बाहुला झपाटलेला, प्रेक्षक झोपाळलेला ! (Zapatlela 2 - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 11 June, 2013 - 02:00

लोक उगाच म्हणतात की चित्रपटातून आपण नको ते उचलतो. खरं तर चित्रपट आपल्यातून हवं ते उचलतात. 'घरी कुणी तरी जेवायला येणार' म्हटल्यावर आजकाल काही लोक बाजारात 'रेडीमेड' काय मिळतं ते आधी पाहातात. अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा मिळायचा हा जमाना आहे. त्याव्यतिरिक्त इडलीपासून बटर चिकनपर्यंत आणि पॉपकॉर्नपासून चिकन लॉलीपॉपपर्यंत स ग ळं 'फक्त पाण्यात मिसळलं/ उकळलं/ भाजलं/ तळलं की तयार' असं उपलब्ध आहे आणि जे पदार्थ असे सहज शक्य नाहीत, ते हळूहळू 'गायब' होत आहेत. तसंच बाजारात उपलब्ध असलेल्या एखाद्या स्वयंसिद्ध फॉर्म्युलाला पुन्हा पुन्हा सादर करणं किंवा जुन्याच एखाद्या चित्रपटाचा पुढचा भाग बनवणं, हा चित्रपटाने निवडलेला 'शॉर्ट कट' आहे, आपल्याकडूनच शिकलेला ! एका दिवसात पटकथा आणि संवाद तयार, दोन दिवसात कास्टिंग फायनल, आठवड्याभरात लोकेशन्स, सेट्स तयार आणि २ महिन्यात चित्रपट तयार आणि एक राहिलंच अर्ध्या तासात संगीतही तयार - असे चित्रपट बनत असावेत असं काहीसं काही चित्रपट पाहिल्यावर वाटतं. पण असे चित्रपट तिकीटबारीवर चांगला गल्ला जमवतानाही दिसतात, त्यामुळे हा 'दोष ना कुणाचा '! आपण तसे, म्हणून आपले चित्रपटही तसेच असा विचार करायचा !
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या सुप्परहिट्ट जोडीचा नव्वदच्या दशकातील सुप्परहिट्ट 'झपाटलेला'चा दुसरा भाग असाच कामचुकार गृहिणीच्या स्वयंपाकाप्रमाणे आहे.

मागील भागात दोन भुवयांच्या बरोब्बर मध्ये साध्या रिव्हॉल्वरने अचूक नेम साधून इन्स्पेक्टर महेश जाधवने भारताच्या अनेक नेमबाजपटूंना लाजवलं होतं (त्यानंतरच भारताला नेमबाजीत पदकं मिळायला लागली का ?) आणि 'तात्या विंचू'चा खातमा केला होता हे तुम्हाला लक्षात असेलच. आता हा इन्स्पेक्टर जाधव कमिशनर झाला आहे. पण अजूनही हातावर मूठ आपटून 'डॅम ईट' चालू आहे and why not ? तात्या परतला आहे ! का ? कशासाठी ? ते असो. मनुष्यदेह प्राप्त करण्यासाठी त्याला पुन्हा 'लक्ष्या'चा शोध आहे. पण लक्ष्या आता जिवंत नाही. मग ? कायद्यातील पळवाटेप्रमाणे मृत्युंजय मंत्रातही एक पळवाट आहे. 'बाप नाही, तर पोराला धर.' म्हणून हा तात्या, लक्ष्याचा पोरगा आदित्य (आदिनाथ कोठारे) च्या मागावर आहे.
पुढे काय होतं, होणार आहे ते सांगून काहीही उपयोग नाही. कारण ते इतकं बुळबुळीत आहे की सांगता सांगताही घसरायला होईल.

images_0.jpg

एकंदरीत पटकथा तर इतकी लंगडी आहे की फक्त तात्या आणि आदित्य ही दोनच पात्रंही चालली असती चित्रपटात. पण मरतुकड्या कथे-पटकथेला वजन येण्यासाठी मकरंद अनासपुरे (बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारा कलाकार म्हणून), सई ताम्हणकर (टिव्ही रिपोर्टर), सोनाली कुलकर्णी ज्यु. (तमाश्यात नाचणार्‍या बाईची सुशिक्षित नाचरी पोर) अश्या काही काही वजनदार नावांची स्टारकास्ट आहे. मधु कांबीकर आदित्यच्या आजीची (आधीच्या भागात लक्ष्याची आई) भूमिका करतात आणि आधी म्हटल्याप्रमाणे महेश कोठारे 'डॅम ईट' करतात. ह्या सर्वांचं अवतारकार्य ह्या दोन ओळींत जितकं लिहिलं तितकंच आहे.

ओव्हर अ‍ॅक्टिंगसाठी जर एखादा पुरस्कार असेल, तर सो. कु. ज्यु. पेक्षा आदिनाथ कोठारे आणि मधु कांबीकर त्यासाठी जास्त लायक आहेत. आदिनाथ कोठारे वडिलांकडूनही जरासा अभिनय शिकू शकतो, असं म्हणावंसं वाटतं, इतका 'होपलेस' आहे. काही फ्रेम्समधला मक्या वगळला, तर पडद्यावर अभिनय म्हणून बाकी जे काही दाखवलं आहे ते निव्वळ 'बं ड ल' आहे. कुठल्याच प्रसंगात प्रेक्षक पडद्यावरील पात्राशी नातं जोडूच शकत नाही.

अवधूत गुप्ते ह्यांचं संगीत इतरांच्या फुसक्या कामाला साजेसं आहे. शीर्षक गीताची लावणी कैच्याकै गंडली आहे. ऑक्टेव्ह्जशी खेळ करावा तर तो बाळासाहेबांनीच, हे त्या गाण्यामुळे पटतं. 'मदनिके' गाणं बरं आहे. बाकी यथा तथाच.

सपक संवाद आणि केविलवाणी विनोदनिर्मिती चित्रपटाला हास्यास्पद करतात.
अख्खा चित्रपटभर दिलीप प्रभावळकर (तात्या विंचूचा आवाज) वगळता प्रत्येक जण 'जत्रा' मधील 'ज' 'जहाजा'चा उच्चारतो. पण आजकाल ह्यावर बोलणं म्हणजे मूर्खपणा असतो. कारण 'भावना पोहोचल्या ना? मग !' असा उलट प्रश्न होतो. आणि असंही अख्खा चित्रपट पांचटपणा आणि मूर्खपणाचा बाजार असल्यावर ह्या चुका तर अगदीच किरकोळ म्हणायला हव्या.

ह्या चित्रपटाची प्रसिद्धी 'पहिला मराठी थ्रीडी चित्रपट' म्हणून करण्यात आली, ते अगदी योग्य आहे. कारण चित्रपटाचा हा एकमेव 'यू. एस. पी.' आहे. हॅरी पॉटरचा शेवटचा भाग मी थ्रीडीत पाहिला होता. पण थ्रीडीची मजा मला तरी 'झपाटलेला - २' मध्ये जास्त आली. किमान ६-७ वेळा मी व आजूबाजूचे लोक व्यवस्थित दचकलो. अनेक कॅमेरा अँगल्स 'थ्रीडी'चा विचार करून प्रयत्नपूर्वक साधले असल्याचे जाणवते. ह्या एका गोष्टीसाठी चित्रपटकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

थोडक्यात, हा 'झपाटलेला - २' पाहाताना प्रेक्षकाचा 'झोपाळलेला' होतो पण तितक्यात थ्रीडीमध्ये काही तरी अंगावर येऊन तो दचकून जागा होतो आणि इच्छा नसताना अख्खा चित्रपट पाहावा लागतो.

रेटिंग - * (केवळ थ्रीडी साठी.)
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/zapatlela-2-marathi-movie-review....

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण थ्रीडीची मजा मला तरी 'झपाटलेला - २' मध्ये जास्त आली. >>> "ट्रांस्फार्मर ३ डार्क साईड ऑफ मुन" हा ३डी मधे बघितला असता तर झपाटलेला मधला ३डी तुम्हाला १डीच दिसला असता Biggrin

सुशिक्षित नाचरी पोर->>> Lol

झपाटलेला चे हे ही परीक्षण आवडले. मूळ चित्रपट जेव्हा लागला होता तेव्हा थिएटर मधे पाहिला होता आणि आवडल्याचे लक्षात आहे. कन्सेप्ट ओरिजिनल नसला तरी मराठीकरण धमाल केले गेले होते. तात्या विंचू परततो ही कल्पना घेऊन यांनी जरा मेहनत घेऊन चांगली कथा लिहीली असती व सादर केली असती तर एक फार जबरदस्त "चित्रपट सिरीज" (मूव्ही फ्रँचाईज) मराठीत यातून होऊ शकली असती. ते एवढे जमलेले दिसत नाही यात.

कदाचित लक्ष्या नसणे हा मोठा प्रॉब्लेम आहे यात. या कथेत आदिनाथ कोठारे ला हीरो म्हणून लाँच कराय्चे असेल तर बेसिक मेच प्रॉब्लेम आहे. कारण महेश-लक्ष्या च्या चित्रपटात लोक मुख्यतः लक्ष्याला (आणि झपाटलेला मधे दिलीपलाही) पाहायला येतात हे बहुधा महेश कोठारेला माहीत असावे. जरी यात तोही एक हीरो असला तरी अनावश्यक फोकस स्वतःवर त्याने ठेवल्यासारखे वाटायचे नाही तेव्हा. आणि मुख्य म्हणजे स्वतः विनोदी रोल करायचा प्रयत्न त्याने केला नाही. त्यामुळे तो महेश-लक्ष्याचा फॉर्म्युला ३-४ चित्रपटांत जमून गेला. पण एका अर्थाने महेश दुय्यम हीरो होता त्यात (७० च्या अमिताभच्या पिक्चर्स मधले विनोद खन्ना, ऋषी, शशी ई. प्रमाणे).

तरी तात्या विंचूमुळे एकदा तरी बघावा लागेल असे दिसते Happy

मी आयुष्यातला पहिला 3D पाहिला. मला तरी मजा आली. मी सुद्धा २-३ वेळेला व्यवस्थित दचकले. सर्वात पहिल्यांदा ते संग्रहालय उघडल्यावर वटवाघळं बाहेर उडत येतात ते तर फारच इफेक्टिव्ह होतं.
बाकी कथा अतिशय बोर, प्रसंगांची सुद्धा लिंक नीट नाही.
दिपक शिर्के आणि आदित्यची इतकी दृष्य आहेत की नंतर नंतर जाम कंटाळा यायला लागतो. Sad मधु कांबिकर फक्त आणि फक्त कर्णकर्कश्य ओरडत आदित्यच्या मागे मागे फिरते.
काही पात्रं उगिचच का आहेत सिनेमात ते कळत नाही. उदा. विजय पटवर्धन (तमाशात एक नाच्या हवाच म्हणून ? :अओ:) त्याला ते काम बिल्कूल जमलेलं नाही दुर्दैवाने. म्हणे त्याने गणपत पाटिल यांचे सिनेमे पाहून खूप अभ्यास केला होता. पण बिचारा फेल झाला. दुसरं विशाखा सुभेदार. सोनाली कुलकर्णी अ‍ॅनिमिक आणि कुपोषित दिसते. तिने लावणी सादर करणं म्हणजे निव्वळ उसाची कांडी किंवा गुढी नाचवल्यासारखं वाटतं. जयश्री गडकर्/लिला गांधी कुठे आणि ह्यांची मिळमिळित लावणी... लावणी म्हणवत नाही गुळवणी म्हणलं तर चालेल एक वेळ.
तो जायंट व्हिलवाला... कशाला? सई ताम्हनकर... कशाला सिनेमात? Uhoh
मक्या सुद्ध कशाला?
आणि एक गोष्ट मला अत्यंत बावळट वाटली सिनेमात. तात्याला लक्श्याच्या पोराचा शोध असतो म्हणून सगळे अगदी त्याला संपुर्ण नावाने हाक मारतात. बोला आदित्य लक्ष्मिकांत बोलके.. किंवा माहित आहे तु प्रसिद्ध शब्दभ्रमकार लक्ष्मिकांत बोलकेंचा मुलगा आहेस इ. इ.

बाकी महेश कोठारेंनी मुलाला सिनेमात भरपूर फुटेज दिलं आहे. १०० फ्रेम पैकी ९९ फ्रेम्स मध्ये तो असेलच याची खबरदारी घेतली आहे. सिनेमाच्या शेवटी महेश कोठारेंनी स्वतःची सुद्धा जुनी इमेज ठेवत नेहमीप्रमाणे तात्याला दोने भुवयांच्या मध्ये गोळी घातली असं दाखवलंय पण तरिही तात्या जिवंत.. मग पोराला चान्स.. कोयत्याने कोठारे पुत्र तात्याचे मुंडके उडवतो.
पण मुंडके ही जिवंत दाखवलेय.
म्हणजे झपाटलेला ३ साठी आधीच जागा निर्माण करून ठेवली आहे.

सिनेमात दोन गोष्टी सुरेख... थ्री डी इफेक्ट्स... आणि तात्या. काही काही प्रसंगात तो डोळे उघडतो ते खरंच भयावह वाटतं. आदिनाथ कोठारे ही दिसतो गोड, शिवाय अभिनय त्याने सराईतासारखा केलाय. नवोदित वाटत नाही अजिबात.

म्हणजे एकूण चित्रपट काही थिएटर मध्ये जाऊन पाहण्यासारखा नाही तर.......मला वाटलं होत ब्लॉक बस्टर वगैरे असेल.

आधी पाहायचं ठरवलं पण सगळेच रिव्हू वाचल्यावर रद्द केल.>>> लोकहो ज्याना बघायचा आहे त्याने ३-डी तच बघा.
घरच्या टिव्हीवर मजा येणार नाही. Happy

बाकी कॉलेजमधल्या एका मित्राचं एक महत्वाकांक्षा / स्वप्न आठवलं. त्याला एक ३-डी चित्रपट बनवायचा होता.
पण कसला तो विचारु नका.. Biggrin

अपेक्षा नव्हतीच.. आधीच्या अवतारात निव्वळ अभिनेत्यांनी तारुन नेलेला हा चित्रपट, आता तंत्रज्ञानानेही सावरता आला नाही, असे दिसतेय.
( तो उठवळ शब्द, त्या संदर्भात जरा गैरलागू आहे. बदलणार का ? )

झकासा, माझ्या कॅमेरात पण ३डी सोय आहे. आपण दोघांनी काढू या का चित्रपट ?

लोकांनो : हे परिक्षण हे रसप ह्यांचे वैयक्तिक मत/अनुभव आहे हे का विसरताय ? न बघता लगेच इतकी टोकाची मतं बनवू नका यार. सहज मजा करायची म्हणून गेलात तर चित्रपट नक्कीच करमणूक करतो. आधिच्या भागाची सर नाहीच आहे ह्याला. कारण पहिल्या भागात फोकस तात्या आणि लक्ष्या ची गोष्टं सांगण्यावर होता, इथे आदिनाथ ला हीरो म्हणून एस्टॅब्लिश करण्यावर आहे. आणि (त्याच्या) वडीलांनी सिनेमा काढलाय म्हणल्यावर हे उघड आहे. लेखातले काही आणि प्रतिक्रियांमधे लिहिलेले नेगेटिव पॉइंट्स खरेच आहेत. तात्या ची गोष्टं कमी आहे पिक्चर मधे आणि विनाकारण भरमसाट पात्रं आहेत. पण अगदी टाकावू नक्की नाहिये हा सिनेमा.
१. आदिनाथ चांगलं काम करतो. guy next door. आम्हाला दोघींना तरी आवडला.
2. ३डी मधे पिक्चर बघायला खूप मजा येते.
३. सोनाली आणि सई - त्यांना विशेष काम नाही ते सोडा पण - छान दिसल्या आहेत.
४. फॅमिली प्रेक्षक पाहू शकतील (लहान मुलांसोबत) असे कमी सिनेमे असतात आजकाल त्यातला हा एक आहे. थीएटर मधे छोटी छोटी मुलं बरीच होती आणि सगळे मस्त एंजॉय करत होते.
५. << 'जत्रा' मधील 'ज' 'जहाजा'चा उच्चारतो. >> बरोबरच आहे की मग. Happy

सुरुवाती पासून शेवटपर्यंत लक्ष्या ची आठवण येत होती. ह्या भागात त्याला मिस केलं म्हणून नाही. पण पहिल्या भागाची आठवण दूर सारता येत नव्हती. शिवाय ह्या भागात भिंतीवरच्या फोटोतून त्याचं दर्शन होत होतच. असो. शेवटी, आवड आपली आपली. तर पाहिल्याशिवाय 'बाद' चा शिक्का मारू नका (इतर ती अनेक गोष्टींवर Happy )

आदिनाथ आणि अभिनय!!! अत्यन्त मख्ख आणि मठठ दिसतो तो. सतरंगी रे नावाचा एक सिनेमा नुकताच पाहिला त्याला.

परीक्षण नेहमीप्रमाणेच खुसखुशीत ! Happy

(बाकी 'जत्रा' मधला 'ज' जमिनीतला उच्चारणारे लोक मीसुद्धा कमीच पाहिलेत ! मीसुद्धा जहाजातला 'ज' च वापरत असतो. नक्की कुठला बरोबर आहे याची कल्पना नाही.)

५. << 'जत्रा' मधील 'ज' 'जहाजा'चा उच्चारतो. >> बरोबरच आहे की मग. Happy
...
अहो मायबोलीकर आहात नां.. ! तरीही असं..??? Happy

ज्ञानेश, जरा 'गांवची जत्रा' असं भरभर तुमचा 'ज' वापरुन म्हणून पहा...! Happy

जाधव जोशी, जोधपूर, जहाज, जमीन, जांभूळ ......यातला त्रा
कि
जेटली, जास्त, जादू, जंतरमंतर, ज्येष्ठ, ज्यांचे, ...यातला ज्यत्रा ??

लई गोंदुळ! जत्रा, जहाज, जमीन सगळ्यात आमचा एकच 'ज' लागतो (सूर लागतो तसा)

जगणे आणि जग (वर्ल्ड) यातला नक्की कोणता ज कोण कोण कुठे कुठे वापरता ते सांगा आता.

भम - आपण लहानपणापासून चुकीचा उच्चार करत असू बहुतेक. म्हणूनच स्वतःला करेक्ट करण्याची ही संधी आहे.

ज्य - ज्यन्म, ज्यनता, ज्यनवाणी..
ज - जोंधळं, जावळं, जर तर, (रविवारची ) जत्रा

हे पण तपासून घ्यायची इच्छा आहे.

छ या अक्षराचा उच्चार करताना जीभ ज्या रितीने वरच्या टाळूशी थोडासा क्लिअरन्स ठेवून हवा सोडते, त्याचप्रमाणे छ पासून पुढे वरच्या ओठाकडे नेऊन छ सारखीच जीभेची स्थिती असताना ज्य हा ध्वनी उच्चारता येतो.

ज साठी ज्य इतका जबडा (कि ज्यबडा ) उघडावा लागत नाही. छ च्या अलिकडे (आतल्या बाजूस) ज्यिभेचा ( कि ज्यीभेचा कि जिभेचा) पुढचा भाग (टोक) वरच्या टाळूस हकलेच स्पर्शून ज हा ध्वनी उच्चारता येतो असं आता लक्षात आलेले आहे.

यातली कुठली क्रिया जत्रा/ ज्यत्रा साठी करावी इतकाच प्रश्न आहे.
To be or Not to be ..
जगावं कि मरावं, ज्यगावं कि मरावं ?
भजी खावीत कि नकोत, भज्यी खावीत कि नकोत

सांगा लवकर... सगळंच अडलंय

स,ध.झांबरे लिखित व्याकरणाच्या पुस्तकानुसार
तालव्य उच्चार्(जिभेच्या टोकाचा स्पर्श तालू स्थानाला) चक्र, चंद्र, चरित्र, जल, जग, जन, झकास, झंझट, झक्क
दन्तमूलीय उच्चार (जिभेचे टोक दन्तमूलाला किंचित स्पर्श करते) : चाक, चटकन, चघळ, जड, जमाव , जत्रा, झाड, झरा, झोप

सिनेमात पाटलेला मधल्या चा उच्चारही झोप मधल्या प्रमाणे करत होते.
तो झेप मधल्या सारखा हवाय का यावर कुणी काहीच कसं वदलं नाही ?

जाधव जोशी, जोधपूर, जहाज, जमीन, जांभूळ ......यातला जत्रा>>>
आम्ही लहाणपणापासुन असाच उच्चार ऐकतोय / करतोय. म्हणुन हे च बरोबर वाटतय.
भरत ज्याधव असा उच्चार ऐकला की खटकतं.

'जत्रा' मधला ज हा जमीन, जहाजमधला 'ज' जास्तमधला 'ज' नाही.

दिलीप प्रभावळकरांनी कॅरेक्टरसाठी मुद्दाम तसा उल्लेख केला असावा, इतर शब्दांचे उच्चार काय आहेत त्यावरून तसा अंदाज बांधता येईल.

यातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत. एका टुकार सिनेमाची अगदी व्यवस्थित चिरफाड केलेली आवडली. सगळं कथानक खरंतर अर्ध्या तासाचंच आहे, कोठारेंनी ते उगाचंच लांबवलंय.

Pages