काश्मिर – १

Submitted by vaiju.jd on 16 May, 2013 - 12:22

॥ श्री ॥
अठ्याऐंशी साली मे महिन्यात आम्ही काश्मिरला गेलो. मी, नवरा आणि पाहिलीतून दुसरीत गेलेला मुलगा. बरोबर सांगलीचे मोठे दीर, जाऊ, त्यांच्या दोन मुली, भाऊजींचे दोघे मित्र फॅमिलीसह अशी तेरा माणसे. श्रीनगरमध्ये आम्ही उतरलो ते हॉटेल बंगाली होते. जेवणात माश्याचे पदार्थ मुख्यत्वेकरून मिळायचे. आम्ही देशपांडे मंडळी शाकाहारी. रात्री जेवायला बाहेर जायचे असे ठरवले. पहीले दोनतीन दिवस बरोबर नेलेल्या गोड पोळ्या, परोठे पुरले. मग बाहेर जेवणे क्रमप्राप्त झाले.

आमच्या हॉटेलपासून अगदी जवळच 'दाल सरोवर' होते. आणि या सरोवराच्या काठावर 'दाल-गेट' नावाचे एक रॆस्टॉरंट होते. दिवसभर कुठेकुठे फिरून आल्यावर रात्री चालत जायला जवळ म्हणून 'दाल-गेट' ला जेवायला जायचो. एक अगदी डुगडुगता, गैरसोयीचा जिना, खाली जिन्याजवळ बऱ्यापैकी केरकचरा पण जायला सोयीचे म्हणून तेच पकडले होते.

पहिल्या दिवशी गेलो तेव्हा लक्षात आले, थोडेसे जुन्या पद्धतीचे, घरासारखेच ते होते. खास दिखाऊ रंगरंगोटी नसलेले, भिंतीवर काही काश्मिरी वस्तुंची केलेली सजावट, छोटासा घरगुती हॉल असल्यासारखे. आतल्या बाजूला किचन. दोनतीन तरुण मुलगे काम करत होते. डोक्यावर वाटीसारख्या आकाराच्या विणलेल्या टोप्या. मंद आवाजात काश्मिरी संगीत सुरु होते.

आम्ही दोघे मुलाला घेऊन जाऊन बसलो. जेवण काश्मिरी असल्याने थोडे तिखट लागले मुलाला. एका काम करणाऱ्या मुलाला बोलावले आणि गोड काय मिळते म्हणून विचारले. तसा काऊंटरवरचा रॆस्टॉरंटचा मालक असलेला तरुण जवळ आला. सगळी काश्मिरी माणसे नाकीडोळी सुरेख, रंगानी गुलाबी गोरी देखणी दिसतात. तसाच तो मुलगा होता. असेल पंचविस एक वर्षाचा. तो जवळ आला तसे त्याला गोड काही मिळेल कां? विचारले.

तो म्हणाला, "क्यूँ नहीं हुजुर, जरूर मिठा मिलेगा, एक आयेगा जिसमें सेवाईयॉं केसर और ड्रायफ्रुटस दूध के साथ आयेगा और दुसरां फ़लोंका आता हैं इसमे अॅपल, आयेगा, स्ट्रॉबेरीज होंगे. थोडा दही शक्कर डालके होगा. कौनसा चाहिये?"

"ठीक हैं, सेवई लाना, जरा जल्दी हां|’

तो आत गेला. ते त्याचे घरच असावे. आतले किचन घराचेच किचन असावे.

"मॅडम दसपंदरा मिनट लगेंगे जी"

"ठीक हैं, भाईसाब कोई हिन्दी गाना सुन सकते हैं?"

"जी हां मेमसाब, क्यूँ नही! कौनसा चाहीए, आशा, लता, रफि?"

"कोई भी चलेगा हिन्दी चाहिये"

त्याने हिन्दी गाणी लावली. एकवार आमच्याकडे पाहून ठीक आहे ना असे नजरेनेच विचारले.

तोपर्यंत गोड खाऊही आला. जेवण छान झाले. निघताना त्याला तसे सांगितले. गाणी लावण्याचे 'धन्यवाद'ही दिले.तो खूष झाला.

मग होतो तोपर्यंत रोजच जेवायला जात राहीलो. दुसऱ्या दिवसापासून आमचे जेवण कमी मसालेदार असायचे. रोज गोड खाऊ मुलासाठी सांगायचो. आमचे ठराविक टेबल सजवलेले असायचे. त्यावर फुले ठेवलेली असायची. आम्ही दिसलो की हिन्दी गाणी लावलेली असायची. आणि तो तरुण मालक आणि काम करणारी मुले सर्वांच्या चेहेऱ्यावर ओळखीचे हसू असायचे. तिसऱ्या दिवशी जायला जर उशीर झाला तर पोहोचल्यावर तो मुलगा म्हणाला, " अभी हम सोच ही राहे थे की गाना सुननेवाली मॅडम क्यूँ नही आयी!" थोड्या वेळाने दोनेक वर्षाचा गोबऱ्या गालाचा, गोड मुलगा घेऊन आला आणि म्हणाला, "ये हमारे शाहजादे हैं।" अचानकच दिसल्यामुळे काही देताही आले नाही.

पांच दिवसातले चार दिवस गेलो पण पण शेवटच्या दिवशी पेहेलगामहून येताना गारठ्याने मुलाला ताप आला. त्यामुळे हॉटेलच्या बाहेरच पडता आले नाही. त्यामुळे 'दाल-गेट'ला जाता आले नाही. त्या तरुणाचा, काम करणाऱ्या, माझ्या मुलाशी लाडाने गप्पा मारणाऱ्या त्या मुलांचा निरोप घ्यायचा राहून गेला. रुखरुख वाटली, पण मुंबईत आल्यावर रोजच्या व्यापात सगळ्याचाच विसर पडला.

अन् एके दिवशी वर्तमानपत्रात अगदी त्रोटक एक बातमी होती. दाललेकच्या काठावरच्या एका रॆस्टॉरंटमध्ये गोळीबार झाला.कुठल्याश्या काश्मिरी अतिरेकी संघटना आणि पोलिसांच्या चकमकीत अतिरेकी रॆस्टॉरंटमध्ये लपले. आणि पोलिसांनी केलेल्या प्रतिकारामधे काही काश्मिरी तरुण ठार झाल्याची बातमी वाचली.आणि 'दाल-गेट' रॆस्टॉरंट

आठवले. ही घटना तिथे झाली नसेल नां? तो 'गाना सुननेवाली मॅडम' म्हणणारा गोरा, नाकेला तरुण, तो सुखरूप असेल नां? परत केव्हातरी जाऊ तेव्हा त्याला नक्की भेटू. खुशाली विचारू, अशा असंख्य विचारांनी जीव कासावीस झाला.

पण अठ्याऐंशी मेमध्ये आम्ही गेलो होतो. त्यानंतर काश्मिर संवेदनाक्षम प्रदेश म्हणून प्रवासी लोकांसाठी बंद झाला.

काळाच्या ओघात भावना बोथट होतात आठवणींच्या मौल्यवान नक्षीदार मोत्यांवर दिवसांच्या गाठोड्यांची रास साठत राहते. मग वरची ओझी हलवून तळातले काही तपासायचे राहून जाते, राहून गेले.

आणि पुन्हा एकदा काश्मिरला जाणे अजून तरी जमले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< 'गाना सुननेवाली मॅडम' >> सुंदर लिहिले आहे. शिर्षकावरुन वाटले मस्त मालिका सुरु झाली.

सुरेख लिहिलंय. अगदी गप्पा मारल्यासारखं. पुढचा भाग लवकर टाका. नुकताच "काश्मिरला जायचं का नाही" ह्यावर आमच्या घरी खल झाला. आणि 'कशाला उगाच विषाची परिक्षा घ्या' अश्या निष्कर्षावर येऊन थांबला. Sad कधी काळी गेलेच तर तुमचं 'दाल-गेट' रॆस्टॉरंट आहे का हे मात्र नक्की पाहेन.

काश्मिर ला नक्कीच जा.........त्यात काय आहे... मी या जानेवारी मधे भर थंडीत गेलेलो होतो

मी आताच जाउन आले दल सरोवराच्या परिसात्च राहले होते पण मला दाल- गेट नावाचे रॆस्टॉरंट नाही दिसले

छान लहीलेय. Happy

एके दिवशी वर्तमानपत्रात अगदी त्रोटक एक बातमी होती. दाललेकच्या काठावरच्या एका रॆस्टॉरंटमध्ये गोळीबार झाला.कुठल्याश्या काश्मिरी अतिरेकी संघटना आणि पोलिसांच्या चकमकीत अतिरेकी रॆस्टॉरंटमध्ये लपले. आणि पोलिसांनी केलेल्या प्रतिकारामधे काही काश्मिरी तरुण ठार झाल्याची बातमी वाचली.आणि 'दाल-गेट' रॆस्टॉरंट>>>>>>>>> Sad