स्वर्ग जर आईचपाशी, का फिरू काबा नि काशी ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 May, 2013 - 10:39

'प्रिया कपड्यांच्या घड्या घातल्यास का? आटोप लवकर, पानं वाढून घेतलीयत पाणी भरुन घे ... मुलखाची चेंगट आहे ही मुलगी ..सासरी गेल्यावर हीच कस काय होणारय देवच जाणे ! दुस-या दिवशी दारात नाही आणून सोडली सासरच्यांनी परत म्हणजे मिळवलं'.....इति मातोश्री.

'वासंती, जावू देत ग ! मी घेतलय बघ तांब्या-भांडं भरुन, का मागे लागतीयस तिच्या ? ...लहान आहे ती तशी अजून.'....-बाबा.

लहान ? लहान-लहान म्हणून पाठीशी घालू नका हं तुम्ही तिला, आज तुमचे लाड होतील अन उद्या तिच्या सासरची लोकं मला नावं ठेवतील, मुलीला वळण नाही लावल आईन म्हणून ....

अग काळजी करु नकोस याद्यात हा मुद्दा लिहून घेवूत की, मुलीला नांवं ठेवताना बाबांचं नाव घ्यायच, आईच नाही ! ...खुष ???

हा नि असा संवाद न घडलेला दिवस उजाडणं कठीण होत माझ्या घरात. माझ्या कित्येक मैत्रिणींना नेहमी त्यांच्या बाबांची भीती वाटत असे मी मात्र सदैव आपली आईच्या धाकात !...मीच नाही तर अवघ घर-दार तिच्या तालावर नाचत असे. तिच प्रत्येक गोष्टीत अगदी बारीक लक्ष ! सकाळी ७ ते ९ तिचा स्वैपाकघरातील सक्रीय वावर आख्ख घर दणाणून सोडायचा.... सकाळी सात ते सव्वासात एकीकडे बाबांचं पेपर वाचता-वाचता रेडीओवरच्या मराठी प्रादेशिक बातम्या ऐकणं सुरु असायच आणि दुसरीकडे मला झोपेतून ऊठवणं ...' पिकुड्या रे, नंदूड्या रे, छोनंद्या रे, ऊठा-ऊठा रे, चहा झाला बघ आईचा' आणि माझ आपल..'बाबा थांबा न पाच मिनीट' च पालुपद आख्खं १५ मिनींटं सुरू असायच शेवटचा जालिम उपाय म्हणजे 'पिकु आई येतीय ह आता !' हा असे नि मी टुणकन पांघरुण झटकून ऊठून बसे !

तिच कुकर लावण सुरू असे तेव्हा नि मला सडा-रांगोळीची आठवण करुन देणं सुध्दा ! केर- वारे, तांब्या-भांडी-कपबश्या घासून-विसळून घेणे ही शिस्त तर होतीच होती त्या शिवाय आंघोळ आटोपून अभ्यासालाही वेळेत बसावे लागे....बाथरुम मधली २-३ जास्तीची लागलेली मिनीटंही तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नसत...आटोप पट-पट तासन तास बाथरुमधे बसू नये मुलीच्या जातीन .....वैगरे-वैगरे... 'मुलीची जात' हे माझ्या बाल मनाला तेव्हा पडलेल कोड आजतागायत सुटता सुटल नाहीय ही गोष्ट निराळी.... असो !

माझ्यावरच नाही तर तिची माझ्या लहान भावावरही तेवढीच करडी नजर असे, तो अभ्यासाला बसलाय की नाही? कुठला विषय करतोय ? शब्दांच्या स्पेलिंगसोबत त्याचे अर्थही पाठ करतोय की नाही ? पाढे पाठ करताना पुस्तक एकीकडे अन लक्ष दुसरीकडे असं तर नाही होत आहे न हे तपासायला तिच्या स्वयंपाकघर ते हॉल अशा अनेक चकरा होत तेवढ्यातल्या तेवढ्यात.

डॉट साडेनवाला आम्ही सगळे जेवणाच्या टेबलवर हजर असूत, तिच्या हाताची चव तर एकदम वाखाणण्याजोगी असायची प्रत्येक पदार्थ ताव मारावा असा... आणि कामाची गती तर अशी की षोडशेलाही लाजवेल....ज्या दिवशी चुकून माकून तिच्या एखादया पदार्थात तिखट-मिठ कमी-जास्त झालच तर बाबा म्हणत असत की 'वासंती आज तू हा पदार्थ सवडीने केलेला दिसतोयस !' गुरवार- शनिवार बाबांचे उपास...मी गुरवारची म्हणून अन भाई शनिवारचा म्हणून आमच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत खंड न पडता केलेले...तर या दिवशी आईचा एक गोड पदार्थ ठरलेला कधी साखरआंबा कधी शिरा कधी उरलेल्या दह्याच पांढ-या शुभ्र फडक्यात गुंडाळलेल्या आंबट-गोड चक्क्याच श्रीखंड, शेवयाची खिर, तर कधी शिकरण सुध्दा...आई भाज्या कधी निवडायची, दळणं कधी करायची, हे कधी कळूनच यायच नाही...सार काही सकाळी ७ ते ९ च्या आत-बाहेरच.

१० वाजता तयार होवून १० ते ११ ती 'पडायची' (गादीवर हो! ) नी १२ ते ६ तिची शाळा... मराठी-इंग्रजी-इतिहास- भूगोल हे तिचे विषय... पी.टी अन गणिताशी तिचा छत्तीसचा आकडा...शिस्तप्रिय कडक शिक्षिका म्हणून तिचा शाळाभर दरारा... रजा घेणे तर अगदीच विरळा...रहाणीमान टाप-टीप, दागिन्यांची नाही पण साड्यांची
निरातिशय आवड...तिचा वर्षोनवर्षे ठरलेला शिंपीही शाळेत जायच्या रस्त्यावरचाच !

घराच्या बागेतील प्रत्येक रोपटी तिच्या निवडीची....कुणालातरी पकडून आणून ती बागेतील बागकाम करवून घ्यायची निशीगंधाचे कांदे, जास्वदीं, गुलाब, जाई-जुईच्या काड्या खोवून घेणे, बाग स्वच्छ करवून घेणे, डीडोनियाची कटींग करवून घेणे, पेरु, लिंबू, कन्हेर, नारळ या झाडांना खत घालून घेणे हा तिचा रविवारचा उद्योग ...हं पाणी मात्र बाबाच घालत दररोज या झाडांना अर्थात तिच्या सुचनेबरहुकूमच !

झाडातील माती बदलणे, हौद धूवून घेणे, वरचे माळे आवरुन घेणे हे तिचे दिवाळी- उन्हाळा अन संक्रांतीच्या सुट्टीतले आवडते छंद ! ती जर शिक्षिका झाली नसती तर खरोखर एक उत्कृष्ट व्यवस्थापक होवू शकली असती हे एकदा नाही तर शंभरवेळा माझ्या मनात येवून जात आजकाल ! तिची कामे करवून घेण्याची हातोटी आणि सुचना करण्यातील जरब वाखाणण्याजोगी आहे. आजही मोलकरीण हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय !

संध्याकाळी दमून-भागून आलेली आई मात्र अगदीच वेगळी वेगळी वाटायची मला तिच्या सकाळच्या रुपाच्या तुलनेत... शांत, सगळ्यांच सगळ ऐकून घेणारी...भविष्याचे बेत आखणारी हास्य-विनोदात सामिल होणारी तरीही 'सातच्या आत घरात' हा तिने घालून दिलेला दंडक आम्ही पाळतोय की नाही यावर करडी नजर ठेवून असणारी !

वयाच्या १८ ते ५८ वर्षांपर्यंत नोकरी करणा-या आईच वेळापत्रक पूर्णतः बदललय सध्या, ती आता टी.व्ही च्या मालिकांमधे जास्त रमते आजकाल...बाबांच्या माघारी तिच संसारातल लक्षही बरच कमी झालय आताशा... तिच हे शांत-निरागस रुप पाहून ब-याचदा मलाच भड-भडून येत

शेवटी एवढच म्हणावस वाटत...

जिवापाड आईस सांभाळताना
तिची मायही लागते मीच आता !!!

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझलेकडून एकदम गद्याकडे? शीर्षकावरून एखादी नवी गझल असेल असे वाटले होते.
पण, गद्य असलं तरी भाषा ओघवती आहे..छान लिहिलंय.

Dhanywad mandali ! Vyaktichitran karanyacha pahila
vahila prayatn . Suchananche swagat !!!

प्रमोदरावांशी सहमत, ओघवते लेखन, शेवटचे दोन पॅरा छान झाले आहेत.

जिवापाड आईस सांभाळताना
तिची मायही लागते मीच आता !!!<<< शेर मस्त.

शुभेच्छा! Happy

आवडले !

प्रतिसादातून मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

देव काका, बेफिजी (विशेष) Happy

-सुप्रिया.

छान लिहिलं आहे.

ऑफिसला जायच्या आधी तासभर पडी खाण्याची कल्पना मला खूपच आवडली. एकदम फ्रेश वाटत असेल.

सुप्रिया, कसं मिसलं हे मी..
छान उतरलय. अगदी जीवाभावच्या माणसाचं लिहिताना किती अपुरं वाटत रहातं नै... पण हे नं अगदी सहज सकळ उतरल्यासारखं आलय. त्या शेवटच्या दोन ओळी अगदी अगदी भिडल्या...
हे आढ्याचं पाणी वळचणीला जाणं किती महत्वाचं, सुखाचं... अगदी शरीर, मन-बुद्धी.. अन कदाचित आत्माही... ह्या सगळ्या-सगळ्याला वेढून टाकणारी एक कृतकृत्यतेची भावना... उरीशिरी वागवते आहेस... तुझ्या आईला तिच्या अन तुला ह्या नव्या आईपणासाठी... खूप खूप शुभेच्छा. तुम्हा दोघींचा हा प्रवास अत्यंत समाधानाचा, समृद्धं अन आरोग्यसंपन्नं असो.

हे दाद !

अश्या मनापासूनच्या शुभेच्छांची अतोनात गरज भासतेय या क्षणी. तस रहाटगाडग्या विरुध्द जाणे म्हणजे 'हे भलते अवघड असते' पण खरोखर जी आत्मीक शांती मिळतेय दोघींनाही यातून ती जगण्याच बळ देवून जातेय.
आपल्यासाठी ही लोकं झटलीयत ग आयुष्यभर...आपले काही दिवस त्यांच पालकत्व स्विकारण्यात गेले तर सत्कारणीच लागतील ख-या अर्थाने ! हो न? Happy

मनापासून धन्यवाद सगळ्यांचेच !

-सुप्रिया.

Pages