आमंत्रण - एक कविता

Submitted by मामी on 3 July, 2013 - 06:53

आमच्या मुलीला आम्ही पंचवीस तोळे सोनं चढवणार आहोत
सोबत जावईबापुंचा मानपान आहेच
वरमाईचा शब्दही खाली पडू देणार नाही आम्ही
आमची ऐपत आम्ही मुलगी झाल्यापासून खूप वाढवून ठेवली होती
याच दिवसाकरता....

तुम्ही लग्नाला नक्की यायचं हं
आपल्या लेकी दोघी एकत्रच वाढल्या
आमची लेकही तुम्हाला तुमच्या लेकीसारखीच
म्हणूनच नक्की यायचं लग्नाला.....
आमची मुलगी म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!

आता ती माहेरचं घराणं मागे टाकून नविन घराण्याचा उंबरठा ओलांडणार
मग ती बायको, सून, भावजय, जाऊ, वहिनी अशा विविधरंगी भुमिकांत रमून जाणार
आणि हो, आईसुद्धा!
निदान एका कुलदीपकाची आई होण्याचं भाग्य तिला लाभावं
असा आशीर्वाद आपण सगळ्यांनी मिळून तिला देऊयात. कसं?

आता माहेरपण कधीमधी चुटपुटतंच
बाकी दिल्या घरात दुधातल्या साखरेसारखं मिसळून जाणं
काही झालं तरी सासर-माहेरची प्रतिष्ठा जपणं आता तिच्याच हातात
भरल्या घरची लक्ष्मी होणार आमची लेक .....

आणि हो, लग्नाला तुमच्या नाठाळ मुलीलाही नक्की घेऊन या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला काव्याच्या रूपाबद्दल स्वरूपाबद्दल विचारले गेलेले प्रश्न नक्कीच अवांतर नाहीत अनावश्यक व असभ्यही नाहीत

आपला त्यावरील दृष्टीकोन समजल्यास काव्यरसिकांचा ( जे खरोखर आहेत ते) फायदा होईल

आपला नम्र
~वैवकु

कृपया, या धाग्यावर अनावश्यक आयडींना / अवांतर पोस्टींना कोणीही उत्तरे देऊ नयेत.
>>>
बापरे! हे माझ्यासाठी आहे की काय? Happy
कवीला त्याच्या कवितेतून काय सुचवायचे आहे हे कवीकडूनच जाणून घेणे हा फार सुंदर आणि समृद्ध करणारा अनुभव असतो असे अनुभवले आहे. म्हणून विचारले की आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे Happy

मामी
डोक्यावरून जावी असं तुम्ही लिहीलेलं नाही. शेवटच्या ओळीपर्यंत आहे त्यात सुखी समाधानी राहणारे समाजाचे प्रातिनिधीक रूप रेखाटले आहे. आणि या सर्वांना नाकारणारी मुलगी तिला नाठाळ म्हटले आहे. कदाचित हे सर्व पाहून ती ही जागेवर येईल हा समाजाचा दृष्टीकोण..

( उलगडून सांगायचं तर व्यवस्था नाकारणा-या बंडखोरीला व्यवस्थेत परतण्याचं आमंत्रण आहे हे )

आमची मुलगी म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!

अहो असे म्हणू नका! ती कायम तुमचीच मुलगी असेल. अजून हजार वर्षांनी कुणि इतिहास लिहीला तरी म्हणतील की ती तुमची मुलगी! नाव बदलले म्हणून रक्ताची नाती तुटतात का? त्यातून तुम्ही तिच्या आई ना?
इथे तर म्हणतातच -

A son is a son until he takes a wife,
but a daughter is a daughter for life!

नाही बेफीजी अगदीच तसे नाही आहे इथे जरा सुसंस्कृत व शिस्तबद्ध भाषेत चर्चा चालली आहे असे अजूनतरी मलातरी वाटते आहे
कवयित्रि आपल्या रचनेच्या कवितेपणाबाबत नेमक्या गंभीर दिसत आहेत इथे
व वाचकही काही नवीन आले आहेत इथे त्यानाही ही कविता नेमकी आहे काय हे रचनाकाराच्या शब्दात जाणून घ्यायचे आहे ...मलाही
काही आय्डी मुद्दाम स्मायलीज टाकत आहेत त्याना गांभीर्य नाही हे उघड आहे

तरीही कवयित्रिकडे विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे देण्याइतका अभ्यास नाही की काय अशी शंकाही बळावली आहे माझी या इथे !! तिथे शंका साधी उपस्थितही झाली नव्हती .........

अहो असे म्हणू नका! ती कायम तुमचीच मुलगी असेल. अजून हजार वर्षांनी कुणि इतिहास लिहीला तरी म्हणतील की ती तुमची मुलगी! नाव बदलले म्हणून रक्ताची नाती तुटतात का? त्यातून तुम्ही तिच्या आई ना?
इथे तर म्हणतातच -<<<

झक्की, आपले वय, अनुभव, ज्ञान व स्थान यांचा यथोचित आदर ठेवून इतकेच म्हणतो की आपल्याला कविता (?) समजलेली नाही. 'नेमका' तोच तर उपरोध आहे कवितेतील. पण आता कसं आहे, की तुम्ही असे बोललात म्हंटल्यावर लोक अगदी सांभाळून बोलणार, तुम्हाला आर्ततेने कवितेतील मेख समजावून सांगणार, वाक्यावाक्यात तुमच्याबाबतचा भीतीयुक्त आदर व्यक्त करणार आणि शेवटी मूळ रचनेपेक्षा तुमच्याशी झालेली चर्चाच रंगणार!

-'बेफिकीर'!

(आपल्या प्रतिसादांचा 'एरवी' पंखा असलेला, पण आज नाही)

तरीही कवयित्रिकडे विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे देण्याइतका अभ्यास नाही की काय अशी शंकाही बळावली आहे माझी या इथे !! तिथे शंका साधी उपस्थितही झाली नव्हती ...<<<

वैवकु, मामींनी अत्यंत उपहासगर्भ व झोंबरी विधाने एकत्र करून जुन्या रुढींवर शाब्दिक आसूड ओढणारी रचना सादर केलेली आहे. तुम्ही पंचाहत्तर टक्के मांडणीकडे, वीस टक्के मुद्यांकडे आणि पाच टक्के मूळ आशयाकडे बघत आहात.

प्रॉब्लेम इतकाच आहे की ह्याला कविता म्हणावे की मुक्तचिंतन यावर वाद होत नसून वाद वैयक्तीक पातळीवर गेलेले आहेत. ते तसे त्या पातळीला जायला तुमचा प्रथम प्रतिसाद कारणीभूत ठरला आहे हे सकृतदर्शनी कोणीही मान्य केले तरी नंतर प्रतिसाद देणार्‍यांनी (आधीच्या आणि याही धाग्यावर) काही फार मोठी परिपक्वता दर्शवलेली नाही.

ओके

ही माझी या धाग्यावरील निदान आजची शे पो

बाकी मनापासून सांगायचे झाल्यास मला या रचनेच्या कवित्त्वाबद्दल जराही रस नाही

पण चर्चेत धारिष्ट्याने व गांभीर्याने मामीनी ह्या कवितेबद्दल ... पात्र ..भूमिका ...भूमिकेमागची मानसिकता ... नेमका अपेक्षित परिणाम ...अश्या बाबीबद्दल न भीता बोलयला हवे असे माझे प्रामाणिक मत आहे .........

म्हणजे मला असे असे वाटले ....असे असे म्हणायचे होते ...मी असा असा विचार केला होता ...... अमुक अमुक घटनेवरून सुचली वगैरे वगैरे .........

वैभव वसंतराव कुलकर्णी,

तुम्हाला समज देत आहे की प्रतिसाद देताना आपली भाषा सांभाळा. तुमच्या प्रतिसादांमुळे या कवितेचा मूळ धागा अप्रकाशीत करावा लागला आहे. पुन्हा अशी भाषा दिसली तर तुमचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल.

त्या धाग्यावर काही चुका झाल्या या धाग्यावर मी मनापासून चर्चा करत आहे याबद्दल कृपया सर्वांनी खात्री बाळगावी ही विनंती
मला कवितेबद्दल काही गंभीर प्रश्न आहेत ते या धाग्यावर सभ्यपणे हाताळण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे व राहील
तसेही माझे जे प्रतिसाद या धाग्यावर जराही चेष्टेखोर आहेत ते मीही संपादित करतोय

अ‍ॅडमीन यांनी स्वतः लक्ष घालून नेमकेपणे सांगीतल्याबद्दल व आधीचा तो धागा काढून टाकल्याबद्दल आभार

या धाग्यावर मी प्रतिसाद यापुढे देवूका चर्चा करणे असल्यास भाग घेवू का याबद्दल धाग्याशी संबंधित सदस्याना विचारणा करीत आहे

सर्वांचे आभार धन्यवाद

वैवकु, बेफिकीर आणि विदिपा,

अभिव्यक्तीवरून मलाही मामींची कलाकृती कविता वाटत नाही. म्हणून म्हंटलं की तिचं रूप (फॉर्म) बदलण्याचं धार्ष्ट्य करून बघूया. बदललेल्या रूपाला कविता म्हणावं का? आपले प्रतिसाद वाचायला आवडतील.

----------------------------

पंचवीस तोळे सोनं
चढेल मुलीचे अंगी
ती होताच ऐपत आम्ही
वाढवून ठेवली होती जंगी .....॥ १ ॥

वर जावईबापूंचा
मानपान करू भारी
वरमाईचा शब्द
झेलू वरचेवरी ....................॥ २ ॥

नक्की या हं लग्नाला
नका बाई होऊ पारख्या
मुली आपल्या एकत्र
वाढल्या एक सारख्या .......॥ ३ ॥

तुमची म्हणू की आमची
पर्याय नाही हो सोपा
लेकी अपुल्या स्नेहांकिता
जेवि एकदिलाचा एकोपा ............॥ ४ ॥

असेल अंतिम दिन
आमची मुलगी म्हणून
घरोब्याचे धागे आपले
गच्च ठेवलेत विणून ..........॥ ५ ॥

सोडूनी माहेर मागे
उडी घेईल ती खोल
विविधरंगी भूमिकांचा
खास सावरेल तोल ............॥ ६ ॥

आपुल्याच सदिच्छाबळे
ती लंघेल उंबरा नवा
आशीर्वचूया सारे तिला
नवकुळा लाभो दिवा .........॥ ७ ॥

आता माहेर चुटपुटतंच
सटीसामाशी कधीमधी
मिळोन जाई त्या घरी ती
साखर जैसी पडे दुधी ........॥ ८ ॥

भरल्या घरची लक्ष्मी
होणार आमची लेक
सासरमाहेराचं नाव
राखेल पहा नेक .............॥ ९ ॥

आवर्जून सांगत्ये बघा
मागणे राहिले एक
मंगलकार्ये आणा सवे
तुमची नाठाळ लेक .......॥ १० ॥
----------------------------

समान आशयाची ओळ गद्यात, पद्यात आणि काव्यात कशी दिसेल याचं एक उदाहरण जुन्या धाग्यावर वैवकु यांनी दिलं होतं (. मला ते आता आठवत नाही). तर या उदाहरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्यास अधिक मुद्देसूद होईलसे वाटते.

(अस्मादिकांची 'कविता' सहन केल्याबद्दल) धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

गा पै
छानच आहे मेहनत तुमची.
मला तर मधले म्युझिक पीसेस आणि नृत्याच्या स्टेप्सही दिसू लागल्यात. सुरुवातीलाच तुतारी फुंकल्यानंतर नगा-याचा ढम ढम ढम आवाज.. मग सगळं शांत.. मग छम छम.. अचानक सनईचे सूर ऐकू येतात आणि लग्नाच्या वातावरणात आपण जातो. इथे पडद्यावर मेंदीवाला एक पाय हळूच डाव्या कोप-यातून उगवतो, पाठोपाठ त्याची मालकीण. तिच्यावर स्पॉटलाईट, भोवताली अंधार. आणि हळूच उर्मिला धनगरच्या आवाजात या गीताचे बोल ऐ़कू येऊ लागतात. सोबत ढोलकीची साथ.. अहाहा

कडवं संपल्यानंतर समूहाच्या आवाजात धृपद आळवले जाते आणि
जी जी रं जी जी
जी जी रं जी जी
जी जी रं जी जी रं जी इ इ इ जी इ इ जी
हां
हे ऐकू येतं.

हे चालू असताना ढोलकी आणि पडद्यावरची बाई देहभान हरपून थिरकत असतात..

( मामी, गापै... आमच्या या चकाट्या हलकेच घ्या हो. हल्ली हलक्या फुलक्या गोष्टींवरून रणकंदन माजू लागलंय )

क्रमशः

गामा_पैलवान ,
तुमची कविता छान आहे.

पण मामींनी जे लिहिलंय त्या विषयातला तिरकसपणा, विखार तुमच्या कवितेत वाटला नाही.ती गुळमुळीत वाटली. अर्थात हे माझं वैयक्तीक मत .

मूळ लेखिकेने जे लिहिलंय (तिला जसं भावलं तसं ) ते तसंच असायला काय हरकत आहे?

सौमित्रची ' बघ माझी आठवण येते का? ' ही कवितेच्या कुठल्या वृत्तात/छंदात बसते ?
कवितेला अमूक एका फॉर्म मध्येच बसवण्याची बाकीच्यांची जबरदस्ती का ? ज्याला जसं व्यक्त व्हायचंय तसं व्यक्त होऊ दे की.

पण चर्चेत धारिष्ट्याने व गांभीर्याने मामीनी ह्या कवितेबद्दल ... पात्र ..भूमिका ...भूमिकेमागची मानसिकता ... नेमका अपेक्षित परिणाम ...अश्या बाबीबद्दल न भीता बोलयला हवे असे माझे प्रामाणिक मत आहे .........

म्हणजे मला असे असे वाटले ....असे असे म्हणायचे होते ...मी असा असा विचार केला होता ...... अमुक अमुक घटनेवरून सुचली वगैरे वगैरे ......... >> हे सगळे स्पष्टीकरण का द्यायचे ते कळले नाही .
हे हास्यास्पद वाटले.

आणि कविता या साहित्यिक प्रकाराबद्दल जी काही जनरल चर्चा करायची आहे ती एका वेगळ्या धाग्यावर नाही का करता येणार ?

@ माशा

शंभरदा पोस्ट एडीट करून धागा वर आणणे याचे पेटण्ट्स आपल्या ..हो हो.. आपल्याच.. वैवकुकडे आहेत. परवानगी घ्या आणि मग खुशाल एडीटा Proud

मूळ लेखिकेने जे लिहिलंय (तिला जसं भावलं तसं ) ते तसंच असायला काय हरकत आहे?<<< सहमत

आणि कविता या साहित्यिक प्रकाराबद्दल जी काही जनरल चर्चा करायची आहे ती एका वेगळ्या धाग्यावर नाही का करता येणार ?<<< सहमत

=========================

एका कलाकाराने आपली कला निर्माण केल्यानंतर स्वतःजवळ न ठेवता जगासमोर आणली, की ती निर्मिती पाहणार्‍यांना जर पुरेसे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळत असेल तर ते त्या निर्मितीबाबत आपापली मते मांडणारच. ही मते कशी, कोणत्या शैलीत मांडायची याचे काही अलिखित / काही लिखित नियम पाळले जावेत हे बघण्यासाठी (उदाहरणार्थ मायबोलीवर) प्रशासन (ही समिती / सदस्य) आहे. त्यामुळे झालेल्या वादावादीवर पडदा टाकण्यात आला.

गंभीर चर्चा करण्यासाठी वेगळा धागा असावा असे वाटते, पण त्यावर लोक उत्स्फुर्तपणे व निखळपणे लिहायला येतील की नाही हे सांगता येणार नाही. मात्र मूळ धाग्यावरच ती चर्चा झाल्यास लोक नक्की येतील.

=========

गा मा साहेब,

आपण केलेली रचना / मांडणी बदलून केलेली रचना फारशी भावली नाही. पण त्यावरील चर्चा येथे करणे योग्य होणार नाही कदाचित! Happy

गामा यांचा प्रयत्न छानच झालाय
मांडणी ह्या मुद्द्यानुसार ती कविता त्यांनी अधिक काव्यात्मक करून दिली

पण मामींनी जे लिहिलंय त्या विषयातला तिरकसपणा, विखार तुमच्या कवितेत वाटला नाही<<< हे वाक्यही बरोबरच आहे !!!

पण मूळ रचना व त्यामागील कविची मूळ भूमिका हाही माझ्यासाठी व्यक्तिगत काव्य-अभ्यासाचा एक विषय आहे कारण काव्य वा काहीही लेखन लिहितेवेळी रचनाकाराचा एक दृष्टीकोण असतो काही धारणा असतात चिंतन असते भावना असतात शब्द असतात जे सगळे नेमके ,ठाम, स्पष्ट खुलून येणारे ,प्रामाणिक (सच्चे) ,मुद्दाम वादग्रस्तता न वाढवणारे , ह्या व अश्या विविध गुणानी युक्त हवेत असे मला वाटत आले आहे

या बाबी प्रत्यक्ष रचनाकाराकडून समजल्यास जाणून घेणे हाही महत्त्वाचा मुद्दा असतो कोणतीही कविता व त्यातले काव्य नेमकेपणाने फील करण्यासाठी हा एक अतीशय उत्तम असा मार्ग आहे व यातील जो आनंद असतो तोही मिळवावा असे मला या रचनेबाबत मनापासून वाटते आहे

प्रस्तुत रचना (उप)हास्यकाव्य लिहावे या हेतूने केली असावी असे माझे एक स्वाभाविक सहजमत होते व अजूनही बदलले नाही आहे स्पष्टीकरण मिळाले तर मला माझी या रचनेबद्दलची व एकूणच कविता ह्या विषयाबद्दलची मते चुकीची असल्यास बदलायला मदत होईल व सुधारणेलाही वाव मिळेल इतकाच माझा काव्यस्वार्थ आहे

या ऊपर माझे काव्यविषयक ज्ञान प्रकट करणे /कोणताही वाद घालणे असला कसलाही हेतू माझा नाही आहे
काल परवा जे वाईट प्रकाराने वाद झाले तेव्हा मी ते केलेलेच आहे आणि आता मी ते विसरलोही आहे.... म्हणून मी या रचनेबाबतच्या आता उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गंभीरतापूर्वक वैयक्तिक मत रचनाकर्तीस व्यक्तिगत्रित्या मागत आहे
कोणीही कसलाही गैरसमज करून घेवू नये व वाद म्हणून याकडे पाहू नये ही हात्जोडून विनंती !!!

मी हे करतोय ते माझ्या कविता ह्या विषयीच्या वैयक्तिक गैरसमजाना दूर करण्यासाठी कुणाच्याही मनोरंजनासाठी नव्हे

माझी ह्या धाग्यावरील प्रतिसादांमागची भूमिका आपणासर्वांपुढे क्लीअर करावी यासाठी हा प्रतिसाद आवर्जून दिला गैरसमज नसावा

धन्यवाद
~वैवकु

(मामी : मत विपूतून दिल्यास आभारी राहीन इथे नकोच Happy )

सौमित्रची ' बघ माझी आठवण येते का? ' ही कवितेच्या कुठल्या वृत्तात/छंदात बसते ?<<<

सौमित्र यांचा 'बालक पालक' मधील शेवटचा स्पीच, त्यातील अभिनय, तसेच नटरंगमधील भूमिका या काही गोष्टी तुफान आवडल्या होत्या. पण एक साहसी व प्रामाणिक विधान करू धजतो, ते म्हणजे त्यांच्या एकाही कवितेत अथवा कविता म्हणून सादर केलेल्या शब्दरचनेत कधीच कवितेची गंमत आली नाही.

खोटं कशाला बोला? त्यांची प्रत्येक कविता (एक मी अन एक तो - या एकाच कार्यक्रमात ज्या काय त्यांच्या कविता ऐकल्या त्यापैकी) फारच सामान्य वाटली.

हे (नेहमीप्रमाणेच) वैयक्तीक मत आहे व येथे हे 'काही प्रमाणात' 'अवांतर' मतही आहे, त्याबद्दल क्षमस्व!

Happy

प्रतिसादात मी स्मायलीज टाकलेली असलेली तरी चर्चा गंभीरपणे वाचतोय. आणि मत व्यक्त करायचं तर
कविता ’मुक्तही’ असते त्यामुळे वरील रचना कविता आहे की नाही हा वाद पहिल्याच धाग्यात तसा निकालात निघालाच आहे, असे वाटते. राहीला आशयाचा प्रश्न कवीला जे वाटले त्यांनी ते लिहिले वाचकांनी तीचा आस्वाद
आपापल्या परिने घ्यावा. दॅट्स ऑल.

-दिलीप बिरुटे

रिया. +१०००००००००००००००००००००००००
मीही हेच म्हणणार होते.

सौमित्र यांचा 'बालक पालक' मधील शेवटचा स्पीच, त्यातील अभिनय, तसेच नटरंगमधील भूमिका या काही गोष्टी तुफान आवडल्या होत्या.
>>
सौमित्र यांच्या अभिनयाचा आणि कवितांचा काय संबंध ते कळले नाही.म्हणजे त्यांच्या अभिनयावरून त्यांच्या कवितेबद्दल मत बनवलं ?
तसाही ते अभिनय किशोर कदम म्हणून करतात असं मला वाटतं.

<< पण एक साहसी व प्रामाणिक विधान करू धजतो . त्यांच्या एकाही कवितेत अथवा कविता म्हणून सादर केलेल्या शब्दरचनेत कधीच कवितेची गंमत आली नाही. >> हे वाक्य खरंच साहसी वाटले.

संदीप खरेंच्या , किंवा गुलजारांच्या कितीतरी कविता मुक्त मौक्तीक या स्वरूपातच आहेत. मग त्या काय कविता नाहीत ? की लिहिणा-यांना माहित नव्हतं आपण नेमकं काय लिहितोय ते?
आणि फक्त मांडणीतच अडकून पडणार की आशयाकडे बघणार ?

आणि प्रत्येक कवितेचा अर्थ, त्यामागची भूमिका, कशी सुचली , केंव्हा सुचली , मनोभूमिका काय होती लिहिताना , मांडणी कशी केली, हाच शब्द का वापरला , हा का नाही वापरला ? ---- हे सगळे जर सांगत बसायचे तर वाचणा-याने काय अर्थ लावायलाच नको मग. ते काय रेडिमेड गाईड अपेक्षित आहे काय ? असं जर असतं तर मग कविवर्य ग्रेसांना रोज ढिगाने उत्तरं देत बसावं लागलं असतं की.

Pages