आईच्या हातचे....

Submitted by पल्ली on 5 November, 2008 - 03:24

आई नक्की काय करायची कळत नाही पण तिच्या हातच्या जेवणाला इतकी सुंदर चव असायची की काय सांगावं? साधा वरण्-भात त्यावर लिंबु, मीठ, तुप! काय सॉलिड लागायचं ते. कधी कधी उरलेल्या भाताला किंवा पोळीला फोडणी देउन आई वाढायची. ते खायला तर आमच्यात मारामारी व्हायची. काय ती फोडणीची पोळी कुरकुरीत, खमंग लागायची. देवा रे, हा पदार्थ कुठल्याच हॉटेलमध्ये मिळंणं नामुमकीन. हाच काय, आईच्या हातचे कुठलेच पदार्थ कुठेच मिळणं अवघड. मी तीची मुलगी असुन सगळं अगदी तिच्या श्टाइलनेच करते तरीपण ती टेस्ट येत नाही!. अगदी घाईत असताना सुद्धा आई जे काही बनवायची त्याला तोड नाही. शॉर्ट कट म्हणुन बटाट्याची रस्सा भाजी आणि ब्रेड! आई गं, प्लीज मला सांग नकी त्यात तु कुठला मसाला घालायचीस?
उन्हाळ्याच्या सुट्टीत ताज्या कैर्‍या आल्या की मस्त लाल जर्द लोणचं तयार व्हायचं अगदी मोठ्ठी बरणी भरुन! ते ज्या ताटात बनवलं जाइ ते ताट हिसकुन घ्यायला आम्ही तुटुन पडायचो. आई मग गरम गरम पोळ्या करुन त्यासोबत तो ताजा ताजा खार वाढायची. थोडा मऊ भात शेवटी घेउन तो खार त्या भाताला लाऊन खायचा. गुळांबा आणि साखरांबा तर असेच. त्यासोबत तेल लावलेली गरमागरम पोळी..... आय हाय. मी तर ओट्यापाशीच ताट घेउन उभी राह्यची. पहिली गरम पोळी घ्यायला. उम्म्म्म. पाणी भरुन वाहतंय माझ्या तोंडाचं!
गुळांबा आणि साखरांबा करुन उरलेल्या कैर्‍यांच्या कोयी वापरुन कायरस आई करायची. फोडणीत मेथ्या, कढीपता घालुन वगैरे. लाल तिखट थोडंसं, गुळ आणि मीठ. झालं. एवढंच. काय लागायचं ते पण. पुन्हा गरम भात आलाच. अलिकडे भात आवडत नाही. जाडीच्या भितीनं जास्त खाल्ला जात नाही पण तेव्हा लहान असताना आई म्हणायची, 'लहान मुलांनी खावा थोडासा. म्हणजे पोट शांत राहतं....'
दुपारची वामकुक्षी तर क्या बात है? पंखा लावुन सतरंजी घालुन सगळी भावंडं ओळीनं पसरायचो. मी सगळ्यात लहान असल्यानं आईच्या जवळ झोपण्याचा मान हक्कानं (बर्‍याचदा रडुन रडुन....) मी मिळवत असे. आईची मऊ कॉटनची साडी, अंगाचा एक वेगळाच वास, किणकिण वाजणार्‍या बांगड्या, आणि त्या मऊमऊ गोर्‍या गोर्‍या हातावर मी! आईच्या चेहर्‍याकडे बघत मस्त झोप लागायची.
दुपारच्या अश्या स्वर्गिय झोपेनंतर आई उठवायची, 'चला पन्हं प्यायला....' शेजारी झोपलेली आई कधी उठली आणि कधी गेली, कधी तिनं पन्हं बनवलं? गम्मतच होती. मला वाटायचं आई जादुगार असेल! वेलदोड्याची पूड, गुळ, केशर आणि हो गुर्‍हाळातुन आणलेला बर्फ घालुन ग्लासभर पन्हं! स्टीलच्या ग्लासाला आलेली थंडाव्याची ओल... सगळी उष्णता चटकन निघुन जायची.
आणि मग संध्याकाळचा मेनु. गल्लिभर खेळुन सगळी भावंडं गच्चीवर गप्पा मारत बसत असु. उन्हाळ्याच्या सुट्टीत सोलापुरहुन मामेभाऊ येत. ते दोघे आणि आम्ही चौघी बहिणी. शिवाय आम्ही पाळलेली कुत्री-मांजरी. असा मस्त कट्टा जमायचा गच्चीवर. आई खालुनच हाक मारायची...
दिवेलागणीचा नमस्कार वगैरे करुन जेवणावर यथेच्छ ताव मारायचो. हापुस किंवा पायरीच्या आंब्याचा रस.... वाट्या वाट्या प्यायचो. मग केशरी झालेली तोंड एकमेकांना दाखवुन हसायचो.
वर्षभर आई सतत काही ना काही करुन खाऊ घालायची. सणावाराला तर अगदी पंचपक्वान्नं. डावीकडुन उजवी कडे क्रमाने लिंबु, कोशिंबीर, चटणी, बटाट्याची भाजी, आमटी, पातळ बाजी, पुरणाचा छोटासा गोळा, शेवयाची चमचाभर खीर, समोर कुरडया-पापड्या, भजी, मिरगुंडं, भाताची मूद, त्यावर पिवळं धम्मक वरण, वर तुप.... पाठोपाठ यायच्या गरम पोळ्या, आणि गोडाची चांदीची वाटी.
होळीला पुरणाची पोळी, दसर्‍याला बासुंदी, गुढीपाडव्याला श्रीखंड, नवरात्रीत खीरी, चतुर्थीला मोदक, दिवाळीत लाडु, करंज्या, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे, चकल्या, अनारसे.... संक्रांतीला गुळाच्या पोळ्या. संक्रांत मला फार आवडायची कारण तेव्हा हलव्याचे शुभ्र दाणे त्यात मधुनच एखादा लाल्-हिरवा दाणा खायला मिळे. शिवाय येता जाता आई 'खाऊन बघ गं' म्हणुन तीळाच्या वड्या खायला द्यायची. कुणी कुणी तिळाचे लाडु देत असत. शिवाय तीळाची चटणी, तीळाचा कुट घालुन आवळ्याचा कायरस आई काय जबरा करायची.
वेगवेगळ्या प्रकारची सरबतं करण्याचा आईला छंद होता. वाळ्याचं, पॅशनफ्रुटचं, व्हॅनिलाचं, कलिंगडाचं, गुलाबाचं सरबत, अशी कितीतरी सरबतं आई घरी करुन द्यायची. शेंगदाण्याची मस्तानी हा एक जबरा प्रकार आई करायची.
गोळ्याच्या आमटीची रेसिपी आईनं लिहुन ठेवायला हवी होती. ती खर्‍या एक्सपर्टलाच जमेल. तसंच उकडीचे मोदक आईची आणखी एक खासियत होती. मोठ्या एकसारख्या आकाराचे गलेलठ्ठ मोदक त्यावर तुपाची धार. ६-६ मोदक खाल्याचं आठवतंय! साउथ इंडीयन, नॉर्थ इंडीयन, महाराष्ट्रीयन आई मस्त करायची. पण एक खंत तिला होती, ती म्हणजे चायनिज, कॉन्टीनेंटल, इटालिअन हे प्रकार तेव्हा नवीन होते. ते शिकायला काही तिला वेळ मिळाला नाही. पण ती एगलेस केक, बिस्किटं, नानकटाइ, सॉस असं बरंच काही करायची. कित्येक पदार्थांची तर मला नावं सुध्हा आठवत नाहीत. तिनं केसरीवाड्यात टिळकांच्या सुनेकडे (? नॉट सो शुअर - सुन की कोण) कुकींगचा क्लास लावलेला आठवतो.
नंतर नंतर आई दुकानावर जाऊन बसायची. येताना मंडईतुन भरपुर भाज्या-फळं घेऊन यायची. सोबत मनोहर बेकरीतुन खास बनवुन आणलेली बिस्किटं असायची, चितळेंचा पेढा किंवा बर्फी, बाकरवडी, पेठा, इमरती, जिलेबी असे ऍडीशनल आयटम असायचे! एकुण काय खाऊन पिऊन (पिऊन म्हणजे पन्ही, सरबतं वगैरे...) मजेत होतो.
त्या प्रमाणात मी माझ्या श्रावणीसाठी फार कमी पदार्थ करते. आईच्या इतकी एनर्जी पण नाहीय माझ्यात. जमेल तेवढं करायचं प्रयत्न करते. मला जशा आईच्या हातच्या जेवणाच्या सुंदर चमचमीत आठवणी आहेत तशा आई म्हणुन श्रावणीला माझ्या आठवणी याव्यात. तिला हे पदार्थ माहीत असावेत.
पुरणाची दिंड, कडबोळी, चंपाकळी, कोथींबिरीच्या वड्या, आळुच्या वड्या, गोळ्याची आमटी, साधी आमटी, शेवग्याच्या शेंगांचं वरण, मेतकुट, लोणचं, मसाल्याच्या मिरच्या, खारातल्या मिरच्या, बटाट्याचा रस्सा, गरम पोळ्या..... बाई गं! किती पदार्थ आहेत. तोंडाला पाणी सुटलं आठवुन. आई गेली आणि तिच्या हातच्या अमृताला गमावुन बसलीय पण त्या आठवणी गर्भरेशमी आहेत, जपुन ठेवलेल्या! अजुनही जिभेवर घोळवलेल्या. तुमच्याही अशा चवदार आठवणी आहेत. शेअर करा ना मग..... अजुन लज्जत येईल!

गुलमोहर: 

पल्ले, खरंच ग आई, आजीच्या स्वैपाकाची चव आपल्या हाताला काही येत नाही.(पुढे माझी लेक पण असंच म्हणेल का ग? आशेवर आहे मी :))

खरंच माझीही आई करते तसं लसणाची खमंग फोडणी दिलेलं पिठलं, अंबाडीची पीठभाजी, कटाची आमटी, डाळींची कोरडी चटणी... सगळं करते मीपण. लेकिन 'वो' टेस्ट नही आती.
अगदी कुकरमधे वाळूवर केक भाजायची आई आमच्या लहानपणी. इथे अगदी सुसज्ज ओव्हनमधल्या केकला सुद्धा ती चव नसते.

माझी मधली मावशी पण अप्रतिम स्वैपाक करायची. साधं फोडणीचं वरण केलं तिनं, तरी उरायचं नाही. रोजचाच पदार्थ, पण हिंग जिर्‍याचा तो खमंग सुवास, तो गोड्या मसाल्यानं आलेला किंचितसा काळसर तवंग नि ताज्या कोथिंबिरीचा तो स्वाद... अहाहा.... तिला नेहमी विचारायचो आम्ही बहिणी...'मावशी, काय घालतेस ग तू पदार्थांत? इतकी मस्त चव आमची का येत नाही?'
यावर मंद हसून सांगायची ती...' त्यात मन घालावं लागतं.. बाकी काही नाही...'

पल्ली, वाचताना जेवढं तोंडाला पाणी सुटलं तसंच डोळ्यातही जमल्याशिवाय राहिलं नाही. खरंच, आईच्या हातच्या जेवणाची अशी एक वेगळीच चव असते. जरी आपण तेच मसाले, त्याच क्रमाने घातले तरी 'ती' चव येतच नाही.
माझ्या आईतही प्रचंड एनर्जी आहे. सकाळी पावणेपाच पासून ती जी कामाला जुंपते ती दुपारच्या वामकुक्षीपर्यंत जराही बसत नाही. आता जरा वय झालं, आणि वयाप्रमाणे तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या तरीही आराम, आळस माहित म्हणून नाही तिला. हे असं कधी मला करायला जमेल? शक्य वाटत नाही. माझ्या लेकीलाही आजीच्या हातचं सगळंच आवडतं आणि त्यांचं चांगलं जमतंही. मी तिला तव्यावर ब्रेड भाजून टोस्ट दिला किंवा दही भात जरी करुन दिला तरी तिचं कायम म्हणणं असतं की 'आजीसारखा' नाही झाला.
खरंच सुमॉ म्हणाली त्याप्रमाणे 'मन' आणि 'प्रेम' हेच मुख्य जिन्नस असावेत त्यांच्या स्वैपाकातले.

पल्ली, भरून आलं गं! मन आणि डोळे दोन्ही..

छान लिहिलायंस लेख. आवडला.. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

आई गं, प्लीज मला सांग नकी त्यात तु कुठला मसाला घालायचीस? >>>>>>>> मायेचा अन् वात्सल्याचा मसाला असतो तो. त्याची रेसिपी अशी सहजासहजी कॉपी नाही करता यायची कुणालाही.

सुरेख लिहिलं आहेस. आवडलं ........... Happy

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी

मी आईच्या हातचा धपाटाच जास्त खाल्लाय. पण त्यातही एक गोडी होती.
आईने काहीही केले तरी त्याची चव ग्रेटच असते. त्याची सर कशालाच यायची नाही.

छान !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

भुक लागली वाचून.
आईच्या हातची चव सर्व बाबतीत अनुभवली आहे. सुदैवाने अजून हा आनंद उपभोगतोय.

पल्ली
खूप सुंदर लिहिलायंस लेख! अगं प्रत्येकालाच आईच्या हातची चव अविस्मरणीयच वाटते. कारण आई या शब्दातच जादू आहे. व कोणत्याही पदार्थाच्या रेसिपीतला महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चिमुटभर(कमीत कमी) प्रेम! तुझी मुलं सुद्धा मोठी झाल्यावर असंच म्हणतील............"माझ्या आईसारखा हा पदार्थ कोणीच करू शकत नाही."
हा लेख काही छोटे डीटेल्स बदलून माझ्याच आईवर लिहिलेला वाटतोय!

खरचं मन अन् डोळे दोन्ही भरुन आले.. खुप छान लिहिलयेस. मी लहानपणी आजीकडे राह्यल्यानं ह्याच आठवणी माझ्या आजीच्या बाबतीत आहेत. आईला आजीसारखं नाही जमत हे मी तीला अजुन ऐकवते. अर्थात तिच्याही काही स्पेशालिटी आहेतच्. पण आजीने केलेला कोंड्याचा मांडा - त्याला तोड नाही.. खुप आठवणी जागवल्यास तू..

पल्ली, खूप छान गं. इथे प्रत्येकाला आपापल्या आईची आठवण झाली असेल Happy , गोळ्यांची आमटी !!!! (तोंडाला पाणी सुटलेली बाहुली)

खूपच छान लेख...... आईचे प्रेम प्रत्येक पदार्थात उतरलेले असते..... त्यामुळेच आईचा कोणताही साधासुध्दा पदार्थ लागतो पंचतारांकीत हॉटेलपेक्षाही अप्रतिम...... प्रत्येकाच्या घरात एक अन्नदात्री असते ती म्हणजे आई.......
सुगरणीचे दुसरे नांव "आई...."......!!!

पल्ले,
फारच मनस्वी लिहितेस. तू मागशील ते इनाम द्यावे म्हटलं, पण " आईच मागितली तर ती कशी देता येईल ?" असं माझं मलाच वाटल्यावरून तसाच थांबलो. मात्र "तुझी आई" ह्या विषयावरच्या, कविता आणि लिखाण मिळून एक सुंदर पुस्तक तू जरूर काढ. त्याच्या किमान २५ प्रतींचा मी तुझा पहिला ग्राहक असेन हे नक्की. (इथे तर ले़खीच दिलंय Happy )

काळजाला भिडणारं उत्तम शब्दचित्र !! Happy Happy :)..............................

पल्ले, सुरेख लिहिलयंस अगदी ...........

मला जशा आईच्या हातच्या जेवणाच्या सुंदर चमचमीत आठवणी आहेत तशा आई म्हणुन श्रावणीला माझ्या आठवणी याव्यात. तिला हे पदार्थ माहीत असावेत.

हा अन्नपुर्णेचा 'वारसा' असतो गं, म्हणून मी सुद्धा विकतचे पदार्थ आणणं शक्य तितकं टाळते. आम्हाला आईबरोबर आजीच्या हातचे पदार्थ सुद्धा चाखायची संधी मिळाली, आणि अजुनही मिळतेय. अळूची भाजी फक्त आजीनेच करावी. अक्षरशः खीर खावी तशी अळूची भाजी ओरपतो आम्ही सगळे... उरलेल्या भाज्यांची थालीपीठं तर कळणार सुद्धा नाही की त्यात शिळी भाजी घातलीये.. आईची खासियत म्हणजे मोदक, डाळींब्या, पुरणपोळी, मसालेभात... अहाहा!! शिवाय दूधीहलवा, खमं काकडी, पालकाची ताकातली भाजी...... कित्ती कित्ती पदार्थ. 'फोडणी वठली की पदार्थाला चव आलीच पाहिजे..' हे आईचं, आजीचं अगदी पालूपद. त्यामानाने माझ्या सासरी अश्या कोणी अन्नपूर्णा नाहीत.

ज्यांच्या हातचं खायला मिळावं म्हणून आपण जीव टाकतो त्यांच्या हातून आपल्या पाककृतींना सर्टीफिकेट मिळतं तेव्हाचा आनंद स्वर्गीयच अगदी... आजी अजूनही जेव्हा जेव्हा आईला म्हणते की पूरणपोळ्या तुझ्या हातच्या खाव्यात तेव्हा प्रत्येक वेळी आईच्या डोळ्यात पाणी येतं. हेच आई मला परवा जेव्हा म्हणाली डाळींब्या अगदी सुरेख झाल्यात हो तुझ्या, तूच फक्त करू जाणे, तेव्हा मलाही कधी भरून आलं ते समजलं नाही.

असो, पल्ले, तू म्हणालीस शेअर करा म्हणून ही इतकी मोठी पोस्ट... Happy
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

----'फोडणी वठली की पदार्थाला चव आलीच पाहिजे.. --
हे अगदी माझ्या सा.बां.च्या तोंडचं वाक्य Happy

पल्ली, एकदम सुरेख लिहिलस!

माझ्या विनंतीला मान देऊन इतकं चवदार शेअर केल्याबद्दल सगळ्यांचे आभार Wink
>>उरलेल्या भाज्यांची थालीपीठं तर कळणार सुद्धा नाही की त्यात शिळी भाजी घातलीये>>>> मन्जुडी, हे मी पण विसरले होते यार. हो हो. मोदक मोदक...

माझी आई उकडीचे मोदक भारी करते!
तिला मी विचारलं होतं असंच एकदा, इतकं सगळं छान कसं जमतं तुला...मला म्हणाली.."तुम्ही मुली म्हणजेच माझं सर्वस्व आहात्..त्यामुळे तुमच्यासाठी करताना ते आपसूकच चांगला होतं..आणि तुमच्या बाबांनापण ते आवडतं.."

आईसारखे छान मोदक मला जमतील तेव्हा सत्यनारायणाची (किंवा गणपतीची!!)पूजाच घालावी लागेल मला!! कारण मी खूप प्रयत्न करते तेव्हा ३ मोदक धड होतात नि चौथा हमखास बिघडतो!

पण चव्/वास एक्दम कळतात बरं मला!
स्वयंपाकघरात केलेल्या घारग्यांचा वास मला माडीवरच्या खोलीत येतो!त्यामुळे काहीही केलं तरी देवाचा झाला की पहिला नैवेद्य मलाच असतो!

..प्रज्ञा

पल्ली,
छान लिहिलयस. आपल्या सगळ्यांच्याच आयांना हा लेख लागु पडेल थोडेफार तपशील बदलुन.

मंजे तू खीर ओरपतेस Happy

पल्ली, आमच्याकडे आई आणि बाबा दोघेपण स्वैपाक करायचे. माझ्या बहिणींना पाठित धपाटे देऊन बाबांनी हातावरच्या भाकरी शिकवल्या आहेत. सगळ्या जणी उत्तम हातावरच्या भाकरी करतात. I too can make such Bhaakaries Happy u may not believe it.

खरय!
माझ्या काकुच्या हातच्या जेवणाला आणि आईच्या हातच्या जेवणाला बर्‍यापैकी सारखीच चव. माझ्या सासुबाईपण अशाच सुगरण.
ह्यावेळी मात्र तिघिंच्या हातचं जेवायला नाही मिळालं. सासुबाईंचा हात मोडलेला, काकुकडे मुक्काम करायला नाही मिळाला आणि आईच्या हातचे खायला कसे मिळणार.

पल्ले, हा चवदार लेख भलत्या वेळी वाचला....
वाचल्यावर माझ्याच हातचा "पकवलेला" डब्बा खायचाय!
सुरेखच लिहिलयस.

-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

पल्ले,सुंदर, संवेदनशिल लिहिलयेस गं...
आईच्या हातचं सगळच कसं छान, हवहवसं असतं... माझी आई केक, श्रीखन्डाच्य वड्या अप्रतिम करायची.. मला अजुन तरी तस जमल नाहीये..

पण त्या मानाने मला आईच्या बाबतीत समज उमज उशिरा आली--- खुपच उशिरा---ती गेल्यावर !!!!!!
---------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

छान लिहिलाय... तोन्डाला पणी सुटाले...
वरण्-भात त्यावर लिंबु, मीठ, तुप... केवाढ सोप, पण केवढ सही!!!
फोडणीची पोळी... अहाहा...
माझी आई पण सॉस, लोणाची, सरबत, केक वगैरे घरी करायची... काय मस्त लागायच सगळ!
मला बहीण नाही त्यामुळे मी आईला मदत करत असे...
मस्त वाटल लेख वाचुन.. धन्यवाद!!

एक मीही आठवण शेयर करते इथे, आईची नुसती लाल माठाची भाजी फक्त एक लसून अन एक मिरची टाकून केलेली भाजी, ताजं गोड दही कालवून गरम गरम भात हा मी इतका आवडीने खायची. गणपती जाण्याच्या दिवशी ही शिदोरी मी सर्वात आधी खायची घरी आल्यावर.

पल्ली, अगदी तू माझ्या आईचेच वर्णन केले आहे असे वाटले. माझी आई पण अतिशय सुग्रण. आणि मुख्य म्हणजे ती सगळी कामे इतक्या effortlessly करते कि अचंबा वाटतो. दमली तरी नेहमी प्रसन्न असते.
घरी लोणचे घालणे, उन्हाळ्याचे खास पदार्थ (कुरडई, पापड्या, बटाट्याचा किस, वेगवेगळे पापड) आणि इतर अनेक उन्हाळी पदार्थ बनविणे आयला मला ते सर्व करायला वेळच मिळत नाही.
आपली आई कसे सगळे करायची ह्याचे नवल वाटते.

मला कुरडईचा चिक (त्यात मस्त तेल आणि हिंग घालुन खायचे), पापडाच्या लाट्या खास करुन पोह्याचे पापड आणि बटाट्याचे पापडाच्या लाट्या खायला जाम आवडते. आत्ता सुद्धा तोंडाला पाणी सुटले.
आईच्या हातचे गुलाब जाम, बासुंदी , पुरणाची पोळी..... toooooo goooooood.
पल्ली कशाला ग आठवण करुन दिलिस? आता ऑफिसमधे मस्त आईच्या हातची पुरणपोळी खाविशी वाटत आहे. Happy

पल्ली तोंडाला पाणी सुटलय आणि डोळ्यातही पाणी आलय. किती छान लिहीलस!

आभारी मित्र मैत्रीणिंनो.......

पल्ली, माझी आई ४ भावात १ बहीण, त्यामुळे भयंकर लाडकी. तिने केवळ मासे आणि आंबे हे दोनच पदार्थ चपातीशी खाल्लेले! त्याकाळी स्टोव्हचा भडका वै. उडत असे त्यामुळे माझ्या आजीने तिला कधीच स्वयंपाक करू नाही दिला. वाटण करणे, चिरणे एवढच! आणि ती लग्न होऊन आली खादाड लोकांच्या घरात. पण ऑफिसच्या मैत्रिणींकडून ती बरेच काही शिकली. आता वेगवेगळ्या वड्या, इडल्या, चाट प्रकार, पुपो, कस्टर्ड - जेली, वै. साठी ती तिच्या सासरी प्रसिद्ध आहे. माझ्या धाकट्या बहिणीने गादी पुढे चालवली आहे. Happy

तसेच माझ्या आईची (सासुबाईंची) आई तिच्या तरुणपणीच वारली. त्यामुळे तिला खाद्यपदार्थ शिकवायला कोणी नव्हते. ती पण प्रयत्नांती, पुस्तकातून असे बरेच पदार्थ बनवायला शिकली. भेंडीची भाजी खावी तर ह्या आईच्या हातची! गुळपोळी, बासुंदी, तिळाच्या वड्या, दिवाळीतली शेव, वै. ती मस्तच बनवते. इथे माझ्या धाकट्या जावेने गादी चालवली आहे. Happy

एकंदरीत माझी दोन्ही घरी चैन असल्याने मी बर्‍यापैकी आयतोबा होते :फिदी:. पण आता लेकीसाठी नविन नविन सूप, खिरींचे प्रकार (धाकट्या जावेच्या सौजन्याने) मी शिकते आहे. लिगसी वै. नाही पण लेकीने निदान आई मला खायला "बर" बनवून देत असे, एवढे जरी कधी म्हटलं तरी मी भरुन पावले! Wink

Pages