कविता

Submitted by सचिनकिनरे on 13 June, 2013 - 18:40

कविता

एका मित्राने विचारलं,
रन टाईम मध्ये लिहितोस का कविता?
कस सांगू त्याला?

ठुसठुसत असतं मनात तेव्हा,
कविता जन्म घेत असते,
कधी व्यक्त, कधी अव्यक्त,
प्रेमा सारखी बहरू लागते.

वेळ द्यावा लागतो कधी,
पिकणाऱ्या फळासारखा,
कधी तुझ्या सारखी भरभरून,
कोसळणारया पावसाने भेटते कविता.....!

कधी रन टाईम मध्ये,
पण नेहमीच मन टाईम मध्ये असते..
जशी बाळासाठी आई,
तुझ्यावरचा विश्वास असते कविता.....

तुझ्या असण्यात असते,
तुझ्या नसण्यातही असते.
भर गर्दीतील एकांतात,
हल्ली सोबतीला असते कविता.....

माझ्या श्वासासारखी असते,
तुझ्या भासासारखी असते..
लिहिता नको येउ दे भले,
छातीवर हात ठेवल्यावर,
जाणवणारी स्पंदने असते कविता..

पगाराचा आनंद असते कविता,
महिना अखेरीची उधारीही असते,
नम्रतेने वाकल्यावरचा आशीर्वाद असते,
बाळाला दिलेला उंच होका असते कविता..

रात्र जागरण, सकाळ ऑफिस असते,
पावसात भिजल्याची सर्दी,
वर कांदाभजी आणि अँसिडीटी असते.
दूर डोंगरावरली ट्रेक असते,
त्यासाठी ऑफिसला बुट्टी असते कविता...

कधी विदारक सत्य असते,
पोटातली भूक असते,
न लिहिलेली, न ऐकलेली,
सेवा असते कविता...

जे पितात त्यांची गजल,
धुंद नशा असते कविता,
जगण्याला धन्यवाद,
डोळ्यातले पाणी असते कविता,
निरोपाच्या वेळचा,
हातातला हात असते कविता..
अंतर देणार नाही म्हणत,
तुझी साथ असते कविता,

मन मोकळं होत तेव्हा,
आभाळ स्वच्छ होत तेव्हा,
इवलासा अंकुर आणि,
गवतावरील फुल असते कविता,
जे भिडतं मनाला,
ते जीवन खूप सुंदर आहे,
आणि मला जगायचं आहे,
ही भावना असते कविता....
ही भावना असते कविता....

सचिन १ जुलै २०१०.

Group content visibility: 
Public - accessible to all site users