तार कायमची बंद होणार

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 17 June, 2013 - 01:39

सुरुवातीच्या काळात एक जलद संदेश पोहोचविण्याचे माध्यम आणि जे ईस्ट ईंडीया कंपनी सोबात भारतात दाखल झाले ती आल्याने कित्येकाच्या उरात धडकी भरायची अशी तार १५ जुलै पासुन बंद करण्याचे शासनाने ठरविले आहे.
आजच्या ईमेल फोन च्या काळात तिचा वापर अतिदुर्गम भागातही होत असेल याची खात्री नाही परंतु काही प्रमाणात शुभेच्छा संदेश तात्काळ देण्यासाठी आजही तारे द्वारे पाठविणारे काही लोक आहेत. पुर्वी तार आली की कोणीतरी गेले अशीच भीती रहायची. लौकर निघ, निघ असे तोकडे संदेशान समजणारा समजुन घ्यायचा आणि मिळेल त्या वाहणानी नियोजित ठिकाणी पोहोचायचा.
ईंग्रजांनी सुरुवातीच्या काळात याचा पुरेपुर वापर केला होता. विशिष्ट कोड असलेल्या भाषेद्वारे संदेश वाहनाचे काम तार द्वारे चालत होते. अशी तार जेव्हा कालबाह्य होणार आहे, आपलेही अशा तारेबद्दल असलेले अनुभव वाचायला आवडतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्तेश्वर.....

तुमच्या 'तार' आठवणीने मी नाही म्हटले तरी थेट ४० वर्षापूर्वीच्या त्या जमान्यात जाऊन पोचलो ज्यावेळी रात्री ११ वाजता मी तार ऑफिसमध्ये जाऊन पाठवून देण्याच्या तारांचे भेंडोळे घेऊन अक्षरशः लांबलचक अशा रांगेत उभा असे. कॉलेजच्या त्या दिवसात एका फर्ममध्ये मी आणि इसाक जमादार नामक एक मित्र असेच पार्टटाईम नोकरी करीत होतो आणि कोल्हापूरातील धान्य तसेच गुळ या दोन प्रमुख घटकांचे त्या दिवसातील भाव तसेच स्टॉक त्या त्या दुकानदारांच्या उपदुकानदारांना कळविणे गरजेचे असायचे. हे काम एक स्थानिक एजन्सी करत असे, तिथे आम्ही चारपाच मित्र फावल्या वेळेचे काम करत असू. अर्थात त्या तारेत नेमका काय मजकूर असायचा याचे ज्ञान आम्हाला नसायचेच. फक्त तार देणारा आणि घेणारा यांचे 'कोड क्रमांक' वा 'कोड नेम' इतकाच प्रकार...तो पत्त्याच्या ठिकाणी तर मजकुर म्हणजे 'अ' - ३९० आणि 'ब' - ४०... बस्स. याचाही अर्थ कळायचा नाही. पण ज्याला ती तार मिळायची आहे त्याला त्या कोडिंगची संगती लागत असणारच.

तुम्ही म्हणता तसे सर्वसामान्य 'नागरी' जीवनात तार म्हणजे नक्की काहीतरी वाईट घडले आहे हीच समजूत. किंबहुना रात्री बेरात्री पोस्टमनने 'देसाई, दार उघडा....तार आहे...' अशी पुकारी दिली की केवळ देसाईच नव्हे तर आजुबाजूचीही घरे किलकिलत उघडायची.... मग तारेतील मजकूर म्हणजे मुलगा सुखरूप मुंबईला पोचला अशा धर्तीचा असला की देसाईना आनंद तर शेजार्यांच्या नजरेत नाराजी....म्हणजे 'उगाचच उठलो...'

पुढे तार कार्यालयाने अशा सौम्य धर्तीच्या तारांचा बटवडा रात्री देण्याचे बंद केल्याचे स्मरते....म्हणजे या तारा जरी रात्री पोस्टात आल्या तरी त्यांचे वाटप दिवसाच व्हायचे.

खूप काही आठवणी आहेत..... आता या क्षणी मात्र ५ जुलैपासून 'तारा' अस्तंगत होणार याचे दु:ख खूप आहे.

अशोक पाटील

अशोकराव तुमची पोष्ट आवडली !
धन्यवाद
मी लहान असतानाची गोष्ट आजी सिरीयस होती फोन फक्त वडीलांच्या ऑफिसला होता. वडीलांनी ऑफिसमध्यल्या काका सोबत मला तार करायला पिटाळले , आजी सिरीयस आहे एवढेच लिही म्हणले . काका व मी पोष्टात दाखल झालो रात्री जवळपास १० वाजले असतील त्या माणसाला काकानी उठविला तसा तो बसला आणि तर्जनीने नुसते एक बदन वर खाली करु लागला मला त्यातले काही कळत नव्हते. बराचवेळ त्याचे तसेच चालु होते. काकानी केव्हा मागुन हाक मारली चल झाले म्हणुन मलाही कळले नाही. नेमके काय केले कसा संदेश गेला तेव्हाही कळले नाही आणि आजही कोणी त्यावर लिहीले नसल्यामुळे वाचनात आले नाही. तार म्हणजे कोणी गेले एवढेच काय ते समजत होतो. आज जरी एखाद्या लग्नात शुभेच्छेची तार आली की प्रथम धडकी भरते.

मला आठवतंय की मला पहिली नोकरी लागली तेव्हा कामावर रुजू व्हा अशी तार घरी आली होती. तेव्हाच कळलं की नोकरीच्या ठिकाणी आपली निवड झाली आहे. तेव्हा आमच्याकडे साधा फोनही नव्हता. गंमत म्हणजे नोकरीच्या अर्जावर इच्छुकाची माहीती भरायची असते तिथेही दूरध्वनी क्रमांक असा रकाना नव्हता. ही मुंबईतली एक प्रतिष्ठित कंपनी होती/आहे.
-गा.पै.

प्रत्येक शब्दाचे पैसे लागायचे.
मग परिक्षा पास झाल्याची तार मित्राने केली ती अशी:
youmesanjyapaased.

.

माझी मावशी तार विभागात तार पाठविण्याचे काम करत असे. सुट्टीत तिच्याकडे रहायला गेलो की मी आणि मावसबहीण तिला तारऑफिसात डबा द्यायला जायचो. तेव्हा ते 'कडकट्ट कडकट्ट' बघायला मजा वाटायची! ती माझ्या लहानपणी वाढदिवसाला नेहमी तार पाठवायची! कोण अप्रुप वाटायचं त्या काळात! अजुनही दोन पक्षांचे चित्र असलेला शुभेच्छा संदेश आठवतो आहे!

वारंवार पाठवल्या जाणार्‍या मजकुरासाठी तारखात्याने काही क्रमांक दिले होते - उदा. ७ म्हणजे परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन इ. (हे केवळ उदाहरण आहे, क्रमांक चुकीचा असू शकतो!)

अशी यादी पूर्वी ज्या कंपन्यांच्या डायर्‍या मिळत त्यावरदेखिल छापलेल्या असत.

कुणाला ही यादी आठवते आहे काय?

सर्वांचे आभार !
ज्ञानेशजी तुमची लिंक वाचली !
महागुरु धन्यवाद यापेक्षा वेगळा मजकुर असेल तर मग काय करीत असतील ?

मी ही कधी तार बघितली नाही की शेजारीपाजारी तार आल्याचे पाहिले नाही.
आता १५ जुलैला तार बंद होणार तर नक्कीच घरी एकदा तार करुन पाहिन. Happy

मुक्तेश्वर....

महागुरू यानी दिलेल्या लिंकमधील तारांचा मजकूर अगदी इंग्रजी जमान्यापासून शासनमान्य 'अप्रूव्ह्ड' असा आहे. म्हणजे असे की त्या पद्धतीतील घटना सर्वसामान्य जनतेच्या जीवनात नित्यनेमाने घडत असतात, सबब त्याला अनुलक्षून जर तार पाठवायची असेल तर त्या मजकुराच्या एकूण बिलाऐवजी केवळ त्या क्रमांकाला 'एक' आकडा संबोधून मास्तर चार्जेस लावायचे. उदा. Happy New Year to You या तारेला ५ चा चार्ज बसणार पण ग्रीटिंग्ज खाली तार पेपरवर केवळ ४ आकडा लिहिला की केवळ १ चा आकार.

आता त्या ठरलेल्या लिस्टशिवाय असे आणखीन् काही 'कोडेड' मेसेजेस वारंवार तारेद्वारे करायचे झाल्यास दोन्ही पार्टीज् मध्ये त्या अगोदर अशा संदर्भात पत्रव्यवहार होणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे ज्या दुकानदाराचे मी उदाहरण दिले आहे त्यानी व ज्याना तार जाणार आहे त्यानी असे ठरविलेले असते की 'अ' = तांदूळ, 'ब' = जोंधळा, 'क' = गुळ... तसेच रुपयांचे आकडे...२९० वा ३१०. अशा तारांचा मजकूर मग इतकाच होतो : अ २९०.

इतकेच नव्हे तर पाठविणारा आणि तार घेणारा या दोघांनीही तार ऑफिसकडून आपले नाव आणि पत्ता यासाठी "शॉर्टफॉर्म" मिळविलेला असतो. त्यामुळे "नेमिनाथ आदाप्पा चौगुले, मंगल धान्यव्यापारी, ७१२, किरण वसाहत, एस.टी.स्टॅन्डनजीक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर" अशा भल्यामोठ्या नामाचे तार बिल २० रुपये होणार असेल तर ही कंपनी 'आकाश' असा शॉर्टफॉर्म पोस्टाकडून स्वीकारीत असे. हीच गोष्ट घेण्यार्‍याची. त्याने 'धरती' असे नाव स्वीकारलेले असते. एकमेकाला ही नावे माहीत असतातच.

आता तार अशी होईल... 'आकाश' - 'अ२९०' - 'धरती'
बस्स....फक्त ३ शब्द....५० पैसे हिशोबाने दीड रुपया एका तारेचा.

अशोक पाटील

मजा यायची.

माझा चुलत भाऊ सुट्टि मिळत नाहि म्हनुन खोटी तार करायला सांगायचा .( आजी सिरीयस आहे ).. आणी मग गावी पळायचा...

मला आली होती तार.. नोकरीत सिलेक्ट झाल्याची आणि पुढच्याच सोमवारी जॉईन होण्याची... फार जुनी नाही.. २००२ सालची गोष्ट आहे... अजूनही जपून ठेवली आहे ती तार.. कंपनीने जॉइनिंग लेटर पाठवण्याऐवजी तार पाठवली... तेव्हा खरे तर ई-मेल्स वापरणे चालू झाले होते... तरीही तार का पाठवली त्याचे कोडे काही उलगडले नाही.

अशोकजी धन्य्वाद खर मजेशीर आहे ते, शिवाय लांबलचक लिहीले तर पैसेही जादा होतील या हिशोबानी लिहीलेले वाचताना मजा येते.

पुलंच्या एका लेखात वाचले होते..
तारेच्या गमती जमती..
बाबुज मॅरेज फिक्स्ड विथ लिमयेज डॉटर...हे
"बाबुज गॅरेज मिक्स्ड विथ लेमन वॉटर" असे पाठवले होते Happy

आम्ही आणि आमचा बाप पुस्तकातही नरेंद्र जाधवांनी एक किस्सा सांगितला आहे.
त्यांचा मोठा भाऊ प्रशासकीय सेवेची परिक्षा पास झाल्याची तार करतो दिल्ली की देहरादूनहून. घरी ते कोणीतरी passed away असे वाचते आणि सगळ्यांना धक्का बसतो. नंतर स्वत: नरेंद्र जाधव ती तार वाचतात बहूतेक आणि मग उलगडा होतो Happy