केस पांढरा (तरूण कविता !)

Submitted by रसप on 16 May, 2013 - 05:14

पुन्हा पुन्हा मी भांग पाडतो
केस पांढरा तरी न लपतो
मनात अजुनी विशीतला मी
हा नालायक वय दाखवतो !

प्रवासात शेजारी माझ्या
असते जेव्हा सुंदर तरुणी
डोळ्यांवर गॉगल लावुन मी
चोरुन बघतो नजर फिरवुनी
संवादाच्या सुरुवातीला
तीही हसते, मीही हसतो
मग ती म्हणते 'अंकल' जेव्हा
सारा उत्साहच गळपटतो
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो

फेसबूकवर चिकना मुखडा
मित्र विनंती मला पाठवे
जुन्या काळची अवखळ वृत्ती
क्षणात फिरुनी मनी जागवे
त्या ललनेशी चॅट कराया
असा उचंबळ दाटुन येतो
आणि तिचा संदेश वाचता
सुरुवातीला 'दादा' असतो !
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो

किती जरी दिलफेक वागलो
जाणिव एकच मनात असते
गेले आता ते दिन गेले
फिरून त्यांचे येणे नसते
पिकल्या केसाला ना औषध
तरुण मनाला मी सावरतो
जरी उधळले मनात वारू
लगाम घालुन मी आवरतो
मनात अजुनी विशीतला मी
केस पांढरा वय दाखवतो..

....रसप....
१६ मे २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post_16.html

डिस्क्लेमर: ही व्यथा माझी नसून हा दुसर्‍यांच्या हृदयाच्या चुकल्या ठोक्यांचा हिशेब लावायचा प्रयत्न केला आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबराट !!!

जाम मजा आली
Happy
________________

तरी तू नशीबवानय्स रे बाबा आमच्याकडे तर विमानतळ तयार झालय Lol

व्वा ! रणजित, वार्धक्याकडे झुकणार्‍यांची व्यथा मस्त मांडल्येस.
बर्‍याच लोकांना फार छळतात हे पांढरे केस.

(अवांतर : या बर्‍याच लोकांमधे मी नाही...... माझी केस वेगळी आहे..... :))

कलप करत जावे
पुन्हा आरशात पहावे
मुखी रोज म्हणावे
गेले ते दीन गेले (पांढर्या केसांचे)

कलप करत जावे
पुन्हा आरशात पहावे
मुखी रोज म्हणावे
गेले ते दीन गेले (पांढर्या केसांचे)

ब्येस कविता रसपभाऊ...!

आमच्या दोन ओळी येथे अर्पण!!

लाईन मारण्या जातो मी पण
केस पांढरा कडमडतो....
डिप्रेस होतसे फारच मन अन्
मी असंबद्धसा बडबडतो....!
कधी तिला कळणार कळेना
माझी येगळी आहे 'केस'
डिवचित आणि चिडवीत जाते..
पांढरा पाहूनी माझा केस..!!!

>> तरी तू नशीबवानय्स रे बाबा आमच्याकडे तर
विमानतळ तयार झालय<< Lol

माझ्याही २ ओळी Wink

त्या केसावरी लावता कलप जरी
मधे मधे 'तो' ना लपतो
एकेक जरी ही बट रंगविली
तरीही अवेळीच तो फडफडतो
कितीही रंगवा, जपा न दिसण्या
त्याला कुठे रंगाची चिंता
मूळ रुप घेतले पांढरेच त्याने
जिव गेला तरी तो ना जातो!!