चला खरं बोलू

Submitted by तिलकधारी on 9 May, 2013 - 06:23

आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. माध्यान्हीची रणरण विरल्यामुळे मनाशी लाडेलाडे करणार्‍या नवजात सुखद झुळुका प्रफुल्लीत राहायला सांगत आहेत. एकाच आकाशात एकीकडे गडदता आणि दुसरीकडे उतरत चाललेली लाली दिसत असल्यामुळे आकाशाचा राग येतो आहे. जन्मापासून या आकाशाने रंगबदल आणि ऋतूबदल याशिवाय काही दिले नाही. त्यात पुन्हा एकाचवेळी वेगवेगळे रंग दाखवून संभ्रमीत केले. उतरत चाललेल्या लालीकडे धावताना चढ लागला. गडदतेपासून दूर पळताना गडदतेच्या मागेच तीच लाली पुन्हा फिरून येत आहे हे कधी स्वतःहून म्हणालेच नाही आकाश. शाळेत शिकलेल्या अस्सल प्रासादिकतेची ठासून मारली गेली आयुष्य जगताना. किती खोटं बोलायचं!

चला खरं बोलू थोडंसं!

कैझन, क्यू एम एस, टी क्यू एम, आय एस ओ ९०००, क्यू एस, क्रायसिल वगैरे! धंदा झालाच नाही तर ही भुतं आपल्या डोक्यावरून झाटांवर फेकली जातात. धंदा का होत नाही? कारण सिस्टिम नाही. सिस्टिम का नाही? कारण माणसांना शिस्त नाही. शिस्त का नाही? कारण भारतात धंदा करायचा असला तर सिस्टिम फाट्यावर मारून केला तरच करता येतो. बाकीच्या देशांमध्ये काय होते? माणसे कमी असतात. सुबत्ता जास्त असते. मग मी इथे का? कारण माझे आई बाप इथले. मग नंतर का गेलो नाही? आई बापांना त्यांच्या म्हातारपणी कोण? मग दोन भावांनी हाच विचार का केला नाही? ते थोरले नाहीत म्हणून. मला आधी काढा असा अर्ज केला होता मी आईबापांकडे? नाही. मग? काढले. मग काढलेत तर जगवा की नीट? साहेब म्हणतो राहणे यू आर नॉट अप टू द मार्क. साहेबाचं वय पस्तीस, पगार बावीस लाख वर्षाला. राहणे पंचावन्न वर्षांचा, पगार आठ लाख वर्षाला. गेल्या सव्वीस वर्षात जो माणूस रोज येथे दहा तास देत आला त्याचे अप्रेझल काल आलेला करतो. फायनान्शिअल इअर एन्डिंगला ऑडिटेबल प्रोसेसेसना रांडांसारखे लायनीत उभे करून प्रॉडक्शन काढून ते विकले जाते सेल वाढवण्यासाठी. एप्रिलच्या तीन तारखेला लगेच प्रोसेस ऑडिट. राहणे ३१ मार्चला रात्री तीन वाजता घरी गेला आणि दोन दिवसावर ऑडिट म्हणून एक एप्रिलला पुन्हा सकाळी आठ वाजता हजर राहिला तेव्हा साहेब घरून फोनवर विचारतो. काल व्हॅल्यू किती झाली? अठरा कोटी. कमी झाली. सॉरी सर, एफ एस बाँडेडमध्ये सिस्टिमप्रमाणे बारा वाजेपर्यंत आलेले मटेरिअल पूर्ण केले, पण त्यानंतरचे सिस्टीमने एक तारखेवर नेले. सिस्टिम गाढवाच्या गांडीत घालायला हवी होतीत म्हणे. हे उत्तर, बापाच्या वयाच्या माणसाला. दहा मिनिटांनी दुसरा फोन. परवा एक्स्टर्नल ऑडिट आहे. एकही एन सी नको आहे. येस सर. अ‍ॅन्ड इफ धिस टाईम आय फाईन्ड एनी एन सी, यू विल पे फॉर इट. येस सर. सर आपण कधी येणार आहात ऑफीसला? आय विल गेट लेट, माय डॉटर इज नॉट वेल. अरे अरे, काळजी घ्या सर. हो पण तुम्ही आधी ऑडिटची काळजी घ्या.

संध्याकाळी मॅनेजमेन्टची पार्टी. रेकॉर्ड सेल झाला. व्हीपी म्हणतात आय अ‍ॅम हॅपी. चीअर्स. दारू सांडेपर्यंत, ग्लासेस फुटेपर्यंत, अश्लील जोक्सची पातळी झवाझवीच्या पुढे जाईपर्यंत आणि अचानक वर्षानुवर्षाच्या राजकारणाने विषावलेल्या मनांमधील विखार शिव्यांच्या रुपात बाहेर पडून शेवटी गळ्यात पडून माफ्या मागेपर्यंत धिंगाणा! राहणे विचारतो आहे मी जाऊ का. याच्यावर उत्तर काय तर म्हणे राहणेंना याही वयात वहिनींची आठवण येतेच अकरा वाजता. शेवटी बारा वाजता प्यायलेल्या दळवीच्या स्कूटरवर मागे बसून म्हातारा राहणे घरी पोचणार आणि ऑडिटच्या शिव्यांच्या काळजीत झोपायला जाणार तेव्हा बायको म्हणणार. मी आजारी आहे हेही लक्षात नाही राहिले का हो? राहणे आजारी आहे हेसुद्धा राहणेच्या लक्षात नसते तिथे बायकोचे काय?

यशवंत राहणे. यडझवं नांव सालं. यशवंत होऊन कधी राहताच आलं नाही. बेखंत राहणे. हे नांव कसं वाटतं?

आज ऑडिट. साहेबाच्या गालाला आफ्टर शेव्हचा वास. शर्ट नवा. स्नो पावडरने चोपडलेले थोबाड. थोबाडावर व्यावसायिक हास्याचा चीड आणणारा शिडकावा. तोंडात फक्त इंग्लिश. समोरच्या दोन ऑडिटर्समध्ये शहा सिनियर. त्याच्याबरोबरची रेवा स्वतःच ऑडिटेबल प्रोसेस असल्यासारखी बसलेली. जे दाखवायचे आहे तेच चुकून दिसते आहे असा आविर्भाव तिच्या चेहर्‍यावर सतत. तिच्यामुळे ऑफीस भारलेले. पार पलीकडच्या प्लँटमधले नाही ते लोक कामं काढून तिला बघायला येत आहेत. साहेब पगलावलेला झाला आहे. त्याचा डावा हात दर पाच मिनिटांनी स्वतःच्या पोटाखाली जाऊन काहीतरी दाबून वर येतो आहे. साहेबाच्या मागच्या खिडकीत दोन पारवे बसले आहेत. पलीकडे आकाश आहे. यशवंत राहणेला फसवणारे आकाश. त्यामुळे राहणे आकाशाकडे दुर्लक्ष करून साहेबाकडे अजीजीच्या नजरेने थुंकी झेलायला बसलेला आहे. ती रेवा मधेच म्हणते. डू वुई हॅव इंटरमिजिएट चेक ऑन व्हर्टिकल प्रेस? लगेच साहेब म्हणतो ओह येस वुई डू. राहणे, व्हर्टिकल प्रेसचा ले आऊट दाखवा. त्यात काय दाखवायचंय? रात्री बायकोवर चढतोस त्यालाच व्हर्टिकल प्रेस म्हणतात. राहणेच्या काळ्याकुट्ट मनाच्या तळाशी आलेला हा विचार पुढच्या हजार पिढ्यांच्या तोंडातून बाहेर पडू शकणार नाही असली राहणेची औकाद आणि औलाद. राहणेने ले आऊट सादर करताना ले आऊट नीट दाखवता यावा म्हणून खुर्ची थोडी रेवाकडे केली की लगेच रेवाचा एक हात स्वतःच्या नाकाकडे जाणार. ब्रीफली. पंचावन्न वर्षाच्या म्हातार्‍याच्या अंगाला अ‍ॅक्सचा वास यायला हवा यांना. व्हेअर इज द चेक? रेवाचा प्रश्नार्थक चेहरा. राहणे गोंधळलेला. ही बया नक्की काय विचारू पाहतीय हे राहणेला समजलेले नाही. कसे काय कोण जाणे पण साहेबाला समजलेले आहे. त्यामुळे साहेबाचा गोरा गाल क्रोधाने लाल व्हायला लागलेला. राहणे कुठेतरी बोट ठेवतो. धिस इज फायनल चेक राहणे, नॉट इंटरमिजिएट. राहणे गोंधळून साहेबाकडे बघत आहे. एका मशीनला, जे मशीन मॅन्यूफॅक्चररकडून आहे तसे विकत घेतलेले आहे, मधेच एक चेक कोण लावणार? आणि कसा काय लावणार? मशीनच्या शेवटी प्रॉडक्ट मिळतंय ना? आणि ते चेक होतंय ना? बर हे एकच मशीन आहे, ही काही लंबीचौडी प्रोसेस नव्हे की अधेमधे सगळीकडे चेक्स हवेत. एकाच मशीनला किती चेक्स लावणार? पण रेवा विचारत आहे. मग तिला समाधानी करायलाच हवे. साहेब लगेच म्हणणार. राहणे, धिस वॉज आयडेंटीफाईड इन इन्टर्नल ऑडिट ऑर नॉट? नो सर. साहेब लगेच रेवाला म्हणणार. काहीतरी प्रोसेस इनअ‍ॅडिक्वसी दिसत आहे. आय विल चेक. रेवा एक मार्क मिळवून पुढे. साहेब लगेच थंडबिंड मागवणार. पण यात राहणेचा उगाचच बळीचा बकरा. त्या शहाला भर ऑडिटमध्ये सतराशे साठ कॉल्स मोबाईलवर. कामं सोडून तो फोनवरच बकत बसला आहे. भडव्या इतका बिझी आहेस तर इथे कशाला झक मारतो आहेस? त्या शहाचेही भाग्यच पण. रेवा त्याचा शब्द अन् शब्द झेलत आहे. मधेच रेवा एसीकडे बघते. लगेच साहेब तेवीसचे तापमान एकवीसवर आणतो. रेवा हसून थँक्स म्हणते. घाम फुटला आहे राहणेला. साहेबाची ही वेळ खरे तर स्मोकिंगची. तो अस्वस्थ दिसतो आहे. सिगारेट ओढायला गेला तर रेवाला पाहण्याची दहा मिनिटे कमी होतील आणि परत आल्यावर रेवाला तो वास असह्य झाल्याने ती ऑडिट करताना अस्वस्थ राहील या काळज्या. राहणेला सगळे कळते.

दुपारी तीनला रेवा सकाळसारखीच दिसत आहे. साहेब मात्र उकडलेल्या भाजीपाल्यासारखा वाटत आहे. शहा निघून गेलेला आहे. समथिंग व्हेरी अर्जंट केम अप. या असल्या लोकांच रोज काही व्हेरी अर्जंट कसं काय कम अप होतं हे राहणेला समजत नाही. पावणे चार वाजता एक सिरियस एन सी. चूक कोणाची तर नॉन बाँडेड इन्स्पेक्शनची. तिथला मास्तर नावाचा माणूस अतिशय कॅज्युअल. घाईघाईत त्याने निरोधच लावलेला नाही. सगळे काँपोनन्ट्स एड्स झालेले पैदा झाले. आज आहे राडा. रात्री रेवाला डिनर, कंपनीची स्टँडर्ड गिफ्ट याशिवायही काहीतरी मिळणार हे नक्की. तिच्यासुद्धा हावभावात आता ते स्पष्ट दिसत आहे. डिनरला साहेब, शहा, रेवा आणि जॉईंट ई डी. तेव्हा राहणे बडवलेल्या बैलासारखा ऑफीसमध्ये एन सी क्लोज करायला राबतोय. दोन्ही डोळ्यात पाणी आहे राहणेच्या. खूप नाही तसे बोलला साहेब. तीन एन सी निघाल्या. एक सुपर इंपॉर्टंट, मास्तरकडची. दोन फायनान्सच्या. फायनल चेक्स राहणेकडे होते पण त्याच्या म्हातारलेल्या नजरेतून त्या तीनही एन सी निसटलेल्या. इंटर्नल ऑडिटर्सना तर त्या माहीतही नव्हत्या, म्हणजे येथेही काही ऑडिटेबल पॉईंट आहे हेच माहीत नव्हते. सगळी नवी पोरे भरलेली. शिव्या खाण्यास लायक एकच माणूअ उरलेला. बेखंत राहणे. बायकोचा फोन. अहो आज जरा लवकर येता का? घाम येतो आहे आणि गरगरतय. राहणेला एक नक्की माहीत आहे. लवकर जाण्याची परवानगी मागण्याची आपल्यात हिम्मत नाही हे. जायचे असेल तर सरळ उद्याच्या शिव्या उद्यावर ढकलून निघून जायचे. उद्या परत उरलेले ऑडिट. राहणे हळूच उठला आहे.

आता घरी गेलो की डॉक्टरकडे जावे लागेल. बायकोला दर दोन महिन्यांनी असे काहीतरी होते हल्ली. घरी गेल्यावर बायकोच्या चेहर्‍यावर दिसलेले समाधान ही बेखंत राहणेची आयुष्यातील एकमेव कमाई. ती म्हणते इथे बसा जरा जवळ. तुम्ही पण किती धावाधाव करता. पडूनच राहणेच्या चेहर्‍यावरून हात फिरवते. राहणे दोन्ही हातांनी तिचा तो हात आपल्या चेहर्‍यावर दाबून ढसाढसा रडतो. बायकोमध्ये आई आणि मैत्रीण असे एक फ्री पॅकेज असणे हे बेखंत राहणेच्या आयुष्यातील एकमेव सरप्राईज.

साहेबाचा फोन. राहणे आय हर्ड यू वेन्ट होम विदाऊट क्लोजिंद एन सीज? येस सर. माय वाईफ इस नॉट वेल. राहणे कूड यू नॉट इन्फॉर्म धिस टू मी? सॉरी सर. राहणे धिस इज यूअर लास्ट चान्स. टूमोरो इफ द एन सीज आर नॉट क्लोज्ड, प्लीज पुट यूअर पेपर्स राहणे. येस सर.

बायकोला काहीही कळू नये म्हणून राहणे चेहर्‍यावरची रेषाही न हालवता फोन ठेवून देतो. खिडकीतून बाहेर बघतो तर आकाश दिसते. गडद झालेले. फार पूर्वी राहणे कविता करायचा. बेखंत होता तो तेव्हा. आत्ताही बेखंत आहे. पण हे आकाश? नालायक साले आकाश. आता गर्रकन गोल फिरून स्वतःच्याच गांडीतून सकाळ काढून दाखवेल.

राहणेने राजीनामा लिहिला आहे. उद्या सकाळी तो राजीनामा देणार आहे.

राहणे ऑफीसला आला आहे. राहणेने साहेब यायच्या आधीच साहेबाच्या टेबलवर राजीनामा ठेवलेला आहे. कोणाशी एक अक्षरही न बोलता राहणे निघत आहे.

भोसड्यात गेली नोकरी. आता आकाश गांड फाटल्यासारखे राहणेच्या आवेशाकडे बघत आहे. राहणे चालत घरी निघाला आहे.

घराची बेल वाजवली आहे राहणेने. आजही कामवालीने उशीर केला हे पाहून वैतागलेल्या मिसेस राहणेने दार उघडलेले आहे.

ती उडालेलीच आहे. आनंदाने.

राहणे आला आहे.

--------------------------

(तिलकधारी)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषा शिवराळ असली तरी कन्सर्न पोचवायला कथा यशस्वी ठरली आहे.

कॉर्पोरेटमधल्या असंख्य राहण्यांना ही कथा समर्पित केल्यासारखी वाटली.

< भाषा शिवराळ असली तरी कन्सर्न पोचवायला कथा यशस्वी ठरली आहे.
कॉर्पोरेटमधल्या असंख्य राहण्यांना ही कथा समर्पित केल्यासारखी वाटली.> + १

भाषा शिवराळ असली तरी कन्सर्न पोचवायला कथा यशस्वी ठरली आहे.
कॉर्पोरेटमधल्या असंख्य राहण्यांना ही कथा समर्पित केल्यासारखी वाटली.> +१
थोडा बेफी टच जाणवला. गैस नसावा.

थोडा बेफी टच जाणवला<<<<<

हो हो अगदी !!!

पण असे अनुकरण वगैरे करणे चुकीचेच असले तरी लेखकाच्या उमेदवारीच्या काळात चालू शकेल

सुरुवातीस असे होणे स्वाभाविकच मानले जाते

असो पुलेशु !!!

Wink

कॉर्पोरेटमधल्या असंख्य राहण्यांना ही कथा समर्पित केल्यासारखी वाटली.> + १
मला माझ्या वडिलान्ची आथवण आली.कदाचित या ताणामुळे आणि आमच्या जबाबदा-यान्मुळे
नोकरी सोडता न आल्यामुळे लवकर गेले ..खुप अपराधी भावना दाटून आली आहे.

अफाट....... सगळं डोळ्यापुढे झरझर आलं..... भाषेत कणेकरी टच जाणवला..... पण इफेक्ट कणेकरांपेक्षा कितीतरी उजवा. आता तिलकधारींचे लेखन वाट पहायला लावणार.

सगळी सुस्ती उतरली....पार झटका बसला....त्यात QA specific...आहे...अजून भिडलं मनाला....आपल्या सगळ्यात एक राहणे आहे......च्यायचा घो!!!

च्च, च्च. दया येते असे वाचून.
काय करणार? कमी अधिक प्रमाणात जगात सगळीकडे हेच हाल.

गाठीशी बक्कळ पैसा असेल नि वैराग्यासारखे रहायचे असेल तरच खोटे न बोलता रहाता येते. काही चूक झाली म्हणून कुणि काही बोलले, तर अपमान विसरून जाणे शिकले पाहिजे. काही वाईट झाले तरी परिणाम सहन करण्याची ताकद पाहिजे.

हे सागणे सोपे आहे. पण काय असावे हे कळले तर ज्याला त्याला आपापल्या परीने मार्ग शोधता येतो.