मातृत्व !

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 June, 2013 - 10:38

बहुतेकवेळी...
इच्छेला मुरड,
भावनेला आवर,
कृतीला पायबंद घालत घालत
करते सादरीकरण मनाचं !

साकारत जाते जगासमोर
एक फसवी प्रतिमा
संयत, प्रगल्भ, विचारवंत..
निव्वळ बुरखेधारी !

अन मग सुरू होतो शोध..
अंतरमनाच्या घालमेलीचा
निसटलेल्या आयुष्याचा गोषवारा काढताना
चालू वर्तमानाशी नाळ तोडत
भविष्यही होत जातं धुसर
धुक्यात हरवलेल्या पायवाटेसारखं !

अन कुठल्याश्या एका अनभिज्ञ क्षणी
लख्ख प्रकाश पडतो जाणिवांचा
जिवघेण्या वेणा देवून साकारतात
दोन-चार जातिवंत ओळी
वृत्त, छंद, रस...
सा-या वर्णभेदा पलिकडल्या
अन बहाल करतात अस्सल मातृत्व !

त्या खाली स्वतःच्या नावाच शिक्कामोर्तब करताना
उचंबळून येतो थुईथुईणारा पान्हा...
पुन्हा पुन्हा !
अन मी कृतकृत्य...
मातृत्वाच्या परीपूर्णतेने !

( खरोखर, काहीकाही स्वप्न किती विलोभनिय असतात नै ! Happy )

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा !! शब्द न् शब्द आवडला !!
खूप दिवस तुमच्या इतक्या आवडणार्‍या कवितेची वाट पाहत होतो

थुईथुईणारा पान्हा...<<<<<< नतमस्तक !!!!!!

क्या ब्बात है ...... ही कविता पुढे मागे....कुमारभारती....युवकभारती वगैरे अभ्यासक्रमात दिसणारच ..

अभिनंदन...

ह्म्न !

विदिपा आपल्या चर्चेनंतरच पोस्टलीय इथे Happy

नविन प्रतिसादकांचेही आभार !

-सुप्रिया.

चालू वर्तमानाशी नाळ तोडत
भविष्यही होत जातं धुसर
धुक्यात हरवलेल्या पायवाटेसारखं !

थेट ह्रदयापर्येंत पोहचणारी रचना
सूंदर
Happy

हे मातृत्व आम्हा पुरुष लेखकुंनाहि मिळते खरच जीवनाची असीम कृपा . सुंदर रचना .

सुप्रिया,

अत्यंत सुंदर!! तुमचे काव्य दिवसेंदिवस खूप अर्थपूर्ण आणि प्रगल्भ होत चालले आहे; यात वाद नाही ! Happy

या विषयावरची माझी एक कविता आठवली. तिची लिंक खाली देत आहे.

http://www.maayboli.com/node/14482