लेखनस्पर्धा २०१३ - स्पर्धेचं स्वरूप आणि नियम

Submitted by Admin-team on 9 July, 2013 - 00:20

भूतकाळाच्या खांद्यांवर पाय रोवूनच वर्तमानकाळ उभा असतो आणि आपण आज जे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य जगतो, त्यातून आपला भविष्यकाळ आकार घेत असतो. त्यामुळे भविष्यकाळाकडे नितळपणे पाहता येण्यासाठी गतकाळातल्या घटनांचा, व्यक्तींचा मागोवा घेणं, या घटनांचा व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लावणं, हे नेहमीच श्रेयस्कर असतं.

हे लक्षात घेऊनच रोहन प्रकाशनाच्या सहकार्यानं मायबोली.कॉमनं आयोजित केली आहे एक लेखनस्पर्धा. तुमच्या प्रवेशिका १० जुलै ते २५ ऑगस्ट, २०१३, या कालावधीत देऊ शकता.

****

भारताच्या अर्वाचीन इतिहासाचे दोन भाग पाडता येतील. पहिला टप्पा - १९०० ते १९४७ आणि दुसरा - १९४७ ते २०१३. स्वातंत्र्यानंतरचा आजवरचा इतिहास हा तेजस्वी, पण तणावग्रस्त, विलक्षण संघर्षमय, एकाच वेळी नवे आदर्श आणि नवी आव्हानं निर्माण करणारा असा आहे. या काळात झालेले बदल हे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या बदलांपेक्षा अधिक वेगानं झाले. स्वातंत्र्योत्तर काळातल्या घटनांनी आजच्या तरुण पिढीवर परिणामही अधिक जोरकसपणे केला.

spardhanew.jpg

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लक्ष्य होतं देशबांधणीचं. तीन वर्षांतच भारताला घटना मिळाली, पं. नेहरूंनी अनेक कारखान्यांची पायाभरणी केली. रिझर्व बँकेचं राष्ट्रीयीकरण, अणुऊर्जा आयोगाची, राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना, हरित क्रांती, भारताचा अंतराळ-कार्यक्रम, कुटुंबनियोजन कार्यक्रमाची मुहुर्तमेढ, पंचवार्षिक योजना, शेजारी राष्ट्रांशी झालेली युद्धं, आणीबाणी, निवडणुका, क्रिकेटमध्ये जिंकलेले विश्वचषक, पंतप्रधानांच्या हत्या, 'शोले'सारखे लोकाश्रय मिळवलेले चित्रपट, समांतर चित्रपटांची चळवळ, मदर तेरेसा, अमर्त्य सेन यांना मिळालेलं 'नोबेल', उभ्या राहिलेल्या लोकचळवळी, कामगारांच्या चळवळी, स्त्रियांवरचे अत्याचार, भारतीय विश्वसुंदर्‍या, बाबरी मशिदीचा विध्वंस, दंगली, पूर, अपघात, बॉम्बस्फोट, महागाई, भ्रष्टाचाराविरुद्धची चळवळ, अनेक राजकीय पक्षांचा उदय आणि अस्त, राजकारणाचं गुन्हेगारीकरण अशा असंख्य बर्‍यावाईट घटनांनी या देशाचं प्राक्तन घडवलं.

लेखनस्पर्धेसाठीचे विषय आहेत -

१. स्वातंत्र्योत्तर काळातील (म्हणजे १९४७ सालानंतर) अशी घटना, जिच्यामुळं भारताच्या वर्तमानावर सकारात्मक परिणाम झाला, किंवा भविष्यात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात -

१९४७ ते २०१३ या ६६ वर्षांच्या काळात भारतानं विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली, क्रिकेटचे विश्वचषक जिंकले, अर्थव्यवस्थेचे दरवाजे जगासाठी उघडले, धवलक्रांतीहरितक्रांतीचे प्रयोग केले. त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्यांमुळे आलेली सामाजिक अस्थिरता आणि जागतिक स्तरावरच्या आर्थिक अस्थिरतेचे परिणामही जाणवू लागले. या सगळ्या प्रवासात सकारात्मक घडामोडी किती हे ठरवणं, तसं कठीण. पण अशा अनेक लहानमोठ्या घटनांचा वर्तमानावर सकारात्मक परिणाम झाला, किंवा भवितव्यावर चांगला परिणाम होऊ शकतो, हे नक्की. उदाहरणार्थ, भारताच्या अंतराळकार्यक्रमामुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकर झालं, किंवा मारुती उद्योगाच्या स्थापनेमुळे चारचाकी वाहन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलं, किंवा खुल्या आर्थिक धोरणामुळे घरांत पैसा खेळू लागला, किंवा अरुणा रॉय यांच्या आंदोलनामुळे देशात माहितीच्या अधिकाराचा कायदा सुरू झाला. रिझर्व बँक, दूरसंचार निगम, केंद्रीय लोकसेवा आयोग यांसारख्या संस्थांची स्थापना असो, किंवा बेनेगलनिहलानी यांचे मध्यममार्गी चित्रपट असोत, हुसेन, गायतोंडे, अर्पिता सिंग यांच्या चित्रांच्या विक्रीतून मिळणारे कोट्यवधी रुपये असो, किंवा विश्वनाथन आनंदनं बुद्धिबळात मिळवलेलं विजेतेपद असो, अशा घटनांमुळे काही चांगले बदल निश्चित झाले.

एखाद्या त्रासदायक वाटणार्‍या घटनेतूनही अनेकदा काही चांगलं हाती येतं. उदाहरणार्थ, कामगारांच्या एखाद्या दीर्घकाळ चालणार्‍या संपामुळे त्यांच्या हिताचे काही कायदे अस्तित्वात येणं. असे सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या, किंवा घडवून आणतील असं वाटणार्‍या अशा एखाद्या चांगल्या किंवा वाईट घटनेबद्दल, आणि त्या घटनेच्या दृश्यादृश्य परिणामांबद्दल तुम्हांला या विषयांतर्गत लिहायचं आहे.

२. स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व (राजकारण, समाजकारण, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान, कला व संस्कृती या किंवा या शिवाय इतर कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असलेलं) किंवा संस्था व त्याचं / तिचं कार्य.-.-

भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या वाटचालीत भारताच्या सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, सांस्कृतिक प्रगतीत अनेकांनी हातभार लावला. अशा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा संस्थेबद्दल व तिच्या कार्याबद्दल तुम्हांला लिहायचं आहे. या व्यक्तीचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला असला तरी चालेल, पण तिचं प्रत्यक्ष कार्य हे फक्त स्वातंत्र्योत्तर काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळातही घडलेलं असावं. ही व्यक्ती जगप्रसिद्ध, अनेक पारितोषिकांनी नावाजलेलीच असावी, अशी काही अट नाही. या विषयासाठी लिहिताना त्या व्यक्तीचं कार्य हेच सर्वांत महत्त्वाचं. हेच संस्थेबद्दलही. ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झाली असली, तरी तिचं कार्य स्वातंत्र्योत्तर काळातही झालं असावं.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती (पुस्तक, चित्रपट, नाटक, शिल्प, गाणं, कविता इत्यादी) -

१९४७ सालानंतर अनेक कलावंतांनी, संस्थांनी भारताच्या सांस्कृतिक प्रगतीत मोलाची भर घातली. तुम्हांला अशाच एखाद्या महत्त्वाच्या कलाकृतीबद्दल लिहायचं आहे. ही कलाकृती म्हणजे एखादं पुस्तकं किंवा चित्रपट असू शकेल, एखादी कविता किंवा गाणं असू शकेल, एखादं चित्र किंवा व्हिडिओशिल्पही असू शकेल. ही कलाकृती मात्र भारतीय भाषेतली, भारतात निर्माण झालेली आणि भारतीय कलावंतानंच साकारलेली असावी.


***

या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री. आनंद आगाशे व सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर.


***


स्पर्धेचं स्वरूप -

१. या स्पर्धेसाठी 'लेखनस्पर्धा - २०१३’ हा नवीन ग्रूप १० जुलैला उघडण्यात आला आहे. या ग्रुपाचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे लेखन करता येईल. १० जुलै ते २५ ऑगस्ट, २०१३, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपामध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून तुमचे लेख प्रकाशित करू शकता.

तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून तुमच्या लेखाचा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.

२. धाग्याच्या शीर्षकात लेखाच्या नावाबरोबरच विषयाच्या क्रमांकाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भारतानं पोखरणला केलेल्या अणुचाचणीबद्दल लिहिणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - विषय क्र. १ - ’लेखाचं नाव’- असं असावं.

३. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यानंतर जाहीर केला जाईल.


***

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.

२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी :)) लेखनस्पर्धेच्या तीनही विषयांसाठी कितीही प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी प्रत्येक विषयासाठी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.

३. लेखनस्पर्धेतील तिसर्‍या विषयासाठी केवळ भारतीय भाषांमधील पुस्तकं व भारतात तयार झालेल्या व भारतीय कलाकारांनी निर्माण केलेल्या कलाकृती अपेक्षित आहेत. परदेशी व परभाषीय चित्रपटांविषयी, पुस्तकांविषयी व परदेशी कलाकारांच्या इतर कलाकृतींविषयी केल्या गेलेल्या लेखनाचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.

४. लेखनासाठी शब्दमर्यादा - दोन हजार शब्द.

५. एकदा प्रवेशिका प्रकाशित केल्यानंतर तीत शक्यतो बदल करू नयेत. अगदीच गरज भासली आणि शुद्धलेखनाच्या काही चुका दुरुस्त करायच्या असतील, तर या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. मात्र हे बदल संयोजकांना संपर्कातून कळवावेत.

६. लेखन स्वतंत्र (म्हणजे तुम्हीच केलेलं) असावं व ते इतरत्र कुठेही पूर्वप्रकाशित नसावं. भाषांतरित लेख स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

७. लेखाबरोबर वापरलेली छायाचित्रं प्रताधिकारमुक्त असावीत. प्रताधिकारमुक्त नसलेली चित्रं वापरली असतील, तर ती तशी वापरण्यासंबंधीच्या परवानगीचा व प्रताधिकाराचा लेखात स्पष्ट उल्लेख असावा.

८. लेखात अवतरणं, कवितांच्या ओळी देताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

९. लेखाबरोबर यूट्युब किंवा तत्सम संकेतस्थळांवरील व्हिडिओंचे व इतर कुठल्याही संकेतस्थळांचे दुवे कृपया देऊ नयेत.

याबाबत कुठलीही शंका असल्यास, अथवा प्रताधिकारधारकाची परवानगी मागण्यात मदत हवी असल्यास कृपया मायबोली प्रशासनाशी संपर्क साधावा.

१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

११. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसं मायबोली.कॉमच्या पुण्यातील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी लागेल.


***

लेखनस्पर्धेच्या विजेत्यांना रोहन प्रकाशन, पुणे आणि मायबोली.कॉम यांनी प्रायोजित केलेली बक्षिसं.

प्रत्येक विषयासाठी तीन बक्षिसं दिली जातील.

पहिलं बक्षीस - रोहन प्रकाशनातर्फे रु. १५०० किमतीची रोहन प्रकाशनाची पुस्तकं.

दुसरं बक्षीस - रोहन प्रकाशनातर्फे रु. १००० किमतीची रोहन प्रकाशनाची पुस्तकं.

तिसरं बक्षीस - मायबोली.कॉमतर्फे मायबोली खरेदीचं रु. ५०० किमतीचं गिफ्ट सर्टिफिकेट.


***

मायबोली.कॉमनं यापूर्वी आयोजित केलेल्या रसग्रहण स्पर्धेला आणि गाथाचित्रशती लेखनस्पर्धेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद या स्पर्धेलाही मिळेल, याची खात्री आहे.

स्पर्धेच्या परीक्षकांविषयी व प्रायोजकांविषयी अधिक माहिती इथे मिळेल.


***

स्पर्धेच्या पोस्टरात 'द टाईम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राच्या १५ ऑगस्ट, १९४७ रोजीच्या प्रतीच्या पहिल्या पानाचं छायाचित्र वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल 'टाइम्स इमेज सिंडिकेट' व 'टाइम्स ऑफ इंडिया आर्काइव्हज्' यांचे आभार.


***

संयोजक - अनीशा, चिनूक्स, इन्ना, महागुरु, प्राची, rmd, सशल, वैद्यबुवा

विषय: 

आजपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे.
निबंध लिहिण्यासाठी 'निबंधस्पर्धा-२०१३' (http://www.maayboli.com/node/44030) हा ग्रूप उघडण्यात आला आहे. या ग्रूपचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे लेखन करता येईल.
सर्वांना शुभेच्छा Happy

विषय क्र. २ साठी फ़क्त एखाद्या व्यक्तिवरच लिहाणे आवश्यक आहे का एखाद्या संस्थेबाबत लिहिले तरी चालेल ?

Heemangi,

संस्थेबाबत लिहिले तर चालेल. थोड्याच वेळात आम्ही विषय क्र. २मध्ये व्यक्तिमत्त्व किंवा संस्था असा बदल करू.
धन्यवाद.

नियमांबद्दल इतर काही शंका असल्यास अवश्य विचारा.

कृपया विषय क्र. २ बद्दलच एक स्पष्टीकरण करावे की केवळ एकाच व्यक्तीबद्दल लिहावयास हवे की एकापेक्षा अधिक व्यक्तींबद्दल लिहिलेले चालू शकेल?

दीपक भिडे,
त्या व्यक्ती एकत्र कार्य करत असतील, उदा. शंकर-जयकिशन, अभय बंग-राणी बंग, तर अशा दोघातिघा व्यक्तींबद्दल लिहिलेलं चालेल. मात्र निबंधातल्या व्यक्ती एकमेकींशी संबंधित नाहीत, असं नको. संस्थेबद्दलचं स्पष्टीकरण विषयात आहेच.

प्रास्ताविकात स्वातंतत्रोत्तर काळातील घटनांमध्ये पहिलीच 'रिझर्व्ह बँकेची स्थापना' नोंदविली आहे.
रिझर्व्ह बँकेची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी आरबीआय अ‍ॅक्ट अन्वये झाली होती. १९४९ साली ती नॅशनलाइज्ड राष्ट्रीकृत(?) झाली. इंदिरा गांधींनी केलेले खाजगी बँकांचे नॅशनलायझेशन आणि १९९१ नंटर खाजगी बँकांना पुन्हा वाव या गोष्टी प्रास्ताविकात नोंदविता येतील.

रिझर्व बँक ही स्वातंत्र्यपूर्व काळात खाजगी बँक होती. १९४८ साली सरकारनं या खाजगी भागधारकांना मोबदला देऊन त्यांचे भाग विकत घेतले व बॅंकेची पूर्णपणे नव्यानं रचना केली. त्या आधी बँकिंग अ‍ॅक्ट पारित केला गेला होता. हे १९४९च्या राष्ट्रीयीकरणाच्या आधी घडलं. त्या अर्थी 'स्थापना' हा शब्द वापरला आहे.

'ग्रूप' या शब्दाबद्दल इतरत्र चर्चा झाली आहे. त्यामुळे हा बाफ कृपया स्पर्धेसंबंधी काही शंका असतील तर वापरावा, ही विनंती. Happy

तुमच्या निबंधाची वाट बघतोय. Happy

चिनूक्स, लेखामधे ज्या पुस्तकांची अथवा व्यक्तींची मदत घेतली असेल तर संदर्भ म्हणून माहिती देणे अपेक्षित आहे का?
किंवा संदर्भसूची देणे अपेक्षित आहे का?

चिनु़क्स, म्हटलं तर तपशीलातला, संज्ञेच्या वापरातला फरक महत्त्वाचा आहे. म्हटलं तर नाही.

आरबीआयचे संकेतस्थळ म्हणतेय, त्यांचे राष्ट्रीयीकरण १९४९ साली झाले.
रिझर्व्ह बॅंक नॅशनलायझेशन कायद्यानुसार अपॉइंटेड डे १ जानेवारी १९४९. माझा समजुतीनुसार या दिवसापासून आरबीआयची फक्त मालकी बदलली. फन्क्शन्स नाही.
राबीआय अ‍ॅक्ट १९३४ हा तिच्यासाठी आजही अंब्रेला अ‍ॅक्ट आहे, असे त्यांचे संकेतस्थळ म्हणतेय.
असो.

<राबीआय अ‍ॅक्ट १९३४ हा तिच्यासाठी आजही अंब्रेला अ‍ॅक्ट आहे, असे त्यांचे संकेतस्थळ म्हणतेय.>
नाही. कृपया विकिवर किंवा इतरत्र तपशील बघा. Happy

कीस काढतोय असे मलाच वाटू लागले म्हणून लिहिणार नव्हतो. पण वरचा प्रतिसाद वाचून राहवले नाही.

आँ? आरबीआयचे स्वतःचे संकेतस्थळ असताना अन्यत्र का जाऊ?
http://www.rbi.org.in/scripts/AboutusDisplay.aspx# तळाला लिगल फ्रेमवर्कमध्ये अंब्रेला अ‍ॅक्ट्समध्ये १९३४ च्या कायद्याचा उल्लेख आहे.

http://rbidocs.rbi.org.in/rdocs/Publications/PDFs/RBIAM_230609.pdf
याचे शीर्षक RESERVE BANK OF INDIA ACT, 1934 : (As modified up to
February 28, 2009)

"४. लेखनासाठी शब्दमर्यादा - दोन हजार शब्द" अशी एक अट प्रास्ताविकात आहे. त्या अटीसंबंधी दोन पृच्छा -

(१) प्रत्येक निबंधांमधे शब्दगणनेची "दोन हजार" ही मर्यादा लेखक/लेखिकांनी पाळली आहे की नाही हे स्पर्धापरीक्षक अगदी जारीने पहाणार आहेत की रस्त्यांवर जागोजागी उभारण्यात आलेल्या पाट्यांवरच्या वेगमर्यादेचे सुमारे २० ट्क्के उल्लंघन वाहनचालकाने केले असताही तिथपर्यंत त्या उल्लंघनाकडे कानाडोळा करण्याची पाश्चिमात्य देशातल्या पोलीसमंडळींची अलिखित प्रथा स्पर्धापरीक्षक पाळणार आहेत? (आपल्या देशात हमरस्त्यांवर अधूनमधून उभारण्यात आलेल्या पाट्यांवरच्या वेगमर्यादेचे एक किलोइटर इतके उल्लंघन वाहनचालकाने केले असताही त्याला तत्परतेने थांबवून चिरीमिरी उकळायची सुवर्णसंधी पोलीसमंडळी (कधी नाही ती आसपास असलीच तर) दवडत नसतात. लेखक/लेखिकांच्या दृष्टीने तत्सम "सोय" निबंधस्पर्धेच्या बाबतीत असण्याची शक्यता मला अजिबात दिसत नाही.)

(२) "दोन हजार" ही शब्दमर्यादा लेखक/लेखिकांनी पाळली आहे की नाही हे पहाण्याची कोणती पद्धत स्पर्धापरीक्षक वापरणार आहेत? ती पद्धत स्पर्धासंयोजकांनी प्रसिद्ध केली असता तीच पद्धत लेखक/लेखिकाही पाळू शकतील. एरवी "एक, दोन, तीन,.......एक हजार नऊशे सत्त्याण्णव, एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव; हुश्श" ही शब्दमोजणीची बाळबोध पद्धत लेखक/लेखिकांना वापरावी लागणार आहे. शिवाय शब्द मोजताना त्या मोजणीत काही "गलती" तर झालेली नाही ना हे पहाण्यासाठी लेखक/लेखिकांना आपापल्या निबंधांमधल्या शब्दांची आणखी एकदा खानेसुमारी करावी लागणार आहे. (आता समजा त्या दोन मोजण्या एकमेकींशी अचूक जमल्या नाहीत तर त्या दोनींपैकी बरोबर कोणती हे पहाण्याकरता आणखी एकदा मोजणी करण्याचे अरिष्ट लेखक/लेखिकांवर पडेल; आणि मग त्या तीन मोजण्यांपैकी ज्या दोन एकमेकींशी जमतील त्या मोजण्या बरोबर असे मानून आणि देवाचे नाव घेऊन आपापले निबंध स्पर्धापरीक्षकांना सादर करावे लागतील. तीन्ही मोजण्या वेगवेगळ्या झाल्या तर त्यापायी कोसळलेल्या अरिष्टाचा विचार मनात येऊन माझ्या मनात आत्ताच धडकी भरली आहे.)

तेव्हा वरच्या दोन पृच्छांचे महत्त्व स्पर्धासंयोजकांना नक्कीच चटकन्‌ कळेल.

शतशः आभार.

विषय १ च्या संदर्भात : भारतात आयोजित एखादी स्पर्धा, जसे क्रिकेट विश्वचषक, राष्ट्रकुल स्पर्धा या 'घटना' या लेबलखाली बसतील का?
त्यातच भारताच्या अंतराळकार्यक्रमाचा उल्लेख आहे. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. तसेच १९९१ नंतर अंगिकारलेले आर्थिक क्षेत्रातील उदारीकरणाचे धोरण ही एक घटना मानता येईल का?

हे प्रश्न कीस काढण्यासाठी नाही, तर निबंधाचा विषय निवडण्यासाठी विचारत आहे. Happy

१९९१ नंतर अंगिकारलेले आर्थिक क्षेत्रातील उदारीकरणाचे धोरण ही एक घटना मानता येईल का? >> अगदी. माझ्याही मनात तोच प्रश्न आला होता.

तसेच १९९१ नंतर अंगिकारलेले आर्थिक क्षेत्रातील उदारीकरणाचे धोरण ही एक घटना मानता येईल का?>>> नक्कीच मानता येईल. ती एक महत्वाची घटना आहे.

"एक, दोन, तीन,.......एक हजार नऊशे सत्त्याण्णव, एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव; हुश्श" ही शब्दमोजणीची बाळबोध पद्धत लेखक/लेखिकांना वापरावी लागणार आहे. शिवाय शब्द मोजताना त्या मोजणीत काही "गलती" तर झालेली नाही ना हे पहाण्यासाठी लेखक/लेखिकांना आपापल्या निबंधांमधल्या शब्दांची आणखी एकदा खानेसुमारी करावी लागणार आहे. (आता समजा त्या दोन मोजण्या एकमेकींशी अचूक जमल्या नाहीत तर त्या दोनींपैकी बरोबर कोणती हे पहाण्याकरता आणखी एकदा मोजणी करण्याचे अरिष्ट लेखक/लेखिकांवर पडेल; आणि मग त्या तीन मोजण्यांपैकी ज्या दोन एकमेकींशी जमतील त्या मोजण्या बरोबर असे मानून आणि देवाचे नाव घेऊन आपापले निबंध स्पर्धापरीक्षकांना सादर करावे लागतील. तीन्ही मोजण्या वेगवेगळ्या झाल्या तर त्यापायी कोसळलेल्या अरिष्टाचा विचार मनात येऊन माझ्या मनात आत्ताच धडकी भरली आहे.)<<<<<<

Lol हे वाचून फारच मजा वाटली. सुखी आपण याआधी कधीही निबंध्/लेख/कथा/ललित इत्यादि लिहिले नाहीत का? खासकरून अशा स्पर्धांसाठी? दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका लिहिल्या नाहीत का? त्यामधला महत्त्वाचा एका ओळीत सात शब्द मावतात हा नियम विसरलात का?

त्याहूनही काटेकोर हवे असेल तर एम एस वर्डमधे वर्ड काऊंट नावाची एक सोय आहे. तिथे किती शब्द लिहिले गेले आहेत ते अचूक रीत्या दर्शवलेले असते. (वर्ड २००७ पासून तर खाली निळी पट्टी आहे तिथे आपोआप वर्ड काऊंट दिसत राहतो. फाईंड अँड रीप्लेस ही सोय वापरून एखादा विवक्षित शब्द कितीवेळा लिहिला गेलाय तेही मोजता येते. इतकेच कशाला? बहुतेक डॉक्युमेंट प्रोग्रॅम ही सुविधा देतातच. त्यामुळे लेखक्/लेखिका या सुविधेचा वापर नियमितपने करत असतात. उगाचच धडकी बिडकी भरवून घेऊ नका.

(वरील पोस्टमधे सुखी यांच्या क्कॉपी पेस्ट केलेल्या भागात १०६ शब्द आणि मी लिहिलेल्या पोस्टमधे १०९ शब्द असे २१५ शब्द आहेत.) Light 1

:

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

Pages