दिंड्या पताका...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो.

खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं...

अगदी लहानपणापासून हो. वाडवडिलांची पुण्याई म्हणावी का, घरावरुनच पालख्या जातात, तुकामाऊली म्हणू नका, ज्ञानोबामाऊली म्हणू नका, इतर लहान मोठ्या पालख्या म्हणू नका.. आठवतं आहे तेह्वापासून जातात. वारी आणि पालखी अगदी माझ्या लहानपणापासून आयुष्याचा एक भाग व्यापून आहेत. वारी ह्या शब्दाशी निगडीत अश्या काही व्यक्तींच्या आठवणी आहेत. लहानपणी आमच्या इथे एक मावशी यायच्या भाजी विकायला आणि वर्षाची वारी करायच्या. आज्जीचं आणि त्यांचं गूळपीठ. आजी मग त्यांना विठ्ठलासाठी काहीबाही द्यायची, त्याही नेऊन पोचवायच्या, येताना बुक्का आणायच्या, थोड्या तुळशी, चुरमुर्‍याचा प्रसाद, एखादा चिकचिकलेला राजगिर्‍याचा लाडू. एकदा विठोबा- रखुमाईची पितळी छोटी मूर्त आणली. अगदी युगे अठ्ठावीस करत विठाई आजतागायत देव्हार्‍यात विराजमान आहेत. आमचे सकाम आणि क्वचित निष्काम नमस्कारसुद्धा आवर्जून आपेलेसे करुन घेतात.. त्यांना सवय आहे. तर अशी ह्स्ते परहस्ते वारी करायची आजीची पद्धत. अजून एक दूरच्या नात्यातल्या आजी वारी करायच्या, त्यांच्या मंडळासोबत, त्या वारीच्या दिवशी आल्या, की त्यांच्या पाया पडून त्यांच्या वारीच्या पुण्यसंचयावर आम्ही लहान मोठे डल्ला मारायचो आधीच. शांत मूर्ती, प्रेमळ चेहरा, मृदू बोलणं. वारी म्हटलं की त्यासोबत हे सारं आठवतं.

अजूनही आठवतं म्हणजे आजी आजोबांबरोबर घेतलेलं वारीचं दर्शन, ते उभे असेतोवर. कपाळावर लावून घेतलेलं गंध, टिळे, बुक्के. घरात तेह्वा वडिलधार्‍यांचे असलेले आणि श्रद्धापूर्व़क केले जाणारे उपवास. आता समजतं की शरीराने वारी चालू शकले नाहीत, तरी त्यांनी मन:पूर्वक वारी अनुभवली. रस्त्यावर आजी आजोबांसकट उभं रहायचं, दोघेही वारीची वाट पहात. जाणार्‍या वारकर्‍यांना नमस्कार करत. आम्ही चिल्ली पिल्ली बाजूलाच हुंदाङपणा करत. वेळ निघून जाई. बराच वेळ टाळ, मृदुंग, टाळ्या, माऊलीचे जयघोष कानी पडत. लोक शांतपणे उभे असत. पावसाची एखादी नाजूक भुरभुर सर येई, की आम्ही अधिकच हुंदाडगंपूपणा सुरु करत असू. आज्जीची आम्हांला आवरता त्रेधातिरपीट उडे. अचानक वातावरण जिवंत होई आणि आली, आली म्हणेपरेंत एकेक पालखी येऊन झपाटयाने निघूनही जाई. त्यातच लोकांमध्ये प्रसाद म्हणून फुलांच्या पाकळ्या,तुळशी, प्रसाद वगैरे वाटले जात. आजोबा पालख्यांच्या गर्दीमध्ये घुसून दर्शन घेत, आज्जी लांबूनच हात जोडी. आम्ही आपले प्रसादाचे धनी होण्यात समाधानी! अवघा आनंदकल्लोळ असे! काळा बुक्का आणि गंध लावलेला आजोबांचा चेहरा आणि नमस्कार करुन पालखीचं दर्शन घेतल्याने तृप्त समाधानी असा आज्जीचा चेहरा अजून डोळ्यांसमोरुन हलत नाही. आजही पालखीच्या अनाम गर्दीचा चेहरा ह्या दोन चेहर्‍यांना आठवून खूप ओळखीचा बनून जातो.

आणखी म्हणजे त्यादिवशी रस्ता वाहतुकीला बंद असायचा, आजही असतो, सकाळपासूनच अगदी तुरळक वाहतूक असते, बरं वाटतं खरं सांगायचं तर. नेहमीच्या वाहतूकीचा अव्याहत वाहणारा गदारोळ लईच काव आणतो जिवाला रोज. तेह्वापण असायचा. मात्र आताच्याइतकी वाहतूक नसायची म्हणा. कधी नव्हे ते सकाळची उन्हं रस्त्यावर पडलेली दिसतात, पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात... दिवस शांतपणे उजाडल्यासारखा वाटतो. आम्हांला तर शाळेला सुट्टी पण असायची, खरी मज्जा हीच बरं, वारीच्या दर्शनाच्या निमित्ताने अभ्यासाला रीतसर दांडी. काय दिवस होते..

वयपरत्वे पुढे दोघांचं हे वारी दर्शन बंद झालं. आम्ही गर्दीत घुसून दर्शन घ्यायला शिकलो. माऊलीच्या पादुकांना हात लावून दर्शन घ्यायला मिळालं की एकदम विजय मिळवल्यासारखा वाटायचा! सोसायटीमधलीधली मुलं, आमच्यावर लक्ष ठेवायला म्हणून तरुण दादा, काका पब्लिक वगैरे आम्ही एकत्र मिळून वारीमध्ये जरासं चार पावलं टाकायचो, अगदी फुगड्या वगैरे खेळल्याचंही आठवतय. बाबा, काका आणि तत्सम पब्लिक घरापाशीच उभं असायचं. पालखी आली की आमच्यासोबत दर्शनाला यायचं. पालखी पूर्वीसारखीच, अंगाखांद्यावर गर्दी खेळवत टाळ चिपळ्या मृदुंगांच्या तालावर नाचत, अलगद निघून जायची... काही क्षणांसाठीचा पाहिलेला सोहोळा दर वेळी पुढल्या वर्षीपरेंत पुरत गेला. चक्र सुरुच राहिलेलं आहे.

पुढे काही वर्षं नोकरी धंद्या निमतानं वारी जराशी दुरावली. आठवण येत राहिली.

आणि मग आता पुन्हा एकदा गेली काही ३-४ वर्षं वारीच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खूप बदलही जाणवतात. ह्या वेळी आमच्या इथे टीव्ही व्हॅन्स होत्या, साम आणि अजून एक कोणतं तरी चॅनेल. हे इतके फोटोग्राफर्स! बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच! तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय! तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय म्हणे! मज्जाच, म्हटलं मनात. खुद्द पांडुरंग हे संबोधन ऐकून दचकला असणार. त्या माणसाला गालातल्या गालात हसणारे वारकरी, जाऊद्या, तितकंच द्येवाचं नाव येतया तेच्याबी तोंडात, चालायचंच, अशी समजूत काढणारे अनुभवी, मुरलेले वारकरी. त्यांच्यासोबत सहभागी झालेले हौशी, नवशे,पोटार्थी, चोर, लबाड, सज्जन, साव सगळे सगळे. खर्‍या अर्थाने जनसमुदाय. नाचणार्‍या दिंड्या, पताका. डोईवरली तुळशी वृंदावनं. गाठुडी. सामानाचे ट्रक. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा भक्तीभाव, विश्वास.

आणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विश्वासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी.

वारीची वाट बघत ह्यावेळी उभे होतो. खूप वेळ वाट बघायला लावून पालख्या दृष्टीपथात आल्या. पुन्हा एकदा तोच परिचित आनंदकल्लोळ उसळला. ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले.. एक म्हातारे वारकरीबुवा आणि आज्जींशी त्याच वेळी माझी नजरानजर झाली दोघेही खूप समजूतीचं असं हसले. आजी आजोबा पुढे वाट चालू लागले.

तीनही लोक आनंदाने भरुन टाकत वारीही मार्गस्थ झाली.

विषय: 
प्रकार: 

मस्तच शैलजा. Happy
पण एकदा वारीबरोबर जायचा पण अनुभव घेच. आमच्या शाळेतून जायचो आम्ही , फार नाही, फर्ग्युसन कॉलेज ते निवडुंग्या विठोबा. पण त्या साठी केलेली तयारी, अभंगाची प्रॅक्टीस. कांदा मुळा आणि भाजी ,अवघीविठाबाई माझी म्हणताना , त्या वयातही , विठू आन त्याची रख्माई अगदी जवळचे वाटायचे बघ Happy .

अफाट सुंदर - मनापासून लिहिलेलं जाणवतंय अग्दी ...

आणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विश्वासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी. >>>> सोळा आणे सत्य .....

ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले....
माझेही.
मी वारी बघितली, अनुभवली नाहीये... पण वारीशी सख्यं आहे हे आतून जाणवतं. तुझ्या लेखाच्या निमित्ताने त्या सख्याचा पुन्हा एकवार आठव आला. उराउरी भेट नाहीये हे ही जाणवलं... तरीही ह्या आठवाशी खिन्नतेचा कणही नाही... जणू अनेक जन्मांचं सख्यं असावं... तसं काहीसं?
मागल्या पानावरून पुढे चालू तशी भेटेन वारीला.
(कसं साजिरं लिहिलयस, शैलजा)

छान लिहीलयसं...
आणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विश्वासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी. >> +१..
खरतरं आमच्या घरी कोणीच वारी केली नाहीये.. पण मला जायचयं
ऑफीसमधुन येताजाता छोटी दिंडी, टाळ मृदुंगाचा स्वर नि सगळ्या आजी आजोबांचे नेहमीच प्रसन्न चेहेरे बघितल्यावर आपसुकच हात जोड्ले जातात.. जय हरी विठ्ठ्ल!! Happy

मस्त लिहीलय.
इन्ना+१. मी पण नाही गेले कधी. ते मनातले 'पुढल्या वर्षी नक्की' कधी उजाडणार कोण जाणे. जायच्या यादीत आहेच पण. आणि जाणारच.

>>आणि मग आता पुन्हा एकदा गेली काही ३-४ वर्षं वारीच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खूप बदलही जाणवतात. ह्या वेळी आमच्या इथे टीव्ही व्हॅन्स होत्या, साम आणि अजून एक कोणतं तरी चॅनेल. हे इतके फोटोग्राफर्स! बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच! तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय! तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय म्हणे! मज्जाच, म्हटलं मनात. खुद्द पांडुरंग हे संबोधन ऐकून दचकला असणार. त्या माणसाला गालातल्या गालात हसणारे वारकरी>>..>>
सुंदर लिहिलेय शैलजा त्या परिचित आनंदकल्लोळाबद्दल अन त्यातल्या बदलांवर.
भाग्यवान आहात.

मस्तच लिहिलयस.

वारीची वाट बघत ह्यावेळी उभे होतो. खूप वेळ वाट बघायला लावून पालख्या दृष्टीपथात आल्या. पुन्हा एकदा तोच परिचित आनंदकल्लोळ उसळला. ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले.. एक म्हातारे वारकरीबुवा आणि आज्जींशी त्याच वेळी माझी नजरानजर झाली दोघेही खूप समजूतीचं असं हसले. आजी आजोबा पुढे वाट चालू लागले.>> हे वाचताना अतिशय प्रसन्न वाटून गेले.

वाचलं... आवडलं...

पहिली वारी अनुभवली ती १९८७ मधे - विनय सोबत, डेक्कन जीमखान्यावर. कॉलेजमधे शिकत असल्यामुळे, जरा जास्त प्रमाणात(च) 'अक्कल' जवळ होती, आणि त्याला जोड होती ती 'कोकणी बुद्धी'ची. असलेला 'काम-धंदा'सोडून लोक किमान महिनाभर असे बाहेर कसे काय पडू शकतात?, हा मनात उभा राहिलेला प्रश्न... गावि गेल्यावर सहाजि़कच 'वारी'ची टिंगल-टवाळी केलेली (कारण दहावित असताना एका शिक्षकानी 'आषाढी' (मार्च) आणि 'कार्तिकी' (ऑक्टोबर) चे महत्व(?) पटवून दिलेले होतेच)... कॉलेज संपल्या नंतरच्या वर्षी वर्तमान पत्रा मधे डॉ. यु. म. पठाण यांचा 'वारी' आणी 'श्री ज्ञानेश्वरी' यांच्या संदर्भातला 'भक्ती-मार्गा'च्या दिशेने विवेचन करणारा लेख वाचनात आला. त्यावेळी 'वारकरी' परंपरा अत्यल्प प्रमाणात लक्षात आली. कालांतराने 'संत ज्ञानेश्वर' आणि 'संत तुकाराम' यांची कादंबरीच्या अंगाने लिहिलेली चरीत्रं वाचनात आली, आणि 'वारी'ची कल्पना थोडी-थोडी स्पष्ट झाली. पुण्यात येऊन स्थिरावल्यावर पहील्याच वर्षी वारी अनुभवली ती 'ट्रॅफिक जाम'च्या निमित्ताने, तेव्हा पुन्हा एकदा 'कोकणी विचारा'ने डोके वर काढले(च), कारण ऑफिस ते घर हा पाऊण तासाचा प्रवास चार तास सुरु होता...
गेली ३-४ वर्षं मात्र वारी सोबत येणार्‍या दिंड्या सोबत समांतर चालण्याचे भाग्य मिळाले. सतत चार वर्षं 'गुंजन टॉकीज - येरवडा' ते डेक्कन जीमखाना मस्त-पैकी चालत येत होतो. गेल्या वर्षी तर त्या निमित्ताने झालेले 'राजकीय' बदल स्वागताच्या ब्यानरवर देखिल 'याची देही - याची डोळा' बघुन घेतले. वारकर्‍यांची पगडी आणि हातात एकतारी घेतलेले 'दादा' आणि हिरव्या पार्श्वभुमीवर काळ्या-पांढर्‍या चौकडीची शाल पांघरलेले आणि डोक्यावर 'विशिष्ट टोपी' घातलेले 'भाई' (स्थळ एकच - कुंभारवाड्याचा सिग्नल)... इथेही दोघे 'आमने-सामने' होते... थोडंसं विषयांतर झालं खरं... पण गेल्या वर्षीच्या वारी मधे 'डेक्कन'ला 'संत ज्ञानेश्वर महाराजांच्या' पादुकांचं अत्यंत व्यवस्थित आणी अगदी जवळून दर्शन घेता आलं होतं...
या वर्षीची 'वारी' मात्र वेगळिच झाली. पालख्यांच्या मुक्कामा दिवशी भल्या पहाटे ऊठून 'वनाज-कॉर्नर' ते 'चांदणी चौक' अशी मी एकट्याने पदयात्रा केली; कारण होतं - मुंबईत वेळेवर 'क्लायंट'कडे पोचण्यासाठी चांदणी चौकात येऊन 'बस' पकडावी लागली... शेवटी काहिही झालं तरी आपण वारकरी नाही, संसारी आहोत हे मान्य करावं लागलं...

Pages