लॉंग ड्राईव्ह

Submitted by मुग्धमानसी on 9 May, 2013 - 03:59

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
रस्त्यावरती एकाचवेळी धावत असतं बरंच काही...
एक गाडी, चार चाकं, दोन मनं...
एक नशिब, लक्षावधी विचार अन्... काही अल्वार स्वप्नं...

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
स्टिअरिंग व्हीलवर आवळलेली त्याची दणकट मूठ
आव्हान देतेसे वाटते समोर पसरलेल्या सगळ्याच वाटांना...
आणि उघड्या खिडकिच्या कडेवर विसावलेली तिची नाजूक बोटं
भूल घालत रहातात त्याच्या आकाशभर पसरू पहाणार्‍या वितभर कर्तृत्वाला

मध्येच पहातो तो तिच्या डोळ्यांत... शोधतो काहितरी... त्याला हवंसं...
पण तिची नजर लांब आभाळात... शोधत असते काही नवंसं...

मग तो म्हणतोच... "काय राणी! कसा चाललाय आपला रथ? अखेर पुर्ण केलंच ना... मी आपले मनोरथ?"
ती हसते...
तो म्हणतो... "किती घाव सोसले... किती झेलली उन्हं... मी माझ्या पंखांना दाखवलीच पण स्वप्नं!
बेताल वाटा तुडवत आलो... खड्डे-काटे चुकवत आलो... काय सांगू किती किती नी काय काय कोळून प्यालो..
बघ माझी स्वप्नं इथं चार चाकांवर उभी आहेत! अजूनही ब‍र्‍याच भरार्‍या कोंडल्या मनीच्या नभी आहेत!"
ती हसते... पुन्हा अशी फक्त त्याच्या डोळ्यांत बघते...
प्रसन्न ओलसर तिची नजर पुन्हा त्याला लंघून जाते...

ती म्हणते "थांबव गाडी... समोर बघ धुकं..."
तो म्हणतो "पार करून जाईन गं मी सगळं..."
ती हसून म्हणते "करशील रे तू पार. डोंगर भेदलेल्या तुला काही धूकं नाही फार.
उगाच वाटलं म्हटलं जरा घालू एकवार हातात हात. चार पावलं चालून यावं वेचावं काही नवथर धुक्यात. येतोस?"

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
गाडित ताटकळत बसतात - ’त्याची’ स्वप्नं... ’त्याचं’ कर्तृत्व... ’त्याच्या’ भरार्‍या...
आणि कुठल्याश्या धुक्यात विरघळून जातं... त्यांचं दोघांचं ’आपलं’ काही...

तो.... आणि ती... एका लॉंग ड्राईव्हवर जाताना...
परततं ते फक्त अलवार... दाट धुकं!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास....

<गाडित ताटकळत बसतात - ’त्याची’ स्वप्नं... ’त्याचं’ कर्तृत्व... ’त्याच्या’ भरार्‍या...
आणि कुठल्याश्या धुक्यात विरघळून जातं... त्यांचं दोघांचं ’आपलं’ काही...>>

मस्त....

खुप्पच सुरेख.. अल्वार अन तरल...
करशील रे तू पार. डोंगर भेदलेल्या तुला काही धूकं नाही फार.
उगाच वाटलं म्हटलं जरा घालू एकवार हातात हात. चार पावलं चालून यावं वेचावं काही नवथर धुक्यात. येतोस?">>> Happy

Pages