भक्ति, ज्ञान आणी योग्य प्रयत्न . . . . रामकृष्ण परमहंस

Submitted by परब्रम्ह on 6 July, 2013 - 10:44

एकदा नदीच्या काठावर रामकृष्ण परमहंस अंघोळीला बसायच्या तयारीत होते.

समोर एक मोठं घंगाळं ठेवलेलं होतं ज्यात अंघोळीचं पाणी भरलेलं होतं, त्याबरोबर एक चंबू ( गडवा ) ठेवला होता, ज्याने त्या घंगाळ्यातुन पाणी घेउन अंघोळ करायची असे.

रामकृष्ण त्या समोर एका लहान चौरंगावर बसले होते.

इतक्यात काही लोकांच्या मोठ्याने आपसात बोलण्याचा आवाज त्यांच्या मागच्या बाजुने आला. त्यांनी वळुन मागी पाहिले, ते लोकं नदीकडे निर्देश करुन काही दाखवत होते . . . .

तिकडे पाहिले तो काय ? एक साधु पाण्यावरुन सरळ चालत येत होता इकडच्या किनार्‍यावर.

रामकृष्ण उठुन उभे राहिले, त्यांनी त्या साधुचे स्वागत केले आणी त्यांना आपल्या समोरच बसायला एक चौरंग द्यायला सांगितले.

साधु : मी ईथे कोणा रामकृष्ण परमहंसांना भेटण्यासाठी आलो आहे. कुठे भेटतील ?

रा.कृ : मीच आहे रामकृष्ण, सांगा मी आपली काय सेवा करु शकतो ?

साधु : नमस्कार स्वीकार करावा माझा आणी मला हे सांगावं, कि, तुम्ही ज्या देवीचे पुजारी आहात ती देवी तुमच्या हातुन नैवेद्य आणी जेवण करण्यासाठी रोजच येते तुमच्या सम़क्ष हे खरे आहे का ?

रा.कृ. : हो, हे खरेच आहे . . . .मग त्यात काय झालं ?

साधु : अहो काय झालं म्हणजे ? मी फार वर्षे तपस्या आणी साधना करुन ह्या सिद्धी प्राप्त करुन घेतल्या आहेत, मी पाण्यावरुन चालत जाऊ शकतो, हवेत उडु शकतो, अंतर्धान होऊ शकतो, सर्व जाळुन भस्मसात करु शकतो, पर्जन्य वृष्टी करवु शकतो आणखीन बरेच काही आहे.
पण मला आजपर्यंत तुम्हाला भेटतात तसे कोणी देव-देवता येऊन भेटत नाहित, मला देव भेटला नाही अजुन, तुम्हाला ह्यातले काहिच येत नाही असे ऐकले आहे, सिद्धी प्राप्त नाही, मग असे कसे होऊ शकते ?

रा.कृ. : अरेच्या ! असे होय ? काही हरकत नाही, सांगतो, पण तुम्ही पाण्यावरुन का होईना, चालत आलात, त्याआधी ही आकाश मार्ग असे काही केलेच असेल ? थकवा घालवा, निवांत बसा, पाणी प्या.
सांगतो.
साधुने काही विचार न करता समोर ठेवलेला अंघोळीचा चंबू उचलुन घंगाळ्यातुन पाणी घेणार . . . . तोच रामकृष्ण म्हणाले, अहो त्या गडव्याने नका घेऊ त्याने मी अंघोळ करतो.
तुम्ही तुर्तास ह्या घंगाळ्यातच तोंड लावुन पाणी प्या ना ? अश्याने ते पवित्र सुद्धा होईल तुमच्या मुखस्पर्शाने.

साधुने तसेच केले, थोडे पाणी त्याला पिऊ दिल्यावर रामकृष्णांनी त्याची मान धरुन त्याचे पूर्ण तोंड पाण्यात बुडवले . . . . साधुला हे अनपेक्षित होते, त्याने वर डोके काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तसे होऊ शकले नाही, रामकृष्णांनी पूर्ण ताकद लावुन त्याला दाबून ठेवला, त्याने शेवटी हात पाय झाडायला आरंभ केला तसा रामकृष्णांनी त्याला सोडुन दिला.

डोके वर काढुन जेव्हा साधुने रामकृष्णांकडे क्रोधाने पाहिले, बाकि सर्वांच्या अंगाला घाम सुटला, आता काय होणार ? हा साधु तर आता प्रलय करवणार ईथे.

रामकृष्ण जणु काहिच झाले नसावे अश्या शांतपणे साधुकडे पाहात मिस्किल हास्य करीत उभे होते.

साधु : अरे ! हे तु काय आणी का केलेस ? माझे तुझ्याशी काय एव्हढे शत्रुत्व आहे कि तु माझा जीव घ्यायला प्रवृत्त झालास ?
आत्ताच्या आत्ता तुला मी ईथेच शि़क्षा करतो, पण त्या आधी तू मला कारण सांग असे का केलेस ?

रा. कृ. : सांगतो, तेही सांगतो पण तुम्ही एव्हढे कासाविस का झाले होते ? असे हातपाय का झाडत होतात जोर जोराने ?

साधु : मुर्खा ! माझ्या नाका तोंडात पाणी गेले, श्वास घेणे अशक्य झाले, काहीच दिसेनासे झाले डोळ्यांत अचानक पाणी गेल्यामुळे , आणी मी जर हात पाय झाडुन जीव तोडुन माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नसता, तर मी संपलोच होतो.

रा. कृ. : अरेच्या ? हो का ? पण तुम्हाला तर पुष्कळ सिद्धी प्राप्त आहेत ना ? त्यातली एकही आत्ता कुठल्याच कामी नाही आली ?

साधु : ! ! ! ! ? ? ? ?

रा. कृ. : अहो साधु महाराज हे असे पाण्यावरुन चालणे ह्यासाठी तर ह्या नौका ह्या नदी मध्ये आहेतच कि हो ! अगदी अर्धा आणा दिला कि ते नावाडी हवे तिथे घेऊन जातात नावेतुन, आणी हवेत उडुन काय करायचे आहे ?
असो . . . .

जेव्हढा प्रयत्न तुम्ही तुमचा प्राण वाचविण्यासाठी आणी ज्या एकाग्रतेने तुमची सर्व गात्रे आणी बुद्धी पणाला लावुन केलेत ना ? तसेच आणी तितकेच प्रयत्न ह्या सिद्धी प्राप्तिकरता न करुन जर सरळ भगवंताला प्राप्त करण्यासाठी केले असतेत ना . . . . .
तर शेकडो वर्षे तो आधीच तुम्हाला मिळाला असता . . . . !

साधु सगळे विसरुन झटकन रामकृष्णांच्या पायांवर पडला, अंघोळी आधीच त्यांचे चरण आपल्या पश्चातापाच्या अश्रुंनी धुवुन टाकीत होता.
-----------------------------------------------------

नमस्कार . . . .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉक्रेटिसच्या नावानेही ही गोष्ट ऐकली आहे.

http://my.englishclub.com/profiles/blogs/story-about-success-socrates

परमहंस आणि सॉक्रेटिस एकाच शाळेत शिकत होते वाटतं .....

उद्या हीच गोष्ट मोदी आणि अडवाणी अशी पात्रे घेऊनही सांगता येईल.

Proud

रूपककथा किंवा बोधकथा थोड्याफार फरकाने सर्वत्र असतात. ती जशीच्या तशी घ्यायची नसते. मला आवडली ही कथा.

चित्रकथाच परब्रह्म यानी उभी केली आहे. कथा इथल्या मुशीतील आहे की परक्या.... असा वादाचा मुद्दा होऊ नये वा तसा दाखविण्याचा प्रयत्नही करू नये. शेवटी महात्म्यांच्या {कुठला ते महत्वाचे नाही} कथांना एक प्रकारचे असे गोंदण असते की त्यापासून सर्वसामान्यांनी योग्य तो बोध घ्यावा. मग त्या कथा हिंदु विभूतींच्या असोत वा मुस्लिम वा ख्रिश्चन.

बिरबलच्या कथात बादशहा अगदीच येडबंबू दाखविला जातो आणि आपण त्याला हसतो. प्रत्यक्षात बिरबल हे पात्र अस्तित्वात तरी होते की नाही याबद्दल चर्चांवर चर्चा घडू शकतात. पण त्यात भाग घेण्यापेक्षा तशा रुपककथा वा बोधकथेपासून आपण काय घ्यावे इतपतच महत्वाचे आहे.

वरील कथेत रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीबद्दलही असेच म्हणावे लागेल.

अशोक पाटील

नमस्कार परब्रम्ह ,

छान कथा सांगीतलीत, परमहंस ह्या पदापर्यंत पोहोचलेल्या एका विभुती बद्दल.

असेच एकदा निरुपण करताना किर्तनकार बुवांनी श्री ज्ञानदेव माऊली बद्दल एक गोष्ट
सांगितली होती त्याची आठवण झाली.

चांगदेव महाराज वय वर्षे ४५०, स्वता: ज्ञानेश्वरांच्या भेटीला येणार म्हणून पत्र लिहायला बसले. काही केल्या
पत्राचा मायना जमेना, परम पुज्य लिहाव तर ज्ञानदेवांच वय फार कोवळ, आणि चिरंजीव लिहावे तर
ज्ञानदेवांची महती फार, शेवटी चांगदेवानी कोर पत्रच पाठवल. पत्र हातात पडताच ज्ञानदेव हसून म्हणाले
चांगदेव ४५० वर्षांनंतरही कोरा तो कोराच राहीला !!

४५० वर्षे वय असलेले चांगदेव महाराज हटयोगी होते. "हटयोगी" ज्यांची सत्ता सर्व सजिवांवर चालते.
ज्ञानदेवांना भेटायला निघाले ते वाघावर बसूनच. चांगदेव आपल्याला भेटायला येताहेत म्हंटल्यावर ज्ञानदेवांनाही त्याच स्वागत करायला गावाच्या वेशीवर जाणे भाग होते. ज्ञानदेव आपल्या भावंडा समवेत
भिंत्तीवर बसले आणि आपल्या सामर्थ्याने त्या भिंतीलाच वाहन बनवले. भिंत्तीवर बसुन ज्ञानदेव चांगदेवांच्या स्वागताला गावच्या वेशीवर पोहोचले.

ज्ञानदेवांना त्या स्वरुपात बघताच चांगदेव ज्ञानदेवांच्या चरणी लागले.
ज्याची सत्ता सजिवासकट भिंत्ती सारख्या निर्जिवावर ही चालते त्याचे योग सामर्थ ते काय ?

चांगदेवांना ज्ञानदेव जसे कळले असे आपल्याला कधी कळतील ?

फार छान बोधकथा परब्रह्म जी .

योग्यानी ईश्वर प्राप्ती साठीच सिद्धि-साधना करावी . योग्यानी सिद्धि जरूर प्राप्त कराव्यात. सिद्धि या मोक्षमार्गा वरच्या अडचणी आहेत, असे जरी काहींचे मत असले तरी तसे नसावे .

याचे कारण असे की सामान्य लोकांना अध्यात्म आणि सिद्धि म्हणजे काय ते माहीत नसते, अशा वेळी काही वामाचारी /तांत्रिक साधक सिदधींचा गैरवापर करून अनेक निष्पाप निरपराध व्यक्तींना नाडत असतात . अशा वेळी योगीजनांनी आपल्या यौगिक सिदधींचा वापर करून दुष्ट शक्तींना पराभूत करावयाचे असते .

आज समाजात असे अनेक खोटे गुरु शिष्यांच्या भवसागरात अडचणी आणून त्यातून आपला स्वार्थ साधत आहेत . शिष्यांना दीक्षा/ साधना यांच्या भ्रामक स्वप्नजालात आणि मोहमायेत अडकवून आपला कावेबाज पणा बेमालूम पणे वठवत आहेत .

-संदर्भ कुंडलिनी साक्षात्कार आणि अनुभूति -लेखिका माता निर्मलादेवी

परब्रम्ह,

ही तुमची स्वरचित कथा आहे का?

(नसल्यास 'झेन कथांप्रमाणे' 'तत्वज्ञान' या सदरात देऊ शकाल बहुतेक, असे वाटल्यामुळे विचारले).

(अवांतर - बाकी या कथेत 'धार्मिक' काय आहे?)

स्वामिजी, अन्जू. Kiranu, अशोक , आपणा सर्वांस अनेक धन्यवाद, कथेचे सार पोहोचल्याच्या प्रतिसादाबद्दल . . . .

निलेश रोडे,
सुक्रात चे जास्त माहिती नाही, परंतु ज्या दिवशी आपण कलकत्ता ईथे दक्षिणेश्वर मंदिरात जाणार असाल, त्या दिवशी कळवावे, वरील कथेचे आधार प्राप्त करुन देण्याचे प्रयत्न अवश्य करीन जे तिथे मिळतील.
आणी जाउन आला असाल तर ही गोष्ट माहित नसल्यामुळे म्हणा तुम्हाला ह्याचा आधार पडताळुन घेण्याची गरज पडलीच नसावी.
असो . . . .
आपला विनोदी स्वभाव आवडला . . . . आभार .

डँबिस१,
धन्यवाद, हो नुसती तीच कथा ( इतिहास ) नव्हे तर, ज्ञानेश्वरांच्या जन्मापासुन परब्रह्मात विलीन होईपर्यंत सर्वच ज्ञात आहे, नुसते ज्ञातच नाही तर त्या सर्वंमागची खरी कारणे ही पृथक्करण करुन समजुन घेतली आहेत.
ज्ञानेश्वराचे ज्ञान आणी तुकारामाची भक्ति दोन्हीही कारणांसमेत ज्ञात आहेच . . . .
एक छोटासा फरक एव्हढाच कि ज्ञानेश्वर समाधी मार्गाने परब्रह्मात विलीन झाले आणी तुकाराम तर भक्तिच्या अत्त्युच्च पातळीवरुन सदेहच वैकुंठास गेले.

बाकि . . . . चांगदेवांना ज्ञानदेव जसे कळले असे आपल्याला कधी कळतील ? > > > >
हे कोणाला उद्देशुन विचारीत आहात ते स्पष्ट करावे कृपया. म्हणजे माझ्याकडुन उत्तर देण्यात काही चुक न होवो.

बेफिकीर , नमस्कार !
बरेच दिवसांनी ?
कथा स्वरचित नाही, अथवा रचित ही नाही Happy ,
पण तुम्ही सुचवले आहे तसे खरेच तत्वज्ञान सदरात जाऊ शकली असती ही कथा.
---------------------------------------

तत्त्वज्ञान असेच म्हणावे की दर्शन (दार्शनिक) हे नक्की माहीत नाही
पण बहुधा ही कथा मी आधीही ऐकल्याचे मला आठवते
आपण ही छान प्रकारे कथन केलीत
ही सत्यकथा असावी असा माझा विश्वास आहे

बाकी इश्वरप्राप्तीसाठी काय तळमळ असावी व कसे प्रयत्न असावेत ह्याचा माझा वैयक्तिक आयुष्यात जो विचार आहे तोच पुन्हा या कथेतून बोधरूपाने मला घेता येतो आहे हेच मझ्याकरता महत्त्वाचे बाकी काहीही महत्त्वाचे वाटत नाही

धन्यवाद परब्रम्ह

परब्रम्ह ,

चांगदेवा सारखे ज्ञानदेव मला कळले नाहीत अस म्हणायचे आहे.

तुम्हाबद्दल मी कसे काय बोलणार ?

डँबिस१ ! ( आणी उपस्थीत महानुभाव ),

तुम्ही पण ना ! अहो मी हे म्हणालो नाही कि तुमच्या बद्दल कि माझ्याबद्दल बोलत आहात.

सांगायचा प्रयत्न करतो . . . .

चांगदेवा सारखे ज्ञानदेव मला कळले नाहीत अस म्हणायचे आहे. > > > >

चांगदेवा ( ईथे ह्यांना तो साधु म्हणुन पाहु ), सारखे ज्ञानदेव ( ईथे ह्यांना रामकृष्ण म्हणुन पाहु ), मला कळले नाहीत ( आहेत, कळले आहेत तुम्हाला पण सांगड बसली नाही म्हणा ), अस म्हणायचे आहे.

. . . . चांगदेव / साधु हे अथक परिश्रम करुन भौतिक जगातील सुख सुविधा आपल्या विद्येच्या द्वारा प्राप्त करुन त्याचा सतत उपभोग घेणारे कर्मकांडी ( म्हणुन ते वाईट आहेत असे नाही ) . . .पण उदाहरणार्थ असे म्हणु या कि, वैकुंठाला जायचे म्हणुन निघालेले हे, वाटेत स्वर्ग काय दिसला ? तिथेच रमले आणी वैकुंठास जाणे राहिलेच Happy

ह्यांच्या उलट ज्ञानदेव / रामकृष्ण हे सुद्धा अथक परिश्रम करुन आपल्या विद्येच्या / भक्तिच्या द्वारा सरळ सरळ भगवंतालाच प्राप्त करुन खर्‍या अर्थाने ( म्हणजेच भगवान सर्वत्र आहे, तो सजीव, निर्जीव, सगुण, निर्गुण, सर्व वस्तु-पदार्थ-गोष्टींमध्ये ओतप्रोत भरलेला आहे म्हणजेच त्याच्या शिवाय ह्या चराचरात एकही गोष्ट असत नाही हा भाव-हा आत्मविश्वास - हेच आचरण ), तो सर्वत्र आहे हे जाणुन आपल्या प्राप्त ज्ञान्-विद्या-भक्तिने त्यालाच सगळीकडे अनुभवतात, म्हणुनच ते निर्जीवावरही तेव्हढेच स्वामित्व प्राप्त करु शकतात जेव्हढे सजीवांवर.

परब्रह्म सर्वत्र सारखेच भरुन राहिले आहे म्हणजेच अंतर्‍दृष्टी पारदर्शी झाली . . . .सर्वांमधला परमात्मा ओळखुन आता त्याच्याशीच सरळ संवाद झाला कि गोष्ट सजीव वा निर्जीव ह्याला काय महत्व ? सर्व एकच.

ह्याच ज्ञानाच्या आधारे त्याने रेड्याच्या तोंडुनही ऋचा म्हणवल्याच होत्या ना ?

हेच उत्तर मी थोड्या वेगळ्या रितीने एका दुसर्‍या धाग्यावर दिले होते, कि आजच्या जगातील विमाने, रेडीयो, टीव्ही वगैरे कोणत्या खर्‍या अर्थाने ते देत नाहीत जे वेदांतील ज्ञान देऊ शकते, तर कैक लोकांनी मला फाडुन खायची तयारी केली होती, जाऊदे, असो, माझ्यासाठी सर्वत्र तोच एक परमब्रह्मच भरलेला आहे निरनिराळ्या रुपांत . . . .

अजुन मी तुम्हाला नीट समजावु शकलो नसेन तर कृपया सांगावे, पुन्हा प्रयत्न करीन.

नमस्कार . . . .

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

नमस्कार परब्रम्ह ,

छान कथा सांगीतलीत
नमस्कार स्वामिजी,
>>>आज समाजात असे अनेक खोटे गुरु शिष्यांच्या भवसागरात अडचणी आणून त्यातून आपला स्वार्थ साधत आहेत . शिष्यांना दीक्षा/ साधना यांच्या भ्रामक स्वप्नजालात आणि मोहमायेत अडकवून आपला कावेबाज पणा बेमालूम पणे वठवत आहेत .<<<
आपण म्हणता ते योग्यच आहे. आज तर सगळा बाजार भरला आहे. वीट येतो सगळ्याचा . पण आजही समाजात असेही गुरु आहेत जे तुमचा पाया/तयारी घट्ट ( foundetion) झालेशिवाय तुम्हाला दीक्षा/ साधना/अनुग्रह काहीही देत नाहीत. फक्त असे गुरु स्वतः समोर कधीच येत नाहीत. जेंव्हा तुमची तयारी योग्य
प्रमाणे होते तेंव्हांच ते तुम्हाला जवळ करतात.

आकाश नील,

नमस्कार !

कसे आहात ? बरेच दिवसात ?

आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल, जसे वाटते मनापासुन तसेच लिहिण्याचा प्रयत्न करतो . . . .

रोचक कथा आहे.

या अशा बोधकथांनी , किंवा बाळबोधकथांनी, नक्की काय साधते असा प्रश्न मला लहानपणापासून पडत आला आहे. फक्त त्यातला मेसेज वाचा, बोधकथानायकाची (प्रस्तुत कथेत परमहंस) महती मनात ठसवा आणि पुढे जा. मग ती कथा ऑथेंटिक नाही असे एखाद्याने दाखवले तरीही स्वतःच्या बुद्धीला संदेहग्रस्त करू नका. याने काय साधते नक्की?

जेव्हढा प्रयत्न तुम्ही तुमचा प्राण वाचविण्यासाठी आणी ज्या एकाग्रतेने तुमची सर्व गात्रे आणी बुद्धी पणाला लावुन केलेत ना ? तसेच आणी तितकेच प्रयत्न ह्या सिद्धी प्राप्तिकरता न करुन जर सरळ भगवंताला प्राप्त करण्यासाठी केले असतेत ना . . . . .
तर शेकडो वर्षे तो आधीच तुम्हाला मिळाला असता . . . . !

असे परमहंस म्हणतात, आणि कथा संपते. बोला जैजैरामकृष्णहरी.
हाच मेसेज एखाद्याला प्राण कंठाशी न आणता सरळपणेही देता आला असता किंवा कसे हा मुद्दा तूर्त आपण बाजूला ठेऊ. पण "पुढे काय झाले?" असा प्रश्न तुम्हाला कोणाला पडत नाही का? तो एनॉनिमस साधू कोण होता, त्याने रामकृष्णांचे पाय अश्रूंनी धुऊन झाल्यानंतर त्यांचा उपदेश आचरणात आणला का? तो तसा आणल्याने त्याला ईश्वराचे दर्शन झाले का?
झाले असल्यास ईश्वराचे सदेह दर्शन घेणारा रामकृष्णांसारखा दुसरा पुण्यवान महायोगी आपल्याला नावानेही ठाऊक असू नये असे का झाले?
त्याला एवढे करून ईश्वराचे दर्शन झालेच नसेल, तर वॉज इट वर्थ इट?

असे प्रश्न पडतात. पडावेत.

बाकी रामकृष्ण परमहंस हे एक ओव्हररेटेड गृहस्थ आहेत असे माझे मत आहे.

बाकी रामकृष्ण परमहंस हे एक ओव्हररेटेड गृहस्थ आहेत असे माझे मत आहे.<<< Lol

(माझे हासणे हे सहमती मानले जाऊ नये व असहमतीही)

परब्रम्ह जी सप्रेम नमस्कार .
रामकृष्ण परमहंस एक महान जगदंबेचे भक्त.
जे कि सर्वच स्त्रियांमध्ये (एखादी वेश्या असेल इतकेच काय तर स्वत:च्या पत्नी मध्ये सुद्धा ) जगदंबेला पहात असत .त्या आदी शक्तीच्याच कृपेने ते स्वामी विवेकानंद यांच्या सारखे महान शिष्य घडवु शकले.
अशा या महान सत् पुरुषा च्या,चरणी कोटी कोटी प्रणाम.
परम हंसाच्या ,चरणी कोटी कोटी प्रणाम.
( परम हंस – मनुष्य जन्मताच लज्जा,घृणा,भय,कुल,शील,जात,मान,अभिमान, या अष्ट पाशाच्या आधीन होण्याकडे वाटचाल करू लागतो .परमेश्वराने जन्मताच निरागसता दिलेली असते .मनुष्य मात्र या अष्ट पाशापाई निरागसता हरवून बसतो. निरागसता असल्यासच परमेश्वराचे दर्शन होते .जो या अष्ट पशापासून स्वत:ला वेगळे ठेवण्यात यशस्वी होतो त्यालाच परमहंस म्हणतात.परमेश्वराकडे लहान मुल होऊन जावे .तू आई मी तुझे लेकरू हाच भाव अष्ट पाश तोडू शकतो तो स्वामिनी जोपासून दाखवला,आयुष्य भर निरागसता जोपासली म्हणून त्यांना प्रत्यक्ष काली मातेचे दर्शन होत असे.हे अष्ट पाश स्वमिनीच सांगितले आहेत. )
.आपण आपल्याला शक्य तेवढ्या स्वामींच्या अशा दुर्मिळ कथा इथे लिहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या वाचन करून धन्य होऊ.||जय जगदंब||

अनेकदा बोधकथा या प्रभावी करण्यासाठी त्यात मालमसाला भरला जातो.काही बाबतीत त्याचा उपयोग देखील होतो.

ज्ञानेश,

>> बाकी रामकृष्ण परमहंस हे एक ओव्हररेटेड गृहस्थ आहेत असे माझे मत आहे.

तुमच्या मताचा आदर आहे. श्रीरामकृष्णांचा रेट ठरवतांना त्यांचा पट्टशिष्य विवेकानंद याचे कार्य तुम्ही विचारात घेतले असेल अशी अपेक्षा आहे.

आ.न.,
-गा.पै.

ज्ञानेश,

<<<<बाकी रामकृष्ण परमहंस हे एक ओव्हररेटेड गृहस्थ आहेत असे माझे मत आहे>>>

मग तुमच्या मते महात्मा गांधीजी सुद्धा एक ओव्हर रेटेड गृहस्थच असतील !!

विनायक,
सप्रेम नमस्कार,
आभारी आहे, ह्या कथेचे सारांश उमजुन घेण्यासाठी.
आपण विदीत केलेली परमहंस पदाची व्याख्या ही सर्वतोपरी सार्थ आहे.मा कालीच्या कृपेने रामकृष्ण ज्या पातळीवर पोहोचु शकले ती आपणा सर्वाना ज्ञातच आहे, त्या काली मातेला अनंत प्रणाम . . . . आपल्या सर्वां वरही ती कृपा करो, त्या जगन्मातेसाठी आपण सर्वच सारखेच आहोत.
अश्या दुर्मिळ कथा आपणा सर्वांबरोबर वाटुन घेण्याचा प्रयत्न मी अवश्य करीनच.
आपल्या प्रतिसादाने आमचा उत्साह द्वीगुणित होतो, कृपया आपल्या विचारांचे ओघ असेच वाहात राहु द्यावेत ज्यामुळे आम्हालाही त्यात आनंद वाटतो वाचतांना.

प्रकाश,
प्रतिसादाबद्दल आभारा आहे.

गा.पै.,
नमस्कार, प्रतिसादाबद्दल फार आभारी आहे, तुमचे म्हणणे अतिशय सत्य आहे.

विनायक. दि.पत्की.,

तुमचे परमहंस या शब्दाचे विवेचन आवडले. ज्याला तुम्ही निरागसपणा म्हणता त्याला बाळदशा म्हणता येईल का? ज्ञानेश्वरीतल्या एका श्लोकात हा शब्द सापडला :

वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥

इथे माउलींनी कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाचे होणारे रूपांतरण वर्णिलेले आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्री. गामा_पैलवान ,
सप्रेम नमस्कार ,
ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यावर विवेचन करण्याची माझी लायकी नाही.

मात्र गीतेत वर्णन केल्याप्रमाणे ----संयमित,भयरहित,मनाने कामजीवनापासून पूर्ण पणे मुक्त होऊन परमेश्वर प्राप्ती हेच मनुष्याच्या जीवनाचे परम लक्ष असावे.योगाभ्यास हा अंतर्यामी परमेश्वराचा शोध घेण्यासाठी केला जातो.मनुष्याने मन संयमित करण्याचा म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्ती टाळण्याचा ज्यामध्ये मैथुन जीवन प्रमुख आहे याचा अभ्यास करणे आवशक आहे यात प्रामुख्याने ब्रम्हचर्याचे महत्व आहे .या ब्रम्हचर्याचे प्रशिक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासुंच म्हणजे जेव्हा मनुष्याला मैथुन जीवनाचे ज्ञान नसते तेव्हा पासूनच होणे आवशक असते (हीच बाळदशा असावी )

हा पाया असल्या शिवाय कोणी हि मनुष्य योगा मध्ये प्रगती करू शकत नाही व हृदय स्थित परमेश्वराचा साक्षात्कार हे योगाभ्यासाचे उद्दिष्ट आहे.
( जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी नियम बद्ध शारीरिक संबंध ठेवून गृहस्थ जीवनाच्या नियमाचे पालन करतो त्या मनुष्याला सुद्धा ब्रम्हचारी म्हटले जाते.)

मात्र निरागसता म्हणजे एक परमेश्वर च सत्य बाकी सर्व माया हे पक्के जाणून जो विनाकारण तर्क वितर्क करण्यात परमेश्वराने दिलेला अमुल्य वेळ,आणि इतर मोल्यवान संपत्ती इतरत्र खर्च न करता त्याच्या अनुसंधानातच राहण्याची इच्छा ठेवतो.तो ठेवील त्यात त्याचे समाधान टिकून च असते त्याला बाह्य जगतात घडणाऱ्या घडामोडी बाबत एकच दृष्टी असते ती म्हणजे परमेश्वरी इच्छा त्यामुळे तो ज्या प्रमाणे लहान मुल खेळ खेळते पण मनातून मात्र सतत फक्त आईचाच विचार ठेवते कंटाळा आला कि आई च्या नावाने टाहो फोडते ती दिसली कि तिच्या कुशीत पुन्हा सर्व क्षणार्धात विसरून पण जाते. एक आई हाच पक्का विचार त्याच्या डोक्यात असतो तो सोडून इतर विचार पालापाचोळ्या सारखे तो उडवून देऊ शकतो,कु विचार तर त्याच्या मनात शिवत पण नाही,कशाचीच काळजी पण नसते.आई वर असणाऱ्या पूर्ण विश्वासाने तो निर्धास्त असतो.साधू संत आपल्याला हाच निरागस पणा अंगी बाळगण्याचा सतत उपदेश करत असतात

अशी निरागसता आयुष्यभर जोपासता येऊ शकते. ती कला आहे ती ज्याला साधली त्यानेच खरा परमार्थ साधला. असे थोडक्यात माझे गुरु परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शब्दात निरागसतेचे वर्णन करता येईल.

बाकी रामकृष्ण परमहंस हे एक ओव्हररेटेड गृहस्थ आहेत असे माझे मत आहे
>>
कीव येते तुमची आणि तुमच्या अल्पबुद्धीची!!

नामण दिवा,

अहो ते इल्बिसचे कर्म बंधू आहेत. याच्यापेक्षा जास्त काय अ पेक्षा ठेवणार ?

त्यांना सर्व हिंदु लोक ओव्हर रेटेडच वाटणार, ईथे यायच एकदा पिंक टाकायची मग वळून बघायच नाही,

यांना ज्ञानेश्वरही ओव्हर रेटेड च वाटतील पण नाव मात्र तसेच ठेवले आहे.

Pages