रेडिओ

Submitted by आशूडी on 3 June, 2013 - 05:44

घराच्या एका दुर्लक्षित कोपऱ्यात
असतोच एक जुना रेडिओ
येता जाता नकळत बघताना
एखाद्या निर्बुध्द मांजरासारखा बंद सुस्त
कधी उगाच चाळा म्हणून त्याला उलट सुलट करताना
कुतूहल कमी; वेळ भरून काढणंच जास्त
आता काय उपयोग याचा ?
हवी ती गाणी केव्हाही येतात ऐकता.
नादमधुर संगीत कमी जास्त खरखर
पण वाटत नाही उचलून फ़ेकून द्यावासा -
त्यानंही जपलीय अंगभर …
आजोबांच्या प्रेमळ हातांची थरथर!
दिवस उगवतात मावळतात, रात्री सरतात
रेडिओला फक्त माणसांच्या वावराचे वारे जाणवतात

आणि मग
‘तो’ एक दिवस उगवतो आपल्याही आयुष्यात
जेव्हा मन होतं रानभर!
शब्द सुचत नाहीत, आठवतात चक्क ओळी
स्पर्शापार चान्दणफ़ुलांनी भरून जाते झोळी
ओळीतून घुमतं एक सुरेल गाणं
खूपदा ऐकलेलं - पण आत्ता कुठे
अर्थ ल्यालेलं !
चुकार मधलीच ओळ छळते
अजून काही आठवतंय का?
मन हुडकत राहतं…
मुद्दाम इंटर्नेटशिवाय.
पुन्हा एकदा वेळ घालवण्यासाठी
रेडिओवर जातो हात
तेच गाणं !! जियो जियो! क्या बात!
आयुष्य सरत आलेल्या बिचाऱ्याला
नकळत नवा जन्मच करतो बहाल!
ओळ केव्हाच निसटून जाते, अर्थ ओसंडून वाहतो
अनपेक्षिताचा अनाम आनंद मनात दाटत राहतो
यंत्रास या म्हणू कसे मनकवडा ?
हळव्या क्षणांचा तू माझा सांगाती.
सुखात या पाल चुकचुकते
ही ‘टेलीपथी’ असेल पुरेशी
टिकवण्या जन्मांची नाती ?
गाणं संपतं.
वीट येईतो पुन्हा पुन्हा ऐकायचे
नाहीत इथे फाजील लाड.
थोड्यात गोडी मानून मीही मग रेडिओ बंद करते.
तो ही निमूट स्वीकारतो
अहिल्येचं जिणं शापित.
येणार असतो असाच एक दैवी क्षण
उलगडत पिढ्यापिढ्यांचं गुपित.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
आवडतं गाणं अकल्पित लागणे, आणि हरखुन जाणे ही गोष्टच या आयट्युनच्या पिढीला माहित नसणार. चालायचेच.

क्या बात!
आमच्या घरातला आता अडगळीत पडलेला जुना व्हॉल्वचा रेडिओ आठवून गेला.... आज्जी असताना न चुकता पहाटे सहा वाजल्यापासून तो खरखरत असायचा.... ती खरखर सुद्धा आता लहानपणची एक हळवी आठवण बनून राहीलीय!

सर्वांना धन्यवाद. रेडिओ इतकं मनातलं स्थान कदाचितच एखाद्या यंत्रानं घेतलं असेल. माझ्यासारखंच वाटणारे खूप जण आहेत हे बघून आनंद वाटतोय. Happy