निसर्गाचा चमत्कार कुंडमळा

Submitted by ferfatka on 29 May, 2013 - 08:05

कुंडमळा
DSCN3112 copy.jpg

महादेवाचे दर्शन घेऊन जवळस असलेले निसर्गाचा चमत्कार पाहायला गेलो. बेगडेवाडी रेल्वे स्टेशनकडून पुणे-मुंबई महामार्गाकडे न जाता कुंडमळ्याकडे जाण्यास निघालो. हा संपूर्ण परिसर देहूरोड लष्करी तळाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे जागोजागी चौक्या उभ्या केलेल्या दिसतात. फोटो काढण्यास मनाई आहे. केल्यास लष्करी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जरा जपूनच. कुंडमळ्याचे फोटो काढण्यास हरकत नाही. कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेले हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटे गाव. सुमारे २ किलोमीटरवर असलेला हा कुंडमळा. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या खडकांवर कोसळून पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. परिसरही खूपच निसर्गरम्य आहे. मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी एक टू व्हिलर जेमतेम जाईल असा मजेशीर पूल पाहिला. हा पुलाखाली इंद्रायणी नदीचे पाणी पुढे जाते. हेच ते रांजणखळगे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रांजणखळगे पाहण्यास दिसतात. रांजणगावचे रांजणखळगे तर प्रसिद्धच आहेत. येथील खळगे मोठे जरी नसले तरी सुमारे ५०० मीटर अंतर विविध आकारातील रांजणखळगे पहाण्यास दिसतात. पावसाळ्यात येथे एकदातरी आवर्जुन जाण्यासारखे हे ठिकाण आहे. खरे तर महाराष्ट्र शासनाने अशा ठिकाणी पर्यटनाला वाव द्यायला हवा तेवढीच स्थानिक लोकांना रोजगाराची निर्मिती होईल. मागील दोन एक महिन्यापूर्वी कुंडमळा परिसरात बिबळ्या आल्याची घटना घडली होती. तसा हा परिसर दाट झाडीचा असल्याने बिबळ्या येणे शक्य आहे. कुंडमळ्यातून दिसणारा घोरावडेश्वरचा डोंगर मस्तच दिसला. मागील बाजूला असलेला भंडारा डोंगर साद घालत होता. मात्र वेळ कमी असल्याने व कामावर जायचे असल्याने पुढील वेळेस भंडारा व भामचंद्र डोंगर करण्याचे मनात पक्के करून परतीचा मार्ग धरला.

आणखी फोटो पाहण्यासाठी लिंक :

http://ferfatka.blogspot.com/2013/05/blog-post_3818.html

कसे जाल :

  • बेगडेवाडी रेल्वेस्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर.
  • वाहन पंक्चर झाल्यास दुकान नाही. हॉटेलची सोय नाही.
  • शक्यतो अंधार व्हायच्या आत हा परिसर सोडलेला बरा.
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users