सांस्कृतिक बोधकथा

Submitted by खटासि खट on 18 May, 2013 - 00:25

एकदा देव प्राण्यांवर प्रसन्न झाला. प्राण्यांनी देवाकडून माणसासारखं आयुष्य मागून घेतलं. मग त्यांनी गावं, नगरं वसवली. पक्की घरं बांधली. माणसाप्रमाणेच प्राणीही लिहू वाचू लागले. विविध कलाविष्कार सादर करू लागले, आत्मसात करू लागले. खरंतर या गोष्टीलाही आता बरीच वर्षं उलटून गेली होती.

पण देवाने वरदान देताना मूळ गुणधर्म तसेच ठेवले होते. म्हणूनच हरीण, चितळ, जिराफ आदी शांत प्राण्यांनी कोकिळेकडून शांतपणे गाणं शिकून घेतलं तर मोराकडून नृत्य. ज्यांना शिकायला जमले नाही ते उस्फूर्त दाद देत आपली इतर क्षेत्रातली प्रगती साधून घेत होते. हत्तीदादांनी खेळामधे प्राविण्य मिळवले होते. वेटलिफ्टिंग, कुस्ती यात मेडल्स मिळवली होती. वाघ सिंहासारख्या प्राण्यांनी गुंडगिरी चालूच ठेवली होती आणि पुढारीपण आपल्याकडे घेतले होते. चौकाचौकात त्यांचे फ्लेक्स झळकत होते. शुभेच्छुक म्हणून कोल्हे, लांडगे, कावळे, तरस, रानडुक्कर, भटकी कुत्री अशा प्राण्यांचे फोटो असल्याने त्यांनाही महत्व प्राप्त झाले होते.

शांत प्राणी फ्लेक्सप्राण्यांच्या जास्त जवळही जात नसत आणि त्यांच्याशी शत्रूत्वही घेत नसत. चौकातून येता जाता होणा-या शेरेबाजीकडे ते दुर्लक्ष करीत असत. त्यांनी आपापला विकास चालूच ठेवला होता. अशाच एका गावात एकदा शांत प्राण्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह उभारले होते. तिथे विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. एका रसिकाने तिथे गुळाचे दुकान लावले होते. चांगल्या कार्यक्रमानंतर तो उपस्थितांना गूळवाटप करून प्रोत्साहन देत असे. तिथे गायनाचे कार्यक्रम यशस्वी हो‌ऊ लागल्याने देशोदेशीचे चांगले गायक तिथे येत. हत्तींनी देखील हल्लीच रागदारीमधे प्राविण्य मिळवले असल्याने कार्यक्रमाला भारदस्तपणा लाभला होता.

पुढा-यांच्या चमच्यांना हे पाहवेना. शांत असलेले इतर प्राणी त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या अंगाचा तीळपापड होतच होता. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ करायला सुरूवात केली. मागच्या रांगेत बसून ते व्यासपीठावरच्या कलाकारांची टर उडवू लागले. मात्र सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत प्राण्यांनी तिकडेही दुर्लक्ष केल्याने चडफडण्यावाचून त्यांच्या हाती काहीच उरले नाही.

आता त्यांनी नवीच चाल खेळली. सभागृहाभोवती त्यांनी कचरा टाकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसात तिथे एक उकीरडा बनला. उकीरड्याबरोबर त्यात लोळणारे एक गाढवही आले. त्या गाढवाला कच-यात लोळताना पाहून चमच्यांनी त्याला सभागृहातही लोळण घे असा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते गाढव एकदा स्टेजवर पोहोचले. संयोजकांनी रागरंग ओळखून आपल्याकडे आता गाढवही गाणं शिकायला आलंय असं सांगून वेळ मारून नेली. पण चमचे वस्ताद होते. त्यांनी तिथेच गाढवाचं गाणं ऐकवा असा गलका केला. त्यावर संयोजकांनी त्याला शिकण्यासाठी वेळ मिळावा अशी विनंती केली. तीन महिन्यांनी गाढवाचं गाणं सादर व्हावं असा तोडगा निघाला.

आता संयोजकांनी आव्हान म्हणून गाढवाला गाणं शिकवायला सुरूवात केली. गाणं शिकण्या‌आधी गाढवाचा सांस्क्रुतिक कायापालट होणं गरजेचं होतं. हे काम मोराने आनंदाने स्विकारलं. त्याने आणि एका चितळाने गाढवाचे गुण सोडून देण्यासाठी गाढवाला तयार केलं. गाढवालाही आपण आपली वर्तणूक सुधारायला हवी हे पटलं, ते आता सॉफिस्टिकेटेड गाढव बनलं. हत्तीने त्याला आणखी प्रोत्साहन दिलं. परिणामी गाढव चांगलं गायला लागलं. त्याच्या आवाजातलं रेकणं पूर्णपणे थांबलं. एकाच महिन्यात गाढवाने चांगली प्रगती केली. पुढच्या महिन्यात गाढवाने संगीतावरचं असेल नसेल ते सर्व साहीत्य वाचून काढलं. जोडीला रियाजही ठेवला. आता गाढवाचा कायापालट झाला, आपण गाढव होतो हे ते विसरून गेलं. तीन महिन्यांनी गाढवाच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. चमचे होणा-या फजितीसाठी खुषीत आले होते. पण झाले भलतेच. कार्यक्रम असा काही रंगला कि बस्स. गाढवही आता सभ्य प्राण्यांच्या पंक्तीला ये‌ऊन बसले. संयोजक अतिशय खुषीत होते. गाढवही सभ्य हो‌ऊ शकतं तर आपण का नाही असं चमच्यांनाही वाटू लागलं.

मग कुणी पाहत नाही हे बघून त्यांनी हळूच गाढवाला आम्हालाही गाणं शिकव अशी विनंती केली. गाढवाने मोठ्या आनंदाने ती मान्य केली. आपल्याकडे कुणी शिकायला येतंय ही भावनाच त्याला सुखावणारी होती. या‌आधी त्याच्या नशिबात उकीरड्यात लोळणे, लोकांची बोलणी खाणे, दगडाचा मार खाणे आणि व्रात्य मुलांकडून शेपटीला फटाके बांधून घेणे असंच सगळं घडलं होतं. आता मिळणारा मानमरातब पाहून ते सुखावले. सभ्य प्राण्यांप्रमाणे ते वागू बोलू लागले. अत्यंत नम्र होण्याचा प्रयत्न करीत ते उत्तरं दे‌ऊ लागले. पण कुठेतरी त्याच्या मनात मूळ स्वभावाप्रमाणे आपल्याकडून अचानक रि‌अ‍ॅक्शन दिली जा‌ऊ नये ही भीती असायचीच. कधीकधी ती उर्मी अनिवार व्हायची. पण तसं काही केलं कि हे आपलं स्टेटस जा‌ईल याचीही भीती त्याला वाटत होती.

हळूहळू कावळा, लांडगा, तरस, रानडुक्कर, भोकर, साळींदर गाण्यात तयार हो‌ऊ लागले. गाण्यावर ते चर्चा करू लागले. सभ्य प्राणी मात्र त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसत. संयोजकांनी गाढवालाही त्यांच्यापासून लांब रहायला सुचवून पाहीले. मात्र गाढव या चमच्यांमधे सर्वच दृष्टीने सरस ठरत असल्याने गाढवाला त्यात आनंद वाटत असे. हळूहळू गाढवाला आपण सर्वज्ञ आहोत असं वाटू लागलं. त्याचं वर्तुळ मर्यादीत झाल्याने आणि ते म्हणेल त्याला मान डोलावणारा श्रोतृवर्ग त्याला लाभल्याने त्याचा अहं सुखावू लागला. पुढे पुढे आपल्याकडे आहे तेच ज्ञान अंतिम असा त्याचा ग्रह झाला. आपण जे ऐकले नाही ते खरे नाही असं त्याला वाटू लागले. गाढवास आता वादविवादाचीही सवय लागली. वादामधे जिंकल्यास पांडीत्य सिद्ध होते असं त्याला वाटू लागले. सभ्य वर्तुळातल्या चर्चेत भाग घे‌ऊन थोड्याच वेळात ते त्यास वादविवादाचे स्वरूप दे‌ई. आपण बोलत असलेला प्रत्येक शब्द विद्वत्ताप्रचुर असल्याचा भास त्याला होत होता. विरूद्ध मत आवाज चढवून ते खोडून काढत असे. हळूहळू सांस्कृतिक सभागृहापुरताच त्याच्याशी संबंध ठेवावा असं हरीण, काळवीट, चितळ, जिराफ असे प्राणी म्हणू लागले. हत्तीने वेट अ‍ॅण्ड वॉच अशी भूमिका घेतली.

काही दिवसांनी चमचेही सभाग्रूहात आपले कार्यक्रम सादर करू लागले. सभ्यगणांनी त्यांचेही कौतुक मनापासून केले. झालं, चमचेही हुरळून गेले. यश पचवायची ताकद त्यांच्यात नव्हतीच. त्यातच चमच्यांनाही आता गाढव्च्या सवयी लागल्या होत्या. ते ही स्वतःला सॉफिस्टिकेटेड समजू लागले होते. मात्र गाढव हेच त्यांचे गुरू असल्याने गुरूचे काही गुण अधिक मूळचे गुण अशा विविध गुणांचे दर्शन आता अशा कार्यक्रमात होऊ लागले. गाढव आता सभागॄह आपल्य़ासाठीच आहे अशा थाटात वाटेल तेव्हां आणि वाटेल ते कार्यक्रम सादर करू लागले. सुरूवातीला गुणग्राहकांनी दाद दिली. पण रोजचेच झाल्यावर त्यांना कंटाळा येऊ लागला. इकडे गाढवाने समज करून घेतला कि सभ्यगण शिष्टपणा करताहेत. मग चमचेकंपनी आणि गाढवाने एकमेकांची पाठ खाजवायचा कार्यक्रम सुरू केला.

अधून मधून मूळचे कलाकार आपली कला पेश करत. पण गाढव आता सांस्कृतिक विभागाचे सर्वेसर्वा असल्याप्रमाणे कार्यक्रम चालू असतानाच माईकवरून कलाकाराचे जाहीर वाभाडे काढू लागले. मीच कसा शहाणा हे दाखवू लागले. झालं चमच्यांनीही गुरूचा आदर्श गिरवायला सुरूवात केली. चमचे तर बोलून चालून चमचेच. त्यात त्यांचे पुढा-यांशी संबंध असल्याने सभ्य प्राणी तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्याप्रमाणे सगळा प्रकार मुकाट्याने सहन करीत होते. आता गाढवाच्य़ा मताविरुद्ध कुणी काही बोलले कि चमच्यांकडून त्याला कोप-यात घेण्याचा नवाच सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. शहाण्या प्राण्यांनी सभागॄहाकडे फिरकणं बंद केलं.

एक दिवस मात्र आश्चर्य घडलं. दूरवरच्या गावावरून आणखी एक गाढव सभागृहात आल आणि गाऊ लागलं. पहिल्या गाढवाने त्य़ाची स्तुती केली. त्याबरोबर आलेलं गाढव हुरळून गेलं. मग ते रोज येऊ लागलं. आपलं गाणं झालं कि ते निघून जात असे. काही दिवस असं झाल्यावर चमच्यांपैकी काहींनी आमचंही गाणं ऐका अशी नव्या गाढवाला गळ घातली. नव्या गाढवाने त्यातल्या एकाचं गाणं ऐकलं मात्रं , ते कडाडलं. त्याने गाण्यात असंख्य चुका काढून दाखवल्या आणि हे गाणं कसं गायचं त्याचं प्रात्यक्षिक सादर केलं. हे पहिल्या गाढवाने पाहीलं ते चिडलं. त्याने नव्या गाढवाला आव्हान दिलं. त्याबरोबर नव्या गाढवाने काही पुरावे दिले. जुन्या गाढवाने चिडून जाऊन ज्याचे पुरावे तुम्ही सादर करता आहात ते गाढव असलं पाहीजे असं खळबळजनक विधान केलं. त्याबरोबर नवं गाढवही चिडलं. खरं म्हणजे आपण दोघेही मूळचे गाढवच आहोत हेच ते विसरले होते.

मग तू तू मै मै सुरू झालं. हे रोजचंच झालं. आता नव्या गाढवाला जुनं गाढव त्याच्या चमच्य़ांसहीत घेऊ लागलं. त्याला एकदा वाघाकरवी गावाबाहेरही काढलं. पण ते बाहेर गेल्यावर यांनाच चुकल्याचुकल्यासारखं वाटू लागलं. आपल्या अस्वस्थतेचं कारण त्यांना समजेना. इतक्यात तिथे एक घोडा आला. त्याने गाणं गायला सुरूवात केली मात्र, चमचे आनंदाने नाचू लागले. हेच आपलं नवं गाढव हे त्यांनी तत्क्षणी ओळखलं. आणि मग पुन्हा एक भीषण दंगल सुरू झाली. पुन्हा तू शहाणा कि मी शहाणा हा खेळ रंगला. या खेळादरम्यान भान सुटून नवं गाढव लोळू लागलं. ते पाहून जुन्या गाढवाचीही दाबून टाकलेली उर्मी उफाळून वर आली आणि ते ही लोळू लागले.

गुरुजी लोळू लागल्याबरोबर चमचेही लोळू लागले. अशा रितीने सभागॄहातच उकीरड्याचं सुख गाढवाला मिळू लागलं. या भांडणांना वैतागून गूळवाल्याने आपलं दुकान बंद करून टाकलं.

एक दिवस एक हरीण सभागृहाकडे पाहून रडत होतं. ते पाहून जिराफाने त्याला रडण्याचं कारण विचारलं. हरणाने सभागृहाकडे बोट दाखवून हुंदके द्यायला सुरूवात केली. रडत रडत त्याने गूळाचा खाऊही बंद झाल्याची तक्रार केली. जिराफ हसलं आणि म्हणालं ये माझ्या मागून !

हरीण त्याच्या मागून चालत गेले. जिराफ त्याला नदीकिनारी घेऊन गेलं आणि हरीण उड्या मारू लागलं. नदीकिनारी आमराईमधे एक मैफल भरली होती. मोराचे नृत्य चालू होते, कोकिळेचा स्वर लागला होता. हत्ती ढोलकी वाजवत होता तर लांडोर वीणावादनात तल्लीन झाली होती. एक म्हातारं अस्वल चित्र काढण्यात गर्क होतं. हरणाला आता पुन्हा जिवात जीव आला आणि क्षणार्धात ते त्या सभेचा एक भाग झालं.

सभागृहाकडे आता यातलं कुणीच परतणार नव्हतं.

- आपला नम्र

खट

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडली बोधकथा. जमून आली आहे. ( कोणावर बेस्ड आहे त्याचे आकलन झाले नाही. पण त्यामुळे फरक पडणार नाही.)

मंडळी,
मी पण वेंधळा. महत्वाचं सांगायचंच राहीलं.

गूळवाल्या सशाचं दुकान आता आमराईतच आहे. एका झाडाखाली त्याने दुकान थाटलं आहे. छान परफॉर्मन्स झाला कि आनंदाने तो गूळवाटप करतो. आता सगळे आनंदात आहेत.

छानाय!

पॅरॅलल्स (काढायचेच झाले तर) बर्‍याच गोष्टींशी काढता येतील, काही अर्धवट, काही पूर्ण.

खट हॅट ऑनः

सुरुवातीचा भाग होमिओ...
पूर्ण न झालेला भाग केजरीवाल (म्हणजे त्यांची स्कीम)
पूर्ण कथा मायबोलीबद्दल नसली म्हणजे झाले ...

ही खट हॅट निघत का नाही?

आवडलीच Happy कुणावरही बेस्ड असली तरी त्यात कुणावर सुड उगवण्याचा अविर्भाव लिखाणात दिसत नसल्याने शेवटपर्यंत वाचावीशी वाटली. ह्यात जो बोध घ्यायचा आहे तो नविन नाही, पण परिणामकारकरित्या या कथेत तो अधोरेखित केला गेला आहे. सुसंगती, क्षमाशीलता, तुटे वाद संवाद तो हितकारी, सत्य, प्रेम, आनंद are the points to be noted, atleast for me.

खख,

मस्त कथा आहे. कुणावर बेतलेली आहे ते कळत नाही. पण सभागृह म्हणजे भारताची संसद हे उघड दिसतं. म्हणूनच शेवट आवडला.

आ.न.,
-गा.पै.

>>> ( कोणावर बेस्ड आहे त्याचे आकलन झाले नाही. पण त्यामुळे फरक पडणार नाही.) <<<<
मला तरी मायबोलीवरच आधारीत आहे असे भासले, (अन असेही भासले की आपणही "एक गाढवच" तर नै ना? Wink )

भट्टी झकास जमलीये, वाक्यरचनेत अजुन थोडी सफाई मात्र हवी होती.

अंड्याचा मायबोलीवर कधीतरीच फेरफटका असला तरी त्याला समजली ही गाढव कहाणी.

खरीखोटी पार्श्वभूमी माहित नसल्याने नो कॉमेंटस, मात्र जे काही आहे, लिहिलेय चांगले. Happy

@खटासि खट | 30 May, 2013 - 09:49

कोणत्याही चांगल्या संस्थेत [अनुकूल काळाची वाट पाहात थांबलेली ] खोटि नाणी शिरकाव करून चांगल्या नाण्यांना हुसकावून लावतात हा सार्वत्रिक अनुभव मांडला आहे असे वाटले. कथा बर्‍यापैकी जमली आहे; पण शेवट आशावादी करण्याचा प्रयत्न कृत्रीम वाटला. व्यवहारात अशा अनुभवाने चांगली माणसे बव्हंशी निराश होतांना दिसतात,

हे लिखाण आपल्यावर आहे असं वाटलं तर काय करायचं याचं उत्तर अनुपस्थितीवरून मिळालं. अनेक दिवसांचं अज्ञान दूर झालं.