आईच्या हातचे....

Submitted by पल्ली on 5 November, 2008 - 03:24

आई नक्की काय करायची कळत नाही पण तिच्या हातच्या जेवणाला इतकी सुंदर चव असायची की काय सांगावं? साधा वरण्-भात त्यावर लिंबु, मीठ, तुप! काय सॉलिड लागायचं ते. कधी कधी उरलेल्या भाताला किंवा पोळीला फोडणी देउन आई वाढायची. ते खायला तर आमच्यात मारामारी व्हायची. काय ती फोडणीची पोळी कुरकुरीत, खमंग लागायची. देवा रे, हा पदार्थ कुठल्याच हॉटेलमध्ये मिळंणं नामुमकीन. हाच काय, आईच्या हातचे कुठलेच पदार्थ कुठेच मिळणं अवघड. मी तीची मुलगी असुन सगळं अगदी तिच्या श्टाइलनेच करते तरीपण ती टेस्ट येत नाही!. अगदी घाईत असताना सुद्धा आई जे काही बनवायची त्याला तोड नाही. शॉर्ट कट म्हणुन बटाट्याची रस्सा भाजी आणि ब्रेड! आई गं, प्लीज मला सांग नकी त्यात तु कुठला मसाला घालायचीस?
उन्हाळ्याच्या सुट्टीत ताज्या कैर्‍या आल्या की मस्त लाल जर्द लोणचं तयार व्हायचं अगदी मोठ्ठी बरणी भरुन! ते ज्या ताटात बनवलं जाइ ते ताट हिसकुन घ्यायला आम्ही तुटुन पडायचो. आई मग गरम गरम पोळ्या करुन त्यासोबत तो ताजा ताजा खार वाढायची. थोडा मऊ भात शेवटी घेउन तो खार त्या भाताला लाऊन खायचा. गुळांबा आणि साखरांबा तर असेच. त्यासोबत तेल लावलेली गरमागरम पोळी..... आय हाय. मी तर ओट्यापाशीच ताट घेउन उभी राह्यची. पहिली गरम पोळी घ्यायला. उम्म्म्म. पाणी भरुन वाहतंय माझ्या तोंडाचं!
गुळांबा आणि साखरांबा करुन उरलेल्या कैर्‍यांच्या कोयी वापरुन कायरस आई करायची. फोडणीत मेथ्या, कढीपता घालुन वगैरे. लाल तिखट थोडंसं, गुळ आणि मीठ. झालं. एवढंच. काय लागायचं ते पण. पुन्हा गरम भात आलाच. अलिकडे भात आवडत नाही. जाडीच्या भितीनं जास्त खाल्ला जात नाही पण तेव्हा लहान असताना आई म्हणायची, 'लहान मुलांनी खावा थोडासा. म्हणजे पोट शांत राहतं....'
दुपारची वामकुक्षी तर क्या बात है? पंखा लावुन सतरंजी घालुन सगळी भावंडं ओळीनं पसरायचो. मी सगळ्यात लहान असल्यानं आईच्या जवळ झोपण्याचा मान हक्कानं (बर्‍याचदा रडुन रडुन....) मी मिळवत असे. आईची मऊ कॉटनची साडी, अंगाचा एक वेगळाच वास, किणकिण वाजणार्‍या बांगड्या, आणि त्या मऊमऊ गोर्‍या गोर्‍या हातावर मी! आईच्या चेहर्‍याकडे बघत मस्त झोप लागायची.
दुपारच्या अश्या स्वर्गिय झोपेनंतर आई उठवायची, 'चला पन्हं प्यायला....' शेजारी झोपलेली आई कधी उठली आणि कधी गेली, कधी तिनं पन्हं बनवलं? गम्मतच होती. मला वाटायचं आई जादुगार असेल! वेलदोड्याची पूड, गुळ, केशर आणि हो गुर्‍हाळातुन आणलेला बर्फ घालुन ग्लासभर पन्हं! स्टीलच्या ग्लासाला आलेली थंडाव्याची ओल... सगळी उष्णता चटकन निघुन जायची.
आणि मग संध्याकाळचा मेनु. गल्लिभर खेळुन सगळी भावंडं गच्चीवर गप्पा मारत बसत असु. उन्हाळ्याच्या सुट्टीत सोलापुरहुन मामेभाऊ येत. ते दोघे आणि आम्ही चौघी बहिणी. शिवाय आम्ही पाळलेली कुत्री-मांजरी. असा मस्त कट्टा जमायचा गच्चीवर. आई खालुनच हाक मारायची...
दिवेलागणीचा नमस्कार वगैरे करुन जेवणावर यथेच्छ ताव मारायचो. हापुस किंवा पायरीच्या आंब्याचा रस.... वाट्या वाट्या प्यायचो. मग केशरी झालेली तोंड एकमेकांना दाखवुन हसायचो.
वर्षभर आई सतत काही ना काही करुन खाऊ घालायची. सणावाराला तर अगदी पंचपक्वान्नं. डावीकडुन उजवी कडे क्रमाने लिंबु, कोशिंबीर, चटणी, बटाट्याची भाजी, आमटी, पातळ बाजी, पुरणाचा छोटासा गोळा, शेवयाची चमचाभर खीर, समोर कुरडया-पापड्या, भजी, मिरगुंडं, भाताची मूद, त्यावर पिवळं धम्मक वरण, वर तुप.... पाठोपाठ यायच्या गरम पोळ्या, आणि गोडाची चांदीची वाटी.
होळीला पुरणाची पोळी, दसर्‍याला बासुंदी, गुढीपाडव्याला श्रीखंड, नवरात्रीत खीरी, चतुर्थीला मोदक, दिवाळीत लाडु, करंज्या, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे, चकल्या, अनारसे.... संक्रांतीला गुळाच्या पोळ्या. संक्रांत मला फार आवडायची कारण तेव्हा हलव्याचे शुभ्र दाणे त्यात मधुनच एखादा लाल्-हिरवा दाणा खायला मिळे. शिवाय येता जाता आई 'खाऊन बघ गं' म्हणुन तीळाच्या वड्या खायला द्यायची. कुणी कुणी तिळाचे लाडु देत असत. शिवाय तीळाची चटणी, तीळाचा कुट घालुन आवळ्याचा कायरस आई काय जबरा करायची.
वेगवेगळ्या प्रकारची सरबतं करण्याचा आईला छंद होता. वाळ्याचं, पॅशनफ्रुटचं, व्हॅनिलाचं, कलिंगडाचं, गुलाबाचं सरबत, अशी कितीतरी सरबतं आई घरी करुन द्यायची. शेंगदाण्याची मस्तानी हा एक जबरा प्रकार आई करायची.
गोळ्याच्या आमटीची रेसिपी आईनं लिहुन ठेवायला हवी होती. ती खर्‍या एक्सपर्टलाच जमेल. तसंच उकडीचे मोदक आईची आणखी एक खासियत होती. मोठ्या एकसारख्या आकाराचे गलेलठ्ठ मोदक त्यावर तुपाची धार. ६-६ मोदक खाल्याचं आठवतंय! साउथ इंडीयन, नॉर्थ इंडीयन, महाराष्ट्रीयन आई मस्त करायची. पण एक खंत तिला होती, ती म्हणजे चायनिज, कॉन्टीनेंटल, इटालिअन हे प्रकार तेव्हा नवीन होते. ते शिकायला काही तिला वेळ मिळाला नाही. पण ती एगलेस केक, बिस्किटं, नानकटाइ, सॉस असं बरंच काही करायची. कित्येक पदार्थांची तर मला नावं सुध्हा आठवत नाहीत. तिनं केसरीवाड्यात टिळकांच्या सुनेकडे (? नॉट सो शुअर - सुन की कोण) कुकींगचा क्लास लावलेला आठवतो.
नंतर नंतर आई दुकानावर जाऊन बसायची. येताना मंडईतुन भरपुर भाज्या-फळं घेऊन यायची. सोबत मनोहर बेकरीतुन खास बनवुन आणलेली बिस्किटं असायची, चितळेंचा पेढा किंवा बर्फी, बाकरवडी, पेठा, इमरती, जिलेबी असे ऍडीशनल आयटम असायचे! एकुण काय खाऊन पिऊन (पिऊन म्हणजे पन्ही, सरबतं वगैरे...) मजेत होतो.
त्या प्रमाणात मी माझ्या श्रावणीसाठी फार कमी पदार्थ करते. आईच्या इतकी एनर्जी पण नाहीय माझ्यात. जमेल तेवढं करायचं प्रयत्न करते. मला जशा आईच्या हातच्या जेवणाच्या सुंदर चमचमीत आठवणी आहेत तशा आई म्हणुन श्रावणीला माझ्या आठवणी याव्यात. तिला हे पदार्थ माहीत असावेत.
पुरणाची दिंड, कडबोळी, चंपाकळी, कोथींबिरीच्या वड्या, आळुच्या वड्या, गोळ्याची आमटी, साधी आमटी, शेवग्याच्या शेंगांचं वरण, मेतकुट, लोणचं, मसाल्याच्या मिरच्या, खारातल्या मिरच्या, बटाट्याचा रस्सा, गरम पोळ्या..... बाई गं! किती पदार्थ आहेत. तोंडाला पाणी सुटलं आठवुन. आई गेली आणि तिच्या हातच्या अमृताला गमावुन बसलीय पण त्या आठवणी गर्भरेशमी आहेत, जपुन ठेवलेल्या! अजुनही जिभेवर घोळवलेल्या. तुमच्याही अशा चवदार आठवणी आहेत. शेअर करा ना मग..... अजुन लज्जत येईल!

गुलमोहर: 

पल्ली फार छान लेख. खूप खूप आठवणी जागवल्यास्...<<<<<उम्म्म्म. पाणी भरुन वाहतंय माझ्या तोंडाचं!>>>>> माझ्यापण!!!
<<<' त्यात मन घालावं लागतं.. बाकी काही नाही...'>>> अगदी अगदी बरोबर...

माझी आई पण पूर्ण वेळ घरी असल्याने आम्ही तिघी बहिणीनी अगदी चन्गळ केली लहानपणी...अजूनही करतो सगळे एकत्र जमलो की.. माझ्या आईची स्पेशालिटी म्हणजे डाल बाटी..non veg ..मसाल्यची कणसे, बटाट्याचा मसालेभात ...आणी पान्ढरी शुभ्र खोबर्याची वडी...मी अजून पर्यन्त तशी वडी कूठे पाहिलेली पण नाही..पण आता आईला सन्धीवाताचा त्रास होतो .पहिल्यासारखे सगळे जमत नाही पण सूचनान्ची मोठी जन्त्रीच आहे तिच्याकडे....माझ्या दोघी बहिणी तशा सुगरण आईसार्ख्यच्..मीच त्यामानाने आळशी...पण मी आता फोन वर सान्गते काय काय केल्याचे ते एकून आई फार खूश होते ...पण मी नकळत म्हन्तेच्...चान्गल झाल होत पण तुझ्यासारख नाही....

Pages