कर्ट कोबेनचे मित्रास पत्र

Submitted by अश्विनीमामी on 13 June, 2013 - 04:33

निर्वाण, ह्या ग्रंज रॉक गृपचा लीड गिटारिस्ट, कवि आणि गायक असलेला कर्ट कोबेन ह्याने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी आत्महत्या केली. तो सात वर्षाचा असताना त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता व त्याच्या मनावर ह्या घटनेचा परिणाम झाला होता. त्यानंतरचे कौटुंबिक अस्थैर्य, कुणाचाच फारसा भावनिक आधार नसणे ह्यामुळे त्याची मानसिक अवस्था कायमच नाजुक होती. प्रसिद्धी, क्रिएटिव सॅटिस्फॅक्षन इत्यादी मिळूनही तो आतून प्रचंड अस्वस्थ असे आणि त्यातूनच शेवटी आत्महत्येचे पाउल उचलले गेले. बॉडा ह्या आपल्या काल्पनिक मित्राला त्याने हे शेवटचे पत्र लिहीले आहे. पितृदिनाच्या निमित्ताने त्याचा मराठी अनुवाद केला आहे.

खल्बली है खल्बली अश्या अवस्थेत आणि आजारपणे, हेरॉइनची नशा करण्याची लागलेली भयानक सवय, ह्या सगळ्यातून त्याचे सर्जनशील मन बाहेर पडू शकले नाही पण मुलीवरचे निरतिशय प्रेम कुठे तरी टिकून राहिले, एखाद्या अद्रुश्य पक्ष्याप्रमाणे ते फ्रान्सेस्का ह्या त्याच्या मुली भोवती अजूनही भिरभिरत असेल असे मला वाट्ते.

प्रिय बॉडा,

गेल्या काही वर्षांपासून नवी गीते लिहिण्यातली गंमत निघून गेली आहे आणि नव्या संगीताला जन्म देण्याच्या प्रक्रियेतला आनंद, उत्सुकता पार हरवून गेली आहे. एक स्वतंत्र, सर्जनशील कलाकार, गायक म्हणून मी घडत गेलो आणि तुमच्यातलाच एक होऊन गेलो तेव्हापासून ऐकत आलेल्या पंक रॉक १०१ अभ्यासक्रमाच्या पुस्तिकेमधल्या चेतावण्या खर्‍याच होत्या म्हणायच्या! माझ्यासारख्या बालीश
तक्रारखोर आणि अंतर्यामी पक्क्या बावळट मित्राकडून तुझी दुसरी काय अपेक्षा असणार म्हणा...
तुला, तुलाच...... कदाचित माझे मनोगत समजेल. समजून घेशील ना?

मला आजकाल ह्याचं खूप अपराधी वाटत राहतं. तुला फ्रेडी मर्क्युरी आठवतो? कॉन्सर्ट सुरू व्हायच्या आधी दिवे मंद होतात आणि श्रोत्यांमधून एक अपेक्षेची मोठी गर्जना होते ते त्याला खूप आवडायचं.
गर्दीकडू मिळणारं अलोट प्रेम त्याला अगदी हवंसं असायचं, मला ह्या गोष्टीचं कौतूक, किंवा खरेतर हेवाच वाटतो. मला आता तसं काही वाटेनासं झालं आहे...... गेल्या कित्येक वर्षांपासून तो उत्साह फारसा वाट्तच नाही पर्फॉर्मन्सच्या आधी.

आपल्याला पर्फॉर्म करताना १००% मजा येते आहे असं खोटं खोटं नाट्क करावं लागावं का मला?
ही तर आपल्या प्रेक्षकवर्गाशी शुद्ध प्रतारणा आहे आणि मी त्यांचा गुन्हेगारच आहे बघ. मी तुला, तुम्हाला कोणालाच फसवू शकत नाही. शकणार नाही. एखादा कामगार कार्ड पंच करून फॅक्ट्रीत जातो
तितकाच निर्विकारपणा माझ्या रक्तात भिनला आहे.

श्रोत्यांच्या प्रेमाची कदर करण्याची मी जिवापाड पराकाष्ठा केली आहे. करतो ही आहे. पण आता ते दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. आम्ही खूप लोकांना आनंद दिला आहे, त्यांची करमणूक केली
आहे हे जरी खरं असलं तरी ते पुरेसं वाट्त नाहिये. एखादी गोष्ट आयुष्यातून गेल्यावरच ज्यांना तिचं महत्त्व कळतं अशां स्वप्रेमी लोकांपैकी मी एक असेन बहुदा. माझ्यातला उत्साही आनंदी लहान मुलगा परत आणायचा असेल तर मला माझं मन थोड फार घट्ट करावंच लागेल. खूप हळवा झालोय मी. मागचे तीन दौरे बघितलेस तर श्रोत्यांच भरपूर प्रेम आपल्याला मिळालंय. माझ्या संगीतावर प्रेम करणारे श्रोते आणि माझ्या वैयक्तिक जीवनाचा भाग असलेले लोक ह्यांचं मला जरी खूप कौतूक वाट्त असलं तरी मला त्यांच्याबद्दल खूपच अपराधी, दु:खी वाट्तं. मी त्यांचाच सारखा विचार करतो आणि मग खिन्न होऊन बसतो. एक दु:खी, बारकासा, हळवा पण कोणाचंच फारसं कौतूक व्यक्त न करणारा, मीन राशीचा जीझस मॅन!

काय अर्थ आहे ह्या सगळ्याचा? मी हे सगळं एंजॉय का करू शकत नाहिये? मला नाही कळत. माझी महत्त्वाकांक्षी, प्रेमळ स्वभावाची बायको मला एक देवीच वाट्ते. माझ्या मुलीत मला लहानपणच्या माझाच भास होतो. भेटणारा प्रत्येक जण अगदी चांगला आहे आणि तो तिला काहीच
त्रास देणार नाही असा ठाम विश्वास उराशी घेऊन ती हसरी चिमुरडी सर्वांशी अगदी छान वागते. गळ्यात पडून पप्पी पण घेते. तिचा हा विश्वास कधीतरी तडकणार आहे ह्या जाणीवेनेच माझ्या काळजाचा थरकाप होतो. कधीकाळी फ्रान्सेस माझ्यासारखीच दु:खी, स्वतःचा विनाश करण्यात मग्न अशी डेथ रॉकर बनेल ह्या शक्यतेला मी सहन करू शकत नाही. नाहीच. अगदी हतबल होतो मी घाबरून.

माझं सध्या अगदी छान चाललंय. खरंच खूप छान. पण वयाच्या सातव्या वर्षापासून मला मनुष्य जातीचा तिरस्कारच वाट्त आला आहे. ही माणसं कशी काय एकमेकांना समजून घेतात नि गुण्या गोविंदाने सुखात एकत्र राहतात कोण जाणे? ते सोपं असेलही कदाचित पण मला माझ्या जवळच्यांबद्दल जे पोटातनं प्रेम अन तितकाच खेद वाटतो ना तो मी आता नाही सहन करू शकत. खूप झालं, बस्स झालंय मला. गेल्या काही वर्षांपासून, तुझ्या पत्रांतून तू माझी काळजी करतोस त्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे मी. अगदी रडकं, मूडी, चिकटू बाळ झालोय मी. पण माफ कर मित्रा, माझ्या आतली पॅशनच मरून गेली आहे बघ. सगळी जीवनेच्छा आटली आहे म्हणेनास का.
पण लक्षात ठेव, हलके हलके विझून जाण्यापेक्षा विजेसारखं तळपून नष्ट व्हावं. ..........

शांती, प्रेम आणि सहानुभूति.

- कर्ट कोबेन.

फ्रान्सेस आणि कोर्ट्नी,

फ्रान्सेसच्या लग्नात मी असेनच विवाहवेदीपाशी उभा.

कर्ट्नी, फ्रान्सेस साठी तू खंबीर उभी राहा. जगत राहा. कारण माझ्याशिवायच तिचं आयुष्य जास्त चांगलं जाणार आहे.

आय लव यू . आय लव यू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, घशात आवंढा आला वाचताना शेवटी. अनुवाद छान जमलाय. प्रेम ही एक निरतिशय सुंदर भावना आहे... पण त्याला कायम खेदाची, निराशेची झालर असेल तर?...
अगदी लेकीवरचं प्रेमही ह्या बापाला जगायला बळ देत नाही.. किंबहुना आपल्याशिवाय ... आपल्या काळ्या सवलीशिवाय तिचं आयुष्यं अधिक आनंदी होईल ह्याची खात्रीच आहे ह्या निराश जीवाला...

दाद, धन्यवाद.

आपण नसणे हेच तिच्यासाठी चांगले आहे अश्या निर्णयापरेन्त येणे किती अवघड असेल नाही का? हा माझ्याहून तीन वर्षे लहान, कधी भेटला असता तर चांगली मैत्री केली असती. जीव देण्यापासून परावृत्त केले असते असे मला राहून राहून वाट्ते. हे संगीतकार मनाने फार सेन्सिटिव असतात. पॅरिस जॅकसन आणि तिच्या बाबांचे नाते पण असेच अवघड आणि तो नसताना मुले एकमेकांना संभाळून घेत आहेत असे आहे. तिने ही परवाच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिला ही जरा समजावले असते किंवा साधे मदरिंग केले असते असे राहून राहून वाटते. अर्थात आपण त्यांना कधी भेट्णार? शक्यच नाहीये असले काही.

सहज अनुवाद अश्विनीमामी... आमच्या वयाचे असतांना या/अशासारख्या लोकांनी प्रसिद्धीची शिखरं गाठल्यानंतर पुढे काय? याचं उत्तर न मिळाल्यानं त्यांनी आत्महत्त्या केली... हा प्रश्न ज्यांना कायम पडत राहतो, त्यांच्यासाठी खरंतर तुम्हाला जे करावसं वाटतं तशा पॅरेंटींगची गरज आहे... अर्थात इतका हळवेपणा सगळ्यांमध्येच नसतोही, आणि हळवेपणा मृत्यूसाठी प्रवृत्त करेल त्यापेक्षा भित्रेपणा अधिक डॉमिनंट असतो बाकीच्या लोकांमध्ये...
तुमचे विचार आणि हे लेखन नक्कीच स्पृहनीय Happy

अमा,
अनुवाद छान जमलाय. कर्ट कोबेनची मानसिक अस्थिरता पाहून फार वाईट वाटते.
तुमचे प्रतिसादातील विचारही भावले.

अमा, हे पत्र खूप छान आहे आणि त्याचा अनुवादही खुप छान झाला आहे. मूळ लेखकाच्या भावना या अनुवादीत पत्रातून वाचकांपर्यन्त पोहोचल्या. तुम्ही एका प्रतिसादात पॅरिस जॅक्सन विषयी लिहीले आहे. त्या विषयी शक्य झाल्यास अवश्य लिहा.