'एक मी अन् एक तो' - गप्पा कवी वैभव जोशी यांच्याशी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 June, 2013 - 10:50

या आठवड्यात बॉस्टनला होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात कवी किशोर कदम उर्फ सौमित्र आणि वैभव जोशी यांची काव्यमैफल सजणार आहे. या मैफिलीत आपल्या सुरांनी बहार आणणार आहेत प्रख्यात गायक दत्तप्रसाद रानडे.

वैभव जोशी यांच्या कविता हा खरंतर न संपणारा विषयच. बोरकर, सुरेश भट इत्यादी पूर्वसुरींचे ऋण जोशी स्वतः मान्य करतात, पण त्याचवेळी या सर्वांपेक्षा भिन्न अशी स्वतःची कविता त्यांनी प्रस्थापित केली आहे. 'तुम्हांला कविता कशा सुचतात?' या कवीला विचारल्या जाणार्‍या हमखास प्रश्नाचं उत्तर त्यांनी काव्यरूपातच दिलं आहे -

धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी

उन्हं अलवारपणे उमटण्यासाठी धरतीसुद्धा तशी सुसंगत असावी लागते. जोश्यांच्या कवितेची जमीन अशीच समृद्ध आहे. पण त्याचवेळी ही समृद्धी देवदुर्लभ आहे, याचीसुद्धा त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच ते पुढे म्हणतात -

रे छळू नका रे त्याला, का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते

कदाचित या स्वजाणिवेमध्येच त्यांच्या काव्याच्या सामर्थ्याचं गमक दडलं आहे.

शब्दांवरचं वैभव जोशी यांचं सामर्थ्य वादातीत आहे. त्याचवेळी त्यांच्या काव्यात शब्दसामर्थ्यापलीकडे जाणारी 'गजलीयत' आहे. 'वगैरे'सारखा अत्यंत कर्मदरिद्री शब्दसुद्धा त्यांच्या कवितेत अर्थवैभव घेऊनच येतो. 'वगैरे' या शब्दाच्या असंख्य छटा आपल्याला नव्यानेच कळतात आणि मग -

किती जीवना रोज देतोस धमक्या
दिली का यमाने सुपारी वगैरे

यासारखे शेर ऐकताक्षणी अक्षरशः आपल्याच नकळत आतून 'आह!' बाहेर येते..

या कवितांकडे केवळ एक शाब्दिक अट्टहास म्हणून बघणं, हा संकुचितपणाच ठरेल. जोश्यांसारखा कवी आयुष्यात कशाकडेही 'बघतो' तेव्हा ते केवळ बघणे राहत नाही. सूक्ष्माचा वेध घेणारी त्यांची संवेदनशीलता जेव्हा कशाकडेही बघते, तेव्हा ती आपल्याला एक नवी दृष्टी देऊन जाते.

वैभव जोशी यांच्या कविता आपल्या मनातल्या आतल्या, अस्फुट भावनेला बघताबघता स्पर्श करतात... आणि तो स्पर्शच असतो, त्यात आपल्या भावनांचा अधिक्षेप नसतो. जोरकस धक्काबुक्की, बळजोरी ही त्यांच्या कवितेची वृत्तीच नाही. त्यांची कविता आपल्याला अलगद तिच्यासहित घेऊन जाते. जे सहित घेऊन जाते ते साहित्य अशी साहित्याची एक व्याख्या केली जाते, तिथेच त्यांच्या कवितेचं मोल दडलं आहे.

वैभव जोश्यांच्या कवितेनं अगदी थोड्या कालावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. व्यावसायिक यशाच्या भाषेत बोलायचं, तर त्यांनी आजवर अठ्ठेचाळीस संगीतकारांबरोबर, आणि दीडशेहून अधिक गायकांबरोबर दोनशे ऐंशींहून अधिक गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत. आशा भोसले, उ. रशीदखाँ, शंकर महादेवन, रेखा भारद्वाज, राहुल देशपांडे, महेश काळे, हृषीकेश रानडे, बेल शेंडे, वैशाली सामंत अशा पट्टीच्या गायकांनी त्यांच्या कवितांना न्याय दिला आहे.

बॉस्टनच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात अमेरिकेतल्या रसिकांना वैभव जोशी व किशोर कदम यांच्या कविता ऐकण्याची संधी 'एक मी अन् एक तो' या कार्यक्रमात मिळणार आहे. या निमित्तानं मायबोलीकर अरभाट आणि चिनूक्स यांनी श्री. वैभव जोशी यांच्याशी गप्पा मारल्या...

vj2.jpg

बीएमएमला हा जो तुझा आता कार्यक्रम आहे, त्याचं स्वरूप नक्की कसं असेल?

बीएमएमच्या आयोजकांकडून फोन आला, तेव्हा त्यांनी माझ्या कवितांचा कार्यक्रम सुचवायला सांगितला होता. पण एकट्याचा कवितांचा कार्यक्रम मी अजूनतरी करत नसल्यानं किशोरचा आणि माझा 'एक मी अन् एक तो' हा कार्यक्रम त्यांना सुचवला. त्यांच्यासाठी ही पर्वणीच होती कारण सौमित्रच्या आणि माझ्या कविता एकत्र ऐकायला मिळणार होत्या. नंतर त्यांनी एक गायक असला तर बरं होईल, असं सांगितल्यावर दत्तप्रसाद रानडे यांचं नाव कार्यक्रमात समाविष्ट केलं. आता या कार्यक्रमात मी आणि किशोर कविता वाचू आणि दत्तप्रसाद आमच्या 'कविता', गाणी नव्हेत, गाईल, जेणेकरून हा कार्यक्रम फक्त आणि फक्त कवितांशीच निगडित राहील.

तू आणि किशोर कदम बरीच वर्षं एकत्र काम करत आहात...

तो सगळा घटनाक्रमच मजेशीर आहे. आशिष मुजुमदार म्हणून माझा एक मित्र आहे. तो माझ्या बर्‍याच कविता, गझला संगीतबद्ध करतो. सुरुवातीला मी त्याच्याबरोबर खूप काम केलं आहे. तो किशोरचाही मित्र आहे. तो एकदा मुंबईत किशोरकडे गेला असताना किशोरनं त्याला 'नवीन काय केलं आहेस ते ऐकव', असं म्हटल्यावर त्यानं किशोरला माझ्या काही रचना ऐकवल्या. त्यांपैकी एक रचना ऐकताना किशोर म्हणाला, अरे माझीपण एक अशीच कविता आहे. ती आशयाच्या दृष्टीनं खरोखर माझ्या कवितेच्या खूप जवळ जाणारी होती. फक्त भावना वेगळ्या पद्धतीनं व्यक्त केल्या होत्या! मग पुढच्या रचना ऐकतानाही असंच पुन्हा झालं. यानंतर एकदा मी सात वाजता ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असताना मला फोन आला आणि आशिष मला म्हटला, 'तुला एका माणसाशी बोलायचंय.' पलीकडून 'मी सौमित्र बोलतोय', असा आवाज आला. सौमित्रचं नाव मी ऐकून होतो. त्यामुळे सौमित्र मला का फोन करतोय, म्हणून माझ्या डोक्यात अनेक प्रश्न येऊन गेले. म्हटलं, काय बोलतोय कुणास ठाऊक? तर तो म्हटला, 'अरे वैभव आपल्याला भेटायचंय. तुला कारण माहितीये का? आपल्या लिखाणामध्ये बरेच पैलू सारखे आहेत आणि आपण त्याच्यावर काही काम करू शकतो.' एवढं बोलून तो थांबला नाही तर पुढच्याच आठवड्यात पुण्यात आला. खास या गोष्टीसाठी! आम्ही खरोखर यादी बनवली आमच्या कवितांची, तर आमच्या लक्षात आलं की, आपण एकत्र वेगळा कार्यक्रमच बांधू शकतो.

कवितांमधला सारखेपणा म्हणजे काय, हे जरा उलगडून सांगशील का?

उदाहरणच द्यायचं, तर समजा मी पावसाची प्रतिमा घेतली असेन, तर बरेचदा त्यानंही पावसाला जिवंत माणसासारखं वागवलं आहे. मी फक्त निसर्गवर्णन करत नाही. तसंच त्याच्याही कवितांत असं केवळ निसर्गवर्णन माझ्या पाहण्यात नाही. म्हणजे कवितेतून किंवा कुठल्याही कलाप्रकारातून नुसत्या वर्णनापेक्षा काहीतरी जास्त गवसलं पाहिजे. तुमची काहीतरी भूमिका त्यातून दिसायला हवी. तेव्हा नुसतेच 'हिरवे हिरवे गार गालिचे' लिहिणं मला जमत नाही. असं लिहिणंही सुंदर आहे, पण माझा तो पिंड नाही. मी निसर्गवर्णन करेन, पण त्यातून आणखी काहीतरी अर्थ लोकांपर्यंत पोहोचायला हवा, अशी माझी पद्धत आहे. त्याचीही तीच पद्धत आहे. आम्ही एकमेकांनी वापरलेल्या प्रतिमा बघितल्या. झाड, पाऊस, आई, प्रेयसी किंवा देव म्हणा आणि त्यांतून आमच्या लक्षात आलं की, आपण दोन निराळ्या दृष्टिकोनांतून या प्रतिमा, ही रुपकं कार्यक्रमातून सादर करू शकतो. तिथून तो कार्यक्रम आपोआप घडत गेला.

तुम्हां दोघांच्या कवितांमध्ये जी साम्यस्थळं आहेत, त्यांत आई आणि निसर्ग या दोन मुख्य प्रतिमा आहेत. तुम्हां दोघांच्या कवितांमध्ये या प्रतिमा इतक्या सारख्याप्रकारे कशा येतात?

मी आधी म्हटलं तसं, मी किशोरचं कवितांचं पुस्तक अगोदर वाचलं नव्हतं. नंतर आवर्जून वाचलं आणि अजूनही वाचतोय. मी प्रेमातच पडलो त्या पुस्तकाच्या. पण आमची ओळख होण्याआधी मी त्याचं काही वाचलं नव्हतं, हेही एकापरीनं बरं झालं. त्याला आशिषनं माझ्या कविता ऐकवल्यावर असं वाटलं नाही की, हा आणखी एक आपल्या लेखनावरून प्रेरणा घेऊन लिहिणारा. कारण प्रेरणा घेऊन लिहिणारे तसे खूपजण असतात आणि ते शैलीच्या प्रेमात पडले असण्याचाही धोका असतो. हे तुमच्या लक्षात येतं. त्याला माझ्या कवितांच्या आशयात रस वाटला. वेगवेगळ्या काळात आम्ही कविता लिहायला सुरुवात करूनदेखील आम्ही सारख्या प्रतिमांवर लिहीत होतो. हे खरंच गूढ आहे, आणि हे गूढ उकलण्याचा आम्ही प्रयत्नही करत नाही. आम्ही कार्यक्रम एकत्र करायला लागल्यापासूनसुद्धा असे कितीतरी प्रसंग घडले आहेत. मी एखाद्या विषयावर नवीन कविता कार्यक्रमात सादर करणार असतो, त्यादिवशी त्यानंही नवीन कविता आणलेली असते. मी 'चोर चोर म्हणून रात्री बोंबलत उठली कविता' अशी एक ग्रामीण कविता लिहिली होती दुष्काळावर, तेव्हा त्यानं त्याच विषयावर 'चोर आणि चंद्र' म्हणून कवितेवरच एक कविता लिहिली होती. दृष्टिकोन वेगळा, विषय तोच! तर असं चालूच आहे. हे आमचं नेणिवेतलं नक्की काय नातं आहे याला काही उत्तरच नाही माझ्याकडे.

तुमच्या, म्हणजे तुझ्या आणि किशोर कदम यांच्या, कवितांमध्ये अनेक निसर्गप्रतिमा आहेत. निसर्ग म्हटला की, बोरकरांसारखं किंवा बालकवींसारखं नुसतं निसर्गवर्णन नाही, तर हा निसर्ग मानवी भावनांशी जास्त जोडलेला दिसतो.

कदाचित याचं कारण गुलजार हे असावं! हा नुसता त्यांचा प्रभाव आहे, असं मी म्हणणार नाही. हे त्यांच्या कविता जगणं आहे. मला वाटतं की, गुलजार, सौमित्रच्या, माझ्या आणि आजच्या काळातल्या अनेक कवींच्या नसानसांत भिनलेले आहेत. गुलजारांनी कुठलीही निर्जीव प्रतिमा सजीव करायचं सोडलं नाही. अगदी 'सिगरेटच्या पाकीटवरती एक रोपट्याचं चित्र काढलं होतंस तू, आता त्याला फुलं आलेली आहेत', अशा पद्धतीची छोटी कविता ते लिहून जातात. हा मार्ग आम्हीही काही प्रमाणात स्वीकारलेला आहे. मग साहजिकच कवितांतून निसर्ग मित्र म्हणून येतो, प्रेयसीचा प्रियकर म्हणून येतो, त्यात मानवी भावभावना जास्त येतात. निसर्गाचं केवळ वर्णन हा प्रकार त्यातून काहीसा बाजूला पडतो. पण तरीही मी खूप दिवस वाट पाहत आहे की, अशी एखादी रचना आपल्याला सुचली तर ती कशी असेल. असो. सध्यातरी असं सुरू आहे.

प्रेम या विषयावरच्या तुझ्या फारशा कविता माझ्यातरी वाचनात नाही आल्या.

प्रेम ह्या विषयावर कविता नाहीत असं नाही. उलट एकेकाळी मायबोलीवर मी सतत प्रेमावरच खूप लिहितो अशीही हेल्दी चर्चा मी ऐकली आहे आणि केलीही आहे. हां, गोडगोड प्रेम व्यक्त करणार्‍या माझ्या कविता नाहीत, असं मला वाटतं. तशा कविता लिहिणं हा माझा स्वभाव नाही म्हणा किंवा कसं असतं, तुमचं व्यक्त होणं हे तुमच्या किंवा तुमच्या जवळपासच्या लोकांच्या अनुभवांवर, अनुभूतीवर आधारित असतं. ते तुम्ही तुमच्या साच्यात बसवता. मी कविता लिहायला सुरुवात केली तीच मुळी वयाच्या बत्तीस-तेहतीस वर्षांनंतर! इतकं जग पाहिल्यानंतर आणि आजूबाजूचं जग सतत वेगानं बदलत असताना ही भावना चिरंतन टिकणारी आहे का, पक्की आहे का, या विचारांचा प्रभाव माझ्या लिखाणावर पडतो. बालगीतांच्या सीडीसाठी आत्तापर्यंत कितीतरी कामं मी नाकारली आहेत. मी आता तितका निरागस राहिलो आहे, असं मला वाटत नाही, आणि परकाया प्रवेश वगैरे ठीक आहे, पण निरागसतेकडे परत जाणं मलातरी जरा अवघड वाटतं.

जेव्हा तुम्ही कुठलीही भावना एका कवीच्या दृष्टिकोनातून मांडू पाहता, तेव्हा तुम्ही ती कविता सर्वसमावेशक कशी होईल, तिचा आशय जास्तीत जास्त व्यापक कसा होईल, असा विचार नकळत करू लागताच. हे मी फार महत्त्वाचं मानतो. दुसरं म्हणजे कला आणि कारागिरी हातात हात घालून चालते. तसं नसतं तर लोकांनी कागदावर पहिलं अक्षरच लिहिलं नसतं. आपण कागदावर पहिलं अक्षर लिहितो तिथेच प्रसिद्धीसाठी आपली हाव सुरू होते. किमान तुम्ही स्वतःला ऐकवण्यासाठी तरी किंवा स्वत:च्या पुनर्वाचनासाठी तरी का होईना, ती 'कागदावर' लिहिता. नुसती मनातल्या मनात ठेवत नाही कविता.

तुम्हां दोघांच्या कवितांमध्ये साम्यस्थळं आहेत, तसेच फरकही असतील ना?

फरक नाहीत असं नाही, पण समान धागे बरेच आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचा विचार करताना एकसंधपणे कार्यक्रम पुढे नेण्यासाठी समान अर्थच्छटांच्या कविता निवडण्याकडे आमचा कल असतो. आमच्यातला एक मोठा फरक म्हणजे किशोर अभिनेता आहे. त्याला एखादी कविता एखाद्या नाटकातल्या प्रवेशासारखी दिसू शकते. यावरही त्यानं कविता लिहिल्या आहेत. कवितांमधले प्रवेश आणि प्रवेशांमधल्या कविता हे दोन्ही त्याच्या गाठीशी आहेत. त्याला ती कविता जास्त हलतीबोलती दिसते, हे खरं! हे कसं आहे बघा... तुमच्या हातात एक माईक दिला आणि दुसर्‍या हातात कागद, तर कवी एका मर्यादेपर्यंत काहीतरी ऐकवू शकेल. पण तोच स्टँड-माईक दिला आणि पाठांतर असलं सगळं तर हातवार्‍यांचा, हावभावांचा वापर करून तीच कविता अजून जिवंत करता येते. किशोरच्या बाबतीत बोलायचं तर ती कविता त्याला जशी हलतीबोलती दिसली असेल, तसाच तो सादर करताना हलतबोलत असणार. मी कॉर्पोरेट कल्चरमधून आलेला माणूस. माझ्या काही कविता त्या अंगाने जातात. हा फरक निश्चित आहे. कदाचित पुढ्च्या एखाद्या कार्यक्रमापासून आम्ही फरकही ठळकपणे मांडायला लागू.

मघाशी जे म्हटलंस, अर्थात वेगळा मुद्दा होता तो, की अनुभूतीच्या आधारे कवी कविता लिहितात. तर असं म्हणता येईल का, की प्रत्येक कवीचे काही आवडते विषय असतात आणि त्या विषयांवर कविता मनातून स्वयंभूपणे सुचतात? याव्यतिरिक्त संवेदनशील स्वभावामुळे तुम्ही समकालीन घटनांवर तर काहीतरी भाष्य करताच. तर हे असं सगळ्याच कवींचं असतं का? म्हणजे त्यांचा प्रत्येकाचा स्वयंभू असा एक विषय असतो जो कुठून येतो, हे कदाचित त्यांना ठाऊकही नसेल?

छान प्रश्न! स्वयंभू विषयापेक्षा मी असं म्हणेन की कविता किंवा कुठलीही कला ही एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते आणि प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते. या स्वभावाच्या मुळाशी दोनतीन मूलभूत भावना असतात. लहानपणीचं उदाहरण घे, आपल्याला आपले बाबा समजा रागावले तर आपल्या प्रतिक्रिया कशा असायच्या? कुणाला राग येईल, कुणी खोलीत जाऊन फुरंगटून बसत असेल, कुणी आईच्या कुशीत जाऊन रडेल किंवा कुणी 'काही का असेना, ओरडतच असतात' असं म्हणून बाहेर बागडायला जाईल. यां चारपैकी आपण काय करायचो? तुम्हांला तेव्हाही आपसूक कळत असतं की, मला सगळ्यांत जास्त फायदा कसं व्यक्त झाल्याने होईल आणि तशी मग तुमची वैचारिक, सांस्कृतिक बैठक घडत जाते. काही विशिष्ट दोन-तीन भावनांकडे ओढा असतो प्रत्येकाचा. पुण्या-मुंबईतल्या, शहरी चौकटीतल्या कवींचं उदाहरण घे. त्यांचं सामाजिक आशयाचं लिखाण नंदुरबार, अंबेजोगाईकडच्या कवींच्या तुलनेत काहीसं कमी असेल. उदाहरणार्थ, तिकडे एखादा कवी दुष्काळाबद्दल, रणरणत्या उन्हाबद्दल लिहीत असेल. त्या विषयावाटे त्याची दु:खं, त्याची चीड, खदखद बाहेर पडत असेल. मला गोंगाटाचा, ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असेल तर मी त्याबद्दल लिहीन. मी दुष्काळाबद्दल लिहिताना घुसमट म्हणून लिहीन. अशा मूलभूत भावनांना माणूस धरून असतो. ते त्याचं सुरक्षित क्षेत्र असतं. दिल्लीतल्या घटनेचं उदाहरण घेऊ. बर्‍याच जणांनी काहीकाही लिहिलं त्यावर. प्रत्येकाची खदखद वेगवेगळ्या रीतीनं बाहेर पडली. तर, वेगवेगळ्या पद्धतीनं लोक प्रतिक्रिया देत असतात. कुणी दु:ख करतात तर कुणी आकांडतांडव, कुणी खिन्न होतं तर कुणी कोशात जाऊन बसतं, कुणी आपल्या अंतर्मनाचा धांडोळा घेणारी कविता लिहितं. एखाद्या कवीबद्दल कुणी म्हणतं, अरे त्यानं सामाजिक विषयावर काही लिहिलंच नाहीये, तो स्वत:तच गुरफटलेला आहे. मी, तू, प्रेयसी यांशिवाय त्याला काहीच दिसत नाही. पण दिल्लीतल्या विषयावर व्यक्त होताना प्रेयसीमध्ये काय बघतोय तो? स्वतःमध्ये काय बघतोय? तो नराधम त्याला स्वतःमध्ये दिसतोय का? समाजावर ताशेरे ओढण्याआधी बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे, असा काही त्याचा दृष्टिकोन आहे का, वगैरे बाबी विचारात घ्यायला हव्यात. पण त्याबरोबरच मी हे म्हणेन की, व्यक्त होण्याचे ठरावीक मार्ग असले तरी ते सतत बदलत राहिले पाहिजेत. मग नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीची कविता लिहावी, भाषा बदलावी, भावना बदलाव्यात. तुम्हांला 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या धाटणीचं काही लिहिता येत नसेल, ठीक आहे. मग उपहासगर्भ कविता लिहायचा प्रयत्न करा. तुमची कविता कायम वृत्तबद्धच असते का? मग मुक्तछंदात लिहून बघा. मी सहसा असं करतो. समजा, माझ्या लागोपाठ तीन रचना उत्स्फूर्तपणे गजलेच्या रूपात आल्या तर चौथी रचना तशाच रूपात मी लिहितच नाही. मी तिच्यासाठी वेगळा प्रकार निवडेन, भाषा वेगळी ठेवेन किंवा मी ती लिहिणारच नाही. ती रचना कधीतरी तुमच्याकडे परतून येतेच. पण उगाच गडबड करून उपयोग नसतो. नाहीतर मग एकच एक साचा वापरून प्रत्येक कल्पना त्यातच बसवण्याचा धोका निर्माण होतो.

हा प्रयत्न फार जाणीवपूर्वक करावा लागत असेल?

हो. माझी एक मैत्रीण आहे, क्षिप्रा नाव तिचं. पूर्वी मायबोलीवर लिहायची ती. तिनं मला अगदी सुरुवातीच्या काळातच सांगितलं होतं की, "वैभव, तुला माइंड कण्डिशनिंग करणं गरजेचं आहे, कारण तू पुढे जाऊन खूप लिहिणार आहेस". मी तिला म्हटलं, "छे, गं! माइंड कण्डिशनिंग वगैरे कुठे? म्हणजे आता काय विचार करून सगळं लिहायचं का?" तर ती म्हणाली, "काय लिहायचंय याचा विचार नाही करायचा, कसं लिहायचंय, याचा विचार करायचाय आपण." तिनं मला पुस्तकंही आणून दिली होती. मी बरेच दिवस त्यांना हात नव्हता लावला. पण नंतर मी ते सगळं वाचलं आणि खरंच त्याचा फायदा होतो, हे मला जाणवलं. कारण तुम्ही अचानक कधीतरी हिंदी सिनेमाचं गाणं लिहीत असता, मग नंतर ते थांबवून कुठल्याशा अल्बमसाठी कविता लिहिता. सत्तर एम्एमचा तुमचा कॅनव्हास एकदम एका सीडीवर येतो. हे झालं की तुम्ही पटकन एखाद्या मालिकेचं शीर्षकगीत लिहिता, आणि मग स्वतःसाठी पुन्हा काहीतरी लिहिता. तर यासाठी थोडेफार बदल हे करावेच लागतात.

पण मग एका अर्थी हे फायदेशीरसुद्धा आहे. जर इतक्या विभिन्न प्रकारे व्यक्त होता येत असेल तर एका साच्यात अडकणं सोपं राहत नसेल.

हो. जर तुम्ही ते सकारात्मकरीत्या घेतलं तरच. सतत ताजं राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमं हाताळणं कधीही चांगलं. ह्याचा अर्थ कविता लिहून झाली की कादंबरी लिहीणं नव्हे. कवितेमध्येच आधी वेगवेगळी माध्यमं तुम्ही हाताळून पाहा. कवितेत ताजं राहायचं आहे, म्हणून मी गद्यलेखनाकडे वळतो, असं असेल, तर मग तो प्रकारच वेगळा. त्याच्यात अजून वेगळेच, स्वतंत्र अपघात घडू शकतात.

तुला एखादी कविता सुचते, तेव्हा ती कला आणि कारागिरी या दोघांतून येते, की नंतर तू त्या कवितेवर प्रक्रिया करतोस? किंवा तुला असं कधी वाटतं का, की एखादी कविता आपल्याला सुचली आहे, पण तिच्यात कारागिरी जास्त वाटते आहे, आणि आपल्याला जे म्हणायचं आहे, ते जरा कमी पडतं आहे?

मी माझ्या प्रक्रियेबद्दल प्रामाणिकपणे थोडं सांगतो. एखाद्या तीव्र भावनेच्या हाताला धरून एखादी ओळ येते, जिच्याबरोबर आपण भटकायचं असतं. त्या ओळीवरून तुम्हांला कळतंच की यातून जे काही घडू शकणार आहे त्यात कला आणि कारागिरी दोहोंचा संगम आहे की नाही. कदाचित ती तुमच्या कवितेतली शेवटची ओळ बनू शकते, अथवा पहिली किंवा अधलीमधलीदेखील. पण मुख्य प्रश्न म्हणजे त्यात ते अपील आहे का? आजच्या भाषेत सांगायचं झालं, म्हणजे एक्स फॅक्टर आणि पॉप्युलॅरिटी अपील दोन्ही तीत आहेत का, याचा अंदाज येतो. माझं मन अशाप्रकारे या गोष्टी तपासतं, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. मग यात न बसणारं काही असेल तर ते तुम्ही स्वतःसाठी लिहून ठेवायचं की नाही? तर मीतरी ते लिहून ठेवतो. पण ते लोकांसमोर कसं मांडायचं, याचा विचार नक्कीच करतो. तुम्ही जेव्हा तिकीट लावून लोकांना काही ऐकवता तेव्हा कलाकार आणि व्यावसायिक म्हणून तुमच्यावर ती जबाबदारी येतेच. उदाहरणार्थ, 'प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही' ही किंवा 'कुणीतरी आठवण काढतंय' ही ओळ घेऊ. ही ओळ सुचते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात, हे तुमचं तुम्हांलाच कळतं. तुम्हांला स्वत:ला सोपवून द्यायचं असतं, त्या कवितेच्या हाती, त्या ओळीच्या हाती. तुम्हांला आता फक्त ती संकल्पना नीट उलगडून लोकांसमोर ठेवायची आहे. तुम्हांला जे काही म्हणायचं आहे, ते सारं तुम्ही एका ओळीत म्हणून टाकलं आहे. पण 'झालं माझं!' ही एकाच ओळीची कविता आहे, हे तुम्ही सांगू शकत नाही. काही लोकांना या एका ओळीतही अख्खी कविता गवसेल. त्यांना त्यातले सगळे अर्थही दिसतील. पण तुम्हांला अजून काही मांडायचं आहे , ह्या ओळीला वेगवेगळ्या पद्धतीनं भेटायचंय, बिलगायचंय म्हणून तुम्ही पुढे लिहिता. त्या संकल्पनेचा विस्तार करता. त्या ओळीपाशी पुन्हा येऊन तुम्ही प्रभावीपणे शेवट करता कवितेचा. ही कारागिरी! कारागिरी असणं, याचा मी बागुलबुवा करत नाही. गायकानं समेवर येण्यासारखंच ते आहे. तुम्ही योग्य ठिकाणी समेवर यायला हवं. नाहीतर मग चार-चार पानी कविता होतात पण तुमचा श्रोतृवर्ग तुमच्यापासून दूर गेलेला असतो. जे सांगायचं आहे, ते नेमकं असायला हवं. याबरोबरीनंच सादरीकरणाचा विचार असलेला बरा, असं मला वाटतं.

vj1.jpg

मध्यंतरी तुझ्या एका कवितेत 'फोन वाजत राहिला' असे शब्द होते. ते कसे आले?

माझं असं म्हणणं आहे की, तुम्हांला कुठल्याही भाषेत शब्द सुचू शकतात. जसं संदीप म्हणतो ना, की आय अ‍ॅम अ‍ॅन एक्स्प्रेशनिस्ट. मी भावना व्यक्त करणारा आहे. मायबोलीवरच्याच एका मुलाखतीत मी त्याचं हे वाक्य वाचलं होतं. मीही एक एक्स्प्रेशनिस्ट आहे. मला जे वाटतं आहे, ते मी एक्स्प्रेस करणार. मग ती कविता असो, गझल असो, किंवा ललित असो. लोकांना इतर भाषीय शब्द आवडतात की नाही, हा वेगळा मुद्दा आहे.

बरेचदा वृत्तबद्ध लिखाण करत असताना त्याचा बराच मोठा बागुलबुवा होतो. त्या वृत्तांचं एक जड ओझं बाळगून लोक वावरत असतात. समजा मी असं लिहिलं की, 'भूक जळू लागली की चंद्र भाकर होत नाही'. ही एक ओळ, आणि 'रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला' ही दुसरी ओळ आहे. या दोन वेगवेगळ्या भावना आहेत. आता दुसर्‍या ओळीत मला 'फोन'च म्हणायचं आहे. दुसरं काही म्हणायचंच नाहीये. त्यात मी असं लिहिलं आहे की,

बोलला सायलेंटली, पण जाब मागत राहिला
रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला

आता यातून मी एक अनसेड गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. कुणीतरी खूप दूर आहे, पण त्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल अजूनही तक्रार आहे, आणि ती व्यक्ती मला मूकपणे जाब विचारते आहे, आणि मी तिच्याकडे लक्ष देत नाहीये. आता हे सांगायला मी फोन हे प्रतीक वापरतो आहे. त्यात चूक काय आहे? आणि ते ही त्या तथाकथित वृत्तात चपखल बसत असेल तर ?

बरोबर, तिथे 'सायलेंटली' हाच शब्द हवा.

आणि हा 'सायलेंटली' मराठी वृत्तात बसतो. त्या गझलेतले सगळे इंग्रजी शब्द मराठी वृत्तात बसतात.

आपण सादरीकरणाबद्दल बोलत होतो, ते अपूर्णच राहिलं. तुझ्या प्रत्येक कवितेला तू सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहतोस का?

नाही. सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून वगैरे मी काही पाहत नाही प्रत्येक कवितेकडे. अर्थात लिहिताना मनाच्या एका कोपर्‍यात कुठेतरी जाणवतं, की आपण हे कार्यक्रमात नक्की समाविष्ट करू शकतो. विशेषतः तुम्ही कार्यक्रम करू लागता, तेव्हा या गोष्टी खूपदा घडतात. ही ओळ आहे आणि ही कविता आपण आता कार्यक्रमात घेऊ शकतो, असं खूपदा जाणवतं. कधी त्या सुरू असलेल्या विषयानुरुप असतात किंवा तुमच्या कवितेनंतर जे गाणं गायलं जाणार आहे, त्यानुरुप एखादी कविता तिथे चपखल बसते. याला क्लृप्ती म्हणायचं असेल, तर या सगळ्या कविता लिहून झाल्यानंतरच्या क्लृप्त्या आहेत. माझ्या पुढच्या कार्यक्रमाची अनुक्रमणिका कशी आहे अथवा कशा पद्धतीनं गोष्टी कार्यक्रमात येणार आहेत, यावर सगळं अवलंबून आहे. त्यासाठी गरजेची असणारी डेटाबँक माझ्याकडे तयार होते आहे इतकंच जाणवतं. गाण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी कविता कशाला माझ्या मते गाणी लिहितानासुद्धा कविताच लिहावी, ते एकापरीनं फायद्याचं आहे. वाटलं तर गाणं म्हणून सादर होईल नाहीतर तुम्ही कविता म्हणून दुसर्‍या गाण्याआधी सादर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे 'माझा दोनतीन तासांचा कार्यक्रम पुढे पाच तास चालला तरी लोकांना कंटाळा न येऊ देता माझ्या कविता मी त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो का', यासाठी प्रत्येक कलाकारानं सज्ज असावं, असं मला वाटतं. असा विचार फक्त कवितांच्याच बाबतीत मनात येतो, असं नाही. कवितांमध्ये स्वतःसाठी लिहिलेली आणि इतरांसाठी लिहिलेली असे प्रकार वगैरे नसतात. मात्र गीतलेखन व कवितांमध्ये एक वैशिष्ट्य असतं की, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी सपकन लिहून मोकळे होता आणि खूप वेळ त्या धुंदीत वावरत राहता. मात्र तयार चालीवर शब्द रचताना तुम्हांला आधी त्या चालीच्या धुंदीत रहावं लागतं, सपकन काहीतरी मनात येण्यासाठी. जणू काही एखादी विशिष्ट मापाची कॉफिन दिलेली असते.

म्हणजे 'मागणीनुसार बेतणं' का?

हो, तेसुद्धा खरंतर करता यायला पाहिजे. मी अलीकडे याबद्दल खूप आसूसून बोलतोय. म्हणजे असं म्हणतात की तुम्हांला कॉफीन दिलेली असते आणि तिच्यासाठी योग्य त्या मापाचं प्रेत शोधायचं असतं पण मी परवा एका कार्यक्रमात म्हटलं, की प्रेत तर शोधायचचं असतं तुम्हांला, पण त्या प्रेतात प्राण फुंकण्याची जबाबदारीही तुमचीच असते. त्या रचनेचं व्यक्तिमत्त्व जिवंत करून लोकांसमोर मांडायचं असतं. म्हणजे तुम्हांला जरी चाल दिली असली, तरी ती चाल एकेक ओळ ऐकतऐकत त्याबरहुकूम कविता लिहायची, की ती चाल पूर्णपणे आतमध्ये रुजवून घ्यायची आणि थांबून राहायचं आतून उत्स्फूर्त काही येत आहे का त्या चालीत हे पाहण्यासाठी, हे तुम्ही ठरवायचं. पण थांबून राहण्यासाठीचा वेळ प्रत्येकाला देता यायला पाहिजे. कवितांच्या बाबतीत असं काहीच नाही. म्हणजे आता पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे कविता नाहीये म्हणून आता मी लिहितोच काहीतरी, असं करून नाही चालणार. तुम्ही तसं करू शकत नाही. तुम्हांला आहे त्यातूनच निवडावं लागतं. पण खरं कसब योग्य ती कविता निवडण्यात येतं. जे काही क्राफ्टिंग असेल, ते कार्यक्रमाचं स्वरूप ठरवण्यात कामी येतं.

म्हणजे प्रेक्षकांसाठी अवघड मांडणी सोपी करणं, त्यांना समजेल असंच सादर करणं, हे आवश्यक आहे का? की प्रेक्षकांचीही काही जबाबदारी असते, हे तू मानतोस?

पहिल्या प्रश्नाचं माझं उत्तर ठाम ’हो ’ असं आहे. जरा सविस्तर सांगतो. प्रेक्षकांवर जबाबदारी ढकलून, आम्ही पाहिजे तसे व्यक्त होत राहू, असं म्हणणं खूप सोपं आहे. पण मग तुम्ही येताच कशाला या क्षेत्रामध्ये? तुम्ही घरी लिहीत बसा ना. हां, मी असंही म्हणेन, की ठीक आहे, जशा प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात, तशा तुमच्याही अपेक्षा असतील प्रेक्षकांकडून, श्रोत्यांकडून. त्यात काही वावगं नाही. पण तुम्ही आधी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जास्तीचं एक पाऊल पुढे टाकत आहात का? तुम्हांला जे लोकांपर्यंत पोहोचवायचंय, ते त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही, याचा तुम्ही आधी नीट अभ्यास केला आहे का? एकदा त्याचं उत्तर मनानं 'हो' असं दिलं की हे पाहायला हवं की म्हणून खूप सोपं , सवंग करून सांगत आहात का? ही अत्यंत अवघड प्रक्रिया आहे. तुम्हांला अलीकडच्या कार्यक्रमांतून बरेचदा दिसेल की जड नको, जड वाटेल, म्हणून सतत उतरलं जातं प्रेक्षकांच्या पायरीला. हे म्हणजे कसं आहे की, शास्त्रीय संगीताची मैफील आहे कुठल्यातरी सभागृहात आणि आता प्रेक्षकांना हे गाणं समजेल की नाही, आवडेल की नाही, असा प्रश्न पडला म्हणून प्रेक्षक येऊन बसल्यानंतर अचानकच लावणीच सुरू केली. तुम्ही किमान प्रेक्षकांना एक संधी द्याना तुमचं गाणं ऐकून, समजून घेण्याची. ते आलेत त्या मैफिलीला तर त्यांची कुवत असू शकेल गाणं समजण्याची. तुम्ही त्यांना अगदी तळागाळातले समजून इतके खाली का उतरताय? हा एक मुद्दा झाला.

दुसरा मुद्दा असा, जो मी अनुभवलेला आहे आणि ज्यातून मी खूप शिकलो आहे, तो म्हणजे, कवीचं कविता ऐकवतानाचं सादरीकरण खूप महत्त्वाचं आहे. भावना पोहोचवणं आणि व्हॉईस मॉड्युलेशन यांबद्दल कवी फार विचार करत नाहीत. थोडासा इगो असतो, की मी ही कविता लिहिली आहे आणि ती मी आता तुमच्यासमोर ठेवतोय, आता तुमची जबाबदारी की तुम्ही ती समजून घ्यायची. नाही कळली ती कविता, तर तुम्हांला कविता कळत नाही, असं म्हणून मी मोकळा होणार. पण या दोन टोकांच्या अधेमध्ये थोडीशी जागा असते. एक प्रयत्न अजून अपुरा असतो. तुम्ही जे वाचत आहात, त्यातले तुमचे उच्चार स्पष्ट नसतील, आवाज चांगला ऐकू येत नसेल, तर प्रेक्षकांना ती कविता आवडणार नाही. तुमच्याकडे ती कविता उत्तमप्रकारे सादर करण्यासाठी लागणारा आवाज, शब्दफेक या गोष्टी आहेत का, हे आधी बघा. कविता लिहिली म्हणजे ती वाचून दाखवण्यासाठी समोर आलंच पाहिजे, असं नाही. तुम्ही पुस्तक छापू शकता. हां, आता तुमच्याकडे चांगल्या सादरीकरणासाठी असलेले गुण असतील, तर तुम्ही त्यांचा पूर्ण वापर करता का? त्यासाठी काही प्रशिक्षण घेता का? आपल्याकडे कसं असतं, मी कविता लिहिलेली आहे आणि ती भारीच आहे, असं वाटत असतं, कारण आजूबाजूच्या लोकांनी तसं सांगितलेलं असतं पाठ थोपटून. मग एकदम चार-पाचशेच्या सभागृहामध्ये ती कविता श्रोत्यांपर्यंत पोहोचली नाही, की ’आजकाल लोकांना कविता कळतच नाही’, ’प्रेक्षकांची अभिरुचीच सवंग झाली आहे’ असं सहज म्हणता येतं. त्यामुळे मला असं वाटतं, की तुम्ही जर तुमची सर्व शस्त्रं आधी वापरून पाहिली असतील, आणि तुमचं सादरीकरण उत्तम असेल, लेखनही कसदार असे, तरच तुम्ही थोडीफार कुरबुर करू शकता. पण अशी उदाहरणं तुला सापडणारच नाहीत.

मुळात या सगळ्या समस्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांना आजकाल पडद्यासमोर यावसं वाटतं, यातून वाढीस लागलेल्या आहेत. ज्यांच्यात क्षमता आहे त्यांनी जरूर करून पाहावं पण आपण मुळात लेखन या क्षेत्रात आहोत, रंगमंच हे आपलं कार्यक्षेत्र नाही, हे भान निसटता कामा नये.

अच्छा, म्हणजे कुठेतरी प्रेक्षकांनीही पुढे यायला पाहिजे.

येतातच रे. ते येत नाहीत, हा गैरसमज आहे. आपलेच प्रयत्न अपुरे असतात. माझातरी नेहमी हाच समज असतो कुठलाही कार्यक्रम संपल्यानंतर, की अजून मला काहीतरी जास्त करायचंय. तुला जर डावीकडच्या कोपर्‍यात तिसर्‍या खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या चेहर्‍यावरची रेषाही हलत नाही, असं दिसतंय, तर तू तुझ्या लिखाणाकडे, सादरीकरणाकडे नीट लक्ष दिलंच पाहिजे, त्याच्या चेहर्‍याकडे बघत बसण्यापेक्षा. इतरांवर दोष ढकलण्यापेक्षा स्वत:ला अधिक कसं सुधारता येईल, हे बघितलं पाहिजे. यामुळे झाला तर तुमचा फायदाच होणार आहे. माझातरी रोज होत आहे.

स्वतःच्या कवितांकडे त्रयस्थ नजरेनं बघण्याची, त्या तपासण्याची, चुका सुधारण्याची वृत्ती हुकमी टाळ्या, किंवा ऑनलाईन माध्यमांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर इन्स्टंट प्रतिक्रिया मिळवण्याच्या नादात कमी होत चालली आहे, असं तुला वाटतं का?

परवाच एका परिसंवादात बोललो की, ऑनलाईन माध्यमात मला तीन बाबी दिसतात - सहजपणे मिळणारी ओळख, झटपट प्रतिक्रिया, झटपट समाधान. हा खूप मोठा धोका आहे. त्याचा तुमच्या कलाकार म्हणून होणार्‍या वाढीवर दुष्परिणाम होतो. विशेषत: कवींबद्दल बोलायचं तर फार चटकन हा परिणाम दिसू शकतो. कवितेच्या लहान आकारामुळे कविता प्रकाशित करणं सोपं आहे. उदाहरण द्यायचं झालं, तर लोक फेसबुकावर एक-दोन चमकदार ओळी टाकत असतात. 'जिचा हात धरून आपण उरलेल्या कवितेचा शोध घ्यायचा असतो ती ओळ', हा जो मुद्दा मी मघाशी बोललो, तशी ती सुचलेली एक ओळ असते. बरेचदा काही सुचल्याच्या उत्साहात लोक पूर्ण कविता न लिहिताच ती एक ओळ प्रकाशित करून प्रतिसादांचा अदमास घेतात. त्याला जर अनुकूल प्रतिसाद आले तर मग पुढची कविता लिहायची. यामुळे होतं काय की, त्यावर जी विचारप्रक्रिया चालू असते ती खंडित होते. यामुळे कविता आधी एकसंध घडली असती तशी आता घडत नाही. त्यात खंड पडला, बाकीचा प्रभाव आला, म्हणजे रचना कलुषित झाली. दुसरं म्हणजे, प्रतिसाद आले नाहीत तर ती रचना पुढे लिहिलीच जात नाही. एखादी चांगली रचना जन्माला येण्याआधीच मारून टाकण्यासारखं ते आहे. गर्भलिंगपरीक्षणासारखं!

अगदी बरोबर.

हे धोकादायक आहे. माध्यमांचा वापर करताना कितपत करायचा आणि कशासाठी करायचा, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. नेटवर्किंग आणि इमेज बिल्डिंग या बाबींसाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर करणं, याला माझी अजिबात हरकत नाही. ती काळाची गरज आहे. पण या माध्यमाचा वापर तुम्ही 'कवितांची वही' म्हणून करत असाल, तर ते मात्र धोकादायक आहे आणि त्यातही त्या वहीत दुसरी किंवा पाचवी ओळ लिहिण्याआधी तुम्हांला 'आधी दाखवू मग लिहू ' असं होत असेल तर जास्तच! अखंड, अविरत काव्यमैफिलच जणू चालू आहे तिथे. चोवीस तास तुम्हांला मंच सज्ज करून दिल्यासारखं ते माध्यम तुम्ही वापरत आहात. लोक येतायत, मंचावर सादरीकरण करतायत. यात सादरीकरणाव्यतिरिक्त कवितांवर विचार करण्यासाठी वेळ कुठे आहे? दोन कार्यक्रमांमध्ये जे अंतर आवश्यक आहे, ते नाहीच इथे.

vj3.jpg

तू बॉस्टनला जो कार्यक्रम सादर करतो आहेस, त्यात नवीन कविता कुठल्या वाचणार आहेस? काही खास तयारी केली आहेस का?

तुला एक सांगतो, माझ्यात आणि किशोरमध्ये ही नेहमीच एक मैत्रीतली, खेळीमेळीची खुन्नस असते. आणि ती आम्हांला, आमच्या कार्यक्रमाला सजग ठेवते. बरेचदा आमचा संध्याकाळी कार्यक्रम असला, की आम्ही दुपारी भेटतो, आणि मनोभावे बसून कवितांची यादी करतो, कुठल्या क्रमानं कविता वाचायच्या ते ठरवून घेतो. दुपारी अडीचतीनला आम्ही वेगळे होतो, आणि थेट थिएटरवर भेटतो. ठरवल्याप्रमाणे एकेक-दोनदोन कविता झाल्यावर असं लक्षात येतं, की एकतर वैभव किंवा किशोर कविता बदलत आहे. त्यामुळे दुसरा लगेच सावध होतो. दोन शास्त्रीय गायकांची जुगलबंदी असल्यासारखं आहे हे. म्हणजे मी आता ही तान घेतली, आता बघू तुझ्याकडे काय आहे आता. आणि खूप मजेदार असतं हे. आपण एक नवीनच कविता सुरू केल्यावर शेजारच्याच्या चेहर्‍यावरचे भाव टिपण्यात मजा असते. त्यामुळे मी बीएमएमच्या कार्यक्रमात कुठल्या कविता वाचणार आहे, हे सांगितलं, तर कदाचित किशोर सावध होईल. (हसतो)

शास्त्रीय गायक, अभिनेते यांच्यात अशी चढाओढ असते, हे ठाऊक होतं. कवीही असं करतात, हे आज कळलं.

यामुळे होतं काय, की वेळ कसा जातो, ते कळत नाही. कार्यक्रम आहे , माझामाझा भाग मी वाचणार आहे, म्हणून तुम्ही शरीर अगदी ताठ करून बसलेले असता, असं घडत नाही. या खेळाचा तुम्ही एकदा भाग झालात, की हा सगळा ताण नाहीसा होतो. प्रेक्षकही मग जरा सैलावतात. कार्यक्रमाची मजा मग ते मोकळेपणानं घेतात. दुसरं असं की, एकच साचेबद्ध कार्यक्रम सतत सादर करण्यामुळे एकसुरीपण येतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या लक्षात आलं आहे, की माझ्या खूपशा जुन्या लिहिलेल्या कविता किशोरनं एखादी त्याची वेगळीच कविता वाचली की आठवतात. त्यानं वेगळी कविता वाचली, की लगेच मेंदू विचार करतो, आपल्याकडे आत्ता वाचण्यासारखं काय आहे? हा विचार करायला कितीसा वेळ असतो? फक्त सव्वा किंवा दीड मिनिट. तुम्ही काही लिहिलेलं सगळं बाड आणलेलं नसतं कार्यक्रमात बरोबर. मग पाठांतर वाढतं वगैरे वगैरे.

तुझं आता हे जे किशोर कदमांबरोबर उत्तम ट्यूनिंग आहे, तसं अजून कुणाबरोबर तुझे सूर जुळतात?

ही यादी मोठी आहे. मी आता दत्तप्रसादबरोबर 'सोबतीचा करार' हा कार्यक्रम करत आहे, फार मजा येते त्याच्याबरोबर कार्यक्रम करायला. हेच आशिष मुजुमदारच्या बाबतीतही. ही झाली पुण्यातली मंडळी. माझं अवधूतबरोबर चांगलं ट्यूनिंग आहे, वैशालीबरोबर तर अर्थात आहेच. शशांक पोवारबरोबर काम करायला मला आवडतं. हिंदीत राजपाल यादवसाठी आता पटकथा लिहिताना मला मज्जा आली. हॉलीवूडसाठी एक क्रॉसओव्हर चित्रपट लिहितो आहे. ते वेगळंच वातावरण आहे. तुफान मजा आणि समाधान.

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यात तुला कितपत रस आहे?

भरपूर . मला पूर्वीपासूनच हिंदीत , उर्दूमध्ये काम करायला आवडतं.

तू हिंदी भाषेबद्दल बोलतोयेस की चित्रपटसृष्टीबद्दल?

चित्रपटसृष्टीतही, आणि भाषेतही. मला स्वत:ला हिंदी ही भाषा खूप आवडते. एका गीतकाराच्या नजरेतनं सांगायचं झालं, तर उर्दूत आणि हिंदीमध्ये साहित्यिकभाषा आणि बोलीभाषा यांत फार अंतर नाही. त्यांच्या लिखाणात ज्या ओळी येतात त्या त्यांच्या बोलण्यामध्ये नक्कीच येत असतात. म्हणजे 'फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा ना था', हे दोघंजण एकमेकांशी बोलताना 'यार ऐसे भी फ़ासले होंगे कभी सोचा नही था' असं नक्की म्हणू शकतात. आपल्याकडे भावना व्यक्त करताना मराठीत थोडं अवघडलेपण येतं. आपली जी साहित्यिक भाषा आहे, ती नेहमीच दोन पिढ्या मागे राहिलेली आहे. आजच्या मुलांना आपली मराठी गाणी का जवळची वाटत नाहीत? तर ती जी मराठी भाषा बोलतायेत (बोलतच असतील तर!), ती ही भाषाच नाहीये गाण्यांमधली. बरं, तुम्ही त्यांच्या पातळीला जायचं म्हटलं, तर एका पिढीच्या मते तुम्ही सवंगतेकडे येता थेट. शिवाय छोट्याछोट्या गोष्टींचे अर्थ निर्मात्यांपासून इतर कुणालाही माहीत नसतात. मग 'अमूक शब्द बदला', 'तमूक शब्द वगळा' असं सुरू होतं. म्हणून माझा नेहमी व्यक्त व्हायला आणि नजाकतीसाठीही हिंदी भाषेकडे जास्त ओढा आहे. मातृभाषेचा अभिमान वेगळा आणि व्यक्तिगत आवड वेगळी , नाही का?

दुसरं म्हणजे, एकदा का तुम्ही या क्षेत्रात, म्हणजे हिंदीत, कलाकार म्हणून आलात, तर तुम्हांला स्थिरावायला जास्त वाव आहे. मराठीपेक्षा हिंदीतल्या गीतकाराला जास्त पैसे मिळतात. हा मुद्दा कुणाला योग्य वाटेल न वाटेल, पण शेवटी चूल चालू राहिली तरंच खरं ना? तुम्ही वृत्तीनं भणंग असू शकता, तुमचं कुटुंब तसं का असेल? का असावं? मघाशी म्हणालो ना,

भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही...

vj4.jpg

***

टंकलेखनसाहाय्य - सशल, बिल्वा, अश्विनी के
शब्दांकनसाहाय्य - श्रद्धा

***

श्री. वैभव जोशी यांचं पहिलं, दुसरं व चौथं छायाचित्र - श्री. नचिकेत जोग
तिसर्‍या छायाचित्राचे छायाचित्रकार अज्ञात.
सर्व छायाचित्रं श्री. वैभव जोशी यांच्या खाजगी संग्रहातून.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुपर्ब मुलाखत!! Happy
वैभव जोशींच्या कवितांसारखीच त्यांची मुलाखतीतली उदाहरणं भारी आहेत! Happy कॉफीन, गर्भलिंगपरीक्षण, ऑनलाईन माध्यमं - कवितांची वही! बेस्टच!

सुंदर ...
वैभवशी मैत्री झाली पण त्याचा कुठलाही कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नव्हता पण गेल्या चौदा तारखेला म्हणजे जून चौदा ला सोबतीचा करार पाहिला आणि एक अपुरा कोन पूर्ण झाला. आता आम्ही भूमितीच्या पलीकडे भेटणार परत ...
हा एक अवलिया वगैरे अजिबात नाहीये पण तसा नसूनही वारंवार आश्चर्याचा धक्का देणारा कलावंत आहे याचे प्रचंड कौतुक वाटते.
मुलाखत सुद्धा अत्यंत सुरेख घेतली आणि दिली आहे ...
आभार

आपल्याकडे भावना व्यक्त करताना मराठीत थोडं अवघडलेपण येतं. आपली जी साहित्यिक भाषा आहे, ती नेहमीच दोन पिढ्या मागे राहिलेली आहे. आजच्या मुलांना आपली मराठी गाणी का जवळची वाटत नाहीत? तर ती जी मराठी भाषा बोलतायेत (बोलतच असतील तर!), ती ही भाषाच नाहीये गाण्यांमधली. बरं, तुम्ही त्यांच्या पातळीला जायचं म्हटलं, तर एका पिढीच्या मते तुम्ही सवंगतेकडे येता थेट>>>> अगदी अगदी.

अरभाट आणि चिनूक्सच्या सुंदर प्रश्नांनी आणि वैभवच्या तितक्याच समर्पक उत्तरांनी मुलाखतीत 'जान' आणली आहे. अरभाट आणि चिनूक्सचे मनःपूर्वक अभिनंदन!

अहा........काय मस्त अनुभव दिलात रे तुम्ही......मजा आ गया Happy
वैभवा...मस्त गाजवून ये बीएमएम Happy

अविकुमार+१. खूप वेगळी आणि खूप काही सांगणारी मुलाखत. 'आपला' वाटणारा वैभव, त्यांची हातात घालून चालणारी -चालवणारी कविता एव्हढंच माहीत होतं आधी.
वैभव, hearty congrats! सुंदर मुलाखत..

प्रतिसाद,

>> मुलाखत सुद्धा अत्यंत सुरेख घेतली आणि दिली आहे ...

अगदी १००% अनुमोदन! ही वाचतांना मुलाखत घेणे ही एक कला आहे याच पदोपदी जाणीव होत राहते. मुलाखत 'मुलाखत' न वाटता ओघवत्या गप्पा वाटतात. तसेच शब्दांकन व टंकलेखन सहाय्यकांचेही अभिनंदन. दोन्ही अगदी अचूक झाली आहेत.

असो.

वैभव जोशींशी माझा परिचय (थेट वा कवितेद्वारे) नाही. मला स्वत:ला कवितेतलं फारसं कळत नाही. मात्र तरीही त्यांचे विचार मननीय आहेत. विशेषत: मराठी भाषेसंबंधी केलेली निरीक्षणे फारंच समर्पक आहेत. मला त्यांना भेटायचं झालं तर एक काव्यरसिक या भूमिकेपेक्षा मराठीप्रेमी ही ओळख अधिक अर्थपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. (हे मी बरोबर बोललो का? :अओ:)

आ.न.,
-गा.पै.

सुरेख मुलाखत! वैभवचा नेहमीचा मोकळेपणा आणि थेटपणा (जो मी पाहिला आहे) मुलाखतीमध्येही आला आहे.

"'वगैरे'सारखा अत्यंत कर्मदरिद्री शब्दसुद्धा"...
>>> हा शब्दप्रयोग जरा अति वाटला... नकळत एकदमच टोकाचा शब्द वापरला जावा, असं काहीसं. चुभुघेदे. एकंदरीतच मुलाखतीची प्रस्तावना मुलाखतीच्या तुलनेत रसभंग करणारी वाटली. 'जोश्यांच्या' वगैरे शब्दप्रयोग खटकले. सर्वसाधारणपणे औपचारिक मुलाखतींमध्ये 'वैभव जोशींची कविता' अशी रुपे अधिक सयुक्तिक वाटली असती, असं वैम. कदाचित संबंधितांच्या वैयक्तिक परिचयामुळे असे प्रयोग वापरले गेले असावेत.

धन्यवाद.

नियमांना धरून असेलही. मोठ्या मंचावरून मुलाखती घेताना वा प्रसारित होताना औपचारिक मुलाखतींमध्ये कधीही मी असा वापर वाचलेला अथवा ऐकलेला नाहीये. कदाचित माझं वाचन कमीही असेल. असो. Happy

मुलाखत छान दिली व घेतली आहे.
मराठी भाषेबद्दल/गाण्याबद्दल जी निरीक्षणे वैभव जोशींनी नोंदवलीत त्याच्याशी अगदी १०१ % सहमत आहे.
शुभेच्छा.

यात्रीजी :असा वापर होतो मोठ्या मंचावरूनही हल्ली......
जोश्याना असे म्हणणे कुणाकुणाला खटकू शकते हे बरोबर
वगैरे हा कर्मदरिद्री शब्द आहे असे म्हणणे आक्षेपार्हच !!!!!!!

असो
मुलाखत खूप सुंदर झाली खूप काही शिकायला मिळते आहे
सर्वांचे मनःपूर्वक आभार

छान आणि मनमोकळी प्रश्नोत्तरे..
हार्दिक शुभेच्छा, वैभव! Happy

नजर कितीही आसमानं ढुंडाळत असली तरी पाय जमीनीवर घट्टं असलेला माणूस. वैभवचा कार्यक्रम आमोरी-सामोरी ऐकायचाय.
वैभवचं एक खूप म्हणजे खूप आवडतं... 'मी एक एक्स्प्रेशनिस्ट आहे'.

मी व्यक्तं होतो... ह्यात विलक्षण सहजता आहे, एक मजबुरी आहे... आहे हे असं आहे असा एक झकास (अक्कडबाज) अ‍ॅटिट्यूडही आहे. तो त्याच्या कवितांमधून, गझलांमधून आपल्याला भेटत रहातो.
वैभवा, जियो!

मुलाखत पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीये... शाब्बास रे... अरभाट, चिनुक्स... तुमचं कौतुक करावं तितकं कमी.
मजा आया