"है कोई माई का लाल?"

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2013 - 04:27

संस्कारांचा अभाव, शिक्षणाला दिले जाणारे अपुरे प्राधान्य, शहरसीमेवरील गावातील रस्त्यालगतच्या जमीनी विकून वाढत्या वयातच हाती आलेला बक्कळ पैसा, चित्रपटातील नायकांचे अनुकरण करण्याच्या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेण्याची इच्छा, राजकारण्यांकडून मिळणारी सुरक्षितता, व्यसनाधीनतेत रमण्याची ओढ आणि मुळातच उदरनिर्वाहासाठी काही फारसे करावयाची गरज उरलेली नसणे या घटकांच्या सातत्यपूर्ण मार्‍यामुळे गेल्या पाच दोन वर्षात एक नव्या प्रकारचा गट निर्माण झालेला आहे.

व्यायाम करून कमावलेले मजबूत शरीर, एक बाईक, शर्टच्या बाह्या दंडामागे ढकललेल्या, डोळ्यांना काळा चष्मा, त्यातूनही सहज जाणवणारी मग्रूरी, वेग व सामर्थ्यप्रदर्शनाची तीव्र ओढ आणि तारुण्य!

हा गट कधी टोळक्याने, कधी एकेकटा असे फिरणार्‍यांचा आहे. धडकी भरेल असे या गटातील तरुणांचे वर्तन असते. त्यांच्या कोणत्याही कृत्याचा, वर्तनाचा विरोध करणे जवळपास अशक्य असते. त्यांच्यात आपापसात तर चकमकी झडतच असतात पण इतर सामान्यांनाही त्यांचा उपद्रव होणे वाढलेले आहे. पोलिस यंत्रणेवर सामान्य माणसाचा विश्वास असो वा नसो, पण या बाबीवर सामान्य माणसाचा नक्की विश्वास असतो की आज कदाचित पोलिस उपयोगी पडतीलही, उद्या काय? या गटाने सूड उगवायचे ठरवले तर आपण कसे पुरे पडणार?

एकंदरीतच 'कायद्याच्या अंमलबजावणीतील निरर्थकता' या घटकाचा हा 'बर्‍यापैकी नुकताच उदयास आलेला' असा एक दृष्य परिणाम आहे. याचे परिमाण वाढण्याची शक्यता बळावलेली आहेच. हे का झाले, हे होऊ नये म्हणून काय करता येईल, वगैरे चर्चा भले जोरदार झाल्या तरी त्यांची कितपत, कुठे व कोणाकडून नोंद घेतली जाईल किंवा त्याचा नेमका काय उपयोग होईल हे माहीत नाही.

एकेकाळची 'निव्वळ गुंडगिरी' यापलीकडे पोचलेला हा प्रकार दिसत आहे. ही व्यापक व सतत वाढती अशी 'गुंड मानसिकता' आहे असे म्हणायला वाव आहे.

स्वतःला व कुटुंबियांना जपणे, रस्त्यावरील वादविवाद किंवा अनोळखींशी होणारे वादविवाद लवकरात लवकर सामोपचाराने मिटवणे, 'तू शहाणा बाबा' ही भूमिका घेणे हे सामान्यांसाठी काही उपयुक्त उपाय ठरावेत.

गेल्या दिड दोन वर्षात बघायला मिळालेले अनेक प्रसंग, क्षणात अकस्मात होणारे भावनिक उद्रेक यातून हे लिहावेसे वाटले. आपल्याला काय वाटते?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शंका - हे कुठल्या एका शहरप्रदेशाला डोळ्यासमोर ठेऊन आहे की सबंध महाराष्ट्र वा अखंड भारताला लागू होते.

मौ कोई लाल नही हुं
आजची तरुण पिढी टोळ भैरव असल्या सारखी वागते आहे. संस्काराच्या गोष्टी पार विसरल्या आहे. टिव्ही मोबाईल ने तर विदारक स्थिती आहे.

अभिषेक,

तुमचा प्रश्न महत्वाचा वाटला. तो वाचल्यावर मला पुन्हा विचार करावा लागला. मग माझेच मला उत्तर असे मिळाले की गेल्या काही वर्षात मी जो काही भारत पाहिला त्यातील गुजरात, केरळ आणि पंजाब ही तीन राज्ये वगळता इतर सर्व राज्यात (काश्मीर व अतीपूर्व भारतात मी अजुन गेलेलो नाही) हा प्रकार बळावलेला दिसतो.

महाराष्ट्र, हैदराबाद, चेन्नई, उत्तर प्रदेश, बिहार, सर्वाधिक प्रमाणात दिल्ली अश्या अनेक ठिकाणी हा प्रकार प्रकर्षाने जाणवला. मुंबईचे तितके ज्ञात नाही.

धन्यवाद.

मला तरी पुणे-पिंचि एरिया झटकन डोळ्यांसमोर आला. >>> ही लागण सगळीकडेच आहे आबा.

महिना ५-७ हजार कमवणारे आणि गावातुन कोल्हापुरला रोज बाइकवर अपडाउन करणारे कित्येक जण असे पाहिलेत की जणु मी रजनीकांतच...
माज, घतींगशाही ...

हे लोण फार लवकर पसरलय आमच्या कोल्हापुरातही.

पुणे- पिंचीत ते लोकं गुन्ठामन्त्री तरी असतात रे..

बा द वे, मी स्कॉर्पिओला नेहमी चटकन रस्ता देतो बॉ...

हे पहायचे असेल तर पुण्यात पुढील भागात फिरा:
धायरी
बाणेर
बालेवाडी
वाकड
ताथवडे
रावेत
मुळशी
हिंजवडी

लेखाच्या विषयावरून ढवळेंची 'सद्या तुम्ही मेलात तरी हरकत नाही' ही कविता आठवली.

नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी ह्या अशा लोकांवर वचक बसविण्यासाठी स्पेशल स्क्वॉड तैनात केलेले आहे आणि त्यामुळे प्रमाण आटोक्यात आलेलेही आहे. सस्टेनन्स कसा राहील माहीत नाही.

बेफी थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पोचलं.
कोल्हापूरात अशाच दोन व्यक्तींमध्ये भांडण होऊन एकाचा खून झाला. कारण सांगितलं तर हसाल.
पानपट्टीवर एक व्यक्ती उभा होता गुटखा खात, तर खाता खाता पडली, दुसर्‍याने उचलून हातात दिली, पहिला म्हणाला पडूंदे, मी खाली पडलेलं खात नाही. इथून वाद सुरू झाला. दुसर्‍या (पुडी उचलून देणार्‍या) मुलाच्या वडिलांनी येऊन पहिल्याला सरळ गोळी घातली.
हा निव्वळ पैसा असल्याचा माज झाला. पण शिक्षणानेसुद्धा हे प्रश्न सुटत नाहीत.

"अवघडे" (तुमची रेखा अजून डोक्यातून गेली नाही :))

माझ्या ऑफिसातला एक पुर्वी MPW म्हणजे साधा लादी पुसणे वगैरे करणारा मुलगा एक दिवस गुटखा खात रेबॅन चा गॉगल लावून थेट माझ्या क्युबिकल ला आला आणि म्हणाला 'काय मॅडम कसं काय?' आय वॉज शॉक्ड Uhoh मी चाचरत हो हो ठिक वगैरे. आता तुम्ही इथे नाही का? वगैरे विचारलं. त्याने सुरूच केलं. आपल्या १५ गाड्या हैत हितं लावलेल्या (आमच्या बीपीओला) आपल्याला जॉब ची गरज नाही, मध्येच शर्टमध्ये हात घालून सोन्याचे साखळदंड वगैरे दाखवण्याचा प्रोगॅम पण झाला. (संबंधित व्यक्ती देहू येथली) हे बक्कळ पैसा इ. तुम्ही बोलला ते हेच.

एक प्रसंग :
मी फॅमिलीसोबत चारचाकीमधून चाललो होतो..२ बाईक्सवर ४ जण चालले होते..रस्ता देईना म्हणून २-३ वेळा हॉर्न दिला तर त्यांनी गाड्या आडव्या लावून शिव्या द्यायला सुरुवात केली ..नंतर दरवाजा उघडून बाहेर खेचले ..आणि धक्क बुक्की चालू झाली..

भरपूर गर्दी जमली ...बाकी लोक मधे पडले ..म्हणून गंभीर मारहाण झाली नाही..सोबतच्या महिला वर्गासही शिवी गाळ झाली..एवढी गर्दी पाहून ट्रॅफिक पोलिस आणि अजून एक पोलिस गाडी थांबली ते आले असताना त्यांना सर्व परीस्थीती सांगितली त्यांना त्या टोळक्याने कोणा राष्ट्रवादी सन्माननीयांची ओळख सांगितली..आणि त्यांना जाउ देण्यात आले ..

आम्ही जाउ दे म्हणून पुढे आलो तर तेच टोळके आणि २-३ जण त्यांना अ‍ॅड झालेले ..गाड्या अडवून मारहाणीच्या पवित्र्यात उभे...

विषय किती छोटा ..आणि कुठवर ताणला गेला...

मी शांतपणे ( पण फुल्ल स्पीडने) गाडी टोळक्याच्या अंगावर घातली...२-३ जखमी..त्यांच्या गाड्यांची मोडतोड करून ..रीव्हर्स टाकली..

आणि सांगितले, पुन्हा अडवा किंवा पाठलाग करा ..तेव्हा चिरडून टाकीन..

जर गाडी थांबवून उतरलो असतो तर जबर मारहाण झाली असती ..सोबतच्यांच् काय झाला असता कोणास ठावूक..
टोळक्यांना चेहरे नसतात..असतो तो फक्त माज, नशा ...आणि हिंसकपणा !!

खर सांगायचा तर ९९% वेळा "तुच भारी बाबा" असे म्हणून पुढे जाण्यात शहाणपणा ..पण ही टोळकी त्याच्याहीपुढे गेले आहेत..

बेफिकिरजी, चांगला विषय आहे,,

फक्त घटना चर्चा करण्यापेक्षा या मागची मानसिक , सामाजिक कारणे आणि परीणाम यांची चर्चा करू या ..

नुसता एखाद्या 'गटाला' कशाला दोष द्या?
आज काल हे सगळीकडे सगळ्या थरात दिसून येतं...मग ते हिंजवडी असो नाहीतर कोथरूड किन्वा Camp......अचानक आणि अक्कल नसताना खूप पैसा हातात येणे हेच मूळ कारण आहे....मग गुन्ठे पाटिल असो किन्वा एखादा उच्चभ्रू सोसयटी मधला एखादा 'सुशिक्षित' टग्या असो....

शाहिर भयंकर प्रसंग Sad
आमच्या ऑफिसच्या कॅब चालकाला धायरी गावात जबरी मारहाण झाली. त्याचा डोळा जाता जाता राहिला. त्याचा दोष एकच. तो गाडी चालवत पुढे गेला.
तु माझ्या पुढे का गेला म्हणून मारला बिचार्‍याला... Sad

नाना फुल्ली अ‍ॅग्री
एक तर लोकांना राग पटकन येतो, तो नियंत्रित करता येत नाही. दारूच्या नशेत काही घटना घडतात आणि सर्वात मुख्य बर्‍याचशा घटना ईगो दुखावल्याने होतात.

समाजाचा एक स्तर हा अत्यंग रागवलेला आहे, कशावर? का? ते माहित नाही त्यामुळे साध्या साध्या गोष्टीत अगदी रस्त्यावर एखादं वाहन आडवं आलं तरिही आई बहिणीवरून शिवी देणं प्रसंगी मारहाण करणं हे अत्यंत कॉमन झालं आहे. मोस्टली तरूणवर्ग. एकट्याने काही वाद विवाद करायचे, अर्ध्या तासाने आपल्या सारख्या डोक्याचे काही अजून गोळा करून समोरिल व्यक्तीवर चालून जायचे.. मग त्यांनी प्रत्युतर द्यायचे याला अंत नाही. अनब्रेकेबल व्हिशियस सर्कल. सोडून दिले तर तिथे इगोला धक्का पोचतो. 'साला आपण नसतं बाबा ऐकून घेतलं,' असं बोलून डोक्यात निखारे पेटवणारे कमी नसतात. कारण त्यांना ही 'वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचा असतो.

मुंबईच्याही विस्तारित सीमारेषांवर हा वर्ग फोफावतोय.जमीन विकून आलेल्या पैशाचा माज, शिक्षणाचा ,संस्कारांचा (काय असतं ते?) अभाव,सोनसाखळ्या गॉगल इत्यादि अ‍ॅक्सेसरीज, फ्लेक्समधून वाढदिवस सणासुदीच्या शुभेच्छा त्यातून राजकारणी/ बिल्डर बनण्याची दिवास्वप्ने ही सर्व यांची व्यवच्छेदक लक्षणे.

>>स्वतःला व कुटुंबियांना जपणे, रस्त्यावरील वादविवाद किंवा अनोळखींशी होणारे वादविवाद लवकरात लवकर सामोपचाराने मिटवणे, 'तू शहाणा बाबा' ही भूमिका घेणे हे सामान्यांसाठी काही उपयुक्त उपाय ठरावेत >>
एवढे खरे !

स्वतःला व कुटुंबियांना जपणे, रस्त्यावरील वादविवाद किंवा अनोळखींशी होणारे वादविवाद लवकरात लवकर सामोपचाराने मिटवणे, 'तू शहाणा बाबा' ही भूमिका घेणे हे सामान्यांसाठी काही उपयुक्त उपाय ठरावेत
>> हे अगदी खरयं! भाऊ-दादा म्हणावे नी बाजूला व्हावे!

हल्ली नवीनच फ्लेक्स्-वॉर सुरु झालयं! कुठल्याही छोट्या गोष्टींसाठी हे मोठे फ्लेक्स लागतात निरनिराळ्या ग्रुप, मित्रमंडाळांचे. त्यावर सगळ्यांचे फोटो. वाकड्-हिंजवडी भागात तर सगळेच पैलवान!
हे सुद्धा एकप्रकारे शक्तीप्रदर्शन आहे.

शाहिर यांचा अनुभव भयंकर आहे! Sad
आत्ताच तो 'हिट एन रनमधील विक्टीमची मदत' ह्या धाग्यावरचा प्रसंगही असाच आहे!

बाप रे! अवघड आहे. तो 'हिट अ‍ॅन्ड रन'चा अनुभवही भयंकर.
(हे 'चालू घडामोडी' सदरात का हलवत नाही? हे काही ललित लेखन नाही.)

१. निष्क्रीय पोलिसदल हे मोठा कारण आहे ..पैसा , माज , गुंडगीरी पूर्वीही मुबंई मध्ये होते पण रस्तो रस्ती सर्व सामान्यांना अडवून मारण्याएवढे नाही..आता पोलिसांचा तो वचक नाहीये..

२.अशिक्षितपणा.
३. सहज आलेला पैसा
४. स्वताबद्दल लार्जर दॅन लाईफ ईमेज..ती प्रूव्ह करायची हौस
५.शहरामधला मध्यम वर्ग भिडणार नाही याची खात्री..
६ दादा भाईंचा आशिर्वाद ..

पूर्वी तरूण मुलाला नोकरी साठी प्रयत्न करायला लागायचे ..त्यात तो बीझी असयाचा ..आता या गुंठा मं त्र्याकडे पैसे आहेत म्हणून फावल्या वेळत हे धंदे

बेफिकीर
कदाचित हे विचित्र वाटेल पण या सर्वाचे मुळ काही प्रमाणात ७०-८० मध्ये झालेल्या स्त्रीभ्रुण्हत्येत असु शकते. ७/८ वर्षापुर्वी बीबीसी चा प्रोग्रॅम पाहिलेला यात स्त्री पुरुष लोकसंख्येचा inbalance अतिआक्रमक
गुंडपणाकडे झुकणारी युवापिढी निर्माण करु शकतो असे म्हटले होते.
काही आलेख
http://www.infochangeindia.org/women/statistics/statewise-distribution-o...

http://www.shareacafe.com/crime-rates-in-indian-state-wise/

http://www.un.org/esa/desa/papers/2007/wp45_2007.pdf

आर्थिक विषमता हे देखिल दुसरे मुख्य कारण आहे. जर समाजाच्या मोठ्या भागाकडे ताकद असेल, पण गुंडगिरीवाचुन उदरनिर्वाह करायची क्षमता जर नसेल तर ती पिढी गुंडगिरी कडे झुकणारच. दुर्दैवी प्रकार आहे हा सर्व.

निलिमा आर्थिक गब्बर लोकंच हे करतात. गरीब लोकं नाही. हे सर्व गुंठा मंत्री अफाट श्रीमंत आहेत पण त्यांना "समाजात कसे जगायचे" ह्याचा गंध नाही.

मुळात भारतीय लोकच एक समाज म्हणून नीट जगत नाहीत.

निष्क्रीय पोलिसदल हे मोठा कारण आहे >> +१

माझ्या सोबतचा किस्सा.

मला चौकात डावीकडे वळायचे होते. मी साधारण १०० मिटर अगोदर सिग्नल दिले आणि आता वळणार तितक्यात एक टू व्हिलर (दोघे होते) माझ्या गाडीच्या डावीकडून येऊन चौकाच्या उजव्याबाजूस वळू पाहत होती. मी वळू लागलो की त्याने समोर घालून थांबविली. मग मी खिडकी उघडून का रे बाबा, मी सिग्नल देऊन जातोय तर मला का जाऊ देत नाहीस? असे म्हणालो. त्याने काहीही न बोलता खाली केलेल्या खिडकीत येऊन ऑलमोस्ट माझ्या भावाला हिट करण्याच्या प्रयत्न केला. (अगदीच टिपिकल, गॉगल, सोने वगैरे टाईप पोरं होते ते दोघ) मग माझ्या भावाने, जो गाडीतच होता, त्याला लावली. आणि हे सर्व भर चौकात (अर्थात माझी गाडी पूर्ण डावीकडे, जिकडे मला वळायचे होते तिकडे) आणि चौकात २ पुरूष आणि एक महिला पोलीस असताना ! दे डिडन्ट बॉदर. त्याने भावाची कॉलर पकडली तेंव्हा मी ही त्याच्या आय माय वरून शिव्या देत खाली उतरलो आणि नेमके माझ्या पांढर्‍या SUV मुळे थोडा फरक पडला असावा. Happy ते सर्व मिटले. पण हे व्हायलाच नको !

सहनशील माणूस खरे तर सहनशील नसतोच, तर तो रस्तावर मारामारी करू शकत नाही म्हणून तो जाऊ द्या म्हणतो, आणि त्यामुळे हे सर्व लोकं बळावतात. (अर्थात १०० पैकी ९८ केसेस मध्ये मी ही जाऊ द्या म्हणून बाहेर होतो हे आलेच.)

ते गेले मग मी पोलीसांना म्हणालो की की तुम्ही लक्ष का देत नाहीत? हे सर्व तुम्ही बघत होतात तर त्याला थांबवून त्याचे चुकले असे का सांगीतले नाही? तर ते म्हणतात, 'साहेब तुमचीच बाजू बरोबर आहे, पण आम्ही काय करणार?" WTF ? पोलीसच असे म्हणू लागले तर लोकांनी काय करावे?

खूप छान निरीक्षण बेफिकीर..
या नवश्रीमंत वर्गाची मग्रुरी हिंजेवाडी ई भागात सहज अनुभवत येइल. हिंजेवाडीतल्या पेट्रोल पंपावर तुमचा नंबर असेल आणि ही बाईकधारी दादा लोकं मागून आलीत तरी त्यांनाच आधी पेट्रोल भरायचा मान द्यावा लागतो . नाही तर अर्वाच्य शिवीगाळ ,धक्का बुक्की आणि मारामारी ठरलेली …
<<फक्त घटना चर्चा करण्यापेक्षा या मागची मानसिक , सामाजिक कारणे आणि परीणाम यांची चर्चा करू या ..>> अनुमोदन

बाप्रे केदार, मलातरी गेल्या ४/५ भारतभेटीत मुंबैत इतका वाईट अनुभव आला नव्हता. कदाचित आपण म्हणतात तसे असुसंस्कृत माणसांच्या हाती आलेल्या श्रीमंतीचा दुष्परिणाम असावा.
रच्याकने केदार तु शिकागोला असतोस ना पर्मनंन्ट पुण्याला गेलास का?

भयंकर आहे. स्वार्थी विचार आहे पण मनात आलंच की भारतात स्थाइक न होण्याने अशा अनावश्यक त्रासांपासून किती दूर आहोत आपण म्हणून.

बेफिकीर
चांगल्या चर्चेला तोंड फोडले आहे. यामागची कारणं सर्वांना माहीत आहेत. त्यावर उपाय काय करायचे हे ही माहीत आहे. पण अंमलबजावणी होणार का ? या प्रश्नात सर्व दडलेले आहे.

गणेशोत्सवाच्या वर्गणीपासून सुरुवात होते. संघटीत असण्याची, नकार न पचवण्याची नशा तिथपासून अंगात भिनते. या संघटीत पण अप्रगल्भ तरुणाईच्या मागे स्थानिक नेतृत्व उभं राहतं. आपल्यामागे राजकिय ताकद उभी असल्याचं अप्रूप आणि मग नियम मोडले तरी काही होत नाही हे वारंवार अनुभवायला मिळाल्यानंतर कायदा वगैरे गेला ..... असा एक अ‍ॅटीट्यूड तयार होतो. तोपर्यंत यांचं व्यक्तिस्तोम माजलेलं असतं. यांच्या एका फोनवर कामं होऊ लागलेली असतात. मुंबईत शिवसेनेची खंडणी नव्हती का ? नाव बदललं तरी संघटीत तरुणाईला राजकिय ताकद मिळणे आणि कुठलाही विधायक कार्यक्रम नसणे, राजकिय पक्ष, नेते अत्यंत बेफिकीर, बेपर्वा असणे यातून या तरुणांना पोलिसांशी कसं उद्धटपणे वागायचं याचं शिक्षण मिळतं.

यातून खैरलांजी हत्याकांडं घडतं, रिंकू पाटील हत्याकांड घडतं, मयुरी देशपांडे कांड घडतं, रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडतं .. आणि अशा घटना ऐरणीवर येऊनही समाजातले सगळेच कोडगे बनत चाललेले असल्याने काहीही केलं तरी काहीच होत नाही हा आत्मविश्वास नव्या मंडळांना मिळत असतो.

चाप लावण्यासाठी नैतिकता थोडी तरी शिल्लक हवी ना ? ती आहे का कुणाकडे ?

शूम्पी,
"स्वार्थी विचार आहे पण मनात आलंच की भारतात स्थाइक न होण्याने अशा अनावश्यक त्रासांपासून किती दूर आहोत आपण म्हणून." >>>> ज्यांना शक्य आहे त्यांनी परदेशातच स्थायिक व्हायचा विचार केला तर त्यात त्यांचं चुकतंय हे म्हणायला जीभ धजावत नाही आता...... Sad

सहजच विचारावंसं वाटलं .. मध्यंतरी एका महान नेत्याचं देहावसान झालं. त्या वेळी उस्फूर्त ( ?) बंद पाळला गेला. या बंदबद्दल विधान केलं म्हणून एका मुलीला जी ट्रीटमेंट मिळाली त्याचं समर्थन कुणी केलं होतं आणि त्याचा निषेध कुणी केला होता ?

manasmi18
'तुमचे भारतात परत येऊ नका' हे सांगणे काही पटले नाही. इतकी वाईट परिस्थिती इथे नक्कीच नाही आहे.
issue/problems सगळीकडे असतात. त्याचे स्वरूप वेगळे असू शकते.
अर्थात हे तुमचे वैयक्तिक मत आहे आणि मला त्याबद्दल आदरच आहे.

कॅबचालकाला मारहाण >>>
मी पिवळ्या पाट्या दिसल्या कि गाडी साईडला घेतो. भयंकर रॅश गाडी चालवतात. यांच्या ठोकलेल्या गाड्यांवरूनच ड्रायव्हिंगचा अंदाज येतो. कंपनीची वेळ गाठायची तर लवकर निघायचं.
@रच्याकने - हिंजवडीचा आयटी प्रोजेक्ट व्हायच्या आधी त्या कंपन्यांना क्वार्टर्स बांधण्याची अट घालण्याचा प्रस्ताव बारगळला...कारणं उघड आहेत. पण तसं झालं असतं तर कॅबचालकांची अरेरावी दिसली नसती.

Pages