"है कोई माई का लाल?"

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2013 - 04:27

संस्कारांचा अभाव, शिक्षणाला दिले जाणारे अपुरे प्राधान्य, शहरसीमेवरील गावातील रस्त्यालगतच्या जमीनी विकून वाढत्या वयातच हाती आलेला बक्कळ पैसा, चित्रपटातील नायकांचे अनुकरण करण्याच्या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेण्याची इच्छा, राजकारण्यांकडून मिळणारी सुरक्षितता, व्यसनाधीनतेत रमण्याची ओढ आणि मुळातच उदरनिर्वाहासाठी काही फारसे करावयाची गरज उरलेली नसणे या घटकांच्या सातत्यपूर्ण मार्‍यामुळे गेल्या पाच दोन वर्षात एक नव्या प्रकारचा गट निर्माण झालेला आहे.

व्यायाम करून कमावलेले मजबूत शरीर, एक बाईक, शर्टच्या बाह्या दंडामागे ढकललेल्या, डोळ्यांना काळा चष्मा, त्यातूनही सहज जाणवणारी मग्रूरी, वेग व सामर्थ्यप्रदर्शनाची तीव्र ओढ आणि तारुण्य!

हा गट कधी टोळक्याने, कधी एकेकटा असे फिरणार्‍यांचा आहे. धडकी भरेल असे या गटातील तरुणांचे वर्तन असते. त्यांच्या कोणत्याही कृत्याचा, वर्तनाचा विरोध करणे जवळपास अशक्य असते. त्यांच्यात आपापसात तर चकमकी झडतच असतात पण इतर सामान्यांनाही त्यांचा उपद्रव होणे वाढलेले आहे. पोलिस यंत्रणेवर सामान्य माणसाचा विश्वास असो वा नसो, पण या बाबीवर सामान्य माणसाचा नक्की विश्वास असतो की आज कदाचित पोलिस उपयोगी पडतीलही, उद्या काय? या गटाने सूड उगवायचे ठरवले तर आपण कसे पुरे पडणार?

एकंदरीतच 'कायद्याच्या अंमलबजावणीतील निरर्थकता' या घटकाचा हा 'बर्‍यापैकी नुकताच उदयास आलेला' असा एक दृष्य परिणाम आहे. याचे परिमाण वाढण्याची शक्यता बळावलेली आहेच. हे का झाले, हे होऊ नये म्हणून काय करता येईल, वगैरे चर्चा भले जोरदार झाल्या तरी त्यांची कितपत, कुठे व कोणाकडून नोंद घेतली जाईल किंवा त्याचा नेमका काय उपयोग होईल हे माहीत नाही.

एकेकाळची 'निव्वळ गुंडगिरी' यापलीकडे पोचलेला हा प्रकार दिसत आहे. ही व्यापक व सतत वाढती अशी 'गुंड मानसिकता' आहे असे म्हणायला वाव आहे.

स्वतःला व कुटुंबियांना जपणे, रस्त्यावरील वादविवाद किंवा अनोळखींशी होणारे वादविवाद लवकरात लवकर सामोपचाराने मिटवणे, 'तू शहाणा बाबा' ही भूमिका घेणे हे सामान्यांसाठी काही उपयुक्त उपाय ठरावेत.

गेल्या दिड दोन वर्षात बघायला मिळालेले अनेक प्रसंग, क्षणात अकस्मात होणारे भावनिक उद्रेक यातून हे लिहावेसे वाटले. आपल्याला काय वाटते?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादकांचे आभार!

झकासराव, मनस्मि, विदिपा, आबासाहेब, बंडोपंत, नाना फडणवीस, भारती, केदार, श्रीयू, किरण्यके - सहमत आहे.

दक्षिणा - तो थेट तुमच्या क्युबिकलपाशी आला वगैरे वाचून खरे तर तीळपापडच झाला. त्या लोकांना ते सगळे दाखवण्याची एक और हौस असते हे वेगळेच! कोल्हापूरचा गुटखा - खून किस्सा शहारे आणणारा!

शाहिर - अंगावर काटा आला. गेल्या वर्षी याच / अश्याच दिव्यातून मी आणि माझे कुटुंबीयही कोल्हापूरहून पुण्याला परतताना गेलो होतो. लिहायला लाज वाटते, खरे तर लाज तरी कशाला वाटावी, की आम्ही काहीही करू शकलो नाहीत. दादापुता करून आणि दोन हजार देऊन निघालो. चूक त्या टोळक्याची होती.

माधवी - फ्लेक्स वॉर - अक्षरशः डोक्यात जाते. बारा वर्षाच्या वगैरे मुलांच्या नावापुढे साहेब, भाऊ, अण्णा, दादा अश्या उपाध्या लावून त्यांची किरकोळ यशे जाहीर केलेली असतात. फुकट खर्च, व्यक्तीपूजा आणि स्पर्धा!

बाई - मागे अ‍ॅडमीनना विचारले होते की ललित व लेख असे स्वतंत्र विभाग असावेत. मला लेख म्हणून हे लिहावेसे वाटले आणि तो पर्याय नेमका ललित लेख अस होता. चालू घडामोडींमध्ये हालवायचे बघतो.

निलिमा - सर्वात चक्रावणारा प्रतिसाद! तीनपैकी दोन लिंक्स वाचल्या. तिसरी बरीच मोठी असल्याने वेळ लागेल किंवा वाचणे होणार नाही. पण तुम्ही सांगत आहात त्या अर्थी प्रश्नच नाही. कश्यातून काय निघेल हे खरंच सांगता येत नाही. आधी खरोखरच विचित्र वाटले, पण या प्रश्नाची मुळे इतक्या वेगळ्याच आणि तब्बल तीन चार दशकांपूर्वीच्या घटनांमध्ये सापडावीत हे नवलाईकारकच!

शूम्पी - एक प्रकारे सहमतच. आदर्शवादाचे थोतांड करून 'मी देशात राहून देश सुधारण्यास हातभार लावेन' म्हणत बसण्यातला अर्थ केव्हाच जवळपास संपलेला असावा.

उल्हासराव - नेमके नोंदवलेत.

आभारी आहे.

-'बेफिकीर'!

चांगली चर्चा आहे.
मुळात भारतीय लोकच एक समाज म्हणून नीट जगत नाहीत. >>> +१
शुम्पीशी असहमत. प्रत्येक जण काहि अमेरिकेत जाउन राहु शकत नाहि. आपले नातेवाइक तर भारतातच आहेत ना! त्यांचे काय ?
सर्व मावळे जर असेच म्हणाले असते तर शिवाजी महाराज देखील काहि करु शकले नसते. आपण शिवाजी माहाराज नाहि हे तर स्पष्टच आहे पण जिथे कुठे थोडाफार शिवाजी दिसत असेल तिथे थोडाफार तरी मावळा व्हायचा प्रयत्न केला पाहिजे.

याच प्रकारातील माझा अत्यंत लाजीरवाणा अनुभव.
माझे सगळे विद्याथ्री ग्रामीण किंवा आता असेच "नवश्रीमंत" गटातील. जो विषय मी वर्षभर शिकवीला (पण कॉलेज्मधे न येणॅ, आदि आदि) त्याच विषया च्या पेपरमधे एकाने युनि. परिक्षेच्या वेळी दुसर्या एका राजकारणी व्यक्तीच्या महविद्यालयात खिशात कॉपी ठेवली. पकडले गेल्यावर सुपर वायजरलाच दम दिला. तिने न ऐकल्यावर त्या राजकारणी व्यक्तीच्या मुलाला फोन केला आणि पुन्हा पेपर सोडविण्यासाठी बसला.

भयंकर आहे. स्वार्थी विचार आहे पण मनात आलंच की भारतात स्थाइक न होण्याने अशा अनावश्यक त्रासांपासून किती दूर आहोत आपण म्हणून.>>>

निव्वळ स्वार्थीच नाही तर पळपुटा आणि भंपकसुद्धा. देश सोडताना देखील स्वार्थी विचारच मनात असतो. कुनीही मी देशाचं भलं करण्यासाठी चाललोय असा विचार करून जात नसतं. स्वदेश मधला मोहन एखादाच असतो डॉ एपीजे अब्दुल कलामांसारखा. नासा मधे करीअर होत असताना त्यांनी पळपुटेपणा न करता देशाला मिसाईलच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवलं. नारायण मूर्तीं, अंबानी किती जणांची नावं घ्यावी ? म्हणूनच इथल्या परिस्थितीला नावं ठेवत आपल्या अमेरिकेत असण्याचं समर्थन करणं हा भंपकपणा आहे. अशा प्रतिक्रियांमधे किती दलदलीत राहता तुम्ही असाही एक दर्प आढळतो. मुळात असे लोक भारतात राहून काही करीत नाहीत कि युरोप, अमेरिका त्यांच्या जाण्याने एका रात्रीत बदललं असंही नाही.

यातल्या काहिंचे तर विचार भारतात असताना वेगळे असतात , तिकडे गेल्यावर वेगळे होतात. याला काय म्हणायचं ? जे विचार, संस्कृती यांना बुरसटलेली वाटते, तिचाच पुरस्कार एकेकाळी यातले बरेच जण करत होते याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो.

असे डबल स्टँडर्ड असणा-या लोकांचा तसाही इथल्या परिस्थितीला काहिच उपयोग नाही. इथं आल्यावर फक्त ईईइ, शी शी करत नाकाला रुमाल लावत हिंडतात हे. जणू काही अमेरिकेत सेटल होण्याआधी यातलं काही पाहीलंच नाही. ओरिजिनल अमेरिकन देखील अशा प्रतिक्रिया कधी देत नाही. बरं, परिस्थिती सुधारण्यासाठी अंग मोडून काम करनार होते कि जनजागृतीसाठी त्यांचं नाममहात्म्य कामाल येणार होतं ? सगळा आनंदीआनंद असताना आम्ही इथं आहोत ते यासाठी बरे आहे अशा पोस्टी कशाला टाकायच्या अधूनमधून ?

इथले लोक किमान प्रामाणिक तरी आहेत. आहे ती परिस्थिती मान्य करतात. बदलयाची असेल तर तेच बदलू शकणार आहेत. पळपुट्यासारखे सातासमुद्रापलिकडे जाऊन शहाणपणाचे बोल सुनावल्याने काही होणार नाही.

सनातन मानवजात , प्रत्येकाला स्वताची बाजू असते ..सुरक्षा , कायदे यांच्या दृष्टीकोनातून अमेरीका किंवा तत्सम देश चांगलेच आहेत ,,त्याबद्दल दुमत नको .
भारतामधे वर चर्चिले जाणारे प्रकार वाढत चालले आहेत ..
आणि जेव्हा कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा सामान्य माणूस काळजी करतोच ..
माझा जीव देशासाठी धोक्यात घालायला मी तयार आहे ..पण रस्त्यावरच्या मवालीपणा मधे तो गमवायची इच्छा नाहिये ..

इथे आपण या प्रश्नासोबत उपाय / पर्याय यांची पण चर्चा करतो आहे..

तुमच्याकडे या गोष्टींवर काय उपाय करता येइल ..जेणे करून ही परीस्थीती बदलता येइल . असे काही मांडा ..

सर्वजण हौस / प्रदर्शन म्हणून देशांतर करतात असा नाहिये ..

ह्या गुंठेमंत्र्यांची ताकद म्हणजे हातात असलेला भरपुर पैसा. एकदा हा पैसा संपला की कोणी कुत्रं पण विचारत नाहीत यांना.
काही वर्षापुर्वी मुंबईची टोकाची उपनगरे दहिसर, मिरारोड भागात पण असे भाई रातोरात श्रीमंत झाले होते. काय ऐट म्हणावी, हातात, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, भारी बाईक घेऊन नाक्यावर उभे राहयचे. टवाळक्या करायच्या. राडेबाज पक्षाचे हे कार्यकर्ते. वरुन आदेश आल्याचे निमित्त की राडा करायचा. वैताग आला होता. पक्षाने पण यांच्या पैशावर मजा केली आणि शेवटी तिकिटच नाही दिले. मग काय भाई अपक्ष म्हणुन उभे राहिले. त्याकाळी मिळालेल्या काही लाख रुपयांची ऐश केली, वर उत्पन्न, गुंतवणुक इ. चे काडीचेही ज्ञान नाही.
आता महागाई प्रचंड झाली. लाखाची वॅल्यू कधीच कमी झाली. हातात करोड असतील तर भाव. आता शितं च नाही तर दांडगाई करायला भुतं कुठुन येणार?
हे दहिसरमधले ९० च्या दशकातले उदाहरण!

एकदा पैसा संपला, की यांना कोणीही विचारणार नाही, ना राजकारणी, ना त्यांचे उजवे-डावे हात म्हणवून घेणारे.

सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, हातातला पैसा टिकवायचा किंवा वाढवायची अक्कल देवाने यांना दिलेली नाही.

@ शाहीर - पोस्ट समजली नाही बहुतेक तुम्हाला.

सनातन मानवजात , प्रत्येकाला स्वताची बाजू असते ..सुरक्षा , कायदे यांच्या दृष्टीकोनातून अमेरीका किंवा तत्सम देश चांगलेच आहेत ,,त्याबद्दल दुमत नको .>>> त्याबद्दल काहीच म्हटलेलं नाही.
भारतामधे वर चर्चिले जाणारे प्रकार वाढत चालले आहेत .. >>> बरं मग
आणि जेव्हा कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा सामान्य माणूस काळजी करतोच ..
माझा जीव देशासाठी धोक्यात घालायला मी तयार आहे ..पण रस्त्यावरच्या मवालीपणा मधे तो गमवायची इच्छा नाहिये ..>> ओके

इथे आपण या प्रश्नासोबत उपाय / पर्याय यांची पण चर्चा करतो आहे..>>> आम्ही इथे आहोत ते बरं आहे हा उपाय आहे का ? म्हणजे सर्वांनी हा देश सोडून जावा कि काय ?

तुमच्याकडे या गोष्टींवर काय उपाय करता येइल ..जेणे करून ही परीस्थीती बदलता येइल . असे काही मांडा >> आधी ज्या पोस्टला उत्तर दिलय , त्या पोस्टबद्दलचं म्हणणं स्पष्ट करा. तुम्हाला समजलेलं नाही. इतरांना समजावण्याचा हट्ट कशाला ?

सर्वजण हौस / प्रदर्शन म्हणून देशांतर करतात असा नाहिये ..>> कुणी जाब विचारला होता का देशांतराबद्दल ? मग कुठलाही विषय आला कि (स्वच्छता, गुंडगिरी, दारिद्र्य इ) कि यासाठीच आम्ही इथे आहोत ते बरे आहे असं सांगणं हे तुमच्या दृष्टीने बरोबर आहे का ? अति झालं म्हणून कधीतरी ठणकवायलाच पाहीजे होतं ते आता ठणकावलं. ही परिस्थिती कशी बदलता येईल त्याबद्दल या लोकांचं काँण्ट्रिब्यूशन नगण्य आहे. अशा चर्चात असे भोचक सल्ले सातासमुद्रापलिकडून ऐकणे आता सहन होत नाही. ज्यांना काहीच करायचं नाही त्यांनी स्वतःला अशा चर्चाम्मधून लांब ठेवावं.

@शाहीर - भारतामधे वर चर्चिले जाणारे प्रकार वाढत चालले आहेत ..>> अहो त्या अमेरीकेत दिवसा ढवळ्या पोरसोर बंदुका चालवुन कित्येकाचे मुडदे पाडत आहेत. नको ते गुण दाखविता आहेत त्यापेक्षा हे बर नाय काय?

@ सनातन मानवजात, वरच्या अनेक प्रसंगात, अशा गुंडगिरी च्या प्रसंगी आपण आपल्या कुटुंबियांच्या आणी आपल्या सुरक्षेसाठी कशी (पळ)वाट काढली ह्याचं वर्णन आहे. इथे पळवाट हा शब्द कुठल्याही negativity ने वापरला नाहीये. कारण अशा प्रसंगी स्वतःच्या आणी कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार महत्वाचा असतो आणी त्या प्रसंगातून सुटका करुन घेणं हेच महत्वाचं असतं... त्याच 'सुटलो' भावनेतून 'आम्ही परदेशी आहोत' हा सुस्कारा आला तर लगेच 'ठणकवायची' गरज नाही आणी केवळ आपण भारतात रहातो आणी काहिजण परदेशी राहून भारतातल्या परिस्थितीवर टीका करतात म्हणून आपण काही अलौकिक देशकार्य करतो आणी / वा परदेशी रहणारे भारतीय निश्क्रिय आहेत ह्या अहं भावनेतून त्यांना ठणकवायची आपली जवाबदारी / अधिकार / कारण देखिल नाही. इथे चर्चा चालू आहे. एकमेकांविषयी, एकमेकांच्या मतांविषयी आदर ठेवून ती व्हावी इतकाच उद्देश. बाकी आपण 'चर्चा' सोडून काय करू शकतो?

@ बंडोपंत, तुम्ही उल्लेख केलेला प्रसंग जरी खरा असला तरी अशा घटना isolated असतात, आणी ह्या बाफ मधे उल्लेखलेले प्रसंग अधिक सार्वत्रिक आहेत. म्हणून त्याच्याविषयी चर्चा (पुन्हा एकदा, आपण चर्चाच करणार) चालू आहे.

देशासाठी मरण्या-बिरण्याचे विचार ठीक आहेत आणी वर आलेली काही नावंही मोठी आहेत, पण शेवटी आपल्या कुटुंबासाठी रोजचं जगणं हाच एक मोठा संघर्ष आहे. मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असो. आणी हा संघर्ष सुरक्षित, स्वच्छ, civilized वातावरणात असावा ही अपेक्षा देखिल अत्यंत basic आहे.

परदेशात स्थाइक झालेले कुटुंब !
म्ह्णजे नेमके कोन कोण आहेत !
आपली आई आहे का?
आपले वडील आहेत का?
आपली बहीन आहे का ?
आपले ईतर नातेवाईक
जसे कि (काका ,मामा,काकु,मामी, )आजुन खुप आहे
आज विन्ग्रज लोकांचा फादर डे आहे म्ह्णुन विचारतो .........

बेफिकीर,

प्रत्येक समाजावर एक वेळ नेहमी येते जेव्हा समाजातल्या सन्माननीय (honourable) लोकांना हाती शस्त्र धरावं लागतं. यावेळी स.लो. गप्प बसले तर तो समाज फुटून तुटून नाहीसा होतो आणि केवळ द्विपादांचा कळप बनतो.

भारतीय समाजावर लवकरच ही वेळ येणार आहे.

उर्वरित जगातल्या सर्व समाजांची थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होणार आहे. जे मूळचे भारतीय परदेशी स्थायिक आहेत त्यांच्यावरही हीच वेळ येऊ शकते.

आ.न.,
-गा.पै.

प्रत्येक समाजावर एक वेळ नेहमी येते जेव्हा समाजातल्या सन्माननीय (honourable) लोकांना हाती शस्त्र धरावं लागतं.
<<

कर्रेक्ट!
म्हणूनच नक्षलवादी शस्त्र हातात घेत असावेत.

गांधीवादी इब्लिस.

हाती शस्त्र घेतलेल्यांमधे सन्माननीय आणि असन्माननीय असा भेद असतो का ? Uhoh
म्हणजे ट्रॅफीकच्या समस्येने त्रस्त होऊन शस्त्र हाती घेतलं तर सन्माननीय आणि दारिद्र्य, कुपोषण - उपासमार, अवहेलना, अत्याचार आणि देशाचं लक्ष नसणे या कारणांमुळे शस्त्र हाती घेतलं तर सन्माननीय नाही असं का ?

मला वाटते की 'धर्मांध' म्हणून हिणवले जाणार्‍यांचा जसा एक पंथ आहे तसाच 'निधर्मी' आहोत असे म्हणून बेभान होणार्‍यांचा / झालेल्यांचाही एक आहे. त्यांचे नांव (शीर्षक) 'निधर्मी' असल्याने ते वरकरणी अहिंसावादी वगैरे मानले जातात. पण त्यांच्यात्यांच्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत ते धर्मांधांइतकेच तीव्र भावना ठेवून बेभानपणे वागतात.

जसे:

शिवाजी महाराज स्वतः निधर्मवादी होते. त्यामुळे त्यांचे आजचे अनुयायी हे उदाहरणार्थ निधर्मी म्हणवले जातील. पण या निधर्मी लोकांना शिवाजी महाराजांबाबत काहीही ऐकून घेण्याची सबूरी दाखवता येत नाही. एक धुरंधर, मुत्सद्दी, शूर, साहसी व सत्यवादी नेता म्हणून वादातीत असलेल्या महाराजांच्या कारकीर्दीत त्यांची एखादी राजकीय चूक झालेली असू शकेल वगैरे असे कोणी म्हणालेच तर त्याला नेस्तनाबूत केले जाईल. असेच महात्मा गांधींबाबतही झालेले आहे. गांधी अहिंसावादी, त्यांचे अनुयायी अहिंसावादी! पण गांधींबाबत अनुदार उद्गार काढणार्‍यांसाठी हे आजचे अनुयायी मात्र हिंसेचा, शिवीगाळाचा अवलंब करणार!

तस्मात.... धर्मांधांना धर्मांध म्हणून हिणवण्याइतकेच या अश्या सत्यवादी, निधर्मवादी व व्यक्तीपूजक पण प्रसंगी हिंसक होणार्‍यांना व मूळ नेत्याच्या नावाला बट्टा लावणार्‍यांना हिणवायला हवे.

-'बेफिकीर'!

बेफिकीर, मूळ चर्चेविषयी काही लिहायला आत्ता वेळ नाही पण तुमची वरची पोस्ट म्हणजे "मार्मिक! क्या बात है! बँग ऑन! "

नताशा, अन बेफी,
स्पेसिफिकली बेफी,
तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला सध्या वेळ नाही. बिझी आहे जरा Wink पण मी अन गापै बोलत होतो त्यात तुम्ही उडी मारली आहेच, उत्तर जरूर देईन Wink

बाय द वे.
थोरले महाराज 'धर्मनिरपेक्ष' असावेत. निधर्मवादी नाही. कारण सर्व धर्मांचे लोक नोकरीस होते इतकेच. महाराज नास्तिक नव्हते, अन निधर्मवादी तर नव्हतेच नव्हते. ते हिंदू होते, व आस्तिकही होते.

मायबोलीचे शब्दप्रभू ना तुम्ही? शब्द नीट वापरा हो!

***

गांधीवाद अन अहिंसा म्हणजे काय याचे धर्मांध हिंदुत्ववाद्यांनी केलेले विकृत प्रेझेंटेशनच तुम्ही खरे म्हणून लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करता, तो दोष तुमचा नाही, परिस्थितीचा व त्यांचे कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याच्या सतत प्रयत्नांचा आहे.

अनुदार उद्गार काढणार्‍यांना 'दुसरा गाल पुढे करा' असे गांधीजींनी कुठे म्हटले आहे? अहिंसा काय तेच मुळातून शिकवायला हवे आहे..

असो.

>>स्वतःला व कुटुंबियांना जपणे, रस्त्यावरील वादविवाद किंवा अनोळखींशी होणारे वादविवाद लवकरात लवकर सामोपचाराने मिटवणे, 'तू शहाणा बाबा' ही भूमिका घेणे हे सामान्यांसाठी काही उपयुक्त उपाय ठरावेत. <<
हा बुळचट पणा आहे. अहिंसा नाही. ना ही गांधीगिरी. वा गांधीवाद.

त्याच्या विरोधात उभे रहाणे, व आपल्यासोबत इतरांनाही यापासून इजा होणार नाही असा प्रयत्न करणे याला म्हणतात अहिंसक गांधीवाद. पण ते तुमच्या डोक्याबाहेरचे आहे, तिथे तुम्ही म्हणणार की गांधी पर्सनली फाईव्हस्टार तुरुंगात असत. पण गांधीवाद मानणारे लाखो रस्त्यावर होते, व रहातील हे लक्षात घ्या. तुमच्यासारख्या पळपुट्यांना गांधीवादाची अन अहिंसेची खिल्ली उडविण्याखेरीज काहीच येत नाही.

>>पण गांधींबाबत अनुदार उद्गार काढणार्‍यांसाठी हे आजचे अनुयायी मात्र हिंसेचा, शिवीगाळाचा अवलंब करणार! <<
नक्कीच करणार. किमान मी तरी, स्पेशल तुमच्या साठी. तुम्ही शिव्या दिल्या तर त्या परत मिळणारच! हो की नाही? काही अहिंसक लोक कुणाचा बाप काढल्यावर सभ्यपणे प्रतिवाद करतात, त्यांना उद्देशून तुम्ही असे तारे तोडावेत हे शोभायला पाहिजे की नाही बेफिकिर 'तुला'? Wink

(अरे हो, मायबोलीवरील समस्त सद्स्यांसाठी. हे महोदय एकमेव आहेत माबोवर, ज्यांना मी एकेरी हाक मारतो व मारणार)

हिंजवडी (पुणे) मधे तर सरपंच एक 'कुमार' आहे. सर्वत्र त्या कुमाराचे अभिनंदनाचे फ्लेक्स झळकायचे. (आता नवा नियम आल्यापासून काढले आहेत बहुदा). त्यावर अभिनंदन करणारे सर्वजण सुद्धा "कुमार". म्हणजे २२-२६ च्या आसपासचे असावीत असं वाटतं त्यांचे फोटो पाहून.

आमच्या कंपनी HR नी तर चक्कं नोटीस (ई-मेल) फिरवली होती कि एम्प्लॉयी नी कुठल्याही कारणासाठी लोकल लोकांशी पंगा घेऊ नये. वेळप्रसंगी मघार घेऊन पुढे निघुन जावे. Happy

धाग्याच्या सुरुवातीला "नव्या प्रकारच्या गटा"विषयी लिहिले आहे. पण आजकाल सुशिक्षित आणि खूप पैसे मिळवणारे (आय टी व इतर) लोक सुद्धा रस्त्यात छोट्याश्या कारणांवरून वादावादी करताना दिसतात. आपण खूप पैसे मिळवतो म्हणजे आपण भारी असा काहीसा विचार दिसतो. असं काही पाहिलं की डॉ. अनिल अवचटांची एक मस्त मुलाखत टी. व्ही. वर पाहिलेली ती आठवते.

त्यांच्या लहानपणीच्या मित्रांना बोलावलं होतं आणि सगळे मिळून डॉ.च्या आठवणी सांगत होते. शाळेत असतानाच्या खोड्या, सवयी, शिक्षा वगैरे. त्यात डॉक्टरांनी असं सांगितलं की घरात, शाळेत वडीलधार्‍यांच्या सततच्या धाकानी, बेदम मार मिळण्यानी आम्ही सगळे खुप लवकर कोडगे झालो. त्याचा फायदा असा झाला की आम्ही एखादं अपयश सहज पचवू शकतो, ऊठ सूट आमचा इगो हर्ट होत नाही आणि छोट्या छोट्या कारणांनी आम्हाला लगेच राग येत नाही.

सो ट्रू... आमची पिढी लहानपणापासून घराच्या सुरक्षेत, लाडात वाढली, उत्तम शिकून आय.टी. वगैरे च्या कृपेनी लवकर जास्त कमावू लागली म्हणून आम्ही असे होतोय का ? थोडं कोडगं व्हायला हवं होतं का डॉ. म्हणतात त्या अर्थानी ?

गांधीवाद म्हणजे काय हा या धाग्याचा विषय नसला तरीही असे म्हणावेसे वाटते की गांधीवादी म्हणवणार्‍यांना तो स्वतःला नीट समजला असेलच असे मुळीच नाही असे दिसत आहे. ते असो.

शकुन - तुमचा मुद्दाही वेगळा आहे व बराचसा पटत आहे. फक्त अगदी तंतोतंतपणे पटला नाही इतकेच.

Kiranyake,

>> अत्याचार आणि देशाचं लक्ष नसणे या कारणांमुळे शस्त्र हाती घेतलं तर सन्माननीय नाही असं का ?

गरिबांच्या हितासाठी नक्षलवादी हाती शस्त्र घेतात यावर शेंबडं पोरही विश्वास ठेवणार नाही. भ्रष्ट नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेला स्वसंरक्षणार्थ हाती शस्त्र धारण करावंच लागेल. नक्षलवादी स्वसंरक्षणासाठी शस्त्रे चालवतात का?

बाकी स्वत:च्या संरक्षणासाठी हाती शस्त्र धरलं तर ते निश्चितच समर्थनीय आहे. किंवा भविष्यात समर्थनीय ठरण्याची चिह्ने दिसताहेत.

आ.न.,
-गा.पै.

इब्लिस,

>> त्याच्या विरोधात उभे रहाणे, व आपल्यासोबत इतरांनाही यापासून इजा होणार नाही असा प्रयत्न करणे
>> याला म्हणतात अहिंसक गांधीवाद.

कशा प्रकारचा विरोध तुम्हाला अपेक्षित आहे? जो माणूस हातात दंडुका घेऊन त्याच्या साथीदारांसह तुम्हाला आणि तुमच्या सोबतच्या बायकामुलांना बडवायला आतुर झाला आहे त्याच्याशी कसं वागावं?

तुमचा अहिंसक गांधीवाद तत्त्व म्हणून मान्य. त्याची अंमलबजावणी कशी करायची ते सविस्तर समजावून सांगावी अशी विनंती.

आ.न.,
-गा.पै.

Pages