घोरावडेश्वर

Submitted by ferfatka on 29 May, 2013 - 08:13

कुटुंबकबीला ‘मामाच्या’ गावाला गेल्याने एकटाच होतो. कुठे तरी जवळपास हिंडून यावे असा विचार करत बसलो होतो. ‘काखेत कळसा व गावाला वळसा’ अशीच परिस्थिती माझी झाली. त्यासाठी जुने फोटो अल्बम पाहत होतो. सुमारे १५ वर्षांपूर्वी साध्या रोलच्या कॅमेºयाने काढलेला एक फोटो दिसला. तेथे जाण्याचे पक्के केले. १० वाजता गाडी, पाण्याची बाटली व कॅमेरा घेऊन घराजवळच सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोरावडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो त्या विषयी....

DSCN2981 copy.jpg
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणेफाटा व तळेगाव मध्ये घोरावडेश्वर एक प्राचीन शंकराचे मंदिर असलेली तिसºया किंवा चौथ्या शतकातल्या दगडात कोरलेल्या बौद्धकालीन ११ लेण्यांचा समूह. घोरावडेश्वर देवस्थान पंचक्रोशीतल्या भाविकांचे श्रद्धास्थान. दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा असते. लाखो भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लांबून येतात.

जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड सोडल्यावर किंवा मुंबईकडून येताना तळेगावची खिंड ओलांडल्यावर एक मोठा डोंगर नजरेस दिसतो तोच हा घोरावडेश्वरचा डोंगर. डोंगर बराच मोठा असून या डोंगरात कालांतराने महादेवाचे मंदीर दिसून येते. या गुंफांमध्ये संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य होते. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५० ते ५०० मी उंच असलेला हा डोंगर. सध्या डोंगरावर जाण्यासाठी पायºया बांधलेल्या आहेत. खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही चांगलीच दमछाकच होते. पायथ्यापासून वर चढण्यास सुमारे २० ते २५ मिनिटे लागतात. वाटेत सुमारे २२५ पायºया चढून गेल्यावर पायºयांचे काम अर्धवट सोडून दिलेले दिसले. १० ते १५ वर्षांपूर्वी डोंगरावर जाण्याकरिता पाऊलवाट होती. त्यामुळे डोंगरावर जाण्यास चांगली दमछाक व्हायची. अर्थातच हौशी पर्यटकांची वर्दळ कमी होती. मी सरळ मार्गाने न जाता डोंगरच्या पाऊलवाटेने जाण्यास निघालो. १० मिनिटातच वर पोचलो. वाटेतून जाताना येथून दिसणारा परिसर मोठा सुंदर दिसतो.

लेण्यांविषयी :

शेलारवाडीची लेणी-बौद्धधमार्तील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स. नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या. ११ लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. बेडसे, भाजे, कार्ले, भंडारा या डोंगरावरील बौद्धकालिन लेण्या या काळच्या. बौद्धकालिन असलेल्या या लेण्या खोदण्यासाठी पूर्वी राजे, व्यापाºयांकडून अनुदान दिले जात असते. बहुधा या लेणीसाठी निधी अभावी कमी नक्षीकाम व विहार बांधलेले दिसून आले. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना आहे. डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये राहण्यासाठी छोटे कक्ष, झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशी रचना आहे. माथ्यावर पोहचल्यावर उजवीकडच्या बाजूला एका विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज तेथे शिवमंदिर आहे. हाच येथील घोरावडेश्वर महादेव. मंदिराच्या आत एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. हे चैत्यगृह अगदी साधे दिसते. सभामंडप, त्यात विहार आत मध्ये ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकटही दिसते. हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर असलेली चौकट अशी चौकट कार्ला येथील लेण्यांमध्ये पाहावयास मिळते. या चैत्यगृहाच्या पुढे एक छोटी विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या बाजूला थोडे प्रस्तरारोहण करून एक मोठा प्रशस्त विहार खोदलेला आहे. इथली लेणी मोठी असून विहारात गणपती, शिवलिंग, देवी आदींच्या मूर्ती आहेत. डोंगरातील याच लेणीमध्ये थोडेफार कलाकुसर काम केलेले दिसते. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात. सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. या विहाराच्या बाहेर दोन नंदी दिसतात. एक जुना व दुसरा नवीन कोरलेला. येथून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे दिसतो. सुब्रतो स्टेडियम लक्ष वेधून घेते. बिर्ला मंदिराकडून बांधण्यात आलेली सोमाटणे फाट्याजवळील भव्य गणेशमूर्ती दिसते. हा परिसर सुमारे अर्धा पाऊण तासात पाहून होतो. महादेवाचे दर्शन घेऊन परत माघारी फिरलो. वाटेत डोंगराच्या माथ्यावर विटांचे बांधकाम व शेजारी कुठल्या महाराजांची पाटी दिसून आली. सध्या येथे कुणी राहत नसल्याचे दिसून आले. पुरातत्व विभागाने येथे बांधकाम कसे करू दिले हा प्रश्न पडतो. एका गुंफेमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती असून संत तुकाराम महाराजांचा एक फोटो ठेवलेला दिसला. येथे वारकरी समाजापैकी काही साधक चिंतन, मनन करताना दिसतात.

पाण्याची टाकी :

डोंगराच्या माथ्यावर दगडात कोरलेले पाण्याची टाकी आहेत. संपूर्ण डोंगरावर पाण्याची ५ ते ६ टाकी आहेत. मे महिन्यात देखील येथील पाण्याची टाकी पाण्याने चांगलीच भरलेली होती. महाराष्ट्रात एवढा भीषण दुष्काळ पडून देखील येथे पाणी असल्याचे समाधान वाटले. पाण्याचे नियोजन आपल्या पूर्वाजांनी एवढे चांगल्यारित्या केले आहे. मात्र आज महाराष्ट्रातील अनेक खेड्यात पाण्याच्या थेंबासाठी मारामारी पाहताना दिसून येते. अवघड आहे. असो.

पुरातत्व विभागाचे लक्ष

प्रत्येक ऐतिहासिक व बौद्धकालिन लेण्यांवर पुरातत्व विभागाची एक पाटी दिसून येते. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत ही पाटी असते. लेण्यांविषयी माहिती देण्याची सोडून यावर लेणी परिसराचे विद्रुपीकरण केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. असी धमकीवजा विनंती लिहलेली असते. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणी लेण्यांची नासधुस जरी केली ती कळणार कशी? कारण पुरातत्व विभागाचा कोणी माणूस अथवा चौकीदार येथे कुठेच आढळला नाही. नुसत्या पाटया लावून संवर्धन कसे होणार महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

लोकांची मानसिकता :

पावसाळ्यानंतर घोरावडेश्वरचे रूपच पालटून जाते. सर्वत्र हिरवळ दिसून येते. मात्र उन्हाळा जासा सुरू होतो. तशी ही हिरवळ गायब होते. महाशिवरात्रीला तर हा संपूर्ण डोंगर परिसर शिवभक्तांनी फुलून निघतो. गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटतात तसे भाविक या डोंगराला चिटकतात. लाख दीड लाख भाविक या ठिकाणी दर महाशिवरात्रीला येतात. शिवशंकराचे दर्शन घेऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकाम्या पिण्याच्या बाटल्या व केरकचरा या डोंगराच्या कानाकोपºयात फेकून देऊन मला काय त्याचे म्हणत निघून जातात. सर्व मंदीर परिसर फॉरेस्ट खात्याच्या मालकीचा आहे. संपूर्ण डोंगरावर झाडे लावणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळावर असा कचरा करणाºया लोकांना दंड करायला हवा व या दंडाचे जमा झालेले पैसे येथील सुधारणेवर खर्च करायला हवेत. यासाठी लोकांची मानसिकता बदलायला हवी. पिंपरी, चिंचवड व देहूरोड, लोणावळा, तळेगाव येथे मोठी कॉलेज उभी राहिली. अर्थातच तरुण-तरुणी या ठिकाणी मोकळ्या व निवांत (एकांत) वातावरणाचा आनंद? घेण्यासाठी या घोरावडेश्वराच्या डोंगरावर येतात. कुठे कोपºयात तर कुठे एखाद्या झाडाच्या सावलीत बसून काय गप्प मारत असतात कुणास ठाऊक अशा जोडप्यांवर गांभीर्याने कारवाई करायला हवी.

घोरावडेश्वरवरून दिसणारा परिसर :

या डोंगराच्या पायथ्यापासून जुना पुणे-मुबई महामार्ग गेलेला आहे. दिवाळीतील किल्यावर दिसणाºया चित्रांप्रमाणे वरून संपूर्ण देहूरोड परिसर दिसतो. देहूगावातील गाथा मंदिर, इंद्रायणीचे पात्र, तळेगावचा काही परिसर, तळेगावची खिंड, नवीन उभरण्यात आलेले सुब्रूतो मुखर्जी स्टेडिअम,पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे, भव्य गणेशमूर्ती, शिरगावचे साई मंदिर, भंडारा डोंगर, आयप्पा मंदिर, मुरगन मंदिर, लांबवर दिसणारा लोहगड व विसापूरचा किल्ला, हा संपूर्ण परिसर या डोंगराच्या अनेक विभागातून मोठा सुंदर दिसतो.

घोरावडेश्वर की शेलारवाडीची लेणी :

अनेकांना या डोंगराचे नाव घोरावडेश्वर की शेलारवाडीची लेणी असा प्रश्न पडतो. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडी गावामुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणू लागले. खरे पाहता ही लेणी पायथ्याच्या शेलारवाडीला चिकटून आहे. संपूर्ण डोंगरावर अग्निजन्य खडक विखुरलेले दिसतात. स्पटिकरुपी असलेले हे छोटे दगड लाखो करोडो वर्षापूर्वी या डोंगराची निर्मिती कशी झाली याची साक्षच देतात. परत येत असताना वाटेत एक छोटा सरडा दिसला मी फोटो काढायला कॅमेरा आॅन केला तर हे महाराज सुद्धा पोज देण्यास पुढे आले. अनेक अँगलमधून फोटो सेशन करून पुढे परतीच्या प्रवासाला निघालो. डोंगर उतरून पुढे बेगडेवाडी रेल्वेस्टेशनपासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रायणी नदीच्या शेजारील कुंडमळा पाहण्यास निघालो.

DSCN3081 copy.jpg

आणखी फोटो पाहण्यासाठी लिंक :

http://ferfatka.blogspot.com/2013/05/blog-post_28.html

कसे जाल :

  • पुण्यातून अथवा लोणावळ्याकडून रेल्वेने आल्यास बेगडेवाडी हे रेल्वे स्थानकावर उतरून डोंगरावर जाता येते. मात्र रेल्वे स्टेशनापासून डोंगर सुमारे २ ते ३ किलोमीटर आहे. पायी चालण्याशिवाय पर्याय नाही.
  • स्वत:चे वाहन घेऊन आल्यास पुण्यातून येताना देहूरोड सोडल्यावर देहूरोड बायपासच्या थोडे पुढे घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी गाडी लावून जाता येते.
  • मुंबई बाजूने आल्यास तळेगावची खिंड ओलांडल्यावर डाव्या बाजूला भव्य गणपती दिसतो. तेथून पुढे घोरावडेश्वराला येता येते.
  • पुणे ते घोरावडेश्वर अंतर सुमारे ३५ किलोमीटर.
  • हॉटेलची सोय आहे. जवळच पेट्रोलपंप सद्धा आहे.

अजुन काय पहाल :

  • डोंगराच्या पायथ्याजवळ अमरजाई मंदिर आहे.
  • बिर्लाचे गणपती मंदिर
  • शिरगावचे श्रीसाईबाबा मंदिर
  • कुंडमळा
  • श्री पार्श्वप्रज्ञालय (तळेगाव)
  • देहूगावातील गाथा मंदिर
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकी वर्षे इकडे येतजात असूनही इथे गेलो नाहीये, या लेखामुळे मात्र आता नक्की जाईन.
आमच्यातले कित्येक जण शनिवार रविवार सुट्टीचे दिवशी सकाळी जातात. भक्तिशक्तिपासुन काय फार लाम्ब नाही.

<< गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटतात तसे भाविक या डोंगराला चिटकतात. >>आठवला हा डोंगुर. महाशिवरात्रीला डोणज्याला जाताना हा दिसला होता व गाडीतुनच हात जोडले होते.
बाकी तुमची मुद्देसुद लेखनशैली फारच आवडली. तळमळही जाणवली.