ती जाते तेंव्हा...

Submitted by मुग्धमानसी on 14 June, 2013 - 03:30

ती जाते तेंव्हा मागे काय रहातं?

ती जाते तेंव्हा... निश्चल होऊन थिजून रहातो चार भिंतींत गुदमरलेला तिचा वावर...
घुसमटलेला... तरिही दरवळणारा... चुरगाळल्यावर सुगंध देणार्‍या बकुळीच्या फुलांसारखा.
दरवाजांच्या, कपाटांच्या मुठींना चिकटून बसलेले तिचे काही ओले-सुके स्पर्श किलकिल्या केविलवाण्या नजरेने तिला शोधत रहातात.
भांड्य़ांना, डब्यांना वाट्या-चमच्यांना मिठी मारुन बसलेला तिचा तिखटामिठाचा आंबटगोड दरवळ... स्वतःलाच हूंगत माग काढत रहातो तिच्या हरवलेल्या अस्तित्वाचा.
उंबर्‍यावरल्या रांगोळीची पांढरी रेघन्-रेघ आतूरल्या नजेरेने तिच्या वाटेकडे पहात रहाते... तुळस भरल्या घरी मावळून जाते...

ती जाते तेंव्हा...
चार भिंतींच्या आत उभं राहिलेलं एक घर कोलमडतं... पण घराच्या वाश्यांना धक्काही लागत नाही.
तिनं प्राण ओतून जिवंत केलेली एक-एक निर्जीव वस्तू जादू संपल्याप्रमाणे हतबल होऊन पुन्हा एक वस्तू बनून जाते....
तिच्या खुणा हळूहळू पुसल्या जातात... घर पुन्हा निर्जीव वस्तूंचा एक संग्रह बनून जातं...
आणि सजीव.... त्यांच्यात प्राण ओतणं जमलंच नाही बहुदा तिला शेवटपर्यंत.
काही उसासे, थोडे उमाळे, क्वचित एखादा अश्रू.... बस्स! - हे एवढंच तिच्या आयुष्याचं संचित... ती इथंच ठेऊन जाते.

ती जाताना सोबत जातं तिचं गर्भाशय आणि त्यातून जन्माला येणारं अनंत पिढ्यांचं, बरबटलेल्या नात्यांचं, ओशाळलेल्या अपेक्षांचं ओंगळवाणं अनाकलनीय जंजाळ!
तिथं ज्यानं पेरलं होतं तो नव्हताच कधी तिचा... आणि तिथून जे उगवलं होतं... तेही तिचं रहाणार नव्हतंच!
तिचा होता फक्त तो देव्हारा.... तो ती घेऊन जाते. देव इथंच ठेऊन जाते.

अंगणातली माती म्हणते... चला... चिमुटभर मला तरी पावलांना चिकटवून घेऊन गेली ती सोबत...
आता चिमुटभर माझ्यासोबत ती माझ्याकडेच येणार आहे परत...
मी पेरेन तिला तिनंच लावलेल्या या प्राजक्ताच्या मुळाशी... आणि ती उगवेल पुन्हा...
पण या वेळेस.... बहरेल सुद्धा!
_____________________________________

आमच्या परिचितांपैकी एकाच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून जीवनप्रवास संपवल्याच्या बातमीने मला मुळापासून हादरवले होते. अवघा अडिच-तीन वर्षांचा संसार, दोन वर्षांचं बाळ मागे सोडून निघून जावंसं का वाटलं असेल तिला या विचारानं अक्षरशः हैराण झाले. मनात अनेक प्रश्न घेऊन घटनेच्या दुसर्‍याच दिवशी संबंधितांच्या घरी गेले. मनात वाटत होतं की आता पहायला मिळणार आहे एक कोलमडलेलं घर, एक उद्ध्वस्त संसार, एक सर्वस्व मावून बसलेला... हरलेला पती, एक चिंताग्रस्त बाप!
पण प्रत्यक्षात जे पहायला मिळालं त्याने मी मूळ बातमीने झाले नव्हते इतकी व्यथित झाले. त्यानंतरच्या कित्येक रात्री तळमळून काढल्या. अनेक प्रश्न तरीही अजूनही अनुत्तरीत राहिलेत. मनात अजूनही एक वेदना ठसठसते आहे.
त्या घरात मला जे जाणवलं ते वर शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे कुणाशीतरी शेअर करायचं होतं. मन हलकं करायचं होतं. ते इथं केलं. हे मला जाणवलेले माझे विचार आहेत. हेच अंतिम सत्य आहे असं माझं कुठेही म्हणणं नाही.

--- मुग्धमानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय लिहावं कळत नाही.. नुकतीच आलेली एका अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी आणि आज हे वाचलं.
असा निर्णय घेताना बाळ कसं डोळ्यासमोर आलं नसेल? हाच १ अंतिम पर्याय आहे असं का वाटलं असेल? असे बरेच प्रष्न पडले.
मुग्धमानसी तुम्ही खूप आतून लिहिलं आहे आणि ते जाणवतं.

सुन्न झालेय्...एखादी च्या मरणाने सुद्धा जे घर पाणावत नाही ....तिथे तिचे मरण पण दुर्लक्शित की काय ?? मग तिचे जगणे किती वेळा समजुन घेतले असेल असे वाटले मला ...

झालेली दुर्घटना वाचून फार वाईट वाटले. कोणत्याही संवेदनशील मनाला हे अनुभवल्यानंतर व्यक्त होणे, इतरांना सहभागी करून घेणे या भावनिक गरजा भेडसावतातच. मात्र ललितातील वर्णन तितकेसे चपखल किंवा समर्पक वाटले नाही. खालचा पॅरा लिहिलाच नसता तर दु:खाची तीच तीव्रता वाचकांना जाणवली असती का असे मनात आले. यात निव्वळ लेखनाबाबत वैयक्तीक मत मांडलेले आहे. आपल्या दु:खात व परिचितांच्या दु:खात तितक्याच माणूसकीने सहभागी आहे.

खरे उत्तर (रागवू नयेत) फक्त तोच ठेवावात असे मनात आले. (गंमत करत नाही आहे). (किंवा तुमच्या लेखनाचा अपमानही करण्याचा हेतू / अधिकार / कुवत नाही).

मला इतकेच म्हणायचे होते की ते दु:ख तितक्याच तीव्रतेने लेखनात परावर्तित करण्याची सहजी हातोटी असणार्‍यांनी असे वरवर वाटेल असे का लिहावे?

चु भु द्या घ्या

मानसी, नक्कीच नाही Happy
नको काढुस तो पॅरा... मी पॅरा वाचायच्या आधी ललित वाचलं... हं अपेक्षा होती की "आई" गेल्यावर जे वाटतं ते लिहिलय की काय? तेंव्हाही ते आवडलंच होतं,ते ही तितकंच भावत होतं....माझं मत Happy

मुग्धमानसी , नका काढू शेवटचा पॅरा.
त्याक्षणी तुम्हाला जे वाटलं तेच तुम्ही लिहिलं आहे.
खालचा पॅरा न वाचताही दु:खाची तीच तीव्रता मला जाणवली.
रिया. यांना अनुमोदन .

धन्यवाद रिया.

बेफिकीर> तुमचा प्रतिसाद अत्यंत प्रामाणिक आहे. राग येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझं लेखन वरवरचे वाटणे हा माझ्या शब्दांचा दोष असू शकतो. पण हे लिहिताना माझ्या मनाची जी अवस्था होती ती वरवरची नव्हती. अजूनही हे वाचताना मला मनाच्या फार जवळचे वाटते आहे. त्यामुळे इच्छा असूनही तुमचा सल्ला मानण्याचे धाडस होत नाही. काही लेख आपण लोकांनी आपल्या लेखन कौशल्याचे कौतुक करावे म्हणून लिहितच नाही. फक्त मनाला वाटते म्हणून लिहितो. बरोबर ना?

घटनेच्या दुसर्‍याच दिवशी तुम्ही जे पाहिलंत ते वरवरचं असू शकतं. बसलेला धक्का, अनिश्चित भवितव्य, आत्महत्येबद्दल त्याच्या मनात असलेले प्रश्न, आपण तर जबाबदार ठरलो नाही ना या विचाराने आलेलं लाजिरवाणेपण अशा कितीतरी भावना माणूस म्हणून मनात आल्या असणारच पण नैसर्गिक मृत्यू नसल्याने हे कुणापुढेही व्यक्त न करण्याच्या धडपडीतलं वागणं वेगळं, असह्य वाटलं असावं असं वाटतं.

तुमचं लेखन वाचून अगदी अंतर्मुख व्हायला होतं..
आता काही वेळ तरी अस्वस्थ व्हायला होणार..
वेदना -संवेदना शब्दात अशा टिपता आल्या पाहिजेत

ग्रेट !!

मोहनाला अनुमोदन! कधी कधी अशा गंभीर प्रसंगी कसे वागायच, काय रिअ‍ॅक्शन द्यायची, प्रश्नांना कसं समोरे जायचं हे कळतच नाही.

जे डोळ्यांना दिसतं ते सारंच खरं नसतं!

असो जे लिहिलेंय ते पुर्णपणे पोहोचतंय.

मोहना, सखी >> ह्म्म. तुम्ही म्हणताय ते योग्य असेल कदाचित. पण या सगळ्या बाह्य गोष्टी इतक्या तीव्र असाव्यात की मनातलं दुःख सुद्धा झाकोळून जावं, चेहर्‍यावर दिसू नये... हे अजूनही पटत नाही. असो. त्या प्रसंगातून गेलेल्यालाच हे कळू शकतं म्हणा. आणि तशी वेळ कुणावर येऊही नये.

मुग्धमानसी... त्या पॅराशिवायही लेखन तीव्रतेनं भेटतय. मला खात्री आहे, मी तो शेवटला पॅरा विसरणारय... पण हा लेख नाही.
तू कोणत्या मानसिकतेनं हे लिहिलयस ते माझ्यासाठी अनावश्यक अस्ल्यानंच पुसलं जाणारय.

>>>> अंगणातली माती म्हणते... चला... चिमुटभर मला तरी पावलांना चिकटवून घेऊन गेली ती सोबत...
आता चिमुटभर माझ्यासोबत ती माझ्याकडेच येणार आहे परत...
मी पेरेन तिला तिनंच लावलेल्या या प्राजक्ताच्या मुळाशी... आणि ती उगवेल पुन्हा...
पण या वेळेस.... बहरेल सुद्धा! >>

खरच शहारले हे वाचून. खूप काळोख दाटून आला मनात. अशीही अभागी असेल कुणी... खरी किंवा कल्पनेतही.. तिच्यासाठी कळवळले.
हे अन इतकच.
(ह्यापुढे आज अजून काहीही वाचायचं नाही)

दाद... +११११११११११११
पण या वेळेस.... बहरेल सुद्धा! खरंच शहारा आला या वाक्यासरशी... मुग्धमानसी तुझं लेखन नेहमीच अंतर्मुख करणारं असतं... काही काळ तरी त्याच कोशात राहावं असं वाटायला लावणारं...

अतिशय हृदयस्पर्शी गं.. खूप हादरले आतून. आपणही आयुष्यात किती जीव लावतो माणसांना, वस्तूंना, घराला
आपणही निघून गेल्यावर कितपत उरणार आहोत आपण यासर्वात ?? कि सगळंच संपुष्टात येईल आपल्या सोबतच .. विचार करायला लावणारं लिहिलंय