पैठणचा ताजमहाल

Submitted by डॉ अशोक on 19 June, 2013 - 13:50

पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध. शासनानं जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी साडेदहा एकर जागा दवाखान्याच्या विस्तारासाठी राखून ठेवलेली. पण त्यासाठी आर्थिक तरतूद वैद्यकिय शिक्षण विभागानं करायची की आरोग्य खात्यानं या वादात प्रकरण ठप्प झालं होतं. मी या प्रकरणाचा अभ्यास केला आणि चार्ज घेतल्यापासून दीड वर्षातच जमीनीचा ताबा घेतला. ताबा घेतांनाच एक एकर जमिनीवर राजकीय पुढा-याच्या कृपेनं अतिक्रमण झालेलं असल्याचं आणि त्या सदगृहस्थानं तिथं एह गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतल्याचं निदर्शास आलं. गंमत म्हणजे हाच माणूस मला दवाखान्याचं विस्तारीकरण कां लांबतंय याची सतत विचारणा करायचा! आता पुढची स्टेप म्हणजे ताब्यात घेतलेल्या जमिनी वर बांधकामाचे प्रस्ताव तयार करून पाठवणे. यात थोडे नाही तर आठ एक वर्षे गेली. दरम्यान तिकडे दवाखाना जाणार म्हणून त्या भागातले जमिनीचे दर वाढले आणि ज्याची जमीन संपादित केली तो वाढीव मोबदला मिळावा म्हणून कोर्टात गेलेला! सुदैवाने त्यातूनही मार्ग निघाला. दरम्यान सरकारं आली, गेली, बदलली. आमदार बदलले. शेवटी एका आमदारानं मनावर घेतलं आणि बांधकामाचे प्रस्ताव तयार होवून अर्थसंकल्पात तरतूद झाली आणि आता प्रकल्प मार्गी लागेल असं चित्र निर्माण झालं. पण हे व्हायचं नव्हतं.

मी माझ्या मित्रांबरोबर धरणाच्या बाजूला रोज फिरायला जात असे. एके दिवशी पहातो तो त्या जमिनीवर रातोरात झोपड्या उभारलेल्या. मी जावून चौकशी केली तेंव्हा गावातल्या आणखी एका वजनदार राजकारण्याचा त्यांना आशिर्वाद असल्याचं कळलं. त्यांना सरकारी जमिनी देण्याचं आणि काहीही कार्यवाही होणार नाही असं आश्वासन या महाभागानं दिलं होतं. काही दिवसांनी तालुका समन्वय समितीच्या बैठकीत सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेलं असूनही सरकारी दवाखान्यातले अधिकारी मात्र झोपा काढत आहेत असं म्हणून याच गृहस्थानं आकांड-तांडव सुद्धा केलं!

मी त्या अतिक्रमण करणारांना नोटीसा द्यायचं ठरवलं तर ती मंडळी धड नावं सांगेनात.पण नोटीसा देणं तर आवश्यक होतं. शेवटी एक शक्कल लढवली. आमच्या मलेरिया कर्मचा-याला फीवर सर्व्हे करायला म्हणून पाठवलं तेंव्हा त्यांची नावं कळली. अपेक्षेप्रमाणे नोटीसा परत आल्या. दरम्यान ज्या आमदारांनी प्रयत्न करून सर्व प्रोजेक्ट मंजूर करून घेतला होता त्यांनी मंत्री महोदयांची गांठ घेतली आणि त्यांना भूमीपूजनाचं निमंत्रण देवून टाकलं आणि आपल्या पक्षाच्या आमदाराचं निमंत्रण सुद्धा मंत्री महोदयांनी स्विकारून टाकलं. मुहूर्त ठरला, स्वातंत्र्य दिनाचा (पंधरा ऑगष्ट) आणि ज्या जमिनीवर भूमिपूजन व्हायचं त्या जमिनीवर मात्र अतिक्रमण झालेलं! आमदार भूमिपूजन व्हावं म्हणून आग्रही. (निवडणूका जवळ आलेल्या ) तर अतिक्रमण वाल्यांना दुस-या वजनदार पुढा-याचा आशिर्वाद. मोठाच प्रश्न होता.

मी दोन कर्मचा-यांना आणि पोलीसांना घेवून चौदा ऑगष्टला भूमीपूजन होणार तिथं गेलो आणि त्या लोकांना जमिन खाली करायची विनंती केली. तेव्ह्ड्यात एका दगड भिरभ्रत आला आणि माझ्या जवळच येवून पडला. पोलीस लाठीमाराच्या तयारीत होते, पण मीच थांबवलं. परत विनंती केली. पण सकारत्मक घडेल असं वाटेना. काही मंडळी भांडण व्हावं, प्रकरण विकोपाला जावं यासाठी प्रयत्न करताहेत असा मला संशय यायला लागला. तेव्हढ्यात एका झोपडीतून एक म्हातारा बाहेर आला. त्यानं डोळ्यावर हात घेवून मला निरखून पाहिलं आणि म्हणाला: "दाक्तर तुमी इथं? आन कशापाई?" आणि त्या माणसानं सगळा प्रश्न चूटकीसरशी सोडवला.

झालं असं होतं की त्याची सून लग्नानंतर ब-याच दिवसांनी गरोदर राहिली होती. त्यानं खाजगी दवाखान्यात दाखवलं पण परवडेना म्हणून तो आमच्याकडे आला आणि त्याला नातू झाला. विशेष म्हणजे डिलीव्हरी माझ्या हातून झालेली आणि त्या रात्री मी दोन पर्यंत केवळ ह्या एका डिलीव्हरी साठी थांबून बाळंतपण केलं होतं. आणि आता त्याला परतफेड करायची संधी मिळाली होती. त्यानं सगळ्यांना समजावून सांगितलं. त्या सर्वांनी रातोरात दुसरी कडे जायचं कबूल केलं. मी पण जायकवाडी धरणावरच्या इंजिनीअरला विनंती करून त्यांना दोन-तीन ट्रक मिळवून दिल्या. त्या ट्रक मधून आपलं सामान घेवून ती भली माणसं आपला मोडका-तुडका संसार घेवून निघून गेली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझे ही डोळे ओलावले होते.

भूमीपूजन समारंभ व्यवस्थित पार पडला. आमदारांनी आपल्या प्रयत्नानं हा दवाखाना होत असल्याचं आवर्जून सांगितलं. अतिक्रमणास प्रोत्साहन देणारे वजनदार पुढारी पण समारंभाला होते. त्यांनी पण जोरदार भाषण ठोकलं ! माझ्या डोळ्या समोर मात्र त्या वृद्ध गृहस्थाचं चित्र राहून राहून येत होतं. पैठणला आता तीस खाटांचं रूग्णालय त्या जागेवर उभं आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी आणि द्न्यानेश्वर उद्यानाला लागून. . तुम्ही पैठणला गेलात तर धरण पहाल, उद्यान पहाल. उद्यानाला लागूनच असलेलं पैठणचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक गावाचं भूषण आहे. मात्र ताजमहालच्या प्रमाणेच या ठिकाणी पण हे सगळं होण्यासाठी काही गरीबांचे हातभार लागलेले आहेत हे मात्र मी विसरू म्हटलं तरी विसरू शकत नाही.
-अशोक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ अशोक, तुमच्या संयमाची कमाल आहे. सरकारी काम अन् वर्षानुवर्षे थांब अशी स्थिती असतांनाही तुम्ही हिंमत हरला नाहीत. अभिनंदन! Happy
आ.न.,
-गा.पै.

डॉक्टर
तुमची पुण्यकर्मे सरकारी कामासाठी धावून आली. सरकारात तुमच्यासारखे लोक असतात म्हणूनच काही तरी चांगलेही घडते.
( आपण डॉ अशोक कुलकर्णी का ?)

मानलं बुआ तुमच्या चिकाटीला....

तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणुन अजुनही सरकारवर विश्वास आहे, नाहीतर ....

शेवटच्या वाक्यातला विचार फार मोलाचा वाटतो. कृतज्ञता आणि त्याची जाहीर अभिव्यक्ती हा सध्या फार दुर्मीळ होत चाललेला गुण आहे.

तुमचेही कौतुक आणि त्या वॄद्धानेही परतफेड केली म्हणुन त्याचेही. अशीच भावना असायला हवी, पुढारी लोक खरच किती मतलबी असतात हेही दिसुन आले.

धन्यवाद दोस्तहो ! भरून पावलो !
Kirnayake, हो मी डॉ. अशोक कुलकर्णी ! माझे मित्र मला एपी ह्या टोपणनावानं पण ओळखतात !

बापरे शेवट वाचून अगदी गहीवरुन आलं!

अभिनंदन तुम्हा सर्वांचे. अपेक्षा आहे की हा पैठणचा ताजमहाल बघायला मिळेल. (उत्तम शीर्षक)

बापरे ......कठिण परिस्थितितही इतका सयम पाळला .....

__________/\____________

आपल्या सगळ्यान्चे अभिनन्दन....... ताजमहाल पहायला नक्की आवडेल ......

खुप खुप शुभेच्छा

छान! तुमचे लेख आवर्जून वाचते कारण १ अनुभव कथनाची पध्दत साधी सरळ अन सोपी अन २रे माझ्या माहेरगावची असते.... हे विशेष Happy

खुप छान !
आपल्या ईच्छाशक्तीच्या जोरावर आपण करून दाखवले!