लेखनस्पर्धा २०१३ - स्पर्धेचं स्वरूप आणि नियम

Submitted by Admin-team on 9 July, 2013 - 00:20

भूतकाळाच्या खांद्यांवर पाय रोवूनच वर्तमानकाळ उभा असतो आणि आपण आज जे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य जगतो, त्यातून आपला भविष्यकाळ आकार घेत असतो. त्यामुळे भविष्यकाळाकडे नितळपणे पाहता येण्यासाठी गतकाळातल्या घटनांचा, व्यक्तींचा मागोवा घेणं, या घटनांचा व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लावणं, हे नेहमीच श्रेयस्कर असतं.

हे लक्षात घेऊनच रोहन प्रकाशनाच्या सहकार्यानं मायबोली.कॉमनं आयोजित केली आहे एक लेखनस्पर्धा. तुमच्या प्रवेशिका १० जुलै ते २५ ऑगस्ट, २०१३, या कालावधीत देऊ शकता.

****

भारताच्या अर्वाचीन इतिहासाचे दोन भाग पाडता येतील. पहिला टप्पा - १९०० ते १९४७ आणि दुसरा - १९४७ ते २०१३. स्वातंत्र्यानंतरचा आजवरचा इतिहास हा तेजस्वी, पण तणावग्रस्त, विलक्षण संघर्षमय, एकाच वेळी नवे आदर्श आणि नवी आव्हानं निर्माण करणारा असा आहे. या काळात झालेले बदल हे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या बदलांपेक्षा अधिक वेगानं झाले. स्वातंत्र्योत्तर काळातल्या घटनांनी आजच्या तरुण पिढीवर परिणामही अधिक जोरकसपणे केला.

spardhanew.jpg

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लक्ष्य होतं देशबांधणीचं. तीन वर्षांतच भारताला घटना मिळाली, पं. नेहरूंनी अनेक कारखान्यांची पायाभरणी केली. रिझर्व बँकेचं राष्ट्रीयीकरण, अणुऊर्जा आयोगाची, राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना, हरित क्रांती, भारताचा अंतराळ-कार्यक्रम, कुटुंबनियोजन कार्यक्रमाची मुहुर्तमेढ, पंचवार्षिक योजना, शेजारी राष्ट्रांशी झालेली युद्धं, आणीबाणी, निवडणुका, क्रिकेटमध्ये जिंकलेले विश्वचषक, पंतप्रधानांच्या हत्या, 'शोले'सारखे लोकाश्रय मिळवलेले चित्रपट, समांतर चित्रपटांची चळवळ, मदर तेरेसा, अमर्त्य सेन यांना मिळालेलं 'नोबेल', उभ्या राहिलेल्या लोकचळवळी, कामगारांच्या चळवळी, स्त्रियांवरचे अत्याचार, भारतीय विश्वसुंदर्‍या, बाबरी मशिदीचा विध्वंस, दंगली, पूर, अपघात, बॉम्बस्फोट, महागाई, भ्रष्टाचाराविरुद्धची चळवळ, अनेक राजकीय पक्षांचा उदय आणि अस्त, राजकारणाचं गुन्हेगारीकरण अशा असंख्य बर्‍यावाईट घटनांनी या देशाचं प्राक्तन घडवलं.

लेखनस्पर्धेसाठीचे विषय आहेत -

१. स्वातंत्र्योत्तर काळातील (म्हणजे १९४७ सालानंतर) अशी घटना, जिच्यामुळं भारताच्या वर्तमानावर सकारात्मक परिणाम झाला, किंवा भविष्यात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात -

१९४७ ते २०१३ या ६६ वर्षांच्या काळात भारतानं विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली, क्रिकेटचे विश्वचषक जिंकले, अर्थव्यवस्थेचे दरवाजे जगासाठी उघडले, धवलक्रांतीहरितक्रांतीचे प्रयोग केले. त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्यांमुळे आलेली सामाजिक अस्थिरता आणि जागतिक स्तरावरच्या आर्थिक अस्थिरतेचे परिणामही जाणवू लागले. या सगळ्या प्रवासात सकारात्मक घडामोडी किती हे ठरवणं, तसं कठीण. पण अशा अनेक लहानमोठ्या घटनांचा वर्तमानावर सकारात्मक परिणाम झाला, किंवा भवितव्यावर चांगला परिणाम होऊ शकतो, हे नक्की. उदाहरणार्थ, भारताच्या अंतराळकार्यक्रमामुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकर झालं, किंवा मारुती उद्योगाच्या स्थापनेमुळे चारचाकी वाहन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलं, किंवा खुल्या आर्थिक धोरणामुळे घरांत पैसा खेळू लागला, किंवा अरुणा रॉय यांच्या आंदोलनामुळे देशात माहितीच्या अधिकाराचा कायदा सुरू झाला. रिझर्व बँक, दूरसंचार निगम, केंद्रीय लोकसेवा आयोग यांसारख्या संस्थांची स्थापना असो, किंवा बेनेगलनिहलानी यांचे मध्यममार्गी चित्रपट असोत, हुसेन, गायतोंडे, अर्पिता सिंग यांच्या चित्रांच्या विक्रीतून मिळणारे कोट्यवधी रुपये असो, किंवा विश्वनाथन आनंदनं बुद्धिबळात मिळवलेलं विजेतेपद असो, अशा घटनांमुळे काही चांगले बदल निश्चित झाले.

एखाद्या त्रासदायक वाटणार्‍या घटनेतूनही अनेकदा काही चांगलं हाती येतं. उदाहरणार्थ, कामगारांच्या एखाद्या दीर्घकाळ चालणार्‍या संपामुळे त्यांच्या हिताचे काही कायदे अस्तित्वात येणं. असे सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या, किंवा घडवून आणतील असं वाटणार्‍या अशा एखाद्या चांगल्या किंवा वाईट घटनेबद्दल, आणि त्या घटनेच्या दृश्यादृश्य परिणामांबद्दल तुम्हांला या विषयांतर्गत लिहायचं आहे.

२. स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व (राजकारण, समाजकारण, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान, कला व संस्कृती या किंवा या शिवाय इतर कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असलेलं) किंवा संस्था व त्याचं / तिचं कार्य.-.-

भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या वाटचालीत भारताच्या सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, सांस्कृतिक प्रगतीत अनेकांनी हातभार लावला. अशा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा संस्थेबद्दल व तिच्या कार्याबद्दल तुम्हांला लिहायचं आहे. या व्यक्तीचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला असला तरी चालेल, पण तिचं प्रत्यक्ष कार्य हे फक्त स्वातंत्र्योत्तर काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळातही घडलेलं असावं. ही व्यक्ती जगप्रसिद्ध, अनेक पारितोषिकांनी नावाजलेलीच असावी, अशी काही अट नाही. या विषयासाठी लिहिताना त्या व्यक्तीचं कार्य हेच सर्वांत महत्त्वाचं. हेच संस्थेबद्दलही. ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झाली असली, तरी तिचं कार्य स्वातंत्र्योत्तर काळातही झालं असावं.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती (पुस्तक, चित्रपट, नाटक, शिल्प, गाणं, कविता इत्यादी) -

१९४७ सालानंतर अनेक कलावंतांनी, संस्थांनी भारताच्या सांस्कृतिक प्रगतीत मोलाची भर घातली. तुम्हांला अशाच एखाद्या महत्त्वाच्या कलाकृतीबद्दल लिहायचं आहे. ही कलाकृती म्हणजे एखादं पुस्तकं किंवा चित्रपट असू शकेल, एखादी कविता किंवा गाणं असू शकेल, एखादं चित्र किंवा व्हिडिओशिल्पही असू शकेल. ही कलाकृती मात्र भारतीय भाषेतली, भारतात निर्माण झालेली आणि भारतीय कलावंतानंच साकारलेली असावी.


***

या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री. आनंद आगाशे व सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर.


***


स्पर्धेचं स्वरूप -

१. या स्पर्धेसाठी 'लेखनस्पर्धा - २०१३’ हा नवीन ग्रूप १० जुलैला उघडण्यात आला आहे. या ग्रुपाचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे लेखन करता येईल. १० जुलै ते २५ ऑगस्ट, २०१३, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपामध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून तुमचे लेख प्रकाशित करू शकता.

तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून तुमच्या लेखाचा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.

२. धाग्याच्या शीर्षकात लेखाच्या नावाबरोबरच विषयाच्या क्रमांकाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भारतानं पोखरणला केलेल्या अणुचाचणीबद्दल लिहिणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - विषय क्र. १ - ’लेखाचं नाव’- असं असावं.

३. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यानंतर जाहीर केला जाईल.


***

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.

२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी :)) लेखनस्पर्धेच्या तीनही विषयांसाठी कितीही प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी प्रत्येक विषयासाठी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.

३. लेखनस्पर्धेतील तिसर्‍या विषयासाठी केवळ भारतीय भाषांमधील पुस्तकं व भारतात तयार झालेल्या व भारतीय कलाकारांनी निर्माण केलेल्या कलाकृती अपेक्षित आहेत. परदेशी व परभाषीय चित्रपटांविषयी, पुस्तकांविषयी व परदेशी कलाकारांच्या इतर कलाकृतींविषयी केल्या गेलेल्या लेखनाचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.

४. लेखनासाठी शब्दमर्यादा - दोन हजार शब्द.

५. एकदा प्रवेशिका प्रकाशित केल्यानंतर तीत शक्यतो बदल करू नयेत. अगदीच गरज भासली आणि शुद्धलेखनाच्या काही चुका दुरुस्त करायच्या असतील, तर या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. मात्र हे बदल संयोजकांना संपर्कातून कळवावेत.

६. लेखन स्वतंत्र (म्हणजे तुम्हीच केलेलं) असावं व ते इतरत्र कुठेही पूर्वप्रकाशित नसावं. भाषांतरित लेख स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

७. लेखाबरोबर वापरलेली छायाचित्रं प्रताधिकारमुक्त असावीत. प्रताधिकारमुक्त नसलेली चित्रं वापरली असतील, तर ती तशी वापरण्यासंबंधीच्या परवानगीचा व प्रताधिकाराचा लेखात स्पष्ट उल्लेख असावा.

८. लेखात अवतरणं, कवितांच्या ओळी देताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

९. लेखाबरोबर यूट्युब किंवा तत्सम संकेतस्थळांवरील व्हिडिओंचे व इतर कुठल्याही संकेतस्थळांचे दुवे कृपया देऊ नयेत.

याबाबत कुठलीही शंका असल्यास, अथवा प्रताधिकारधारकाची परवानगी मागण्यात मदत हवी असल्यास कृपया मायबोली प्रशासनाशी संपर्क साधावा.

१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

११. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसं मायबोली.कॉमच्या पुण्यातील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी लागेल.


***

लेखनस्पर्धेच्या विजेत्यांना रोहन प्रकाशन, पुणे आणि मायबोली.कॉम यांनी प्रायोजित केलेली बक्षिसं.

प्रत्येक विषयासाठी तीन बक्षिसं दिली जातील.

पहिलं बक्षीस - रोहन प्रकाशनातर्फे रु. १५०० किमतीची रोहन प्रकाशनाची पुस्तकं.

दुसरं बक्षीस - रोहन प्रकाशनातर्फे रु. १००० किमतीची रोहन प्रकाशनाची पुस्तकं.

तिसरं बक्षीस - मायबोली.कॉमतर्फे मायबोली खरेदीचं रु. ५०० किमतीचं गिफ्ट सर्टिफिकेट.


***

मायबोली.कॉमनं यापूर्वी आयोजित केलेल्या रसग्रहण स्पर्धेला आणि गाथाचित्रशती लेखनस्पर्धेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद या स्पर्धेलाही मिळेल, याची खात्री आहे.

स्पर्धेच्या परीक्षकांविषयी व प्रायोजकांविषयी अधिक माहिती इथे मिळेल.


***

स्पर्धेच्या पोस्टरात 'द टाईम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राच्या १५ ऑगस्ट, १९४७ रोजीच्या प्रतीच्या पहिल्या पानाचं छायाचित्र वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल 'टाइम्स इमेज सिंडिकेट' व 'टाइम्स ऑफ इंडिया आर्काइव्हज्' यांचे आभार.


***

संयोजक - अनीशा, चिनूक्स, इन्ना, महागुरु, प्राची, rmd, सशल, वैद्यबुवा

विषय: 

अगदी अगदी अश्विनी के Proud पोस्ट केल्यानंतर क्षणभर थबकले होतेच.. लगेच नवीन प्रतिसाद पाहून ठोका चुकला आणि प्रत्यक्ष वाचून गप्पगार झाले.. Lol

ओ संयोजक, नंदिनीसारखे सुजाण लेखक हवे असतील, तर त्यांच्यापासून असल्या मुदतवाढीच्या घोषणा अदृश्य ठेवता येण्याचे बघा जरा Proud नंदे Light 1 घे!

मुदतवाढ... हम्म ... म्हणजे माझ्यासारख्या आळश्याला उत्तेजनच... लिहेनच असही नाही, पण उगाच आनंद.

हे म्हणजे सायन्टीफिक कॉन्फरन्स सारखं झालं. पेपर सबमिट करायचा आहे, डेट वाढली, पण उपयोग नाहीच... शेवटी पेपर होतच नाही Lol

हे म्हणजे सायन्टीफिक कॉन्फरन्स सारखं झालं. पेपर सबमिट करायचा आहे, डेट वाढली, पण उपयोग नाहीच... शेवटी पेपर होतच नाही Happy

संयोजकांना काही प्रश्न आहेत--
लेखाच्या शेवटी संदर्भसूचि दिली तर चालेल का? तसंच संदर्भ म्हणून काही युट्यूबच्या लिंक दिल्यातर चालतील का? या दोन्ही किंवा एकाचं उत्तर हो असेल तर ते २००० शब्दांमधे धरणार का?

संयोजक,
काही शुद्धलेखनाच्या चुका: १. जाणार्यास, >> जाणार्‍या २. हीरो >> हीरोज् सुधारत आहे.

तसंच ऋणनिर्देश मधे " यु ट्युब वरील अनेल मुलाखती व भाषणं" हे अ‍ॅड करतीय.

अमेरिकन वेळेनुसार २८ ऑगस्टच्या रात्री बारापर्यंत लेख प्रकाशित करता येतील.

नमस्कार संयोजक,
मी माझ्या लेखातल्या शुद्धलेखनाच्या चार/पाच चुका बदलल्या आहेत आणि काही ठिकाणच्या अनावश्यक स्पेसेस काढलेल्या आहे. मजकुर/अर्थाच्या दृष्टीने लेखात एकाही शब्दाचा बदल केलेला नाही. कृपया ह्या बदलांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास नक्की विचारा. धन्यवाद.

नमस्कार,

स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

परीक्षकांनी निकाल आमच्याकडे सुपूर्त केला आहे. मात्र काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याने येत्या काही दिवसांत आम्ही निकाल जाहीर करू.

सहकार्याबद्दल धन्यवाद. Happy

Pages