वैशाख-वणव्यात सह्याद्रीदर्शन: इगतपुरीचं दुर्ग-त्रिकुट

Submitted by Discoverसह्याद्री on 26 May, 2013 - 06:53

मोरधन – कावनई – कपिलधारा तीर्थ – त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग):: एका दिवसात!!

‘उन जरा जास्तंच आहे...’, सालाबाद प्रमाणे याही वर्षी अस्संच वाटलं. खरंतर मे महिन्यात वैशाख-वणवा पेटला असताना, सह्याद्रीत खूप दमवणारं ट्रेकींग टाळलेलंच बरं. पण, आता लवकरच पावसाळ्यात मोठ्ठे ट्रेक्स बंद होणार आणि ट्रेकशिवाय अगदीच बोअर व्हायला लागलेलं.. खरंतर ठरला होता, सदाहरित जंगलातला ३ दिवसांचा जब-या ट्रेक. उद्या निघायचं, अन् अचानक ट्रेकर्स फसले खिंडीत - “...घर शिफ्टींग करायचंय, Certification परीक्षा आहे, बायकोच्या आत्तेभावाच्या मुलाची मुंज आहे, onsite जातोय, वगैरे वगैरे..”. अन्, शेवटी उरले वैतागलेले दोघं, अन् ट्रेकसाठी उरला एकंच दिवस!

00_MoKaTri_Map_DiscoverSahyadri.jpg

ट्रेकचा Plan – B ठरला. सह्याद्री घाटमाथ्याजवळ इगतपुरीचं दुर्ग-त्रिकुट: मोरधन – कावनई – त्रिंगलवाडी!
रोड-टच आणि सुटावलेल्या डोंगरांवर हे किल्ले असल्यामुळे, उन्हांत जितकं जमेल तितकंच करू; असं ठरवून साकेत अन् मी शनिवारी संध्याकाळी इंडिकामधून कूच केलं. कार आहे, की ‘टूरिस्ट-गिरी’ सुरू. अंथरुण – पांघरूण – संदर्भ पुस्तकं - तहानलाडू – भूकलाडू – पायताण, असं सग्गळं सामान सुट्ट सुट्ट करत संसारंच सोबत घेतला.
01_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

..पुणे – नाशिक लघुमार्गावर धीम्या वाहतुकीनं वैताग आणला. पण आळेफाट्यापुढच्या बोटा गावाजवळ खास पसंतीच्या ढाब्यावर शेवभाजी – अख्खां मसूर – शेवग्याच्या शेंगांची भाजी - बाजरीची भाकरी ‘ये-दबाके’ चेपल्यावर, मग कुठे ‘आपण ट्रेकला निघालोय’, असं वाटायला लागलं. पहिल्यांदा वळणां-वळणांचा साधा मार्ग, मग राज्यमार्ग अन् मग राष्ट्रीय महामार्ग अश्या नाना प्रकारच्या रस्त्यांवर बोटा – ब्राम्हणवाडा – कोतूळ – धामणगाव पाट – राजूर – भंडारदरा अशी गाडी बुंगवत कळसूबाईच्या पायथ्याशी गाडीला ब्रेक मारला. अष्टमीच्या चांदण्यात कळसूबाईची उंची धूसर जाणवत होती. कळसूबाई फोटुत सापडेना..
02_MoKaTri_DiscoverSahyadri.jpgमोरधन
इगतपुरीच्या दुर्ग-त्रिकुटात ‘मोरधन’ सर्वात खड्या चढाईचा अन् घसा-याचा, म्हणून ठरवलं नमनाला दर्शन घेऊ ‘मोरधन’चं. घोटी गावच्या अलीकडे आहे देवळे गाव. गावाजवळ दारणा नदीचा मोठ्ठा पूल लागायच्या आधी डावीकडे ‘खैरगाव’ कडे वळलो. वाजले होते रात्रीचे १२:३०. पुण्यापासून २०५ कि.मी. मारुती मंदिराच्या चौथ-यावर मंद झुळूका अंगावर घेत, चांदण्या निरखत पडलो. उन्हं चढायच्या आत जास्तीत जास्त अंतर कापण्याच्या दृष्टीनं पहाटे ६ वाजताचं कूच केलं. मोरधनचं पहिलं दर्शनचं मोहवणारं होतं. दोन टप्प्यांत तीव्र घसा-यावरून चढाई असणार होती.
03_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

कातळकडा टाळून आडवं गेल्यावर खैरगावचं अन् दारणा खो-याचं सुंदर दृश्य पाठीमागे होतं.
04_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

मोरधनचा कातळमाथा कोवळ्या उन्हांत सोनेरी उजळला होता. डावीकडून वळसा घालून समोरच्या बेचक्याकडे चढत जाणारी वाट आहे. सरळ जाणा-या वाटेच्या ‘मोहा’त खरंतर उगाचच फसलो, अन् वाट चुकली!!!
06_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

चुकल्या वाटेचा निर्णय निभावून न्यायचाच, या हट्टामुळे थेट माथ्याकडे घुसत गेलो. नेहेमीप्रमाणे ‘सुरक्षित ट्रेकींगची तत्त्वं’ यावर ग्यान-सत्र पाजळलं. अर्थातंच, भीषण घसारा अन् ठिसूळ कातळ यांच्याशी चांगलीच झटपट केल्यावर, कसंबसं माथ्यावर पोहोचलो.
08_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

ज्यासाठी केला एवढा अट्टाहास, अशी प्रचीती देणारं साक्षात्कार दृश्य समोर... ट्रेकर्सचं आराध्य असलेली कळसूबाई – अलंग – मदन – कुलंग ची रांग कोवळ्या उन्हांत न्हात सामोरी होती. आजमितीस भर्राट वारा सोडला, तर गडावर काहीच नाही.
09_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

गडप्रदक्षिणा करून अर्थातंच मळलेल्या वाटेनं गडाच्या पदरात पोहोचलो. मगाशी चढताना इथंच वाट चुकली होती, त्याचं विश्लेषण होवून, या ठिकाणी वाट चुकणं साहजिकंच कसं आहे, असं justification शोधलं गेलं.
10_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

इगतपुरीच्या दुर्गत्रिकुटातला पहिला गड – मोरधनची तीन तासांत चढाई-उतराई केल्यामुळे, आम्ही मे महिन्यातल्या ट्रेकसाठी rhythm मध्ये आलो.

कावनई
आता लक्ष्य होतं, इगतपुरीचा दुसरा किल्ला – कावनई! घोटी गावात न जाता, मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिककडं वळल्यावर लग्गेचंच डावीकडे कावनई फाटा आला. ट्रेकर्सचा ‘राष्ट्रीय आहार’ मिसळ-पाव चेपल्यावर घामटं आलं, अन् दोन कडक चहा मारून तरतरी आली.

अप्पर वैतरणा रस्त्यावरून उजवीकडे वळल्यावर मागं वाकी गावचा बुध्या डोंगर, समोर कावनई किल्ला अन् त्याच्या उजवीकडे दास्कोन डोंगर लक्षवेधी उठावले होते.
12_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

घरांच्या दाटीवाटीतून किल्ल्याकडे मळलेली वाट निघाली. कातळटप्प्याकडे तिरकं चढत वाट हळूहळू उभी होत गेली.
13_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

माथ्यावरचे बुरुज अन् ध्वज खुणावत होते, म्हणून झपझप पावलं उचलली.
15_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचण्यासाठी पूर्वी बेचक्यातल्या नाळीतून ‘चिमणी’ तंत्राने किंचित अवघड कातळारोहण करावे लागत असे. गडावर कावनईदेवीच्या दर्शनाला येणा-या भाविकांसाठी आता लोखंडी शिडी आली. तरीही, पूर्वी इथली चढाई-उतराईचा थरार काय असेल, याची कल्पना येते.
16_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

प्रवेशद्वारापासून गडाची धारेवरची कावनई गाव अन् पाठीमागे मुकाणे – अप्पर वैतरणा धरणांचे जलाशय चमकत होते. अंजनेरी – त्र्यम्बक – डांग्या – गडगडा हे दुर्ग सवंगडी सहजंच ओळखू आले.
17_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

माथ्यावर निवासाच्या घरट्यांच्या जागा, खांबांचे खड्डे अन् चर बरेच दिसतात.
18_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

बाजूला होतं कावनईचा जोडीदार दास्कोनचं विहंगम दर्शन!
19_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

मध्यभागी तलाव अन् कावनईदेवीचं राउळ! गडावर स्वतः शिवाजीराजांनी काही दिवस वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे.
20_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg21_MoKaTri_DiscoverSahyadri.jpgकपिलधारा तीर्थ
अडीच तासांत कावनईची चढाई-उतराई करून, पायथ्याचं ‘कपिलधारा’ हे प्राचीन तीर्थक्षेत्र गाठलं. कुंभमेळा मुळात इथला, असं मानतात. इथल्या घंटांपैकी एक घंटा चिनी वाटसरू ह्युआन स्तंगनं भेट दिलीये म्हणे. असेल!
22_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg23_MoKaTri_DiscoverSahyadri.jpgऊन जब-या पेटलं होतं – शंकाच नाही.
नरेंद्र ढाब्यावर टेकलो. बाहेर एक-एक डोंगर, त्यांच्या सोंडा, झुडपं, कातळमाथे, घसारा असं सग्गळं कळाकळा उन्हांत तापत होतं. खरं सांगू, ते काही बघावसंही आता वाटेना. पुढचा बेत काय याबद्दल थोडी डळमळीत मनस्थिती. एकदा वाटलं, दोन किल्ले मोरधन अन् कावनई झाले आहेतंच, अन् परतीचा प्रवास २०० किमीचा. तिसरा किल्ला – त्रिंगलवाडी सोडला तरी चालेल. मग वाटलं, त्रिंगलवाडी साठी इतकं लांब परत कधी येणार, अन् तो आत्ता सोडला तर नंतर खूप regret वाटत राहील.. अर्थात हे नक्की होतं, की त्रिंगलवाडी करायचाच असेल, तर मनापासून बघू शकणार असू तरंच.

शरीराला खूप गरम - खूप गार असा शॉक बसू नये, या पध्दतीनं थोड्या विश्रांतीनंतर ताक – लस्सी – कोल्डड्रिंक्स असा मारा केला. थोडक्या विश्रान्तीनंतर त्रिंगलवाडी करायचा की नाही, यावर विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही...

त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग)
त्रिंगलवाडीला जायला मुंबई – आग्रा महामार्गावर घोटी आणि इगतपुरीच्या दरम्यान टोलनाक्यावर जातानाचे ९० अन् येतानाचे ९० असा टोल ‘उग्गाच’ भरावा लागला. उग्गाच अश्यासाठी कारण, टोल भरल्यावर अवघ्या १ कि.मी.वर त्रिंगलवाडीकरता ‘टाके’ गावापाशी उजवीकडे वळलो. मग अर्थातंच ‘आपण भरलेल्या टोलच्या पैश्याचे लाभार्थी कोण’, यावर रवंथ करणं आलंच..

डावीकडे म्हाळुंगे डोंगराचे करकरीत कडे मागे टाकत त्रिंगलवाडी गावात आलो. त्रिंगलवाडी धरणाच्या पल्याड असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याला चालत जाण्यापेक्षा पेठेच्या वाडीपर्यंत खराब रस्त्यावरून गाडी नेऊन पाऊणेक तास वाचवला. इतक्या उन्हांतही गडाचं पहिलं दर्शन सुखावह होतं.
24_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

वाटाड्या मागितला नसतानाही गावातली पोरं (पांडुरंग अन् त्याचा दोस्त) आमच्याबरोबर गडावर निघाली.
25_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

पायथ्याच्या जैन लेण्या पाहून थक्क व्ह्यायला होतं.
26_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

लेण्यांवरचा डोंगर चढून गडाच्या कातळमाथ्याजवळ गेलो. पाठीमागे इगतपुरी अन् कोकणाचं उत्तम दर्शन झालं.
27_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

कातळकड्यापासून डावीकडे आडवं गेलो.
28_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

नैसर्गिक घळ अन् तासलेले कातळ यांतून ७०-८० उंचंच उंच पाय-यांची सुरेख वाट चढू लागलो.
29_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg30_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

विशाल मारुतीरायाची मूर्ती अन् कातळकोरीव प्रवेशद्वारावरील शरभ शिल्पानं लक्ष वेधून घेतलं.
31_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg32_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

गडाच्या माथ्यावरून भास्करगड, उतवड, हर्षगड, त्र्यम्बक, अंजनेरी, डांग्या, गडगडा, कावनई, मोरधन आणि कळसूबाई रांग लक्षवेधी होती. दुर्गेच्या राऊळापाशी उतरलो.
33_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg34_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

गुहा-टाक्याचं थंड पाणी..
35_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

उतरताना दुस-यां बाजूची पाय-यांची वाट घेतली, अन् त्रिंगलवाडी दर्शन संपवलं.
36_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

परत निघाल्यावर आता ऊन्हातलं पोळणं - आलेला घाम - लागलेला दम – घश्याला पडलेली कोरड, असंलं काहीच आठवत नव्हतं... वाटलं, वैशाख-वणव्यात वणवण करून एका दिवसात ३ किल्ले बघून आपण काय साध्य केलं.. फक्त ‘ईगो’ सुखावा या हट्टानं केलं, की खरंच काही आनंद मिळाला या प्रवासात. अन् मग डोळ्यासमोर तरळू लागली गेल्या १० तासांमधली काही देखणी दृश्यं.

ढगांआडून झालेला देखणा सूर्योदय..
38_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

ऐन मे महिन्यात कोरड्या ठणठणीत करपलेल्या जमिनीत उमललेली फुलं पाहून, ‘जगण्याची – उमलायची उत्कट प्रेरणा कुठून आली असावी’ या विचारानं चकित झालो.
07_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

दारणा नदीच्या पार्श्वभूमीवर मोरधन अन् windshield वर ढगांची मोहक नक्षी दिसत होती.
11_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

कावनईचा जोडीदार दास्कोनच्या दांडावर गुरांच्या वाटांचं mosaic design मोठ्ठं विलक्षण दिसत होतं..
14_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

ट्रेकची धुंदी तनामनावर चढली असताना, परतीचा प्रवास सुरू केला.. कारमध्ये गाणंही असलं apt लागलं – अग्गदी मनातलं गुज सांगणारं::

फिर से उड़ चला.. उड़ के छोड़ा है जहां नीचे.. मैं तुम्हारे अब हूँ हवाले.. दूर-दूर लोग-बाग़ मीलों दूर ये वादियाँ...
05_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे भारीच रे..असल्या उन्हात तुम्ही हा ट्रेक केला...

आजमितीस भर्राट वारा सोडला, तर गडावर काहीच नाही.

अगदी अगदी....डोके दुखायला लागेल एवढा वारा आहे...

बाजूला होतं कावनईचा जोडीदार दास्कोनचं विहंगम दर्शन!

अच्छा या डोंगराचे नाव माहीती नव्हते...दास्कोनचा अर्थ काय आहे...

गडावर स्वतः शिवाजीराजांनी काही दिवस वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे.

हे ही ऐकीवात नव्हते...पण किल्ला एक नंबर आहे...आम्ही मस्त थंडीत गडावर राहीलो होतो...फारच धमाल होती.
तिकडून आम्ही कळसूबाईला गेलो त्यामुळे त्रिंगलवाडी राहीला...

मस्त वर्णन आणि फोटू…उन्हाळ्यात अत्यंत रखरखीत आणि रुक्ष असणारे हे किल्ले मात्र त्यांच्या माथ्यावरून दिसणा-या कळसुबाई रांग,पट्टा रांग त्रिंबक रांग आणि अप्पर वैतरणेच्या जलाशयाच्या अप्रतिम दृश्यासाठी सुखावह आहेत.

बाजूला होतं कावनईचा जोडीदार दास्कोनचं विहंगम दर्शन!

अच्छा या डोंगराचे नाव माहीती नव्हते...दास्कोनचा अर्थ काय आहे...>>>>> खरं तर या डोंगराला कावनईचा बुधला उर्फ बुध्या म्हणतात. त्रिंगलवाडी गावातील लोकांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे हा डोंगर दहा कोनांचा (??) असल्याने याला दसकोन असं नाव आहे. त्याचा अपभ्रंश होऊन दास्कोन झालं असावं. आता गोल आकारामुळे बुध्या हे नाव पडलेलं असताना त्याला दहा कोन कुठून आले हा प्रश्न मला आजही पडला आहे.

एकदा गोरखगडला गेलो असताना देहरीतल्या स्थानिक माणसाने किल्ल्याच्या गुहेबद्दल दिलेली माहिती….ही गुहा (अर्थातच) पांडवांनी एका रात्रीत खोदली आणि सकाळ झाल्यावर सीता लव - कुशांना घेऊन आजोबा डोंगराच्या वाल्मिकी आश्रमात निघून गेली.…. !!!!!

मी "को जागर्ति" लेखात लिहिलेला "पट्ट्यावरच्या अफझलखान वधाचा" किस्साही याच प्रकारातला आहे.

in short… गावातल्या लोकांना दिव्यदृष्टी असते !!!!

चालायचंच… हर एक का नजरिया होता है !!!!

एकदम भारी!!

१. मोरधन किल्ला नाशिकचे दुर्गअभ्यासक श्री. गिरीश टकले यांनी शोधला. मुघलकालीन पत्रांत याचा मोरदंत म्हणून उल्लेख येतो. मोरधन माथ्यावर आल्याबरोबर उजवीकडे एक टाके आहे. ते पाहिले नाही कां? या किल्ल्याच्या सोंडेला नेढंदेखील आहे. आशुचँपचाही मोरधन दुर्गाचा धागा आहे.. http://www.maayboli.com/node/17732

२. त्या डोंगराचं नांव दास्कोन नसून 'दशकोन' आहे. समिच्या पोस्टला अनुमोदन. मलाही तो प्रश्न आहे.
साईंनी विंग्रजी माहिती शोधली असणार म्हणून दसकोन चे दासकोन->दास्कोन झाले असणार.. Happy

३. इथल्या घंटांपैकी एक घंटा चिनी वाटसरू ह्युआन स्तंगनं भेट दिलीये म्हणे.
प्रचिमध्ये दाखवलेल्यांपैकी ती घंटा नाहीये. खरंतर ती एक धातूची प्लेट आहे. तिथेच जर चौकशी केली असतीत तर त्यांनी ती प्लेट दाखवली असती. त्यांवर काही चिनी आकृत्या कोरलेल्या आहेत.

बाकी बरेच दिवस ट्रेक न करता तडफडत रहाण्यापेक्षा उन्हांत तडफडत ट्रेक करणं प्रकृतीला उत्तम..! Happy

एकदम मस्त लिहिलं आहे! त्रिंगलवाडी किल्ला भारी!
सगळे फोटो छान आहेत, आणि शेवटचे २ मात्र एकदम जबरी Happy

वॉव ! सही !
मस्त ट्रेक करवलास !
त्या कातळ्यातल्या पाय-यांचा रस्ता, सुर्योद्य, जमिनीतून वर आलेली चिमुकली फुलं, काचेतले ढग, दास्कोच्या दांडावरचे मोझॅक आणि उडिबाबा,... सगळेच अप्रतिम सुंदर. धन्यवाद Happy
ते मोझॅक तर मला आधी पाण्यातल्या हलत्या सावल्या वाटल्या Happy

सहीये बॉस. Happy

कावनईचा जोडीदार सुंदर आहे.. Happy

(अर्थातच) पांडवांनी एका रात्रीत खोदली आणि सकाळ झाल्यावर सीता लव - कुशांना घेऊन आजोबा डोंगराच्या वाल्मिकी आश्रमात निघून गेली.…. !!!!!>>> Lol

<< बाजूला होतं कावनईचा जोडीदार दास्कोनचं विहंगम दर्शन >> मस्तच सवंगड्यांनो, खरंच विहंगम दर्शन दिले. पायाकडची ४ प्र.चि. म्हणजे तुमच्या प्रवासाचा कळस.

विजय आंग्रे
रोहित
यो
दिनेशदा
शापित गंधर्व
शैलजा
श्री
अवल
जिप्सी
झकासराव
पुरंदरे शशांक
सुनिल परचुरे
ईनमीन तीन
किशोर मुंढे

प्रत्येक प्रतिक्रिया मोलाची आहे. स्वतंत्र उत्तर देत नाही, याबद्दल क्षमस्व!
वर्णन आणि प्र.चि. आवडले, हे वाचून आनंद वाटला. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!! Happy

आशुचँप::
कावनईच्या सवंगडीच्या ‘दास्कोन’ नावावर सह्याद्रीमित्र आणि हेम यांच्या प्रतिक्रिया बघा. Happy ‘दस-कोन’ या स्थानिक नावाचा अपभ्रंश असू शकेल.
बाकी, तुमच्या कावनई - मोरधन भटकंतीच्या वर्णनासोबतचे (http://www.maayboli.com/node/17732) प्र.चि. उच्च दर्जाचे आहेत!!!! Happy

सह्याद्रीमित्र
दंतकथा एक नंबर आहेत!!!!! : D
आम्ही कावनईच्या बुधल्याला ‘दास्कोन’ हे स्थानिक नाव ऐकलं खरं, पण ते या मातीतलं वाटलं नव्हतं.
दहा कोनांचा = दशकोन, ही फोडणी हेम व तुझ्याकडूनंच ऐकली. खूप धन्यवाद!!!!!!
ता.क. "को जागर्ति" लेखाचा दुवा दे ना...

@ हेम
आधुनिक तंत्र (Google maps वगैरे) उपलब्ध नसताना श्री. गिरीश टकले यांनी केलेल्या नाशिकच्या किल्ल्यांच्या original शोधकामाबद्दल खूप ऐकलंय..
मोरधन माथ्यावरचं टाके आणि सोंडेवरचं नेढं बघितलं.
कपिलतीर्थला घंटेची चौकशी करायचा आळस केला... याची आता मोठ्ठी regret Sad
तुमच्याकडे प्र.चि. असेल सहज हाताशी, तर शेअर करता येईल का?
overall, जपून ठेवावी अशी अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिलीयेत!!! Happy

बंकापुरे:
इंद्रधनुष्य:
कंसराज:
भटकंती वर्णन आणि प्र.चि. आवडले, हे वाचून छान वाटलं. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!! Happy

खूप छान पण या व्यतिरिक्तही अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळाली असती मी मुळची इगतपुरीची म्हणून जास्तच छान वाटल