नंद-यशोदा... नव्या युगाचे!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:29

नुकत्याच जन्मलेल्या आपल्या बाळाला मोठ्या विश्वासाने वसुदेव-देवकीमातेने गोकुळी धाडले आणि तिच्या ह्या विश्वासाला किंचितसाही धक्का न देता नंद यशोदेने श्रीकृष्णाचे मोठ्या मायेने पालनपोषण केले ही आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारी कथा. काळानुसार संदर्भ बदलले. गेल्या २-३ पिढ्यांपासून आई पण बाबांच्या बरोबरीने अर्थार्जनासाठी बाहेर जाऊ लागली. आपल्या लहानग्यांना एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे सोपवून आई वडील घराबाहेर निर्धास्त राहू लागले. जन्मदाती आई किंवा वडील नसताना मुलांचे प्रेमाने संगोपन करणारे हेच ते आधुनिक युगातील नंद यशोदा! मग ते घरातीलच आजी- आजोबा असतील, शेजारच्या काकू असतील, घरी येणारी एखादी मावशी असेल किंवा मग पाळणाघरातील ताई-दादा!

आपल्यापैकी बरेच जण आपली मुलं पाळणाघरात, आजी-आजोबांकडे, मावशी-काकांकडे सोपवून कामाला जातात. आपल्या मुलांचा दिवसभरातील बराचसा वेळ या व्यक्तींबरोबर जातो. साहजिकच त्यांच्यात आणि मुलांत आपोआपच एक भावनिक बंध तयार होतो. त्यातूनच काही कडुगोड अनुभवही येतात. नकळत आपल्यात आणि या केअरटेकर्समध्ये एक विश्वासाचे, मैत्रीचे नाते तयार होते.

आपली मुलेच नव्हे तर आपल्यापैकी कितीतरी मायबोलीकरसुद्धा अशा आजी-आजोबा, काकू-मावशी-आत्यांकडे वाढले असतील. त्यांनी भरवलेला गरम-गरम वरणभात, कधी हक्काने दिलेला धपाटा, आजारपणात घेतलेली काळजी अशा अनेक आठवणी अनेकांच्या मनात पिंगा घालत असतील.

आज मातृदिनाच्या निमित्ताने तुमच्या स्वत:च्या किंवा तुमच्या मुलांच्या ह्या 'नंद-यशोदे' बद्दलच्या ज्या मजेशीर,चांगल्या-वाईट, हळव्या आठवणी असतील त्या घ्या लिहायला! तसेच जर मुलांचे कुटुंबाबाहेरील व्यक्तींकडून/पाळणाघरांतून संगोपन होत असेल तर अशा व्यक्ती/संस्थांकडून उच्च प्रतीची सेवा मिळण्याच्या दृष्टीने काय बदल झाले पाहिजेत असे आपल्याला वाटते तेही लिहा.

लिहिताय ना मग तुमचे अनुभव आणि अपेक्षा?

daycare.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

माझा असा काही फार विलक्षण अनुभव वगैरे नाहिये पण माझ्यापुरता फार महत्त्वाचा.
सानिका अगदी लहान, दीड दोनचवर्षाची होती, माझी नोकरी नविन, त्यात नविन टाउनशिप मधे इतक्यातच घेतलेल्या घरात नुकतेच रहायला आलो होतो, कुणाची ओळख पण नव्हती जास्त. सानिकासाठी डेकेअर शोधणे हे एक मोठे काम होते.
आधी मी एक घराच्या जवळ अन नोकरीला जाता येतानाच्या रस्त्यावर सोयीचे लोकेशन असणारे, सर्व (किमान) सोयींने युक्त एक डेकेअर सेन्टर निवडले. सगळे तसे ठीक होते, पण महिना होऊन गेला तरी सानिका रमेना.इतकी लहान असली तरी सानिका तशी सोशल होती, तिला इतर मुलांत खेळायला आवडायचे , पण ती आपली मला तिथे जायचं नाहिये , तू जाऊ नकोस असंच म्हण्त रहायची. अजिबात खूष दिसत नव्हती.त्यामुळे मी चिंतेतच होते. नविन नोकरीचा स्ट्रेस, त्यात मुलीला आवडत नसताना डे केअर ला ठेवावं लागतंय हा भयंकर गिल्ट आला!!
थोडं निरीक्षण केल्यावर लक्षात आले की खाणे, झोपवणे, डायपर चेंज सगळे वेळच्या वेळी, इतरही काही चुकीचे /वाइट नसलं तरी एकंदर वातावरण फार कोरडे होते. टीचर्स रोबोसारख्या निर्विकारपणे सगळी कामं करायच्या. सगळी चकाचक खेळणी इ. असली तरी मुलांना कंफर्टेबल वाटावं यासाठी काही खास प्रयत्न दिसले नाहीत. गंमत म्हणजे वय जेमतेम दीड असले तरी आपल्याला इथे आवडत नाही हे सानिकाने मला व्यवस्थित कम्युनिकेट केले!
शेवटी मी जमेल तेव्हा इतर डेकेअर सेन्टर्स च्या टूर्स घ्यायला पुन्हा सुरुवात केली. आता जाताना मुद्दम सानिकाला बरोबर घेऊन जायचे. तर जेव्हा या गोडार्ड स्कूल ला सानिकाला घेऊन गेले तेव्हा टूर घेतानाच सानिका इतकी खूष झाली की तिथूनच मला बाय बाय म्हणायला लागली नंतर लक्षात आले की या स्कूल मधल्या प्रसन्न आणि वेलकमिंग वातावरणाचा तो परिणाम असावा.
तसे इथे किमान सोयी, सुरक्षित वातावरण, स्वच्छता वगैरे तर सगळ्याच मान्यताप्राप्त डेकेअर सेन्टर्स मधे असतातच पण त्यामुळे हे सेन्टर की ते ही निवड कशी करावी कळत नाही. मी सानिकाचा कौल ग्राह्य धरला अन तोच बरोबर ठरला! गोडार्ड जरी चेन असली तरी या सेन्टर मधल्या व्यवस्था अन वातावरणाचे श्रेय संचालिका सुषमा पाटील यांना नक्की आहे. या शाळेत आपलेपणा, घरच्यासारखे प्रेमाचे फीलिंग पुरेपूर आहे. आपण इथे कुणी महत्त्वाचे आहोत अशी समजूत जवळपास प्रत्येक मुलाची असायची प्रत्येक मूल शाळेत सकाळी आले की दारातच त्याचे इतकं जंगी स्वागत व्हायचं की जणू कुणी सेलेब्रिटी आली असावी!! मुलं लगेच खूष! आयांचा हात सोडून लगेच टीचर ला हग द्यायला जाणार!आमची चिंताच संपली अगदी. किंडरगार्टन ला जाईपर्यंत सानिकाची ३ वर्षे इथे इतकी मस्त मज्जेत , आनंदात गेली की बस!
वेळीच सानिकाच्या मताला महत्त्व देऊन मी शाळा बदलण्याचा निर्णय घेतला त्याचं आता पण समाधान वाटतं मला Happy

थोडं निरीक्षण केल्यावर लक्षात आले की खाणे, झोपवणे, डायपर चेंज सगळे वेळच्या वेळी, इतरही काही चुकीचे /वाइट नसलं तरी एकंदर वातावरण फार कोरडे होते. टीचर्स रोबोसारख्या निर्विकारपणे सगळी कामं करायच्या. सगळी चकाचक खेळणी इ. असली तरी मुलांना कंफर्टेबल वाटावं यासाठी काही खास प्रयत्न दिसले नाहीत.

>> खुप महत्वाचा मुद्दा आहे हा. बादवे.. तुला ही गोष्ट लक्षात कशी आली?

लेक २ वर्षाचा अस्ताना मी शाळेत जायला सुरवात केली....म्हणून लेकासाठी ही शाळा शोधली....
अतिशय चांगला अनुभव. शाळेत प्रवेश देण्याआधी १-२ वेळा त्यांनी मुलाला १-२ तास वेगवेगळ्ञा वेळी ( लंच टाइम, प्ले ग्राउंड टाईम वगैरे ) वर्गात बोलवले... मुलाचा फीडब्क त्यांनी विचारला, आम्हालाही विचारयला सांगितला.... त्याचा वर्ग निश्चित झाल्यावर त्याच्य वर्गाच्या टिचर सोबत त्याचा फोटो काढून घरी दिला.....

आम्ही नवीनच होतो अमेरिकेत, पोरगा तेव्हा थोडेफार इंग्रजी टीव्ही शो बघायचा... पण दुद्दु, गागा, सू/शी असं सगळा मराठीच मामला होता.... शाळेनी सविस्तर फोर्‍म भरून घेतला होता. मिन्ग्लिश मधून ही सगळी नावं लिहून घेतली होती.....

माझ्या लेकीला २.५ वर्षाची असताना प्ले गृप ला घातल होत. ती प्रचंड रडायची. मी तिच्याबरोबर जाऊन बसले तरी रडणे थांबायचेच नाही.. सतत बाबा पाहिजे इथे चा जप चालू असायचा. (त्याचे कारण त्या वेळी ती मुलगे/पुरुष ह्यांना घाबरायची.. घरातले सोडून) आणि तिच्या वर्गात १८ मुले आणी ही धरुन २ मुली अशी संख्या..
त्या शाळेत १सोडुन सगळे शिक्षक/ मुलांना खेळवणार्‍या ह्या स्त्रीया होत्या आणि १ पुरुष. आम्ही लेकीचा मुलग्यांबद्दल चा प्रॉब्लेम शाळेत सांगितला, तिथल्या हेड ने सांगितले की तुम्ही काळजी करु नका ह्या वयात अशी फेज असु शकते. आम्ही तिची भिती कमी करायला मदत करु. आणि मला रोज शाळेत बोलावल तिच्या जवळ बसण्यास सांगितल.
तेव्हा रोज मी तिच्या वर्गात बसत असे आणि ते १ पुरुष शिक्षक होते ते आमच्या शेजारी बसत आणी मी तिला प्रत्येक गोष्टीत काय म्हणते काय सांगते हे सगळ त्यांनी पण करायला सुरवात केली. मी तिच्या डोक्यावरुन/ पाठीवरुन हात फिरवला की ते पण फिरवायचे, मी बोलेन तेच ते माझ्या मागुन तिच्याशी बोलायचे.. सुरवातीला त्यांचा अश्या करण्याने तिने किंचाळून रडायला सुरवात केली, ते बघुन मलाच रडू यायच बाकी होत. पण ३-४ दिवसांनंतर ती त्या माणसाकडे बघुन थोड हसु लागली.. १५ दिवसात तिची सगळी भिती त्या माणसाने घालवली.
खूप रिलॅक्स झालो होतो मी आणि माझा नवरा तेव्हा, कारण जवळ जवळ ७-८ महिने आमच्या घरात कोणीही बाबांचा, काकांचा मित्र वैगरे आलेल पण चालायच नाही तिला. २-३ तास सलग रडायची.
हा प्रोब्लेम संपवायला खूप मदत झाली त्या सरांची, खरोखर नव्या युगाचे नंद असावेत. जे दुसर्‍यांच्या बाळांचा प्रोब्लेम आपला म्हणुन हाताळतात.

अडीच वर्षांचा असताना निषादला बंगलोरातल्या प्लेस्कूलला घातलं होतं. ही शाळा बरीच नावाजलेली वगैरे होती. १५ वर्षांपूर्वी शाळेतर्फे पालकांचं ओरिएंटेशन वगैरे प्रकरण अटेंड करून, बापसंगोपनाच्या भल्याजंगी गप्पा ऐकून अगदी भारावून गेलो होतो. पहिल्या दिवशी बर्‍याच उत्साहात गेल्यावर, नंतर रोजचं झालं आणि मग शाळेत गेल्यावर अगदी साग्रसंगीत रडण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आठवडाभरानंतर घशाचं इन्फेक्शन झाल्यावर त्याचं रडणं जास्त सिरियसली घेऊन स्कूल काउन्सेलर, टीचर भेटीगाठी सोहळा उरकला. पण काही फरक पडला नाही. शाळेच्या गेटबाहेर त्याचे आजोबा पूर्ण शाळा संपेपर्यंत वाट बघत रखवालदाराच्या बाजूला उभे राहू लागले. आता ही भानगडच नको, पुढे शाळेचं बघू म्हणून त्याला काढणार होतो तेवढ्यात न्यु यॉर्कात यावं लागलं. इथे डे केअरला ठेवणं काही कारणांमुळे भाग होतं. आधीचा अनुभव बघता पुन्हा त्याच चक्रातून जावं लागणार या कल्पनेनं पोटात गोळा आला. पण अनुभव पूर्णतः वेगळा होता.

हे डे केअर युनिव्हर्सिटी कँपसमधे, न्यू यॉर्क स्टेट अक्रिडीटेड आणि ठराविक गाइडलाइन्स अत्यंतर काटेकोरपणे पाळणारं होतं. मोठ्या आवारात असलेली घरं डे केअरसाठी घेतली होती. बाळं एका घरात, रांगती-चालती मुलं दुसरीकडे आणि ३ ते ५ वयोगटातली वेगळ्या घरात अशी व्यवस्था होती.

आतलं सेटिंगपण घरासारखं, कोझी होतं. त्यामुळे की काय पण याला तिथे गेल्यागेल्या बिचकायला झालं नाही. जागा नवी, भाषा नवी होती. पण स्टाफ अत्यंत चांगला होता. युनिव्हर्सिटीच्या चाइल्ड सायकॉलॉजी विभागातली मुलं तिथे इंटर्न म्हणून कायम येत जात असायची. त्यामुळे मुलं:अ‍ॅडल्ट रेशिओ ३:१ असा होता. आठवडाभर जरा त्रास झाला. पण अख्ख्या शिक्षकवर्गानं प्रचंड सपोर्ट केलं. त्याला येणार्‍या भाषेतले ठराविक शब्द लिहून घेऊन, ते वापरून त्याला समजेल असं कम्युनिकेशन सुरू झालं.

नॅपटाइमची गाणी, गोष्टी, गप्पा, बर्फातले खेळ असे बरेच आवडते प्रकार बघून डे केअरला जायची उत्सुकता वाढली. शेविंग फोमडे प्रचंड फेवरेट झाला. (भल्या थोरल्या प्लास्टिक टबात शेविंग फोम भरून मुलांनी त्यात मनसोक्त मस्ती करायची).

डे केअरमुळे तो लवकर वाचायला शिकला. घरात पेट ठेवण्याची परवानगी नसलेल्या त्याच्यासारख्या मुलांना तिथला 'बनबन' ससा जीव की प्राण वाटायला लागला. त्याला अजीर्ण होईस्तोवर खायला घालून, लाडवून पाळीव प्राण्याची हौसही फेडून झाली.

३ महिन्यांसाठी त्याच्या बाबाला दुसर्‍या ठिकाणी कामाला जावं लागलं. तो काळ फार कठीण होता. कारण असं की निषादच्या एका जवळच्या मित्राच्या आई-वडलांचा डायव्होर्स होत होता. त्याचे वडील घर सोडून दुसरीकडे रहायला गेले होते. आणि याला 'बाबा फक्त कामाला गेलाय. पुन्हा परत येईल' हे पटवूनही कळत नव्हतं. त्याचा परिणाम त्याच्या वागण्यावर व्हायला लागल्याचं लक्षात आलं. शहाणं पोर बरेच वेडेपणे करायला लागलं. त्या काळातला डेकेअर टीचर्सचा सपोर्ट आयुष्यात न विसरता येण्यासारखा होता. त्याला अत्यंत प्रेमानं समजवण्याचं, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ताळ्यावर आणण्याचं काम, घरातल्या त्याच्यावर प्रेम करणार्‍या एखाद्या नातेवाईकानं करावं तसं सगळ्यांनी केलं.

जेवण घरून न्यावं लागे. अतीशय स्ट्रिक्ट 'नो शुगर' पॉलिसी असलेल्या संस्थेत आम्ही त्याला सवयईचं म्हणून बरेचदा तूप इडली साखर असं देत असू. तिथल्या शिक्षकांनी ते चाखून बघितलं की काय आठवत नाही, पण त्या दिवशीचा डबा काढून घेऊन, त्याला सबस्टिट्यूट जेवण देऊन आम्हाला ताळ्यावर आणण्याचं कामही चोख बजावलं.

मुलाला प्रेम लावलं, शिस्तही लावली. त्याचा दिवसातला जागेपणीचा जास्तीतजास्त वेळ, ८ तास, डे केअरमधे गेला. 'आपण त्याच्यासाठी घरी नाही' ही बोच बोथट व्हायला डे केअरच्या शिक्षिका, इंटर्न्स, तिथलं वातावरण कारणीभूत आहे. आजही तिथे जाऊन, मनापासून सगळ्यांना भेटावसं वाटतं.

२०००साली मुलांनी एक टाइम कॅप्सूल डे केरच्या अंगणात पुरलीय. २०१४ साली मंडळी ती उकरायच्या निमित्तानं एकत्र येवोत ही मनापासून इच्छा!

स्टोनी ब्रूक युनिव्हरसिटी (न्यू यॉर्क) डे केअर सेंटर, डिनीस, एव्हलीन, कॅथलीन, जस्टीन यांचा आमच्या मुलाच्या सगळ्या प्रगतीत सिंहाचा वाटा आहे. इमारत मजबूत व्हायला पाया भक्कम केला तो त्यांनीच.

(आठवणींत असूनही एरवी हे लिहिल्या गेलं नस्तं. लिहिण्याची संधी दिल्याबद्दल संयुक्ता मातृदिन संयोजकांचे आभार.)

वा! फारच छान लिहिलंय सर्वांनी. Happy

पाळणाघराचा मला स्वतःला काहीही अनुभव नाही. माझ्या मुलाला कधी पाळणाघरात ठेवण्याची वेळ आली नाही. जवळच्या नात्यातही असं उदाहरण कधी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यामुळे हा विषय माझ्या बर्‍यापैकी कुतूहलाचा आहे. एक आई म्हणून, गृहिणी म्हणून, मध्यमवयीन संसारी स्त्री म्हणून माझ्या मनात अनेक प्रश्न असतात या विषयावरचे.
परदेशात स्थायिक झालेल्या, तिथल्या पाळणाघरांत मुलांना ठेवून नोकरीला जाणार्‍या आयांबद्दल तर मला नितांत आदर आहे.
आता रोज हा धागा पाहणारच. Happy

हा धागा पाहून मलाही काही जुनं आठवलं. ते तुमच्याशी शेअर करावंसं वाटतंय...
आमचं कुटुंब पुण्याला कायमस्वरुपी स्थलांतरित झालं तेंव्हा मी ८ वर्षांची होते आणि माझा भाऊ ६ वर्षांचा. पुण्यात ओळखीचं एकाही नातेवाईकाचं घर नाही! साधा मित्रपरिवारही कुणी नाही, हक्कानं मदत मागायला जावं असं एकही ठिकाण नाही. आई-बाबा नोकरी करणारे. नोकरी सोडून चालणार नव्हतं. जवळपास पाळणाघराची त्याकाळी फारशी सोय नव्हती आणि असली तरी परवडणं अवघडच होतं बहूदा! आजी-आजोबा आमच्याजवळ रहात नव्हते. एकूण परिस्थितीत आमच्यामुळे आई त्यावेळेस किती बुचकळ्यात पडाली असेल ते आत्ता... मी आई झाल्यावर जाणवतंय...

त्यावेळेस आमच्या शेजारी राहणार्‍या प्रधान मावशी आमच्या मदतीला आल्या नसत्या तर? त्यांनी स्वताहून माझ्या आईला धीर दिला आणि आमच्या संगोपनाची जवाबदारी घेतली. त्यांच्या दोन मुली आमच्याहून बर्‍याच मोठ्या होत्या. पण मी आणि माझा भाऊ दोघंही त्यांच्या घरातलेच असल्याप्रमाणे राहिलो... वाढलो... मावशींच्या मांडिवर बसून भावाने काऊ-चिऊचे घास खाल्ले. मी त्यांच्याचकडून कित्येक गोष्टी ऐकत मोठी झाले. मावशींची धाकटी मुलगी माझी सगळ्यात जवळची मैत्रिण बनली. मावशी आणि काका आमचे दुसरे आई-बाबाच बनले जणू.... आम्ही त्याच्या घरात इतके मिसळून गेलो होतो की सोसायटीत त्यावेळेस बर्‍याच जणांना बरिच वर्ष माहितच नव्हतं... की आमचं आडनाव 'प्रधान' नाही...

ती जागा सोडून आम्ही गेलो... काही महिन्यांनी प्रधान कुटुंबानेही ती जागा सोडली. पण त्या दिवसांमध्ये जुळलेला तो ऋणानुबंध आज इतक्या वर्षांनीही तसाच कायम आहे. आजही लहानग्या लेकीला घरी सोडून ऑफिसला जाताना डोळे भरून येतात... आणि तेंव्हा न चुकता डोळ्यांसमोर उभा रहातो रडत ऑफिसला जाणार्‍या माझ्या आईच्या खांद्यावर हात ठेउन समजूत काढणारा प्रधान मावशींचा चेहरा. आणि लक्षात येतं... आपलं जगातलं सगळ्यात मौल्यवान धन आपल्यामागे सांभाळणारा परमेश्वरी हात असा गवसणं आणि कायम पाठीशी असणं किती आवश्यक असतं.... एका उंबर्‍यात उभं राहून जगाला भिडणार्‍या आईसाठी!!!

या मातृदिनाच्या शुभेच्छा... माझ्या आईसोबतच माझ्या मावशींनाही!!!

मस्त मुग्धमानसी..

आताच्या काळात असं कोणी भेटेल असं वाटत नाही. आणि भेटलं तरी आपण निर्धास्तपणे आपलं बाळ त्यांच्या हातात सोपवु शकु का अशी शंका वाटते..

पियू परी.... 'विश्वास' ही फार मोठी गोष्ट आहे! तो अशा पद्धतीने टाकावा लागतो कि विश्वासघात करावा अशी कुणाची इच्छाच होता कामा नये!

>> 'विश्वास' ही फार मोठी गोष्ट आहे! तो अशा पद्धतीने टाकावा लागतो कि विश्वासघात करावा अशी कुणाची इच्छाच होता कामा नये!
नाही हं मुग्धमानसी, हे 'ओव्हरसिम्प्लिफिकेशन' झालं.
आपलं मूल कुठे ठेवताना नुसतं विश्वास 'टाकून' भागत नाही. डोळे आणि कान उघडे हवेतच. वर मैत्रेयीने लिहिलं तसं अगदी लहान मुलंही त्यांची नाराजी/अस्वस्थता/असुरक्षितता त्यांच्या पद्धतीने व्यक्त करत असतात. त्याकडे लक्ष हवंच. Happy

मी लिहिते जराशाने माझे अनुभव.

>>आपलं जगातलं सगळ्यात मौल्यवान धन आपल्यामागे सांभाळणारा परमेश्वरी हात असा गवसणं आणि कायम पाठीशी असणं किती आवश्यक असतं.... एका उंबर्‍यात उभं राहून जगाला भिडणार्‍या आईसाठी>>

+१

खूप छान लिहिलं आहेस मुग्धमानसी.

तिसरी हा एकदम मेजर टप्पा होता माझ्या बालपणीचा. तिसरीत गेल्यावर पेन वापरायची परवानगी मिळाली होती. पेन्सिलींना टोकं काढत बसायचा एक तापच असायचा. तो संपला. खरंतर ताप मला नसायचा. कमलताई कायम मला टोका काढून देत असत. पण पेन वापरण्यातली ऐट निराळीच. मग पाचवीत शाईचं पेन मिळणार, मग आपल्याही बोटांवर मन्याच्या असतात तसे शाईचे डाग पडणार.. 'अक्षर छान काढलंस तर पार्करसुद्धा घेऊन देईन' म्हणाले होते बाबा. कमलताई शाळेत आणा/पोचवायलाही यायच्या. इतकुश्शी चण होती त्यांची. गर्दीच्या रस्त्यातून आम्हा तीनचार वाभरट कार्ट्यांना नीटपणे परत आणायचं म्हणजे त्यांना भारीच पडत असणार तेव्हा! पण एकदाही त्यांचा चढा आवाज ऐकल्याचं आठवत नाही. कसं काय?

शिवाय तिसरीत माझी 'शिशुधाम'मधून 'बालकेंद्रात' बढती झाली होती. आईची पूर्णवेळ नोकरी, त्यामुळे मी आणि धाकटा भाऊ तीन महिन्यांचे असल्यापासून पाळणाघरात होतो. सुदैवाने 'हिंद महिला समाजा'ने चालवलेलं हे पाळणाघर चाळीच्या आवारातच होतं.
चाळीतली पाळणाघरात न जाणारी मित्रमंडळी त्याला 'शी शू धाम' म्हणून चिडवत असत. आता इतकी लहानगी म्हणजे दिवसभर कोणाचा ना कोणाचा तो प्रोग्रॅम सुरू असायचाच की! पण निदान आता ती चिडवाचिडवी ऐकून घ्यायला नको. बालकेंद्रात म्हणजे मजा! तिथल्या ताई सारख्या हे कर ते कर म्हणून मागे लागत नाहीत असं चिनू म्हणाली होती. घरच्या अभ्यासात मदत करतात, घरी जाण्याआधी वेणी घालून देतात. सगळ्यांनी लवकर अभ्यास संपवला तर गोष्टसुद्धा सांगतात.

तशी गोष्ट नलूताईसुद्धा सांगायच्या की. जाळीच्या दाराजवळ आमची ठरलेली जागा होती. दुपारी जेवणं आटोपली की त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकायचा ठरलेला कार्यक्रम! पण आता मोठ्या मुलांच्या गोष्टी. पुस्तकांतल्या! शिवाय जेवायला आणि दुपारी खाऊ खायला जुन्या स्वयंपाकघरातच जायचं. म्हणजे सखुताईंनी त्यांच्या डब्यात 'फिश' आणलं असलं तर मला हमखास त्यातला पीस मिळणार म्हणजे मिळणारच. शिवाय नवलकर बाई मोठ्या मुलांची पंगत तपासायला येत नाहीत!

नवलकर बाई! गोर्‍यापान कपाळावर एक आठी कायमची गोंदवलेल्या. 'शांत बसा रे!', 'ऑफिसरूममधे धावायचं नाही!', 'भाजी कोणी टाकली पानात?' म्हणून ओरडणार्‍या. दुष्ट!

बाकी सगळ्या ताया होत्या. नवलकर या एकच 'बाई'. स्वयंपाक करणार्‍या सखुताई आज्जीच्या वयाच्या तरी ताईच. सगळ्यांचं जेवण आणि दुपारचा खाऊ त्या रांधायच्या. कोणाच्या डब्यात काय आहे त्यावरून मुलांच्या मनात भेदभाव येऊ नये यासाठी ही सोय. सर्वांनी हातानेच जेवायचं, सांडासांड करायची नाही, पानात काही टाकायचं नाही हा नवलकर बाईंचा कटाक्ष. सगळ्यांना सगळं कसं आवडणार पानातलं? आणि त्यासाठी पंगतीतसुद्धा पट्टी घेऊन फिरायचं म्हणजे काय! त्या ऑफिसचं काम करतात तर तिथेच का बसत नाहीत? मुलांना त्रास द्यायला कशाला येतात!
तायासुद्धा क्वचित कधीकधी कोपर्‍यात त्यांच्याबद्दल काहीतरी खुसखुस करत. ऑफिसमधे बसूनही शिशुधामचा कोपरा-न्-कोपरा स्वच्छ, नीटनेटका आहे की नाही, रडणार्‍या मुलाकडे लगेच लक्ष दिलं गेलं की नाही, मोठ्या मुलांना शाळेतून आल्यावर हातपाय धुवायला लावले की नाही - सगळ्याकडे त्यांचं लक्ष असायचं. रोज निराळं, ताजं, गरम अन्न मुलांना मिळायला हवं असा कटाक्ष असायचा. ब्रेड हा प्रकार स्वयंपाकघरात आणायला परवानगी नव्हती. 'इतकं काय अगदी!' असं तायांनाही क्वचित वाटत असणार. पण सगळे त्यांच्या धाकात होते.

मी बालकेंद्रात गेले त्यावर्षीच नवलकर बाई रिटायर झाल्या. आधी का नाही झाल्या! निदान आता धाकट्याला त्यांच्या पट्टीच्या तालावर रहावं लागणार नाही याचंच मला बरं वाटलं होतं. 'बालकेंद्रा'त लगेच रमलेही मी. तिथल्या ताई खरंच छान होत्या. सुट्टीत हस्तकला शिकवायच्या, 'नाव गाव फळ फूल' वगैरे खेळायच्या, गाणी म्हणायच्या, एका सुट्टीत तर साचा, चिकणमाती वगैरे आणून सगळ्यांना गणपती करून दिले होते त्यांनी. सगळे एका साच्यातले, पण रंगवलेले आपापल्या मनाने. नवलकर बाई केव्हाच विस्मृतीत गेल्या.
'शिशुधामची व्यवस्था पूर्वीसारखी राहिली नाही हं' असं कधीतरी आईच्या बोलण्यात ऐकू यायचं, पण भावाची सोय तरीही चांगली होती.

पुढे हायस्कूलला गेल्यावर पाळणाघर हा विषयच संपला.
सातवीत असताना एक दिवस आई म्हणाली 'उद्या शाळेतून घरी आलीस की आपल्याला हॉस्पिटलमधे जायचंय. नवलकर बाईंना भेटायला.'
'का?!'
'अगं बर्‍याच आजारी आहेत. तुम्ही त्यांची पहिली बॅच म्हणून चिनूची आणि तुझी खूप आठवण काढतात असं कळलं.'
'आमची आठवण काढतात? नवलकर बाई?!'
विश्वास बसला नाहीच, पण मी आणि चिनू भेटायला गेलो. हॉस्पिटल बेडवर दिसतसुद्धा नव्हत्या इतक्या कृश झाल्या होत्या नवलकर बाई. डोळ्यांवर ते जाड ढापण नव्हतं. असतं तरी बहुधा उपयोग नव्हता. आम्ही आल्याचं नर्सने त्यांच्या कानात सांगितलं. त्यांचे क्षीण डोळे क्षणभर चमकले. काहीतरी पुटपुटल्या. नर्सने आम्हाला बेडजवळच्या स्टुलावर येऊन बसायला सांगितलं. दोनेक मिनिटं आमचे पायच हलले नाहीत. एखाद्याला असं होत्याचं नव्हतं झालेलं प्रथमच पाहत होतो आयुष्यात. कसाबसा धीर करून जवळ गेलो. बाईंनी कष्टाने हात उचलून आम्हा दोघींच्या हातावरून फिरवला. बहुधा त्यांना चेहर्‍यावरून फिरवायचा असावा, पण तेवढा उचलण्याइतकी शक्ती उरली नव्हती.
'बाई, लवकर बर्‍या व्हा.' चिनूला नेहमीच कुठल्या प्रसंगात काय बोलावं हे नीट कळायचं.
बाईंचा हात अतीश्रमांनी खाली पडला.
हॉस्पिटलमधल्या ताई हातात वाडगा घेऊन आल्या. त्यात दूध होतं. आणि ताटलीत ब्रेड. ब्रेड! ब्रेडचे छोटे तुकडे करून दुधात भिजवून त्या ताई नवलकर बाईंना भरवू लागल्या. बाई नको नको म्हणून मान डोलवायचा प्रयत्न करत होत्या. ताईंनी 'असं काय ताई! खायाला हवं. अंगात ताकद कशी येणार? आन औषदं कशी लागू पडनार?' असं काहीबाही बोलत चार घास तशातही त्यांना भरवले. ओठांच्या कडेवरून दूध ओघळत होतं ते पुसलं.
आम्ही माना खाली घालून तिथून बाहेर पडलो. 'मुलगा परगावी आहे, बघत नाही म्हणे यांना. दुसरं कोणी नाही नात्यातलं' असं काहीबाही आया आपसात बोलत होत्या.

बालसंगोपनातलं काहीतरी महत्त्वाचं मी त्या दिवशी शिकले.

स्वाती, नको बदलूस काही त्या पोस्टमधलं. सुरेख लिहिलंयस. अगदी आतून. तुला काय म्हणायचंय ते सगळं सगळं पोचलं. Happy

धन्यवाद. Happy

वर सर्वांनीच लिहिलेले अनुभव हृद्य आहेत. मघाशी त्याबद्दल लिहायचं राहिलं.

सगळ्यांचे अनुभव छान Happy
स्वाती_आंबोळे, सुंदर पोस्ट.

माझ्या मुलीचा जेव्हा जन्म झाला तेंव्हा आम्ही भारतात होतो.
मॅटरनिटी लिव्ह वरून जेंव्हा ऑफिस ला जॉईन झाले तेंव्हा सासुबाई आल्या होत्या सांभाळायला..
त्यांनी अगदी व्यवस्थित सांभाळले तिला.
ती एक वर्षाची झाली आणि आम्ही लंडन ला आलो.. इकडे येण्याआधी तिला डे केअर मधे ठेवावे लागणार, ती राहिल की नाही, आपल्याला जमेल की नाही अश्या ना ना शंका डोक्यात येत होत्या.
जायच्या दिवशी एअरपोर्ट वर मी सासुबाईच्या गळ्यात पडुन खुप रडले .. त्यांनी अगदी मना पासुन तिचे केले होते. त्या होत्या म्हणुन मी भारतात बिन्धास्त जॉब करू शकले..

इथे आल्या नंतर माझ्या लेकीने १ महिना लावला डे-केअर मध्ये अ‍ॅडजस्ट होण्यासाठी. १-२ महिन्यात मग छान रुळायला लागली..

एकदा सहजच ३-४ महिन्यांनी तिची व्हिडीओ कॅसेट लावली होती आणि अचानक तिला तिची आज्जी दिसली टिव्ही वर .. तर लगेच पळत टिव्ही जवळ जाउन दोन्ही हात वर करून तिला 'घे' म्हणत होती.. आणि लगेच धुमसुन-धुमसुन रडायला लागली...
जेमतेम दिड वर्षाची नव्हती पण इतक्या दिवसांनी आज्जी ला दुरुनच पाहुन तिला गहिवरून आलं होतं...:)
आम्हा दोघांना तर काय करावे काही सुचत नव्हते.. तिला धड सांगता येत नव्हते आणि आम्हाला काही समजावता येत नव्हते...

आता पर्यंत २-३ डे केअर बदलली आणि चाइल्डमाइंडर (नॅनी) च्या घरी ठेवायचा पण अनुभव घेतला. . . सगळे अनुभव चांगलेच आहेत..
ऑफिस मधला वेळ ह्या डे केअर च्या टिचर्स नी / नॅनीं नी नक्कीच सुकर केला असे मी म्हणेन..

वर मृण्मयी ने लिहिल्याप्रमाणे 'आपण त्याच्यासोबत घरी नाही' ही बोच बोथट व्हायला ह्या सगळ्यांची आम्हाला खुप मदत झाली..

माझा मुलगा डे केअरमध्ये जायला लागला आणि तिथेच त्याचं पॉटी ट्रेनिंग झालं आणि अंगठा चोखायची सवयही गेली .. ह्या दोन गोष्टींसाठी तो जायचा त्या पहिल्या गोकुळाची मी खूप ऋणी आहे ..

खूप सुरेख लिहिलयं सगळ्यांनी.

स्वातीच्या पोस्टबद्दल वरदास अनुमोदन! अप्रतिम पोस्ट आहे.

अनु३ तुमची पोस्ट आवडली.

खूप सुरेख लिहिलयं सगळ्यांनी.
मला काही डेकेयर वा पाळणाघर याचा अनुभव नाही.
सो इथे वाचुन उत्सुकता भागवते आहे!

स्वाती, मानसी छान पोस्ट! Happy

Pages