अजिंठा: भाग १

Submitted by डोंगरवेडा on 3 July, 2013 - 23:13

भारतीय शिल्पकलेतले अत्त्युच्च वैभव पाहायला वेरूळ, अजिंठा इकडे जायची कितीतरी वर्षापासूनची इच्छा होती. शेवटी मित्रांबरोबर ऑक्टोबरमध्ये जायचा बेत नक्की झाला. पण ऐनवेळी टपकलेल्या हापिसच्या कामांमुळे शेवटी एकदाचे डिसेंबरमध्ये निघालो.

१५ तारखेला शनिवारी पहाटे लवकर धन्याच्या कारने मी, किसनदेव आणि दिनेश निघालो ते १०.३०/११ च्या सुमारास औरंगाबादेस पोचलो. बिरुटे सर नगर फाट्यावर आले होतेच. मग त्यांच्यासवे खुल्दाबाद इथली औरंगजेबाची कबर, भद्रा मारूती आदी पाहून वेरूळ लेण्यांची मनसोक्त भटकंती झाली (त्यावर नंतर लिहिनच). त्या रात्री वेरूळ येथेच मुक्काम करून दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी वेरूळ - फुलंब्री -सिल्लोड मार्गे अजिंठ्याला जाण्यास निघालो. वेरूळ ते अजिंठा साधारण १०० किमी आहे. रस्ता चांगलाच आहे. साधारण १.५ तासात अजिंठा व्ह्यू पॉइंट फाट्यापाशी आलो. इथून अजिंठा व्ह्यू पॉइंट ८ किमीवर आहे. या पॉईंटवरून एका इंग्रज अधिकार्‍याला दगडधोंडाच्या ढिगार्‍यात लपलेल्या अजिंठा लेणीचे दर्शन झाले आणि हा अमूल्य ठेवा जगासमोर आला. तर सरळ रस्त्याने फर्दापूरमार्गे अजिंठा १६ किमी पडते. फर्दापूरला गाडी पार्क करून पुढे अजिंठा लेणीपर्यंत सरकारी सीएनजी वाहनाने पोहोचावे लागते. आम्ही अजिंठा ह्यू पॉइंटला जायचे ठरवले. आणि थोड्याच वेळात तिथे पोहोचलो. पॉइंटवरून संपूर्ण अजिंठा लेणीचा समूह एकाव वेळी नजरेच्या टप्प्यात येतो. घोड्याच्या नालासारखा डोंगराचा आकार, वाघूर नदीच्या प्रवाहाने केलेले डोंगराचे दोन भाग व पलीकडच्या भागात खोदलेला अजिंठा लेणीचा समूह त्यातील विहारांचे स्तंभ व चैत्यगृहांच्या कमानीमुळे अतिशय प्रे़क्षणीय दिसतो.

पॉइंटवरूनच अजिंठालेणीकडे जाता येते. इथून उतरले तर फर्दापूरचा मार्ग व सीएनजी वाहनप्रवास टाळता येतो. दरीत उतरायला उत्तम पायर्‍या बांधल्या आहेत. गाडी पॉइंटच्या पार्किंगमध्ये लावून आम्ही पायरीमार्गाने उतरायला सुरुवात केली. १० मिनिटातच एक टप्पा उतरून एका पठारावर आलो. इथून अजिंठ्याच्या तुटलेल्या कड्यांचे भेदक दर्शन होते. इथून परत पायर्‍या उतरून त्यापुढील लोखंडीपुलावरून वाघूर नदी पार करून आम्ही थेट अजिंठा लेणीच्या पुढ्यात पोचलो. प्रत्येकी १० रूपयांचे प्रवेश शुल्क भरून आम्ही ९ व्या क्रमांकाच्या चैत्यगृहापाशी आलो.

अजिंठा व्ह्यू पॉइंटवरून दिसणारे अजिंठा लेणीसमूहाचे मनोरम दृश्य

१.
a

२.
a

अजिंठा लेणी ही विविध कालखंडात खोदली आहे. इथले सगळ्यात जुने लेणे इस.पू. २०० वर्षापूर्वी खोदले गेले तर सर्वात अलीकडचे साधारण ५ व्या ते ६ व्या शतकात. सातवाहन, गुप्त आणि वाकाटकांच्या कारकिर्दीत येथली लेणी खोदली गेली. सुरुवातीच्या काळात खोदलेली लेणी ही हीनयानकाळातली असून त्यात साधे चैत्यगृह आणि विहार आहेत तर  नंतरच्या काळात खोदलेली महायानपंथीय लेणी सालंकृत स्तूप आणि भव्य विहारांनी सजलेली आहेत. अजिंठ्याची जगप्रसिद्द चित्रे असलेले विहार महायानकाळात खोदले गेले, साहजिकच ती लेणी ह्या समूहाच्या दोन्ही टोकांना आहेत तर मधली लेणी ही सर्वात प्राचीन आहेत. म्हणजेच ९,१० क्रमांकाची लेणी ही अतीप्राचीन तर १,२ आणि २५, २६ हे सर्वात अलीकडील. यातले १ व २ क्रमांकाची लेणी हे विहार असून यात पद्मपाणी, वज्रपाणी, मैत्रेय आदी बोधिसत्वांची अतिशय देखणी चित्रे तसेच जातक कथांतील दृश्ये रंगवलेली आहेत तर २५, २६ क्रमांकाच्या लेण्यांमध्ये बुद्धाच्या जीवनातील प्रसंग मूर्तीरूपात कोरलेले आहेत.
अजिंठा लेणीसमूहात एकूण ४ चैत्यगृह तर उरलेले सर्व विहार आहेत. कड्याच्या वरच्या भागात अजून एक चैत्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो पण फक्त अश्वनालाकृती वातायन तयार करून इतर काम अर्धवट सोडलेले दिसते.

अजिंठ्यातील बहुतेक विहार हे महायानकाळातील असल्याने त्यांमध्ये बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत.  ओसरी, स्तंभयुक्त सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृहात सिंहासनारूढ अथवा कमळपुष्पावर विराजमान झालेली बुद्धमूर्ती अशी यांची सर्वसाधारण रचना. एका परीने मंदिरनिर्माणाची ही पहिली पायरीच.  इथल्या पहिल्या व दुसर्‍या क्रमांच्या विहारात अजिंठ्यातली जगप्रसिद्ध चित्रे रंगवलेली आहेत तिथेच आता आपण जाउ.

लेणी क्र. १:
हा विहार वाकाटक राजा हरिषेण याने खोदविला. लेणी क्र. १६ व १७ याच राजाचा अमात्य वराहगुप्त याने स्वतःच्या खर्चाने खोदविली असा शिलालेख त्या लेण्यांमध्ये आहे. साहजिकच आपले अमात्य लेणी खोदवून घेत असता राजा कसा मागे राहील. खुद्द हरिषेणच हा विहार खोदवून घेत असल्याने यातील काम राजाच्या दर्जाला साजेसे असे नेत्रदीपक झाले आहे.
ह्या प्रशस्त विहाराच्या ओसरीत सालंकृत स्तंभ असून स्तंभांवर तसेच ओसरीच्या भिंतीवर बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग, हत्ती, घोडे इ. पशू कोरलेले आहेत तसेच नक्षीदार कलाकुसर केली आहे.  ओसरीतले छत  आणि भिंती पूर्वी रंगवलेल्या होत्या पण आजमितीस मात्र त्यांचे लहानसे अवशेष दिसतात.  रविवार असल्याने गर्दी होती.  एकावेळी ठरावीक लोकआंनाच आत सोडत असल्याने १० मिनिटे रांगेत उभे राहिल्यावरच आतमध्ये प्रवेश झाला.
प्रशस्त सभामंडप,  स्तंभावरचे अतिशय देखणे कोरीवकाम, समोरील गर्भगृहातील बुद्धाची प्रसन्न मूर्ती आणि सभामंडपातील सर्वच बाजूंना रंगवलेली चित्रे अशी याची रचना.
भिंतीवरच्या चित्रांमध्ये जातक कथांमधली घटना कोरलेल्या आहेत.
शिबी राजाची कथा, महाजनक जातक कथा, बुद्धशत्रू मार याचा बुद्धाला मारायला येणारा प्रसंग आणि पद्मपाणी, वज्रपाणी बोधीसत्वाच्या प्रतिमा आदी चित्रे या विहारांत रंगवलेली आहेत.

३. लेणी क्र. १ बाहेरून
a

४. ओसरीतील स्तंभांवरील कोरीव काम
a

५.
 a

६.
 a

महाजनकाच्या कथेत महाजनकाच्या राज्यारोहणाचा प्रसंग चित्रित केला आहे. राजक्न्या शिवालीच्या विविध कूटप्रश्नांना उत्तरे देऊन महाजनक तिचे मन जिंकतो आणि मिथिलेचा राजा बनतो.
७.
a

८. वास्तविक इथे राणी शिवाली अर्धावस्त्रांकिता दिसत असली तरी तिने अतिशय तलम असे उत्तरीय परिधान केले आहे.

a

इथे महाजनकाच्या राज्यारोहणप्रसंगी चाललेल्या नृत्याचे चित्रण केले आहे. दोघी जणी बासरी वाजवीत असून एक जण ढोलावर ताल देत आहे तर वाद्यांच्या तालावर चाललेल्या नर्तिकेचे नृत्य इतरेजणी कुतूहलाने आणि आनंदाने बघत आहेत. सर्वांनीच सुंदर अलंकार परिधान केले आहेत.

९.
a

तर एका चित्रामध्ये बुद्धशत्रू माराचा प्रसंग चित्रित केला आहे.
गौतम बुद्ध ध्यान करत बसला आहे तर त्याचा शत्रू मार एका हातात तलवार घेऊन त्याला मारण्यासाठी येत आहे. मनुष्याच्या अंगातले षडरीपू, त्याच्यातले विकार म्हणजेच हा मार. गौतम जणू त्या अंतस्थ विकारांशी लढून बुद्धपदाला पोहोचलेला आहे.
१०.
a

दुसर्‍या बाजूच्या भिंतींवर राजाच्या दरबारातले काही प्रसंग चित्रीत केले आहेत.
११.
a

१२.
a

इथली सर्वात लक्षवेधी चित्रे आहेत ती पद्मपाणी आणि वज्रपाणी बोधीसत्वांची. ती आहेत गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना.
ही दोन्ही बुद्धाचीच रूपे.

पद्मपाणी बोधीसत्व अतिशय शांत मुद्रेचा, गोर्‍या रंगाचा दाखवलाय. डावा हात कमरेवर तर उजव्या हातात कमळ, मस्तकी मुकूट, गळ्यांत मोत्यांचा हार व त्यात मधोमध ओवलेला निळ्या रंगाचा तेजस्वी खडा. त्याची देहबोली अतिशय संयमित आहे.  जणू शांतीचे प्रतिक असलेले कमळ हातात धरून तो सर्व जनांना अभय देतोय.  त्याचे अनुयायी त्याच्यासमोर उभे आहेत.
तर दरवाजाच्या दुसर्‍या बाजूला वज्रपाणी बोधीसत्वाचे चित्र कोरलेले आहे.
हा काळसर वर्णाचा असून याचा डावा हात कमरेपाशी तर उजव्या हातात याने वज्र धरलेले आहे. ह्याच्याही मस्तकी मुकूट असून ह्याची मुद्रा कठोर दाखविली आहे. याच्या देहबोलीतून याची ताकद प्रतीत होते.

पद्मपाणी आणि वज्रपाणी अशा खुबीने रंगवलेले आहेत जणू ते एकाच व्यक्तीचे दोन चेहरे आहेत. एकाचे शांत रूप तर दुसर्‍याचे कठोर.  जणू एक संयमित स्वभावाची व्यक्ती आरशासमोर उभे राहून आपलेच  उग्र रूप आरशात पाहात आहे असाच भास इथे होतो.

१३. पद्मपाणी
a

१४.
a

१५. वज्रपाणी
a

१६.
a

तर छतावरसुद्धा देखणे रंगकाम केले आहे.

१७.
a

विहारातल्या स्तंभांवर काही लक्षवेधी शिल्पे कोरलेली आहेत. बुद्धजीवनांतील काही प्रसंग, भारवाहक यक्ष यांच्या जोडीलाच इथल्या एका स्तंभावर एक अनोखे शिल्प कोरलेले दिसले. चार हरीण परंतु चौघांचे शिर एकच अशी अनोखी रचना इथे केलेली दिसली. अतिशय प्रमाणबद्ध असे हे शिल्प.

१८.
a

हा विहार बघून आम्ही बाहेर आलो व लेणी क्र. २ मध्ये शिरलो.

लेणी क्र. २
या विहाराची रचनापण पहिल्या विहारासारखीच.
ओसरीतील भिंतींवर इथेही देखणे कोरीवकाम केले आहे.

१९.
a

२०.
a

ह्या विहारातील छताची रंगसंगती तर लाजवाब आहे.
२१.
a

२२.
a

२३.
छतावरच रंगवलेली एक जोडी
a

२४.
a

इथल्या भिंतीवर जातक कथांमधील काही दृश्यांचे चित्रांकन केले आहे.

त्यातले एक म्हणजे बुद्धाचा श्रावस्तीमधला चमत्कार ज्यात बुद्धाने स्वतःला १००० बुद्धांमध्ये रूपांतरीत केले.
२५.
a

इथल्या काही पॅनेल्सवर नागराजा नंदाच्या राज्यारोहणाचे प्रसंग रंगवले आहेत.
२६.
a

२७.
a

उजवीकडच्या भिंतींवर कोरलेली चित्रे तर त्रिमितीय दृश्यांचा आभास करू देतात. इथे गौतमाचा जन्मप्रसंग चित्रीत केला आहे.

२८.
a

२९.
a

३०.
a

३१.
a

३२. माता मायादेवीला नवजात गौतमाला हातात घेऊन उभी आहे.
a

३३. विहारातील स्तंभावरचे नाजूक नक्षीकाम आणि ते छत तोलून धरणारे भारवाहक यक्षिणी
a

३४.
गर्भगृहातील पद्मासनावस्थेत बसलेली बुद्धाची प्रसन्न मूर्ती
a

क्रमशः

अजिंठा गुहेत कॅमेरा फ्लॅशचा वापर करण्यास मनाई असल्याने वरील सर्व फोटो अतिशय मंद प्रकाशात फ्लॅशचा वापर न करता काढलेले आहेत त्यामुळे काही फोटो हलल्यासारखे आले आहेत. प्रत्यक्षात यातली चित्रे जास्त तेजस्वी आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो खूप सुरेख आलेत.

गेल्या वेळी आम्ही गेलो असताना रिस्टोरेशनचे काम चालू होते. त्यामूळे काही लेणी बंद होती आणि चित्रं असलेल्या गुहांमध्ये कसलेही फोटो काढण्यास मनाई होती. यावेळी पोरांबरोब जायचं होतं, पण फक्त वेरूळलाच जाणं झालं. अजिंठा नेक्स्ट टाइम. Happy

धन्यवाद बी.
हे रंग जसेच्या तसेच आहेत. दीड हजार वर्ष जुने.
अजिंठा लेणीपाशी खायची सोय नाही. फर्दापूर गावात काही हॉटेल्स आहेत. अजिंठा लेणीत फिरताना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र कूलर्स, नळ वगैरे बांधून चांगली सोय केलेली आहे.

अरे वा. सावकाश वाचणार आणि पहाणार. तीन वेळा पाहिली आहेत मी अजिंठा आणि वेरुळची लेणी. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसते.

धन्यवाद लिहिल्याबद्दल आणि फोटोंबद्दल. पुढचे भागही येउंद्या लवकर.

एन.सी.सी मधे असताना इथे कॅम्प होता.. तेव्हा काही चित्र झेपलीच नव्हती..
एका विहाराचा फोटो अपेक्षित होता... जो ह्यात नाहिये.. कदाचित तुम्ही पुढे टाकाल.

छान आलेत फोटो ( आत फोटो काढायची परवानगी आहे, हेच माहीत नव्हतं मला ).
मला जायची खुप इच्छा आहे पण अजून जमलेलं नाही. रिस्टोरेशन जमत नसेल ( कायदेशीर / तांत्रिक अडचणींमूळे ) तर निदान एखाद्या कलाकाराने या चित्रांच्या पूर्ण आकारात नकला तरी करायला हव्यात. ऑलरेडी आहेत का कुठे ?

रिस्टोरेशनचं काम पूर्ण झालं आहे बहूतेक. ७-८ वर्षापुर्वी कोरियन सरकारच्या मदतीने रिस्ट्रोरेशनचं काम चालूये असं कळलं होतं.

मस्त. तुम्ही व्ह्यू पॉइंटवरून खाली गेलात हे मस्तच झालं.
१८१९ साली जॉन स्मिथ नावाचा ब्रिटिश अधिकारी शिकार करत असताना वाघ दरीत गेला म्हणून त्याच्या मागावर या व्ह्यूपॉईंटवर आला. तिथून खाली बघितल्यावर त्याला लेणी क्र. १० ची चैत्यकमान दिसली आणि शिकार सोडून तो कुतुहलाने हे काय आहे हे पहायला खाली दरीत उतरला. अशा तर्‍हेने अजंठा (या नावाचं एक छोटंसं गाव या परिसरात आहे) लेण्यांचा शोध लागला. त्याने त्या लेण्यात स्वतःचं नाव आणि शोधाची तारीख भिंतीवर कोरून ठेवली आहे.
(अर्थातच, स्थानिक लोकांना लेण्यांचं अस्तित्व माहित होतं)

@वरदा: स्वतःचे वाहन असेल तर व्ह्यु पॉइन्टवरूनच उतरणे जास्त सोयीचे आहे. जेमतेम १५/२० मिनिटात दरी उतरून थेट अजंठा लेणीच्या पुढ्यातच उतरता येते. उतरायला उत्तम पायर्‍या बांधलेल्या आहेत. नपेक्षा सरळ रस्त्याने गेलात तर फर्दापूरला वाहन लावून बराच काळ पर्यावरणपूरक बस येण्याची वाट बघावी लागते.
बाकी स्मिथनेअसे काही कोरवून घेतले आहे हे माहित नसल्याने ते मात्र पाहिले गेले नाही.

@दिनेशः लेण्यांचे रिस्टोरेशनचे काम बरेचसे पूर्ण झाले आहे. सुरक्षित रसायनांचा वापर करून चित्रे बरीचशी स्वच्छ केली आहेत. मला आठवते एका इंग्रज अधिकार्‍याने (बहुधा स्मिथच) येथील सर्व चित्रांच्या नकला केल्या होत्या. पण नकला घेऊन इंग्लंडला जाणारी बोट समुद्रात बुडाली आणि नंतर असे प्रयत्न केले गेले नाहीत.