प्रिय.....

Submitted by बागेश्री on 25 June, 2013 - 08:19

प्रिय सखे,

हे पत्र नाही, एक आवेग आहे... तो ओसरला की सारं शांत होईल... पूर्वीप्रमाणे, शांत!
फक्त हा आवेग सांभाळून घे, समजून घे.... पेलून घे...

दोन दिवस.. दोन दिवस झाले प्रचंड घूसमटते आहे.. प्रचंड!

दोन दिवसांपूर्वी तुला फोन केला... खूप आनंदात.. माझ्याकडची आनंदाची बातमी तुला न देता तो आनंद साजरा होईलच कसा...?आपली सवयच ना... लहान लहानग्या इच्छा पूर्ण झाल्या की कर फोन ...आणि फोनवरच्या शब्दांतच सिलीब्रेशन, खरं तर तेच खरं आनंदानं न्हाऊन जाणं!

अगदी तसाच तुझा नंबर डायल केला... तू फोन उचलेपर्यंत, नेमकं काय काय बोलायचंय... गेले दोन महिने बिलकूल बोललो नाहीत म्हणून शिव्या कश्या घालयच्यात ह्याची उजळणी करतच होते...
तितक्यात पलीकडून फोन उचलल्या गेला...

"हॅलो, बागेश्री!"
"कोण, काकू का?"
"नाही गं, ताई बोलतेय...."
"ताई, तू कधी आलीस सिंगापूरवरून, आणि ही माहेरी आलीये होय?"
"बागेश्री, आमचे बाबा गेले, ही ने "तुला" नाही सांगितलं???"

पुढचं सगळं बोलणं यांत्रिक होतं... प्रश्न होते, उत्तरं होते...

काकूंनी घेतला मग फोन...
काय बोलावं अशावेळी?
इथून पुढे सहजीवन नसणार त्यांचं... काय सहानुभूती, समजूत.. शब्द तोकडे, तोकडे अगदी.
अशा वेळी खरंतर भेटायलाच हवं, हात हातत घेऊन, डोळ्यांनी आधार द्यावा...
ठेवला फोन...
सगळं गर्रकन फिरलं!
मी काय सांगण्यासाठी फोन करत होते, काय ऐकून फोन ठेवला... त्यात तुझ्याशी बोलणं झालंच नाही.

काका जरा आजारी होते, तू म्हणाली होतीस, पण तडाकाफडकी सगळंच आवरून निघून जातील, नव्हतं वाटलं!

अगं,
आई किंवा बाबा, ह्यांच नसणं काय असू शकतं, ह्याचा विचारही करवत नाही.
आपली पाळं मूळं गमावणं आणि जगत रहाणं सोपं नसावंच...
त्यात असं तडका फडकी कुणी छप्परच उडवून नेलं तर हादरायला होणारच...

आपलं नातं इतकं प्रगल्भ आहे, परंतू तरिही तुला पुन्हा मी फोन केलाच नाही. तुझी आणि तुझ्या बाबांची गट्टी मी ओळखून आहे, तुला काय वाटत असेल, ते इथे जाणवतंय... काय बोलू मी फोन करून तुला... शब्दांचा दिलासा... ?
आज पहिल्यांदा शब्दांच कमी पडणं मी अनुभवतेय..

तू आणि मी उदगीरला असताना, काकांनी मारलेल्या हजार खेपा मला आठवून गेल्या, कधी पुस्तकं द्यायला, कधी भाजलेला रवा, कधी चिवडा, कधी नुसत्याच भेटी....
आधार वाटायचा, आपले घरचे येऊन जाऊन असले की अगदीच एकटे पडलो नाहीत ही भावना आनंद द्यायची, मग अभ्यासावर लक्ष देता यायचं...

शेवटी सांग ना,
आपल्याला एका व्यक्तीतलं काय प्रिय असतं गं?

त्याचं हसणं, बघणं, बोलणं, रुसणं..नाही...
तर त्याचं "असणं"
फक्त असणं....

एक व्यक्ती, एक चैतन्य!
एक असं चैतन्य, जे कधी ना कधी आपल्यापासून कायमचं दूरावणार असतं... जे दूरावू नये म्हणून फार तर फार आपण आटापिटा करू शकतो, पण ते थोपवून धरू शकत नाहीच....

त्या व्यक्तीचं दुरावणं म्हणजे एक भकास पोकळी आणि त्या पोकळीची सवय लावून पुढे जाणं म्हणजे जगणं!
ह्यासाठी आपण आपल्यालाच कारणं देऊ लागतो- 'माझं जगणं, ह्याच्यासाठी- त्याच्यासाठी- तिच्यासाठी.... किती आवश्यक आहे' हे स्वतःला पक्कं पटवलं की त्या पोकळीची सवय लागलीच समजावी....

मी कधी क्षणभर थांबते,
विचार करते... अवलोकन करते..
माझ्या ध्यानात येतं, आता येत्या काही वर्षांत माझ्या खूप जवळच्यांचे मृत्यू मला पहायचे आहेत. ते त्यांच्या वयानुसार आलेले असू शकतात किंवा दिवसेंदिवस बळावणार्या आजारपणामुळे.
त्यांची स्थिती मला दिसते आहे, आणि नजीकचं भविष्यही.

पण हा विचार मला शहारा देतो, अंगभर.

त्या प्रत्येक व्यक्तीशी माझं निराळं नातं असतं, त्यांच्याकडून मी खूप काही मिळवलेलं असतं....
त्या प्रत्येकाचं 'असणं' मला "माझ्यासाठी" हवं असतं, त्यांचं जाणं माझं फार मोठं भावनिक नुकसान असतं!
इथे माझा स्वार्थ त्या व्यक्तीला नेऊ पाहणार्या मृत्यूपेक्षाही मोठा होतो, मला मिठीत घेतो, आवळतो आणि मी त्या व्यक्तीतल्या चैतन्याची पुजा करू लागते...
खरं तर, हे चैतन्य संपताना.. माझ्यातलं काही संपणार असतं... नेमकं, ते संपणंच मला नको असतं...

पण; क्षणार्धात जेव्हा, ह्या कशावरच माझा कंट्रोल नाही ह्याची जाणीव होते, तेव्हा हतबुद्ध मी, माझ्या सार्या व्यक्तींकडे पहात राहते....फक्त पहात राहते!!

आणि मग,
जे प्रिय आहेत, त्यांना 'हरएक' क्षण आनंदाचाच द्यायचा हे ठरवते... हे देणं मोठ्या पातळीवर जाऊ पाहतं.. आणि मग 'फक्त देतच राहायला हवंय' इथे मी पोहोचते.. आणि त्या स्वार्थाची मिठी सुटते... मी मोकळी होते

माझ्या हातात काहीही नाही हे कळाल्यावर, मी दु:खापासूनही वेगळी होते... माळेतल्या त्या 'गळून गेलेला मोत्याला' आठवणीचं कोंदण देते... मी ह्या जगण्याला तयार होते.
असे अनेक मोती उराशी जपते, आठवणींमधे त्यांना राखून ठेवते... जरा थांबते, कधी अश्रूचा कधी हास्याचा एक क्षण त्या मोत्याला देते.... मी ह्या जगण्याला तयारच असते...
माझाही असाच मोती होईल, हे ही जाणून असते.... आता मी जगत असते.

आणि खरं सांगतेय,
शेवटी तुला 'ह्या दु:खातून बाहेर पड, सावर स्वतःला' असं सगळं सांगणं म्हणजे.. तुझ्या दु:ख सहन करण्याच्या क्षमतेला कमी लेखणं होईल. तू काय आहेस, कुठल्या ताकदीन जीणं जगतेस हे मला माहिती आहे.. म्हणून हा आवेग इथे कागदावर उतरवलाय.

ह्यावेळेस फोनवर नाहीच बोलणार, येऊन भेटेन... घट्ट मिठीच बोलेल..

तुझीच

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्रे Sad
काय ग हे Sad

आपल्याला एका व्यक्तीतलं काय प्रिय असतं गं?
त्याचं हसणं, बघणं, बोलणं, रुसणं..नाही...
तर त्याचं "असणं"
फक्त असणं....
>>>
बागे जियो!

तू फक्त लिहित रहा!

माझ्या ध्यानात येतं, आता येत्या काही वर्षांत माझ्या खूप जवळच्यांचे मृत्यू मला पहायचे आहेत. ते त्यांच्या वयानुसार आलेले असू शकतात किंवा दिवसेंदिवस बळावणार्या आजारपणामुळे.
त्यांची स्थिती मला दिसते आहे, आणि नजीकचं भविष्यही.

पण हा विचार मला शहारा देतो, अंगभर.

त्या प्रत्येक व्यक्तीशी माझं निराळं नातं असतं, त्यांच्याकडून मी खूप काही मिळवलेलं असतं....
त्या प्रत्येकाचं 'असणं' मला "माझ्यासाठी" हवं असतं, त्यांचं जाणं माझं फार मोठं भावनिक नुकसान असतं!
इथे माझा स्वार्थ त्या व्यक्तीला नेऊ पाहणार्या मृत्यूपेक्षाही मोठा होतो, मला मिठीत घेतो, आवळतो आणि मी त्या व्यक्तीतल्या चैतन्याची पुजा करू लागते...
खरं तर, हे चैतन्य संपताना.. माझ्यातलं काही संपणार असतं... नेमकं, ते संपणंच मला नको असतं...

+ १००००००००००००००

आशू Happy
मी पण हेच कोट करणार होते ... पण हळू हळू लक्षात आलं की मला सगळंच्या सगळं ललितच कोट करावं लागणारेय Happy
मग सोडुन दिलं Happy

आपल्याला एका व्यक्तीतलं काय प्रिय असतं गं?

त्याचं हसणं, बघणं, बोलणं, रुसणं..नाही...
तर त्याचं "असणं"
फक्त असणं....>>>

खरंय. पोहोचलं जसंच्या तसं..

आपल्या प्रिय व्यक्तींपासुन दूर राहताना,हा विचार अनेकवेळा अंगावर शहारे देऊन गेला आहे.
पोहोचलं जसंच्या तसं..

एक न एक शब्द पटला आणि आत खरचं काहितरी हाललं! अप्रतिम!
जे प्रिय आहेत, त्यांना 'हरएक' क्षण आनंदाचाच द्यायचा हे ठरवते... हे देणं मोठ्या पातळीवर जाऊ पाहतं.. आणि मग 'फक्त देतच राहायला हवंय' इथे मी पोहोचते.. आणि त्या स्वार्थाची मिठी सुटते... मी मोकळी होते << जवळच्या व्यक्ती दूर होणार हे सत्य मान्य करुन त्यावरचा हा उतारा खूपच भिडला!
बागेश्री खूप छान लिहिलं आहेस!

बागेश्री ,
खूप छान. अगदी आतून हलवणारं ललित आहे.
मी पण हेच कोट करणार होते ... पण हळू हळू लक्षात आलं की मला सगळंच्या सगळं ललितच कोट करावं लागणारेय >> रिया + १

एखादी घटना अगदीच अंतर्मुख करून जाते, तेव्हा स्वतःशीच गप्पा होतात, जगणं किती प्रॅक्टीकली स्वीकारायला शिकलो आहोत, ह्याची प्रामाणिक पडताळणी होते... त्यातलंच हे काही.

वाह! काय लिहिलयसं!
शेवटी सांग ना,
आपल्याला एका व्यक्तीतलं काय प्रिय असतं गं?

त्याचं हसणं, बघणं, बोलणं, रुसणं..नाही...
तर त्याचं "असणं"
फक्त असणं....>>> ++१११११११११११

आपल्याला एका व्यक्तीतलं काय प्रिय असतं गं?

त्याचं हसणं, बघणं, बोलणं, रुसणं..नाही...
तर त्याचं "असणं"
फक्त असणं...
खुपच छान लिहलय!

बागेश्री...
>>>
माझ्या हातात काहीही नाही हे कळाल्यावर, मी दु:खापासूनही वेगळी होते... माळेतल्या त्या 'गळून गेलेला मोत्याला' आठवणीचं कोंदण देते... मी ह्या जगण्याला तयार होते.
असे अनेक मोती उराशी जपते, आठवणींमधे त्यांना राखून ठेवते... जरा थांबते, कधी अश्रूचा कधी हास्याचा एक क्षण त्या मोत्याला देते.... मी ह्या जगण्याला तयारच असते...
माझाही असाच मोती होईल, हे ही जाणून असते.... आता मी जगत असते.
>>>>
अगं...

दाद गं.....

मित्रांनो, हे विचार/ आवेग समजून घेतल्याबद्दल आभार...
निसटताना गोष्टींवर कंट्रोल नसतो, हे डोळ्यांना सुस्पष्ट दिसलं की "इन्सान किस झाड की पत्ती" वाटतंच वाटतं!!!

आपल्या सार्‍यांच्याच मनात असतात अशा काहिशा भावना, तू त्या खूप छान लिहिल्यास, खूपच छान, म्हणजे, तुझ्या ह्या लेखाचा संदर्भ देऊन सांगता येईल, हे वाचा मला हेच म्हणायचंय