समर कूलर......मॅन्गो पाइनॅपल

Submitted by मानुषी on 19 May, 2013 - 00:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ आंबे, अननसाचे ७/८ स्लाइसेस, पुदिन्याची १२/१५ पाने, काळं मीठ(सैंधव), १ लिंबू, २ चमचे साखर, पाव चमचा जिरा पावडर, चिल्ड पाणी, बर्फाचा चुरा .

क्रमवार पाककृती: 

चांगले पिकलेले २ हापूस आंबे घ्या. त्यातल्या दीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा.
अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दोन स्लाइसेस सजावटीसाठी वगळा. पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बोटानीच थोडी चुरडा.
आता मिक्सीच्या लिक्विडायझरमधे एका आंब्याच्या फोडी, अननसाचे तुकडे, चुरडलेली पुदिन्याची पाने, पाव चमचा जिरा पावडर, एका लिंबाचा रस, अर्धा चमचा सैंधव असं सगळं घालून थोडा वेळ मिक्सी चालवा. याची संपूर्ण बारीक पेस्ट करायची नाही. एक तर आपण लिक्विडायझरमधे हे करत असल्याने तशी पेस्ट होणारही नाही. पण ही काळजी घ्यावी. कारण हे पेय स्मूदीच्या कन्सिस्टन्सीचं नाही. हे पातळ असं तहान भागवणारं (क्षुधाशामक)आणि पाचक असं पेय आहे.
आता यात चिल्ड पाणी ओता. यात साधारण २ उंच चषक भरून(टॉल ग्लासेस) पेय होणार आहे.
त्या अंदाजाने पाणी घाला. पुन्हा मिक्सी काही सेकंद फिरवा.
आता दोन उंच चषक(टॉल ग्लास))घ्या. तळाशी बर्फाचा चुरा घाला त्यावर हे मिक्सीत फिरवलेलं पेय ओता.
आता वगळलेल्या आंब्याच्या छान छोट्या छोट्या चौकोनी फोडी(क्यूब्ज) करा. व एक फोड एका ग्लासला लावण्यासाठी आडवी चीर देऊन तयार ठेवा.
अननसाचेही असेच छोटे चौकोनी तुकडे करा. एका छोट्या तुकड्याला आडवी चीर देऊन ग्लासाला लावण्यासाठी तयार ठेवा.
आता दोन्ही ग्लासात ओतलेल्या पेयावर आंब्याचे आणि अननसाचे तुकडे अलगत सोडा. जे छान वरच तरंगतील.
आता एका ग्लासाला अननसाची आडवी चीर दिलेली फोड खोचा.
दुसर्‍या ग्लासाला आंब्याची चीर दिलेली फोड खोचा.
समर कूलर तयार आहे.
यात अननस, आंबा, पुदिना या सर्वांची वेगवेगळी आणि एकत्रित अशी छान चव लागते.
यात आवडत असल्यास थोडा आल्याचा रसही छान लागतो.
माझ्याकडे बर्फासाठी मिक्सर लावेपर्यंत लाइट गेल्याने मला फ्रिजमधे असलेल्या तयार बर्फाच्या क्यूब्जवरच भागवावं लागलं.

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी.
माहितीचा स्रोत: 
टीव्ही
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर कू>>>>ल वाटलं...

मस्त ं मस्तं गारेगार..
एक टिप.. हे पेय थोडे एक्स्ट्रा बनवून बर्फाच्या ट्रे मधे ओतावे. या पेयाचे आईस्ड क्यूब्ज तयार होतील तेच बर्फाऐवजी वापरावे म्हंजे बर्फ वितळल्यावर पाणचट चव न येता पेयाची ओरिजिनल चव बरकरार राहते.. ट्राईड अँड टेस्टेड ट्रिक.. Happy

छान दिसत आहेत दोन्ही कमनीय बांधा असलेले काचेचे प्याले Happy

फ्रिजमधले गार पाणी प्यायल्यानी पचनाला वेळ लागतो. त्यापेक्षा माठातले गार पाणी वाळा घातलेले प्यायले असता रक्त शुद्ध होते आणि भरपुर प्राणवायु मिळण्यास मदत होते.

मस्त ! दिसायलाच इतके छान दिसते तर चवीला किती मस्त लागेल! अननस+ संत्र याची चव चाखली आहे. पण अननस्+आंबा चव चाखली नाही कधी. आता नक्कीच करुन बघेन.

सगळं सामान घरात आहे. संध्याकाळपर्यंत उत्साह टिकल्यास करणेत येइल Happy

अरे वा! सगळ्यांना धन्यवाद! अप्रतीम चवीचं आणि खरंच क्षुधाशामक असं आणि करायला सोप्पं असं पेय आहे.
आम्ही सध्या रोज दुपारी हे घेतो. नगरात सध्या प्रचंड उकडंबा आहे.
हो आणि बी म्हणतात त्याप्रमाणे कमनीय बांध्याच्याच प्याल्यातून प्राशन करणे! चव वृद्धिंगत होते!

सगळं सामान घरात आहे. संध्याकाळपर्यंत उत्साह टिकल्यास करणेत येइल, + १००००,
दिवसभर फोटो बघत राहणार म्हणजे घरी जाउन करेपर्यन्त उत्साह टिकुन राहिल. खुप छान दिसतायत ग्लास, कृती अणि फोटो दोन्ही छान.

झकास दिसतय. ग्लासेस मस्त.
काळं मीठ सोडुन सगळं काही आहे घरात. साधे मीठ चालेल का?

सुप्पर कुल Happy

एक टिप.. हे पेय थोडे एक्स्ट्रा बनवून बर्फाच्या ट्रे मधे ओतावे. या पेयाचे आईस्ड क्यूब्ज तयार होतील तेच बर्फाऐवजी वापरावे म्हंजे बर्फ वितळल्यावर पाणचट चव न येता पेयाची ओरिजिनल चव बरकरार राहते.. ट्राईड अँड टेस्टेड ट्रिक..>>टिप पण लई भारी

या पेयाचे आईस्ड क्यूब्ज तयार होतील तेच बर्फाऐवजी वापरावे >>> अशा क्युब्स लेमनेडमध्ये घालून सर्व्ह केल्या तरी छान लागतात. दिसायला पण खूप छान दिसतो तो प्रकार.

मला अननस आवडत नाही, आंब्याबरोबर इतर कोणतं फळ चालेल?
कलिंगड चालेल का?

दक्स.............मला वाटतं की कलिंगडापेक्षा संत्र चांगलं लागेल.
तेही संत्र्याचा थोडा रस आणि थोडा गर असं छान लागेल. करून बघ.