नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

Submitted by सुशांत खुरसाले on 26 June, 2013 - 04:46

जैसा जमेल तैसा आणा घरात पैसा
काट्यात शोध पैसा , फुलवा फुलात पैसा!

जेव्हा मनात असतो तेव्हा करात नसतो
असतो करात तेव्हा नसतो मनात पैसा !

असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

उशिरा मला कळाले-ती नाचणार तोवर
जोवर असेल माझ्या नाचत खिशात पैसा..

दु:खात माणसाला लोटून तोच देतो
आणिक हळूच नंतर हसतो मनात पैसा !

दररोज साजरी तो करतो पहा दिवाळी
दररोज काढतो अन् त्याची वरात पैसा

घेईल का विकत तो प्रेमास काय केव्हा..?
दररोज विकत घेतो जरी चांदरात पैसा ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतल्यातली दुसरी ओळ कमी आवडली बाकी शेर सुसाट !! आता तुमचे नाव सुसाट खुरसाले ठेवायला हरकत नाही Happy

जेव्हा मनात असतो तेव्हा करात नसतो
असतो करात तेव्हा नसतो मनात पैसा !<<<<< याला म्हणतात स्टाईल !!! Happy

मस्त ! मूड फ्रेश करणारी मुसल्सल गझल आवड्ली

वा वा वा पैशावर कुठल्या कवीने अशी कविता केली नव्हती म्हणून तो हिरमुसला होता, आज न्याय मिळाला त्याला Happy
खूप आवडली गझल.

सुसाट खुरसाले<<ठेवा ठेवा जरूर....
दोन अक्षरे बदलून नावात 'लाख'मोलाचा फरक पडला...!

मनापासून आभार भारतीताई आणि वैवकुजी!:)

खूप छान!!
<<असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा >> थोड्या वर्षांनी हे अगदी खरे होईल....

असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...
.
उशिरा मला कळाले-ती नाचणार तोवर
जोवर असेल माझ्या नाचत खिशात पैसा..
.
दु:खात माणसाला लोटून तोच देतो
आणिक हळूच नंतर हसतो मनात पैसा !
.
दररोज साजरी तो करतो पहा दिवाळी
दररोज काढतो अन् त्याची वरात पैसा

फ़ार सुंदर. Happy

शिवम, आनंदयात्री ,गणेशजी,मुटेसर - सर्वांचेे मनःपूर्वक आभार!!

आनंदयात्रीजी, वैभव जोशींच्या त्या गझलेची लिंक मला मिळू शकेल का? त्यांच्या अनेक गझला वाचण्याची इच्छा आहे..( ते माबोवर लिहित तेव्हा मी माबोकर नव्हतो बहुधा त्यामुळे ...:))

अहाहा...रचना आवडली. सालं हल्ली मनमोकळी दाद द्यावी अशा रचना येत नाही असं मी मनातल्या मनात म्हणतो...पण आपल्या रचनेने जालसकाळची मस्त सुरुवात केली. . कोणती खास ओळ वाटली असं विचाराल तर मी खालच्या दोन ओळी चोप्य पस्ते करीन.

असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा...

वॉव....!

-दिलीप बिरुटे

वा वा आवडलीच गझल

जेव्हा मनात असतो तेव्हा करात नसतो
असतो करात तेव्हा नसतो मनात पैसा !....सुंदर

असतेच माणसाची पैसाच जात हल्ली
नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा......खरय !

संपूर्ण काव्य आवडले ,पैसा विलक्षण गोष्ट आहे त्यावर हे लिहिणे ,सर्वांच्या मनातील लिहणे आहे

शशांकजी, बिरूटे सर , सुप्रियाताई, विक्रांतजी दिलखुलास प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...!!:)

नक्कीच माणसाची बदलेल जात पैसा.<<< उत्कृष्ट ओळ!

गझल किंचित अधिक सफाईदार झाली असती तर, असे आपले मनात आले. शुभेच्छा!

धन्स!

काही शेर आवडले.
अर्थात मला स्वतःला स्वरयमकामुळे येणारा कल्पनाविलास विशेष भावत नाही.

समीर

स्वरयमकामुळे येणारा कल्पनाविलास <<<हे जरा डीटेलमधे समजावून सांगाल का समीरजी मला नाही समजले काहीच Uhoh

स्वरयमकामुळे येणारा कल्पनाविलास <<<हे
जरा डीटेलमधे समजावून सांगाल
का समीरजी मला नाही समजले काहीच<< +1
मला पण नै कळलं हे......:अरेरे:

वैभव आणि सुशांतः
पैसा असे अंत्ययमक आल्यामुळे अर्थाला येणा-या मर्यादा, आणि त्या मर्यांदामुळे करावा लागणारा कल्पनाविलास म्हणायचे होते. सगळेच अश्या गझल लिहिण्याच्या काळातून जात असावेत. ९८ च्या सुमारास लिहिलेली माझी एक गझल आठवते, ज्याचा रदीफ लिहिली गाणी असा होता. अश्या गझलांत एखाद दुसरा सहज येतो पण नंतर प्रथम काफिया, मग दुसरी ओळ आणि मग पहिली ओळ असं काहीतरी कृत्रिम होतं.
मी एकूणच गझलेबाबत मत देत आहे तेव्हा गैरसमज नसावा.

धन्यवाद.

संपादित

वैभव आणि सुशांतः
पैसा असे स्वरयमक आल्यामुळे <<<

ते तर अंत्ययमक आहे ना समीर, मनात, घरात, करात वगैरे यमके आहेत, जी स्वरयमके नाही आहेत.

Happy

Pages