सायकलविषयी सर्व काही २

Submitted by आशुचँप on 8 May, 2013 - 15:04

http://www.maayboli.com/node/42915
ज्यांनी हा धागा वाचला असेल आणि सायकल घ्यायचे ठरवले असेल त्यांचे मनापासून अभिनंदन...किमान विचार केलात आणि उत्सुकता दाखवलीत हेही नसे थोडके...

या भागात आपण पाहूया सायकल निवडण्यापूर्वी काय करावे. सर्वसाधारणपणे सायकलच्या दुकानात गेल्यावर इतक्या सायकली, गियरवाल्या, बिनागियरवाल्या, देशी, इंपोर्टेड असे पाहून भंजाळायला होते. त्यात आपण शाळा कॉलेजमध्ये सायकल चालवल्यानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच सायकल घ्यायला गेलो असू तर फारच.
आपल्या काळात २-२.५० हजारात चांगली सायकल येत असे पण आता तो जमाना गेला..
आता साध्या सायकलीसुद्धा पाच सहा हजाराच्या घरात आहेत. थोड्या चांगल्या सायकली १०-२० हजारात आणि रेग्युलर चालवणार्यांसाठी तर पार अगदी पाच लाखांपर्यंत (अतिशयोक्ती नाही पुण्यात लाईफसायकल मॉलमध्ये मी ही पाच लाखाची सायकल पाहीली आहे)
अर्थात आपल्याला इतक्या महागातल्या सायकलची नक्कीच गरज नाही. या सायकली प्रामुख्याने प्रोफेशनल सायकलपटू वापरतात...आपल्याला गरज आहे ती एक हलक्या, स्वस्त मस्त आणि दणकट सायकलची...आणि इथेच आपल्याला पहिला दणका बसतो...

हलकी, स्वस्त मस्त आणि दणकट सायकल हे एक आखुडशिंगी बहुदुधी प्रकरण आहे.
कसे त्याचे उदाहरण देतो...
स्वस्त आणि दणकट सायकल - अर्थातच काळा घोडा किंवा दूधवाला सायकल...या सायकलला तोड नाही. एकदम दणकट आणि स्वस्तही. पण ही मुळीच हलकी नाही. आणि ही घेऊन तुम्ही ऑफीसलाही जाऊ शकत नाही.
स्वस्त आणि हलकी सायकल - बहुतांशी चायनिज बनावटीच्या सायकली. अनेकदा या अन्य चायनिज मालाप्रमाणे क्षणभंगुर असतात. यात चायनिज मोबाईलप्रमाणे भरपूर सोयी सुविधांचा मारा केला असतो पण क्वालीटी शून्य. आणि सायकल चालवताना एखादा पार्ट तुटणे हे फारच धोकादायक आहे.
त्यामुळे जर आपल्याला हलकी आणि दणकट सायकल घ्यायची असेल तर थोडा खिसा हलका करावा लागेल एवढे मात्र निश्चित..
स्कॉट, बर्गेमॉंट, बियांची, ट्रेक यासारखे इंटरनॅशनल ब्रँड हे वजनाने अतिशय हलक्या पण तितक्याच दणकट सायकल्स बनवण्यात अग्रेसर मानले जातात. हे बहुतांशी ब्रँड आता भारतात सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि याच्या किंमती साधारणपासून १५ हजारांपासून पुढे आहेत.

आता सायकलसाठी एवढे पैसे खर्च करायचे म्हणले किच आपल्याला धसका बसतो...बापरे एवढे पैसे आपल्याला नाही परवडणार..आपण काय कधीतरी वापरणार आणि नंतर ती नुसती पडून राहणार मग कशाला एवढी महागातली सायकल...आणि मग या नकारात्मक विचारानंतर एक पाच-सहा हजाराची सायकल खरेदी केली जाते. ती अर्थातच जड तरी असते किंवा कमी क्वालीटीची..आणि मग नंतर नंतर ती त्रास देऊ लागते आणि हळूहळू ओढून ताणून आणलेला उत्साह कमी होऊन खरोखरच ती सायकल पडून राहते.

त्यामुळे माझा सल्ला हाच की खरोखर सायकल चालवण्याची इच्छा असेल तर थोडे पैसे खर्च करा..मोबाईल घेतानाही अनेकजण १०-२० हजार सहजगत्या खर्च करतात..तेच पैसे आपण आपल्या आरोग्यासाठी गुंतवत आहोत असा विचार करा. पेट्रोलचे वाचलेले पैसे, जिमचे, औषधपाण्याचे खर्च लक्षात घेता सायकल कधीही स्वस्तातच पडते.

आता मुळात महाग सायकल का घ्यायची..एकतर वरती सांगितले तसे की हलक्या आणि दणकट असतात म्हणून. दुसरे म्हणजे या सायकली चालवायला अतिशय सुखद असतात...आपण शाळा कॉलेजच्या वयाचे नसू तर या वयात पूर्वीसारखा जोम नसतो आणि स्नायूही थोडे आखडून गेलेले असतात, लवचिकपणा, दमसास हा तितका राहीलेला नसतो. अशा वेळी चालवायला मजा येईल, मोटीव्हेट करेल अशी सायकलच घेणे उत्तम...अन्यथा ती दोन चार महिन्यात पडून राहणार एवढे मात्र निश्चित (हा एक सर्वसाधारण अंदाज आहे...यालाही अपवाद असतील..त्यांनी कृपया असे कसे म्हणू शकता म्हणून वाद घालू नये)

आता अजून एक मुद्दा म्हणजे गियरवाल्या सायकलींचा...आपल्यापैकी अनेकजण गियरवाली सायकल म्हणजे काहीतरी चमक्तारीक प्रकरण असल्यासारखे वागतात. पण एकदा सवय झाली तर त्यासारखी छान गोष्ट नाही हे लक्षात येते. गियरवाल्या सायकलींना जास्त मेंटेनन्स लागतो, त्याला जास्त वेगाने जावे लागते ही सगळी मिथके आहेत. आत्ता आपण एवढेच लक्षात ठेवायचे की गिअरमुळे आपण आपल्याल्या स्नायूंवर जितका ताण देणे शक्य आहे तितकाच देऊ शकतो. उदा. साध्या सायकली चढावर नेतानाचे श्रम आपल्याला आठवत असतील. पार अगदी दात ओठ खाऊन पेडलवर उभे राहून दाबावे तेव्हा सायकल पुढे सरकत असे. पण हेच गियरवाली सायकल तुम्ही आरामात बसून सहज पेडल मारत चढ पार करू शकता. हे गियर कसे असतात आणि त्याचा वापर कसा याची माहीती देतोच पुढे.

आता सायकलचे प्रकार
मुख्यत्वे सायकल रोडबाईक (टूर डी फ्रान्स डोळ्यासमोर आणा त्या सायकली), माऊंटन बाईक्स अर्थात एमटीबी आणि हायब्रीड. याव्यतिरिक्त टूरिंग बाईक्स, फोल्डींग बाईक्स, आणि एक्सट्रीम असेही प्रकार आहेत पण ते भारतात अजून फारसे उपलब्ध नाहीत आणि लोकप्रियही नाहीत.

रोडबाईक - खाली वळलेले हँडल, अतिशय स्लीक बॉडी आणि टायर्स ही वैशिष्ट्ये...मुख्यत्वे करून सायकलस्पर्धांमध्ये वापरल्या जातात.

माऊंटन बाईक्स - रोडबाईकच्या अगदी उलट...जाड टायर्स, भरभक्कम बॉडी आणि सस्पेशन. मुख्यत्वे करून ऑफ रोडींग साठी वापरले जातात. जाड टायर्स आणि सस्पेशनमुळे खराब रस्त्यांवरही सुखात चालवता येते.

अर्थात रोजच्या रोज ऑफीसला किंवा घराच्या आजूबाजूला जाणारे आपल्यासारखे या दोन्ही गोष्टी करत नाहीत. त्यामुळे आपल्यासाखी हायब्रीड हा प्रकार उत्तम...

रोडबाईक आणि माऊंटन बाईक यांचा संकर घडवून आणलेली ही सायकल सर्वांनाच वापरता येण्यासारखी असते. टायर्स स्लीक असल्याने पळते वेगात आणि एमटीबीसारखे हँडल असल्याने वाकून चालवाण्याची गरज नाही. जर तुम्ही वरच्या दोन्ही गटात जाण्याचा विचार करत नसाल तर हायब्रीडशिवाय पर्याय नाही. अनेकजण एमटीबीच्या देखण्या रुपाला भाळून विकत घेतात आणि डांबरी रोडवर सस्पेशन आणि जाड टायर्स वाहून नेता नेता टेकीला येतात.

आता आपण एकदा हायब्रीड घ्यायची ठरवल्यानंतरही त्यात पुन्हा शंभर ब्रँड, पन्नास फिचर्स आणि हजार पर्याय असतात आणि त्यापैकी नक्की कुठला पर्याय निवडावा याबाबत मनात संभ्रम राहतो. डायरेक्ट दुकानात गेलात तर तो तुम्हाला इतके गियर्स, सस्पेन्शन, डिस्कब्रेक आदींचा मारा करून टेकीला आणतो. तर आपण टप्प्याटप्याने या फिचर्सची माहीती करून घेऊ...

१. सस्पेन्शन्स - अनेकदा दुकानदार याचे भरघोस कौतुक करून सस्पेन्शन असणे किती आवश्यक आहे हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. पण माझा अनुभव असा आहे की शहरातल्या शहरात चालवताना सस्पेन्शनची मुळीच गरज पडत नाही. पुण्यातले रस्ते काय हेमामालिनीच्या गालासारखे नाहीत पण तरीदेखील सस्पेन्शनची गरज पडत नाही. आणि मुळात आपले बजेट कमी असेल तर सस्पेन्शनच्या मोहात न पडलेलेच बरे कारण चांगले सस्पेन्शन महागडा प्रकार आहे आणि स्वस्त सायकलीमध्ये स्वस्तातलेच सस्पेन्शन बसवले असताता जे उपयोगी तर फारसे नाहीतच पण उलट त्याने वजनात वाढ होते. स्कॉटची विदाऊट सस्पेन्शन १२ कि. वजन तर फ्रँट सस्पेन्शन १३.५ कि. आणि विश्वास ठेवा हे वाढलेले दीड किलो अतिशय अनावश्यक असतात. त्यामुळे पैसे वाचवा आणि श्रमही.

२. डिस्कब्रेक - अजून एक अनावश्यक फिचर. टूर डी फ्रान्समध्ये सायकली ८०-९०किमी च्या वेगाने जातात त्या सायकलींना देखील डिस्कब्रेक नसतात. आणि आपण कितीही वेगात गेलो तरी ४०च्या वर जात नाही. त्यामुळे इथेही साफ नाही आणि पैसे बचाओ धोरण.

३. टायर्स - बरेचजण जाड टायर्सच्या मोहात पडतात. पण अनुभव असा की डांबरी रस्त्यावर स्लीक टायर्स असले तर कमी श्रमात जास्त वेगात जाता येते. म्हणूनच रोड बाईक्सचे टायर सुपरस्लीक असतात. जाड टायर्समुळे खड्यांमधूनही आरामात जाता येते पण त्यासाठी वजनाची पेनल्टी बसतेच.

४. गियर्स - सर्वात महत्वाचा मुद्दा..साधारणपणे दुकानदार ही १४ गियरवाली, २७ गियरवाली सायकल असे दाखवतात आणि बरेचजणांना असे वाटते की मोटरबाईकप्रमाणे एका पुढे एक असे २१ गियर्स असतात आणि मग एवढे कशाला असा प्रश्न येतो. पण मुळात हे मार्केटिंग गिमिक्स आहे. २१ गियर्स असले तरी आपण त्यातले सगळे वापरू शकत नाही आणि वापरूच नये.

आता हे गियर्स कसे असतात सांगतो...सगळ्या सायकलींचे गियर्स हे कॉबीनेशनमध्ये असतात. डाव्या बाजूला ३ फ्रंट गियर्स आणि उजव्या बाजूला ७ रिअर गियर्स असे हे सात त्रिक असे २१ गियर्स. आणि कुठल्यावेळी कुठले गियर वापरायचे याचेही नियम आहेत.

जसे बाईक, कार सुरु करताना आपण पहिल्या गियरमध्ये टाकून मग पुढे नेतो तसेच हे. पहिल्या गियरमध्ये पेडल मारणे अतिशय सोपे म्हणजे अगदी गरागरा फिरवता येईल इतके. पण श्रम कमी असल्यामुळे काम फक्त गतीला चालना देणे ऐवढेच. त्यामुळे वेगात चालवण्यासाठी उपयुक्त नाही. चढावर जिथे पेडल फिरवणे आवश्यक तिथेच पहिला गियर जो डावीकडे असतो. आणि त्याच्या कॉंबिनेशनमध्ये मागचे (उजवीकडचे) १, २ हे गियर्स...
आता थोडासा वेग आला आहे तर डावीकडचा गियर एकाने वाढवायचा..दुसरा गियर हा सर्वसाधारणपणे सरळ रस्त्यांवर चालवण्यासाठी वापरला जातो. आणि त्याच्या कॉंबोमध्ये उजवीकडचे ३, ४, ५ हे गियर्स
आता छान गणित जमले आहे आणि उत्साह आहे आणि वेगाने सायकल चालवण्याची मौज घ्यायची आहे तर डावीकडचा तिसरा गियर टाकायचा. सगळ्यात वरचा गियर असल्याने थोड्या पॅडलमध्ये सायकल भसकन पुढे जाते पण ते पॅडल दाबायला श्रमही तितकेच जास्त लागतात. याच्या कॉंबोमध्ये ६, ७ हे उजवीकडचे गियर्स. शक्यतो वेगाने जाण्यासाठी किंवा उतारावर चालवण्यासाठी.
शक्यतो डावीकडच्या पहिल्या गियरवर उजवीकडचा ७ किंवा डावीकडच्या तिसर्या गियरवर उजवीकडचा पहिला असे चमत्कारीक कॉंबो करू नये त्याने चेनवर ताण येऊन ती निसटण्याची शक्यता असते.
हे थोडे तांत्रिक झाले असले तरी थोड्याश्या सरावाने सहज जमून जाते. फार काही अवघड नाही. त्यामुळे गियर्सचा बाऊ बाळगू नका.

सर्व प्रचि आंतरजालावरून साभार...(शेवटचा माझा सायकलचा आहे)

पुढच्या भागात सायकल्सचे देशी परदेशी ब्रँड, सुरक्षा आणि काळजी, सायकलबरोबरच्या आवश्यक एक्सेसरीज आणि काही टीप्स...

http://www.maayboli.com/node/42971

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान माहिती आहे ही! माझ्याकडे ladybird breeze आहे . मी फक्त campus मध्येच वापरते. अजून रस्त्यावर चालवायची हिम्मत होत नाही अन खूप जास्त उतारावरचा speedbreaker ओलंडता येत नाही.

गुरुघंटाल आशु, गुढीपाडव्यापासून ३७२किमी. झाले रे!! .. मध्ये १५ दिवस गांवी गेलो होतो ते सोडून..
सध्या 'सप्टेंबरात गोवा नित्य वदावा' सुरु आहे. Happy
(विषयांतराबद्दल क्षमस्व)
इथे कुणी अलिबाग ते गोवा सागरी मार्गाने गेलेले आहेत कां? अचूक अंतरे हवी आहेत. (गांवाहून येतांना त्या मार्गाने आल्यामुळे बर्‍यापैकी अंतरे हाताशी आहेत).
तो विमुक्त २ भाग खरडून कुठे गडपलाय कोण जाणे??

मी आठ वर्षांपुर्वी एक दणकट १० (३-७) गिअरवाली माउंटनबाईक घेतली. एकदम मस्त आहे. जडबुदुक आहे पण मी काही माउंटनींग करत नाही, रस्त्यावरच चालवते. एक लाईटवेट रोडबाईक घ्यायचा विचार आहे..आता वय झालं अन बाईक खुप रेटाविशी वाटत नाही.

लेख आवडला. नविन खरेदीच्यावेळी रेफरंसला उपयोगी आहे.

हेमट्या - लईच सुटलायस...मी इथे उन्हाने करपतोय त्यामुळे फक्त ऑफीसला जाणे येणे इतकेच सायकलिंग करतोय...
गोवा डन आहेच....पण आता तुझी तयारी बघून मला पण काहीतरी करावे लागणार बहुदा...

शिल्पा - (३-७) म्हणजे २१ च. Happy
हो बरेचदा एमटीबी घेतलेल्यांना हाच व्याप होतो. एकदम रोडबाईक घेण्यापेक्षा हायब्रीड चालवून पहा.

अरे देवा! हे गिअर्स माझ्या सायकलीला असूनही मी माहिती न घेता माझ्याच मनाला वाटेल तसे टाकत होते. आता समजलं दम का लागतोय ते. मस्त माहिती देताय.... आता मी उद्याच माझी गिअर सेटिंग बदलते.
बाईक (होंडा-बजाज वगैरे..) चे गिअर्स म्हणजे कमी गिअर १-२ वगैरे चढात आणि जास्तीचे गिअर उतारात हेच गणित इथे असतं (बरोबर आहे की पुन्हा बेसिकमें राडा?) असं मनातही आलं नाही Uhoh

कमी गिअर १-२ वगैरे चढात आणि जास्तीचे गिअर उतारात हेच गणित इथे असतं (बरोबर आहे की >>>

एकदम बरोबर ! आणि मधले सरळ रस्त्यावर.

आता आजपासून लढायला सुरू कर.

केदार, आजचा कोटा फिनीश! आत उद्याच बदल करते आणि सांगते.
धन्यवाद! Happy

अवांतर...
माझी सायकल बघून एक भाजीवाला- ताई, फार म्हाग असेल ना? गाडीवानी दिसतेय..चालवायलाबी तशीच का?
मी- हो.
तो- कितीचीहे?
मी- (अनवधानाने!) दहा हजार.
तो- हायला! धा ची सायकल..
मी- (खरंच घाबरून...) माझी नाही ती. मला नाही परवडणार. मी चालवायला म्हणून आणली आहे! (काय थापा!)

मला खरंच सॉल्लिड ताण आला... कारण पहिल्या दिवसापासून बघतेय मी, लोक नुसती पार्क केलेली सायकल वळून वळून बघतायत... खरंच चोरेल कोणी... देवळात गेलं की निम्मं लक्ष चपलांवर तसं भाजी घेताना माझं निम्मं लक्ष सायकलवर! Wink तरी वॉकिंग ट्रॅकवर जाताना जमिनीला फिक्स केलेल्या रेलिंगला मी वायरलॉक करते सायकल, कोणी उचलून नेऊ नये म्हणून. पहिल्याच दिवशी "तुम्ही विकताय का ही सायकल?" असा प्रश्न एकांनी केल्यावर हे असं झालंय! Proud

सायकलच्या सीटची उंची कशी असावी? याबद्दल माझा गोंधळ होतो. लहान असताना 'काळी' सायकल चालवत होते. ती बर्‍यापैकी उंच होती. बसल्यावर पेडल मारताना पाय पूर्ण सरळ व्हायचा. आताच्या सायकली बुटक्या असतात. पोक काढून बसावे लागते. पेडल मारताना पायही पूर्ण सरळ होत नाही. (याच लेखातले चित्र क्र. २ बघा) सीटची आयडियल उंची कशी असावी? (सायकल शहरात चालवायची असेल तर )

हायला हे गिअर वाचुन मला अगदीच रहावत नाहीय.. आज घरी गेल्यावर पाहतेच या गियरला... आजवर कधी ढुंकुनही पाहिलं नाही त्यांच्याकडे. हे नंबर्स प्रकरण इथेच पहिल्यांदा वाचलं, असलं काही असतं हेच माहित नव्हतं. Happy

मागे लोकल सायकलवाल्याकडे सर्विसिंगला नेलेले त्याने सायकल हळू चालत असताना गिअर वापरले तर चेन तुटून्जाणार म्हणुन्सांगितले. तेव्हापासुन गिअरकडे बघितलेच नाही मी कधी.

सीटची उंची : पाय पेडल मारताना जितका सरळ झाला तितकी ती पोझिशन योग्य. म्हणून सायकलच्या सीट थोड्या उंच असतात. जास्त पोक काढून बसू नये अन्यथा लाँग राईडस नंतर पाठ दुखते, शिवाय सायकल नेहमी इम्बॅलंस राहाते. ( उदा चढ चढताना आपोआप पोक येतो तसे)

मस्त धागा. मी हिवाळा संपल्यापासून रोज ऑफिसला सायकलने येतो जातो आहे गेले दोन महिने. रोजचे ८-९ किमी होतात आणि ऑफिसमध्ये पोचल्यावर ताजेतवाने वाटते.

अजून एक फुकट सल्ला: ऑफिसला जाताना तसेच मोठ्या पल्ल्याचे अंतर काटताना सायकल चालवताना वापरायचे कपडे घालावेत. किमान ढुंगणाशी पॅडिंग असलेली अर्धी चड्डी किंवा पूर्ण बिब व वरती घालायचा टिशर्ट घ्यावा. त्यामुळे बुडाला चांगला आधार (सपोर्ट) मिळतो आणि घाम सर्व ह्या कपड्यातून निघून जातो.
ऑफिसमध्ये गेल्यावर नेहेमीचे कपडे घालावेत. सायकलींगच्या चड्या-शर्टच्या आत अंतर्वस्त्रे घालत नाहीत. का ते गूगल केल्यावर कळेल. त्यामुळे हापिसात सगळे कपडे चढवले की एकदम फ्रेश Happy

प्रज्ञा - अगदी रास्त भिती आहे तुमची..मी पण माझ्या सायकलची किंमत कोणालाच सांगत नाही. अगदीच खनपटीला बसले तर ४ हजार म्हणून सांगतो.
आणि सायकल इकडे तिकडे कुठेच पार्क करत नाही. ऑफीसला पण सिक्युरिटी गार्डच्या समोरच लॉक करून ठेवतो.

पौर्णिमा - या धाग्यावर अतिशय उपयुक्त माहीती आहे.
http://www.ebicycles.com/article/determining-your-bicycle-saddle-height....

रोजचे ८-९ किमी होतात आणि ऑफिसमध्ये पोचल्यावर ताजेतवाने वाटते. + १००

पॅडिंग असलेली अर्धी चड्डी मला घ्यायची आहे पण अजून योग आला नाहीये. किंमत फार जास्त आहे त्याची.

>> बाईक (होंडा-बजाज वगैरे..) चे गिअर्स म्हणजे कमी गिअर १-२ वगैरे चढात आणि जास्तीचे गिअर उतारात हेच गणित इथे असतं
>> कमी गिअर १-२ वगैरे चढात आणि जास्तीचे गिअर उतारात हेच गणित इथे असतं

मला वाटते की वरील (ठळक अक्षरातले) गणित चुकीचे आहे.

१) मोटरसायकलमध्ये कमी गियर हा पॉवरफूल असतो.

कमी गियर = जास्त पॉवर = कमी वेग = म्हणून सुरूवातीला कमी गियरमध्ये गाडी चालवावी लागते = म्हणूनच चढावर हा गियर वापरावा लागतो.

२) मोठा गियर = कमी पॉवरचा = जास्त वेग = म्हणून गाडी एकदा चालू लागली की जास्त वेगासाठी हा गियर वापरावा लागतो = (उतारावर आधीच गाडीचा वेग जास्त असतो त्यामूळे मोठा गियर वापरून गाडी जास्त वेगात जाईल व उतारावर कंट्रोल होणार नाही म्हणून उतारावर मोठा गियर न वापरता लहान गियर टाकून, २ किंवा १, गाडी चालवावी (लागते.) )

हेच गणित जास्त गियरच्या सायकलींना लागू होते ना?

माझी एक शंका :

>>> आता हे गियर्स कसे असतात सांगतो...सगळ्या सायकलींचे गियर्स हे कॉबीनेशनमध्ये असतात. डाव्या बाजूला ३ फ्रंट गियर्स आणि उजव्या बाजूला ७ रिअर गियर्स

हे ३ फ्रंट गियर्स म्हणजे पुढच्या चाकाला
अन
७ रिअर गिअर्स मागच्या चाकाला

असे असते काय?

जमल्यास फोटो द्यावा. निट समजेल.

पाषाणभेद - पहिली पोस्ट - थोडे बरोबर थोडे चूक.
सायकलच्या कमी गियरना पॉवर जास्त असते आणि त्यामुळे पायांना जास्त जोर लावावा लागत नाही. अगदी थोडक्या श्रमात सायकल जागची हलते. पण एकदा वेग पकडल्यावर तेच गियर ठेवले तर पेडल नुसतेच गरागरा फिरेल आणि वेगावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे पुढचा गियर कमी पॉवरचा त्यामुळे त्याला पायांची पॉवर जोडावी लागते.
इथे इंजिनमध्ये पाय हे गणित लक्षात ठेवावे. आणि उतारावर पेडल मारलेच पाहिजे असे काही नाही. अगदीच वेग हवा असेल तरच मोठे गियर अन्यथा निवांत बसून रहा. सुसाट जातेच सायकल.

दुसरी पोस्ट बरोबर आहे...डावीकडचे ३ हे पुढचे गियर आणि उजवीकडचे ७ हे मागचे..माझ्या सायकलचेच उद्या फोटो काढून डकवतो...

आशुचँप - धन्यवाद उत्तम लेख.

मी स्वत: सायकलीसाठीचे कपडे न वापरता नेहमीचेच कपडे घालून कामाला जायचो (सध्या कामाचे ठिकाण ५० किमी लांब आहे म्हणून सायकल वापरणे शक्य नाही). ४-५ किमी साठी कपडे दोनदा बदलणे मला कंटाळवाणे व्हायचे. मी ४-५ किमी रहदारीमधून जायचे असल्यास नाकावर "मास्क" वापरायचो. धूम्रनालांचा ("exhaust") त्रास कमी... तसेच मी भारतात साधी काळी हर्क्युलसच वापरायचो.

सुरक्षेचा मुद्दा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे पण सावध राहून आणि अपघाती जागांमधे नीट सांभाळून जायचे हा एकमेव उपाय. बाइक आणि सायकल सारख्याच धोकादायक (किंवा सायकल कमी धोकादायक) असे माझे मत आहे.

उत्तम सायकल्सची काही मॉडेल्स देऊ शकता का? लिंक्सही चालतील, जेणेकरुन कोणती सायकल सर्वात चांगली आणि परवडणारीही, हे कळेल. आय होप, ही जाहिरात होणार नाही आणि आक्षेपही येणार नाही. Happy

"उत्तम सायकल्सची काही मॉडेल्स देऊ शकता का?"

काही लिंक्स:
१)http://www.trekbikes.com/int/en/
२)http://www.firefoxbikes.com/
३)http://www.bianchi.com/
४)http://www.gtbicycles.com/
५)http://www.cannondale.com/
६)http://www.axis-bikes.com/
७)http://www.btwin.com/en/home
८)http://www.herocycles.com/
९)http://www.atlascycles.co.in/
१०)http://hamiltoncycles.com/

ही साईट पहा...
http://www.choosemybicycle.com/in/en/bicycles

इथे सर्वच भारतीय, परदेशी बनावटींच्या सायकली आहेत. तुम्हाला हवी तशी सायकल पाहता येईल....
फक्त किंमती नीट तपासून पहा...२०१३ पूर्वीच्या परदेशी सायकलींवर ड्युटी लागत नव्हती. त्यामुळे त्या स्वस्त होत्या. आता त्यात किमान ३-५ हजारांनी वाढ झाली आहे..
हा मुद्दा लक्षात घेणे

धन्यवाद उपेन्द्र, आशुचँप.
सायकल घेताना पुन्हा एकदा हे सगळं वाचेनच. Happy

माझ्या नववितल्या मुलीसाठी सायकल घ्यायची आहे. एक वर्षानंतर तिच सायकल माझा मुलगा वापरेल. सध्या मुलगी लेडीबर्ड वापरते तर मुलगा क्रॉस के ३० वापरतो. दोन्ही सायकली सिंगल गिअरच्या आहेत आणि बर्‍यापैकी वजनदार आहेत. सायकल वरुन १ किमी अंतरावरच्या शाळेत जातात मुलं. आणि संध्याकाळी सोसायटीमधेच रपेट मारतात. मुलांना गिअरची क्रेझ आहे. शाळेत जाताना मधे एक चढ आहे. तिथे सध्या उभं राहुन जोर मारत मारत जातात.

फक्त ६ गिअरची एखादी चांगली हलकी सायकल सुचवा ना. पुढचा/मागचा गिअर काँबिनेशनचं झंझट नकोय. बजेट १५ हजाराच्या आत आहे.

परीक्षा ८ मार्च ला संपणार आहे. तर त्याने २ महिने आधीच नवीन सायकल साठी जॅक लावून ठेवलाय बाबाकडे, आणि रोज चार वेळा त्याची आठवण करून देतो, त्याला गियर वाली सायकल हवी आहे त्याच्या मित्रांनी दोघांनी गेअरसायकल घेतली आहे. पण आठ वर्षाच्या मुलांना कोणती सायकल घ्यावी?गेअरवली चालेल का?
जाणकारांकडून काही टिप्स मिळतील का छोट्यांच्या सायकल साठी,
* सायकल घेण्याआधी काय बघावं?
* कोणत्या ब्रँड ची सायके चांगली मिळेल?
* त्यात साईझ असतात का आणि आत्ता घेतलेली सायकल ( वय वर्षे ८) तो किती वर्ष वापरू शकेल किंवा त्याला ती चालेल.
* किमती साधारण किती असतील?
आणि बराच काही ज्याचा विचार करायला हवा सायकल घेण्यापूर्वी..

Pages