काश्मिर -२

Submitted by vaiju.jd on 22 May, 2013 - 13:47

॥ श्री ॥

आयुष्यात एकदातरी काश्मिरला जाणे हे प्रत्येक भारतीयाचे एक स्वप्न असते. भूतलावरचे ते 'नंदनवन' एकदा तरी डोळे भरून पाहून घ्यावे असे वाटते.

काश्मिर आहेच तसे! दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरे, हवेतला सुखद गारवा, सुखविणारी वनराई, कुरकुरीत ताजी फुले, चिनारच्या रांगा, स्वच्छ खळखळणारे पाणी, कितीतरी गोष्टी आणि या सर्वाबरोबर सुरेख देखणी माणसे! बघायला रोज नव्या ठिकाणी जावे. प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळेच, सोनमर्ग, गुलमर्ग, पहेलगाम!सरोवरातून शिकाऱ्यातून फिरणे, वेगवेगळ्या बागा, त्यातल्या मोहक रचना, अक्रोड, केशर, रेशीमवस्त्रे यांची खरेदी. सगळेच काही मोह घालणारे!

आम्ही सहा दिवस राहिलो. शेवटच्या दिवशी सगळ्यात सुंदर म्हणून 'पहेलगाम' ठेवले होते. दिवसभर निसर्गाच्या सान्निध्यात कसा गेला ते कळलेच नाही . खळाळत वाहणारी नदी, तिच्यावर छोटासा आकर्षक पूल , नदीच्या काठावर हिरवाई, पलीकडे डोंगररांगा, जंगल झाडी, अलीकडे छोटेसे टुमदार गाव!

दुपारी चारच्या सुमाराला एकदम झाकळून आले. आम्ही श्रीनगरला परतायचे ठरवले. बसने श्रीनगरला आलो पण तिथेही दुसरी बस करून आम्हाला हॉटेलवर पोहचायला हवे होते. श्रीनगर मध्ये अगदी छोट्या छोट्या बस हिंडायच्या. उंचीला कमी, मान वाकवून उभे राहावे लागायचे. माणसेही कमी मावायची. एका खच्चून भरलेल्या बसमध्ये शिरलो . मी सगळ्यात मागच्या सीटजवळ जाऊन उभी राहिले.मुलगा चांगलाच तापला होता. बाहेर पाऊस पडत होता. त्याचे डोळे मिटत होते. बसायला जागा नव्हती. पण बसच्या सगळ्यात मागच्या सीटवरच्या एका सोळा-सतरा वर्षाच्या मुलाने स्वतः उभे राहून बसायला जागा दिली. मी बसले, मुलाला मांडीवर घेतले. तो पेंगतो आहे हे पाहून शेजारच्या मुलाने त्याचे पाय हळूच मांडीवर घेतले आणि स्वतःच्या खांद्यावरचे शालीसारखे कापड त्याच्या अंगावर टाकले. लगेच त्याच्या शेजारच्या मुलाने पाय ओढून सरळ करून स्वतःकडे मुलाला ओढून आरामशीर झोपवले. मी त्यांचे आभार मानले.

माझ्या शेजारचा मुलगा चौदा पंधरा वर्षाचा असेल.

"पहेलगाम गये थे क्या आप? कैसा लगा ?"
"अच्छा लगा.बहुत सुंदर है. आप कहाँ गये थे?"
"पहेलगामही गये थे हम।"
"यहीपे रहते हो नं? फिर, देखा नही था?"
"देखा है, हम देखने नही गये थे. हम 'जुआ' खेलने गये थे."
"क्या? क्या?" मी अवाक, कानांवर विश्वासच नाही.
"हाँ, हम जुआ खेलने गये थे."
"आपको मालूम है, जुआ खेलना बुरी बात है।"
"हाँ, मालूम है।"
"तो? घरपे बताके गये थे क्या?"
"बताते तो कोई जाने थोडेही देता।"
"फिर चोरी छिपे गये थे क्या?" मी बरोबरच्यांकडे एक नजर टाकली," सब दोस्त है क्या?"
"नही वो दोनो मेरे चाचा के लडके है. वो खडा है वो उनकी मॉंसीका लडका है. वो मेरे मामाका लडका है और ये पास बैठा मेरा दोस्त है।"
"पढे लिखे हो क्या?"
"हाँ. वो चाचाका लडका सातवी पास है. मै और मेरे चाचाका छोटा लडका चौथी पास है. मेरा ये दोस्त स्कूल नही गया."
"पैसे कहाँसे आये, जुआ खेलने ?"
" हुमारी दुकाने है, वहाँसे थोडे थोडे उठाये थे!"
" घरपे किसीको नहीं बताया और कैसे बता दिया मुझे कि जुआ खेलने गये थे ?"
"आपको बताया तो क्या हुआ? आप थोडेही हमारे घरवालोंको बताओगे? आप तो उन्हें जानते भी नहीं।"
"और क्या हुआ उधर, जीते क्या? जुअेमें कोई नही जीतता."
"लेकीन खेलने मजा तो आता है!"
"अब क्या बोलूँ?"

इतक्यात 'उतरायचेय पुढे ये' म्हणून जाऊबाईंनी हाक मारली. मी मुलाला कडेवर घेण्यासाठी हळूच गोळा करायला लागले. मला शेजारच्या दोन्ही मुलांनी त्याला उचलून कडेवर घ्यायला मदत केली. उभा असलेला 'चाचाका सातवी पास बडा लडका' म्हणाला , "उन्हे जरा चद्दर या शॉलमे लपेट लो। यहाँकी बारीशमे बहुत जल्द बुखार पकड लेता है. खुदा हाफिज, धीरे जाना."

मी बसमधून उतरले. जाऊबाईंनी बरोबर आणलेली शाल मुलाला गुंडाळून दिली. बस निघून गेली होती.

पुढे जेव्हा जेव्हा काश्मिरमधला आतंकवाद वृत्तपत्रात वाचनात आला तेव्हा तेव्हा ती चौदा ते सतरा वर्षापर्यंतची मुले आठवतात.आणि 'हम जुआ खेलने गये थे' हे त्यांचे प्रामाणिक पण धक्कादायक सांगणेही आठवते. त्यांची मदत करण्याची वृती आठवते. मानवी मन मुळात सद्भावना घेऊन जन्माला आलेला मातीचा गोळाच असते. संस्कार ते बरेवाईट घडवतात.

गेल्या दहा वर्षात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्या अनुषंगाने अतिरेकी कारवाया, त्यासाठी दिली जाणारी प्रशिक्षणे, त्यासाठी होणारा गरीब अर्धशिक्षित तरुणांचा उपयोग यांची खूप चर्चा होते., खूप माहिती मिळते. एखाद्या क्षणी मला ती श्रीनगरच्या बसमध्ये भेटलेली मुले आठवतात. आणि मन भयशंकीत होते -

ती मुले , त्यांची मने ---------------------------------?
ती मुले आजही 'जुआ' खेळायला---------------------------------?
त्यांची दुकाने आज---------------------------------?
त्यांच्या हातात कोणी शस्त्रे---------------------------------?
ती सगळी मुले सुरक्षित---------------------------------?
ती मुले आज हयात---------------------------------?

आणखीही प्रश्न पडतात, उत्तरे माहीत नसलेले.
पण मग मी माझ्या देवावर असलेला विश्वास ओलीस ठेवत त्याला म्हणते.,
"या विश्वातल्या सद्भावना चिरंतन ठेव.
या जगातली माणुसकी अविनाशी ठेव.
आसमंतात तू कोणत्याही रूपा स्वरुपात असलास तरी सर्वांना सुखी ठेव!"
आमेन!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण सध्या तरी कश्मीरवरती अजून काही सुचलेला नाही Sad
सुचलं तर नक्की लिहीन Happy