अतृप्त ठेवणारा झपाटलेला २

Submitted by टोच्या on 10 June, 2013 - 08:26

एखाद्या चमचमीत खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये जावे… आणि जेवणाच्या अपेक्षेने आलेल्या खवैयांना हॉटेल मालकाने केवळ उत्कृष्ट स्टार्टर देवून बोळवण करावी अशी काहीशी झपाटलेला २ ची गत आहे. खरं तर आधीच्या सिनेमाची (झपाटलेला ) पुण्याई आणि तात्या विंचू सारखा ब्रांड हाताशी असूनही महेश कोठारेंनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला जाणवत नाही. सिनेमाचे कथानक असे- वीस वर्षांपूर्वी इन्स्पे. महेश जाधव यांनी खात्मा केलेला तात्या विंचू हा बहुला एका संग्रहालयातून चोरी होतो. तात्या विंचूचा साथीदार असलेला कुबड्या खविस (अभिजित चव्हाण ) तात्या विन्चुला पुन्हा जिवंत करण्यासाठी बाबा चमत्कार (राघवेंद्र कडकोळ ) यांच्याकडे घेवून जातो. महत्प्रयासाने तात्या विंचू जिवंत होतो आणि मानवी देह धारण करण्यासाठी श्रीरंगपूर गाठतो. केवळ लक्ष्याच्या मुलाच्याच शरीरात त्याला प्रवेश करणे शक्य असते. त्याच्या शोधात तात्या विंचू श्रीरंगपुरच्या यात्रेत दाखल होतो. लक्ष्याचा मुलगा आदित्य (आदिनाथ कोठारे ) इंजिनिअर झालेला असतो आणि बेकार असतो. यात्रेत बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा मकरंद वटवटे (मकरंद अनासपुरे ) याच्याकडून आदित्यला बोलक्या बाहुल्यांचे तंत्र शिकायचे असते. यात्रेतच त्याची भेट मेघा सातारकर ( सोनाली कुलकर्णी ) हिच्याशी होते आणि अपेक्षेप्रमाणे ते दोघे प्रेमात पडतात. तात्या विंचू जिवंत झाला हे कळल्यावर महेश जाधव (महेश कोठारे ) जे आता कमिशनर झालेले आहेत ते त्याच्या मागावर श्री रंगपुरात दाखल होतात. त्यानंतर तात्या विंचू आदित्यच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी जे प्रयत्न करतो ते म्हणजे हा सिनेमा.
खरे तर इतका चांगला track असताना त्याचा उपयोग करून घेण्यात दिग्दर्शक कमी पडला असे पदोपदी जाणवत राहते. तात्या विन्चूच्या करामती पाहण्यासाठी लोक आलेले असतात पण २-४ अपवाद वगळता प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो. थ्री डी effect दाखविण्यासाठी काही शॉट मुद्दाम घेतलेले आहेत. वास्तविक त्याची कथानकात गरजच नव्हती. सिनेमाभर आदित्य रिकामा हुंदडत असतो . तात्या विंचूला जिवंत करण्याचा सिनेमाचा पहिला शॉट अप्रतिम… त्यातील तांत्रिक करामती, वातावरण निर्मिती जबरदस्त… त्या दृश्यानंतर पुढे अतिभव्य कलाकृती पाहायला मिळेल अशी अपेक्षा निर्माण होते, पण सिनेमाभर ती अपूर्णच राहते. सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, मधू कांबीकर यांच्यासारख्या कलावंतांना वाया घालविलेले आहे. महेश कोठारे यांचेही काम अतिशय कमी आहे. मुलावर कॅमेरा ठेवण्याच्या नादात कथानकाकडे लक्षच दिलेले दिसत नाही. त्यातच पूर्ण सिनेमा जत्रेत घडतो त्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत तेच तेच back ground पाहून वैतागतात. चित्रपटाचा क्लायमक्स सुरु झाला असे वाटत असतानाच सिनेमा संपतो. खरे तर यात्रेमध्ये तात्या विंचू च्या कारामतींना भरपूर वाव होता. पण केवळ जायंट व्हील वगळता कशाचाच वापर करण्यात आला नाही. केवळ तीन गाणी आहेत. लावणी जमलीये. बाकी दोन्ही गाणीही ठीक ठाक. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आदिनाथ चांगला रुळलाय असे वाटते. सोनाली नेहमीप्रमाणे चांगली दिसण्याचे काम करते. तिला विशेष वाव नाही. मकरंद, विजय पटवर्धन, सई आपापली कामे करतात. आधीच्या सिनेमात लुगडे नेसणार्या मधू कांबीकर या सिनेमात साडी नेसून का वावरतात? शिवाय लक्ष्याकडे एवढा मोठा बंगला (गावाच्या मानाने ) कसा आला असाही प्रश्न पडतो. लक्ष्याचा सिनेमात जागोजागी उल्लेख असला तरी सिनेमात तो का मारतो याचा कुठेही उल्लेख नाही. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ बाबा चमत्कारच्या भूमिकेत पुन्हा एकदा भाव खावून जातात. त्यांनी वीस वर्षांपूर्वीचा कडक आवाज आणि बोलण्याचा लहेजा तंतोतंत भूमिकेत उतरवलाय. कुबड्याच्या भूमिकेत अभिजित चव्हाणही लक्षात राहतो. सगळ्यात जास्त कौतुक करावे लागेल ते दिलीप प्रभावळकर यांचे. वीस वर्षावर्षांपूर्वीचा तात्या विन्चूचा आवाज या वयातही त्यांनी हुबेहूब काढलाय. त्यांच्या 'ओम फट स्वाहा' ला तर टाळ्या पडतातच. तांत्रिक बाबतीत सिनेमा अप्रतिम. ५ कोटीच्या हिर्यासाठी तात्या विन्चूला जिवंत केलं जातं पण त्याचा उल्लेख कुठेच येत नाही. कदाचित या सर्व प्रश्नांची उत्तरे 'झपाटलेला ३' मध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे. सिनेमा पाहायचाच असेल तर पुन्हा जिवंत झालेला तात्या विंचू आणि रामदास पाध्ये यांनी त्याच्यावर घेतलेली मेहनत यासाठी पाहावा. फार अपेक्षा ठेवून गेलात तर अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता. सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर एक गोष्ट प्रत्येकाला जाणवते आणि ती म्हणजे लक्ष्याची कमतरता. लक्ष्या जिवंत असता तर त्याने धमाल उडवून दिली असती एवढे मात्र निश्चित.

रेटिंग २ स्टार

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म Happy
सगळीकडुन हेच रिव्युव्ह मिळालेत
तरीही पहायची इच्छा आहे. जमल्यास पहाण्यात येईल Happy

छान आहे परीक्षण. पहिला 'झपाटलेला' मस्त होता. दिलीप प्रभावळकर व लक्ष्या दोघांनी धमाल उडवली होती. हाही चांगला असेल असे वाटले होते. बहुधा तरीही एकदा पाहण्याएवढा ठीक दिसतो.

दिलीप प्रभावळकर व्हिलन ही मुळात एक जबरी आयडिया होती पहिल्यामधे.

पुर्ण पोस्ट छान लिहिली आहे.

पहिल्या पार्ट मध्ये स्टोरी जास्त चांगली होती.
मी फक्त मराठीतील पहिला ३-डी म्हणुनच पहायला गेलो होतो. Happy

काहि इफेक्ट्स जबरी जमलेत.
सुरवात मस्तच होती.
नंतर तात्या वर जास्त फोकस ठेवला असता तर अजुन मस्त थ्रिलर झाला असता. (पहिल्या भागात तसच जमलेलं)

मला तात्या विंचु जिवंत झाल्यावर तो ते पुस्तक वाचतो हा सीन लैच भारी वाटला.
बोट जिभेवरुन घेवुन पुस्तकाची पानं पलटतो. Lol
बाकी ३-डी मधले काही सीन क्लिशे टाइप पण मस्त जमलेत.

सोनाली सुंदर दिसलीये.

लोक हिरॉइनच्या एन्ट्रीला / हिरो च्या एन्ट्रीला शिट्ट्या मारतात हे माहिती होतं.
व्हीलनच्या ते ही बाहुल्याच्या एन्ट्रीला शिट्ट्या पहिल्यान्दाच ऐकल्या. Happy
मी ही दोन चार वाजवुन घेतल्या. Happy
शनिवारी थियेटर फुल्ल होतं. ह्यावरुन तात्याच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. Happy

अवांतर : तात्या विंचु माबो वाचत असावा.
कारण त्याने ह्या चित्रपटात स्वप्नील जोशी पेक्षा थोडासा वेगळा लुक केलाय अस मला वाटल. Biggrin

कारण त्याने ह्या चित्रपटात स्वप्नील जोशी पेक्षा थोडासा वेगळा लुक केलाय अस मला वाटल. <<< Lol

रीव्ह्युजमधे आदिनाथच्या करीअरसाठी महेश कोठारेने हा पिक्चर बनवला हे वाचलंय. एवढं त्याचं करीअर बेकार चालू आहे का? कोठारे बहुतेक माझा छकुलाचा सीक्वेल पण बनवतील आता.

कालच पाहिला..
बहुतांश परीक्षण अगदी पटलं... लावणी जमली आहे, असं अजिबातच वाटलं नाही.

एकूणात अत्यंत बंडल चित्रपट.. आजकालच्या मराठी चित्रपटांसमोर न शोभणारा.

चिमुरी, फारएंड, झकासराव, स्मित, प्रसन्न, नंदिनी धन्यवाद!

कारण त्याने ह्या चित्रपटात स्वप्नील जोशी पेक्षा थोडासा वेगळा लुक केलाय अस मला वाटल. <<< हाहा
नंदिनी अगदी अचूक निरीक्षण!! अनुमोदन.

झपाटलेला २ जरी अपेक्षेला उतरत नसला तरी तात्या विंचूची क्रेझ जबरदस्तच आहे. वास्तविक झपाटलेला पाहायला येणारे लोक फक्त तात्या विंचूच्या करामती पाहायलाच थेटरात येतात.
महेश- लक्ष्या जोडीच्या सिनेमांमध्ये लक्ष्याने काहीतरी गोंधळ करून ठेवायचा आणि तो महेशने निस्तरायचा असा प्रेक्षकप्रिय फोर्मुला होता. झपाटलेला २ मध्ये असा गोधळ कुठेच दिसत नाही. त्यामुळे ९० च्या दशकातील सिनेमा डोक्यात ठेवून येणाऱ्या प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो.

झकासरावांच्या प्रत्येक वाक्याला अनुमोदन !!

माझ्या बाजूला आणि पुढच्या रांगेत तर मारवाडी लोक आले होते..!!

त्यातच पूर्ण सिनेमा जत्रेत घडतो >>>
हे जाण्वलेलंच. तरी पण लहान मुलांनी (थोडा फार भीतीदायक असूनही) एण्जॉय केल्याने हेतू साध्य झाला. स्वतःसाठी पाहिला असता कि नाही हे सांगता येत नाही. टारझन चं ३ डी ट्रेलर दाखवतात, ते पाहीलं तरी पैसे वसूल होतात. मक्या आणि सई ही जोडी अतिशय विजोड दिसली. त्यात मक्याचा विचित्र टोप वय जास्तच ठळक करतो. बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत ना त्याने धुमाकूळ घातलाय, ना त्याला काही वाव आहे. त्याचा रोल नसता तरी फरक पडला नसता, तेच सई च्या भूमिकेबद्दल म्हणता येईल.

कारण त्याने ह्या चित्रपटात स्वप्नील जोशी पेक्षा थोडासा वेगळा लुक केलाय अस मला वाटल. >>>> Lol Lol Lol

आधी पाहायचं ठरवलं पण सगळेच रिव्हू वाचल्यावर रद्द केल.

झपाटलेला (१) मात्र मस्त होता....आजही टी.व्ही.वर लागल्यावर चॅनल न बदलता झपाटलेला (१) आम्ही सगळेच जागेवर खिळून बसून पाहत असतो. आणि आजही त्यातले विनोद, हॉरर सिन्स, सर्वांचे (विशेषतः लक्ष्मीकांतचा) अभिनय सगळेच आजही खूप छान वाटते.

सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर एक गोष्ट प्रत्येकाला जाणवते आणि ती म्हणजे लक्ष्याची कमतरता. लक्ष्या जिवंत असता तर त्याने धमाल उडवून दिली असती एवढे मात्र निश्चित. >> अनुमोदन.

कोठारे बहुतेक माझा छकुलाचा सीक्वेल पण बनवतील आता. >> नंदिनी Lol Rofl

आणि धरून चाला जत्रा ४ दिवस आहे, ही सईबाई तिथेच? कॅमेर्‍याने टिपण्यासारखं असं इतरत्र काही घडतंच नाही? Uhoh
सर्वात बाहुलिचं काम छान झालंय.
फोफशा आणि अदित्यचे पकडापकडीचे सिन कमी करायला हवे होते, फार बो ओ ओ ओ ओ र आहेत ते.

आधी पाहायचं ठरवलं पण सगळेच रिव्हू वाचल्यावर रद्द केल.>>> लोकहो ज्याना बघायचा आहे त्याने ३-डी तच बघा.
घरच्या टिव्हीवर मजा येणार नाही.. Happy

नितीन देसाई यांनी जत्रेचा सेट उभा केला आहे पण त्यात देसाई ट्च जाणवत नाही. जत्रेत फक्त एक जायन्ट व्हील, तमाशाचा फड आणि बोलक्या बाहुल्यांचा तंबू एवढेच दाखवले आहे. जत्रेत बर्फाचा गोळा विकानारा वगळता एकही दुकान दिसत नाही. वास्तविक गावच्या जत्रेत गोडीशेव रेवड्या, मिठाईची दुकाने, इतर मजेदार खेळ, खेळण्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने अशा सर्वच गोष्टी असतात. शिवाय मौत का कुआ, छोटे मोठे पाळणे, खेळण्यातल्या आगगाड्या अशा कितीतरी गोष्टी असतात. पण यात अशा कुठल्याच संधीचा वापर करून घेण्यात आलेला नाही. शिवाय पूर्ण जत्रेत कॅमेरा एकाच अंगलने फिरत राहतो.

<< नितीन देसाई यांनी जत्रेचा सेट उभा केला आहे पण त्यात देसाई ट्च जाणवत नाही >>
सगळीकडे (तंबू चं आवरण सुद्धा) जरीकाठाचे आणि डिझाइनर कापड वापरलं आहे त्यावरून कळतं की की हे एन. डीं.चं काम असेल म्हणून Proud

वन टाईम वॉच आहे. विशेषकरून छोट्या मुलांना ज्यांचं पहिल्या भागावर आपल्यासारखं प्रेम नाहीये त्यांना आवडतोय. 3D तर छानच.

कोठारेंनी त्यांच्या "लहान मुलाला" रि लाँच करायला लहान मुलांना आवडेल असा सिनेमा काढलेला दिसतोय. Happy

मी झपाटलेला ( लक्ष्याचा ओरिजिनल) सिनेमा पण कधीच मन लावून पाहिला नव्हता.
झपाटलेला २ पाहताना ते फार जाणवलं.
मग परवा टिव्हीवर लागला होता तेव्हा पाहिलं. झपाटलेला २ पेक्षा ओरिजनल जबरदस्त होता.