सायकलविषयी सर्व काही २

Submitted by आशुचँप on 8 May, 2013 - 15:04

http://www.maayboli.com/node/42915
ज्यांनी हा धागा वाचला असेल आणि सायकल घ्यायचे ठरवले असेल त्यांचे मनापासून अभिनंदन...किमान विचार केलात आणि उत्सुकता दाखवलीत हेही नसे थोडके...

या भागात आपण पाहूया सायकल निवडण्यापूर्वी काय करावे. सर्वसाधारणपणे सायकलच्या दुकानात गेल्यावर इतक्या सायकली, गियरवाल्या, बिनागियरवाल्या, देशी, इंपोर्टेड असे पाहून भंजाळायला होते. त्यात आपण शाळा कॉलेजमध्ये सायकल चालवल्यानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच सायकल घ्यायला गेलो असू तर फारच.
आपल्या काळात २-२.५० हजारात चांगली सायकल येत असे पण आता तो जमाना गेला..
आता साध्या सायकलीसुद्धा पाच सहा हजाराच्या घरात आहेत. थोड्या चांगल्या सायकली १०-२० हजारात आणि रेग्युलर चालवणार्यांसाठी तर पार अगदी पाच लाखांपर्यंत (अतिशयोक्ती नाही पुण्यात लाईफसायकल मॉलमध्ये मी ही पाच लाखाची सायकल पाहीली आहे)
अर्थात आपल्याला इतक्या महागातल्या सायकलची नक्कीच गरज नाही. या सायकली प्रामुख्याने प्रोफेशनल सायकलपटू वापरतात...आपल्याला गरज आहे ती एक हलक्या, स्वस्त मस्त आणि दणकट सायकलची...आणि इथेच आपल्याला पहिला दणका बसतो...

हलकी, स्वस्त मस्त आणि दणकट सायकल हे एक आखुडशिंगी बहुदुधी प्रकरण आहे.
कसे त्याचे उदाहरण देतो...
स्वस्त आणि दणकट सायकल - अर्थातच काळा घोडा किंवा दूधवाला सायकल...या सायकलला तोड नाही. एकदम दणकट आणि स्वस्तही. पण ही मुळीच हलकी नाही. आणि ही घेऊन तुम्ही ऑफीसलाही जाऊ शकत नाही.
स्वस्त आणि हलकी सायकल - बहुतांशी चायनिज बनावटीच्या सायकली. अनेकदा या अन्य चायनिज मालाप्रमाणे क्षणभंगुर असतात. यात चायनिज मोबाईलप्रमाणे भरपूर सोयी सुविधांचा मारा केला असतो पण क्वालीटी शून्य. आणि सायकल चालवताना एखादा पार्ट तुटणे हे फारच धोकादायक आहे.
त्यामुळे जर आपल्याला हलकी आणि दणकट सायकल घ्यायची असेल तर थोडा खिसा हलका करावा लागेल एवढे मात्र निश्चित..
स्कॉट, बर्गेमॉंट, बियांची, ट्रेक यासारखे इंटरनॅशनल ब्रँड हे वजनाने अतिशय हलक्या पण तितक्याच दणकट सायकल्स बनवण्यात अग्रेसर मानले जातात. हे बहुतांशी ब्रँड आता भारतात सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि याच्या किंमती साधारणपासून १५ हजारांपासून पुढे आहेत.

आता सायकलसाठी एवढे पैसे खर्च करायचे म्हणले किच आपल्याला धसका बसतो...बापरे एवढे पैसे आपल्याला नाही परवडणार..आपण काय कधीतरी वापरणार आणि नंतर ती नुसती पडून राहणार मग कशाला एवढी महागातली सायकल...आणि मग या नकारात्मक विचारानंतर एक पाच-सहा हजाराची सायकल खरेदी केली जाते. ती अर्थातच जड तरी असते किंवा कमी क्वालीटीची..आणि मग नंतर नंतर ती त्रास देऊ लागते आणि हळूहळू ओढून ताणून आणलेला उत्साह कमी होऊन खरोखरच ती सायकल पडून राहते.

त्यामुळे माझा सल्ला हाच की खरोखर सायकल चालवण्याची इच्छा असेल तर थोडे पैसे खर्च करा..मोबाईल घेतानाही अनेकजण १०-२० हजार सहजगत्या खर्च करतात..तेच पैसे आपण आपल्या आरोग्यासाठी गुंतवत आहोत असा विचार करा. पेट्रोलचे वाचलेले पैसे, जिमचे, औषधपाण्याचे खर्च लक्षात घेता सायकल कधीही स्वस्तातच पडते.

आता मुळात महाग सायकल का घ्यायची..एकतर वरती सांगितले तसे की हलक्या आणि दणकट असतात म्हणून. दुसरे म्हणजे या सायकली चालवायला अतिशय सुखद असतात...आपण शाळा कॉलेजच्या वयाचे नसू तर या वयात पूर्वीसारखा जोम नसतो आणि स्नायूही थोडे आखडून गेलेले असतात, लवचिकपणा, दमसास हा तितका राहीलेला नसतो. अशा वेळी चालवायला मजा येईल, मोटीव्हेट करेल अशी सायकलच घेणे उत्तम...अन्यथा ती दोन चार महिन्यात पडून राहणार एवढे मात्र निश्चित (हा एक सर्वसाधारण अंदाज आहे...यालाही अपवाद असतील..त्यांनी कृपया असे कसे म्हणू शकता म्हणून वाद घालू नये)

आता अजून एक मुद्दा म्हणजे गियरवाल्या सायकलींचा...आपल्यापैकी अनेकजण गियरवाली सायकल म्हणजे काहीतरी चमक्तारीक प्रकरण असल्यासारखे वागतात. पण एकदा सवय झाली तर त्यासारखी छान गोष्ट नाही हे लक्षात येते. गियरवाल्या सायकलींना जास्त मेंटेनन्स लागतो, त्याला जास्त वेगाने जावे लागते ही सगळी मिथके आहेत. आत्ता आपण एवढेच लक्षात ठेवायचे की गिअरमुळे आपण आपल्याल्या स्नायूंवर जितका ताण देणे शक्य आहे तितकाच देऊ शकतो. उदा. साध्या सायकली चढावर नेतानाचे श्रम आपल्याला आठवत असतील. पार अगदी दात ओठ खाऊन पेडलवर उभे राहून दाबावे तेव्हा सायकल पुढे सरकत असे. पण हेच गियरवाली सायकल तुम्ही आरामात बसून सहज पेडल मारत चढ पार करू शकता. हे गियर कसे असतात आणि त्याचा वापर कसा याची माहीती देतोच पुढे.

आता सायकलचे प्रकार
मुख्यत्वे सायकल रोडबाईक (टूर डी फ्रान्स डोळ्यासमोर आणा त्या सायकली), माऊंटन बाईक्स अर्थात एमटीबी आणि हायब्रीड. याव्यतिरिक्त टूरिंग बाईक्स, फोल्डींग बाईक्स, आणि एक्सट्रीम असेही प्रकार आहेत पण ते भारतात अजून फारसे उपलब्ध नाहीत आणि लोकप्रियही नाहीत.

रोडबाईक - खाली वळलेले हँडल, अतिशय स्लीक बॉडी आणि टायर्स ही वैशिष्ट्ये...मुख्यत्वे करून सायकलस्पर्धांमध्ये वापरल्या जातात.

माऊंटन बाईक्स - रोडबाईकच्या अगदी उलट...जाड टायर्स, भरभक्कम बॉडी आणि सस्पेशन. मुख्यत्वे करून ऑफ रोडींग साठी वापरले जातात. जाड टायर्स आणि सस्पेशनमुळे खराब रस्त्यांवरही सुखात चालवता येते.

अर्थात रोजच्या रोज ऑफीसला किंवा घराच्या आजूबाजूला जाणारे आपल्यासारखे या दोन्ही गोष्टी करत नाहीत. त्यामुळे आपल्यासाखी हायब्रीड हा प्रकार उत्तम...

रोडबाईक आणि माऊंटन बाईक यांचा संकर घडवून आणलेली ही सायकल सर्वांनाच वापरता येण्यासारखी असते. टायर्स स्लीक असल्याने पळते वेगात आणि एमटीबीसारखे हँडल असल्याने वाकून चालवाण्याची गरज नाही. जर तुम्ही वरच्या दोन्ही गटात जाण्याचा विचार करत नसाल तर हायब्रीडशिवाय पर्याय नाही. अनेकजण एमटीबीच्या देखण्या रुपाला भाळून विकत घेतात आणि डांबरी रोडवर सस्पेशन आणि जाड टायर्स वाहून नेता नेता टेकीला येतात.

आता आपण एकदा हायब्रीड घ्यायची ठरवल्यानंतरही त्यात पुन्हा शंभर ब्रँड, पन्नास फिचर्स आणि हजार पर्याय असतात आणि त्यापैकी नक्की कुठला पर्याय निवडावा याबाबत मनात संभ्रम राहतो. डायरेक्ट दुकानात गेलात तर तो तुम्हाला इतके गियर्स, सस्पेन्शन, डिस्कब्रेक आदींचा मारा करून टेकीला आणतो. तर आपण टप्प्याटप्याने या फिचर्सची माहीती करून घेऊ...

१. सस्पेन्शन्स - अनेकदा दुकानदार याचे भरघोस कौतुक करून सस्पेन्शन असणे किती आवश्यक आहे हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. पण माझा अनुभव असा आहे की शहरातल्या शहरात चालवताना सस्पेन्शनची मुळीच गरज पडत नाही. पुण्यातले रस्ते काय हेमामालिनीच्या गालासारखे नाहीत पण तरीदेखील सस्पेन्शनची गरज पडत नाही. आणि मुळात आपले बजेट कमी असेल तर सस्पेन्शनच्या मोहात न पडलेलेच बरे कारण चांगले सस्पेन्शन महागडा प्रकार आहे आणि स्वस्त सायकलीमध्ये स्वस्तातलेच सस्पेन्शन बसवले असताता जे उपयोगी तर फारसे नाहीतच पण उलट त्याने वजनात वाढ होते. स्कॉटची विदाऊट सस्पेन्शन १२ कि. वजन तर फ्रँट सस्पेन्शन १३.५ कि. आणि विश्वास ठेवा हे वाढलेले दीड किलो अतिशय अनावश्यक असतात. त्यामुळे पैसे वाचवा आणि श्रमही.

२. डिस्कब्रेक - अजून एक अनावश्यक फिचर. टूर डी फ्रान्समध्ये सायकली ८०-९०किमी च्या वेगाने जातात त्या सायकलींना देखील डिस्कब्रेक नसतात. आणि आपण कितीही वेगात गेलो तरी ४०च्या वर जात नाही. त्यामुळे इथेही साफ नाही आणि पैसे बचाओ धोरण.

३. टायर्स - बरेचजण जाड टायर्सच्या मोहात पडतात. पण अनुभव असा की डांबरी रस्त्यावर स्लीक टायर्स असले तर कमी श्रमात जास्त वेगात जाता येते. म्हणूनच रोड बाईक्सचे टायर सुपरस्लीक असतात. जाड टायर्समुळे खड्यांमधूनही आरामात जाता येते पण त्यासाठी वजनाची पेनल्टी बसतेच.

४. गियर्स - सर्वात महत्वाचा मुद्दा..साधारणपणे दुकानदार ही १४ गियरवाली, २७ गियरवाली सायकल असे दाखवतात आणि बरेचजणांना असे वाटते की मोटरबाईकप्रमाणे एका पुढे एक असे २१ गियर्स असतात आणि मग एवढे कशाला असा प्रश्न येतो. पण मुळात हे मार्केटिंग गिमिक्स आहे. २१ गियर्स असले तरी आपण त्यातले सगळे वापरू शकत नाही आणि वापरूच नये.

आता हे गियर्स कसे असतात सांगतो...सगळ्या सायकलींचे गियर्स हे कॉबीनेशनमध्ये असतात. डाव्या बाजूला ३ फ्रंट गियर्स आणि उजव्या बाजूला ७ रिअर गियर्स असे हे सात त्रिक असे २१ गियर्स. आणि कुठल्यावेळी कुठले गियर वापरायचे याचेही नियम आहेत.

जसे बाईक, कार सुरु करताना आपण पहिल्या गियरमध्ये टाकून मग पुढे नेतो तसेच हे. पहिल्या गियरमध्ये पेडल मारणे अतिशय सोपे म्हणजे अगदी गरागरा फिरवता येईल इतके. पण श्रम कमी असल्यामुळे काम फक्त गतीला चालना देणे ऐवढेच. त्यामुळे वेगात चालवण्यासाठी उपयुक्त नाही. चढावर जिथे पेडल फिरवणे आवश्यक तिथेच पहिला गियर जो डावीकडे असतो. आणि त्याच्या कॉंबिनेशनमध्ये मागचे (उजवीकडचे) १, २ हे गियर्स...
आता थोडासा वेग आला आहे तर डावीकडचा गियर एकाने वाढवायचा..दुसरा गियर हा सर्वसाधारणपणे सरळ रस्त्यांवर चालवण्यासाठी वापरला जातो. आणि त्याच्या कॉंबोमध्ये उजवीकडचे ३, ४, ५ हे गियर्स
आता छान गणित जमले आहे आणि उत्साह आहे आणि वेगाने सायकल चालवण्याची मौज घ्यायची आहे तर डावीकडचा तिसरा गियर टाकायचा. सगळ्यात वरचा गियर असल्याने थोड्या पॅडलमध्ये सायकल भसकन पुढे जाते पण ते पॅडल दाबायला श्रमही तितकेच जास्त लागतात. याच्या कॉंबोमध्ये ६, ७ हे उजवीकडचे गियर्स. शक्यतो वेगाने जाण्यासाठी किंवा उतारावर चालवण्यासाठी.
शक्यतो डावीकडच्या पहिल्या गियरवर उजवीकडचा ७ किंवा डावीकडच्या तिसर्या गियरवर उजवीकडचा पहिला असे चमत्कारीक कॉंबो करू नये त्याने चेनवर ताण येऊन ती निसटण्याची शक्यता असते.
हे थोडे तांत्रिक झाले असले तरी थोड्याश्या सरावाने सहज जमून जाते. फार काही अवघड नाही. त्यामुळे गियर्सचा बाऊ बाळगू नका.

सर्व प्रचि आंतरजालावरून साभार...(शेवटचा माझा सायकलचा आहे)

पुढच्या भागात सायकल्सचे देशी परदेशी ब्रँड, सुरक्षा आणि काळजी, सायकलबरोबरच्या आवश्यक एक्सेसरीज आणि काही टीप्स...

http://www.maayboli.com/node/42971

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मस्त धागा. सध्या माझी हायब्रीड सायकल नुसती पडून आहे, वापरायला हवी.
प्लीज सगळ्या भागांचे दुवे सगळ्याच धाग्यात १,२ असे ़ क्रमांक टाकुन द्याल का?

सायकल बरोबर हवा भरायचा पंप पण विकत घ्यावा. माझी हायब्रीड सायकल केवळ चाकात हवा नाही आणि पंप आणायचा आळस म्हणून पडून आहे. पण ह्या विकांताला पंप नक्की घेणार.

सायकलचा रस्ता नोंदवणारे एखादे app अवश्य टाकावे. बरीच stats जस सरासरी वेग, अंतर, थांबायचा वेळ, आपली प्रगती अशाने मोटीवेशन मिळत आणि फेसबुकावर टाकायला सोप पडत. Lol

सायकलचा रस्ता नोंदवणारे एखादे app अवश्य टाकावे. बरीच stats जस सरासरी वेग, अंतर, थांबायचा वेळ, आपली प्रगती अशाने मोटीवेशन मिळत आणि फेसबुकावर टाकायला सोप पडत.
>>>
इथे पहा

व्वा! छान धागा! पहिला भागही आवडला होता.
आमच्या पिढीतल्या ८०% लोकांसाठी सायकल हा जीवनाचा एक अविभाज्य घटकच होता.
मी चौथीत असताना मला लाल रंगाची सायकल(दुचाकी!!) मिळाली होता. घरासमोरच्या ग्राउंडवर माझ्या सायकलच्या कॅरिअरला धरून माझ्याबरोबर गोलगोल पळणारे वडील आजही नजरेसमोर आहेत. मग काही वर्षांनी रीतसर मोठी लेडीज सायकल मिळाली. तिथून जी सायकल चालवली ती कॉलेजमधे गेल्यावर थोडी कमी झाली. कारण कॉलेज खूपच लांब होतं. पण बाकी सगळ्या ठिकाणी सायकलशिवाय नाहीच. कधी चुकून माझ्याबरोबर माझी सायकल नसली तर "घोडा कुठाय"? असा प्रश्न लोक विचारायचे.
गंमत म्हणजे लग्नानंतरही ही सायकल मी माझ्याबरोबर नेली होती. तोपर्यंत लूना/कोणतीही मोपेड अस्तित्वात नव्हती. तेव्हा सासरी एक लॅम्ब्रेटा (लांब रेटा!!) होती. मग काही वर्षं मुलांनाही कधी पुढे छोटी सीट लाऊन, कधी मागे कॅरीअरवर असं बसवून अनेक कामं केली.
मग मात्र हळूहळू सायकल बंदच झाली.
नंतर अगदी आत्ता २ वर्षांपूर्वी कोडाईकॅनॉलला अगदी निसर्गरमणीय असा एक सायकल ट्रॅक होता. साधारणपणे ७ ते ८ कि.मी.चा असावा. तोही अगदी आरामात पूर्ण केला.
नंतर २०११मधे लेकीकडे (उसगावात) खूपच वेळा भरपूर सायकलिंग केलं .
पण तिथलं ट्रॅकवरून सायकल चालवणं म्हणजे अगदी स्वर्गसुखंच. कारण अवती भोवती निसर्ग रमणीय वातावरण. आणि मुख्य म्हणजे जनावरं, अवजड वाहनं किंवा अगदी पादचारी यापैकी काहीच तुम्हाला आडवे जाणार नाहीत याची खात्री! त्यामुळे अहाहा!

मस्त माहिती Happy

मलाही सायकल चालवायला खुप आवडते. अजुनही चान्स मिळाला की मी आनि लेक सायकल चालवुन येतो Happy

रोज एक अशाच वेगाने अजून येऊदेत....<<< सायकल जोरात पिटाळा Happy

दोन्ही भाग मस्त झालेत... Happy
मी आधी कॉलेज पर्यंत सायकल वापरायचे.. परवा आठवण झाली होती... आता परत घेइन बहुतेक

हा पण धागा मस्त Happy

पुर्वी साधी सायकल चालवली असल्याने हे इतक्या गियर्सचं भेंडोळं वाचून भंजाळायला झालं.

मस्त लिहिलंय. पुण्यात मोठी झाल्याने खूप वर्षं सायकल चालवली आहे. पण आता सगळाच सराव सुटलाय. कधीमधी मोह होतो पण कलकत्त्याच्या हवामानात, वाहतुकीत आणि अंतरांत सायकल चालवणं म्हणजे जवळजवळ हाराकिरीच!
पुढचे भाग पटपट लिहा Happy

मुळात हे मार्केटिंग गिमिक्स आहे. २१ गियर्स असले तरी आपण त्यातले सगळे वापरू शकत नाही आणि वापरूच नये. >>.

अरे आशू हे मार्केटिंग गिमिक नाही.

गिअरच्या सायकलमुळे आपण Cadence टिकवून ठेवू शकतो. जितके जास्त तेवढे चांगले.
मी गेले ७ -८ वर्षे सायकल चालवतोय. ते पण श्विन आणि ट्रेकच्या. माझी सध्याची ट्रेक ७१०० ही २१ गिअर वाली आहे पण जेंव्हा ३ X ८ ची ट्रेक ४३०० सहज चालवून बघीतली तर त्यातील आठवा (रादर माझ्या १ च्या -१ रेशो) इतका सहजसुंदर होता की ज्याचे नाव ते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गिअर Cadence ठरवते. २ - ५ ( म्हणजे २ डावीकडचा आणि ५ उजवीकडचा) हा जर एखाद्याला जास्त वाटत असेल तर तो २ - ३ मध्ये जाऊ शकतो पण त्यामुळे त्याचे पाय रोटेट होण्याचा वेग वाढतो पण सायकलचा वेग मात्र वाढत नाही. राईट मधील लोअर गिअर्स ( १, २,३) हे चढावर चढण्यासाठी उपयोगी आणि लेफ्ट मधील १ हा देखील चढावर चढण्यासाठी उपयोगी. सिंहगडासारख्या चढावर १, ३ किंवा २, २ हे सारखाच Cadence देऊ शकतात.

अ‍ॅप साठी मी स्टराव्हा वापरतो. ज्यातून वेग, चढ, उतार, मिनिटं हा सर्व डेटा कळतो. ज्याला अगदीच फेसबुवकर नोंदवायचे असेल तर तो तिथेही पोस्ट करू शकतो. शिवाय त्याच रोडवरून (नोंद केलेल्या) जर कोणी तुमच्यापेक्षा कमी वेगात गेले तर तुम्हाला एक स्टारही मिळू शकतो.

लाँग सायकलींग साठी सेल्फ मोटिव्हेशन अत्यावश्यक आहे. Happy

आणि हर्क्युलस वरून स्कॉट च्या अपग्रेड बद्दल अभिनंदन.

डिस्क बद्दल अनुमोदन. व्हि ब्रेक इज मस्ट. Happy लोकांना डिस्क ब्रेक म्हणजे लै भारी वाटतं.

साधना,

तुला नेमके कोणते प्रश्न आहेत ते सांग. हे फॉलो कर ( अगदीच नवीन बायकर साठी)

सरळ रस्ता = २ - ३ ( लेफ्ट - राईट) पासून सुरू कर. ३ ला लगेच ४ करशील Happy अन पुढे पाच पण.
थोडा चढ = २ - २ किंवा २ -३ , १ -४

उतार = २-६, २-७, ३ -५ , ३-६/७

शा ग च्या गटगला मला आशुच्या सायकलच खुप कौतुक वाटलेल. मी आता विचार करतो नविन सायकल घेण्याचा. पुण्यातलेच अजुन ४-५ जण येकत्र येऊन सायकल घ्यायला गेलो तर डायरेक्ट डिलर/ डिस्ट्रिब्युटर कडुन पण सायकली घेता येतिल आणि किंमत पण कमी असु शकेल. जरा माहीती काढली पाहिजे.
पुणेकर / मुंबईकर नाव नोंदणी करा ज्यांना ज्यांना सायकल घ्यायचीये ते. आशु आपल्याला स्वस्त आणि मस्त मॉडेल / कंपनी सुचवेल.

रुनी - नक्कीच. अजून किती भाग होतील याचा मलाच अंदाज नाही. वाचकांच्या शंका आणि प्रतिसाद बघुन किती तपशीलात माहीती द्यायची हे ठरवता येईल. पण पहिल्या भागात सगळ्याच्या लिंक देईन.

अमित - पंप घेताना त्यात प्रेस्टा आणि नॉर्मल असा दुहेरी वॉल्व असलेलाच घ्या. सगळ्यासाठीच सोयीचा पडतो. अनेक इंपोर्टेड बाईकमध्ये प्रेस्टा वॉल्व असतो.

कधी चुकून माझ्याबरोबर माझी सायकल नसली तर "घोडा कुठाय"? असा प्रश्न लोक विचारायचे.

हर्पेन - जरा माझ्या जीवाचा विचार करा. एवढ्या जोराने सायकल मारली तर धाप लागेल मला...टाकतो हळूहळू

डॉ. - तुम्ही तर पहिले घ्यायला पाहिजे...

केदार - मी मार्केटिंग गिमिक अशासाठी म्हणलो की प्रत्यक्षात आपण तीनच गियर वापरतो...हे कॉबोमध्ये असले तरी बेसिक तीनच आणि मग त्यात रियर गियर्सचे ऑप्शन असतात. पण लोकांना तीनच गियरची सायकल सांगितली की काय भारी नाही वाटत. २१ गियरची सांगितली की अरे वा २१ गियरवाली का..छान छान.
केडन्सचा मुद्दा नंतर स्पष्ट करणार होतो म्हणून इथे दिला नाही पण बरोबर आहे तुमचा.
सिंहगड चढताना तर अगदी गियर संपल्यासारखे वाटतात...१ - १ कॉंम्बोमध्येपण शेवटी शेवटी जीव जातो.
मेरिंडा किंवा ट्रेक या दोन्ही मला ओव्हरप्राईस्ड वाटल्या. किमान इथे भारतात उपलब्ध असलेले ऑप्शन बघता. मला स्कॉटचा डिलर याच सायकलला अलीव्हीयो ३-८ मध्ये अपग्रेड करून द्यायला तयार आहे. पण आत्ताच सायकल घेतली आहे. नंतर विचार करीन. आणि आता पुढेमागे एक छानशी रोडबाईकच घ्यायचा विचार आहे.
आत्ता बरेच प्लॅन डोक्यात आहेत.

साधना - शक्य असल्यास कुणा सायकलवाल्याकडून डेमो घ्या..हे असे वाचून समजण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहीले तर लगेच समजते.

ते वाचुन खरेच काही समजले नाही पण प्रयत्न करत राहिन, समजेल हळुहळू. माझ्याइथे कोणीही नाहीय गिअर प्रकरण समजवायला. ज्या दुकानातुन घेतली त्यालाही माहित नव्हते. एनी वेज, मी स्वतःही कधी गिअर वापरायचा प्रयत्न केला नाही, आता मुद्दामहुन करुन पाहिन. बघितले की समजेलच.

अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे. बाकी मलापण सायकल घ्यायची आहेच. तेव्हा को़णकोण सायकल घेणार आहेत. त्यांनी नावनोंदणी करायला पाहिजे.

चांगली माहिती. मी लेडीबर्ड म्हणतात ती सायकल विकत घ्यायच्या विचारात आहे. Happy त्यात हा धागा वाचून अजूनच मोटिव्हेशन मिळालंय.

मलाही गियर प्रकरण नाही कळत. छान वेगात असतांना उतारावर पायडल फिरवले कि त्यात जोरच नसतो आणि सपाटीवर किंवा चढ्वर आले कि खुप जड होतात पयडलस.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गिअर Cadence ठरवते. २ - ५ ( म्हणजे २ डावीकडचा आणि ५ उजवीकडचा) हा जर एखाद्याला जास्त वाटत असेल तर तो २ - ३ मध्ये जाऊ शकतो पण त्यामुळे त्याचे पाय रोटेट होण्याचा वेग वाढतो पण सायकलचा वेग मात्र वाढत नाही. राईट मधील लोअर गिअर्स ( १, २,३) हे चढावर चढण्यासाठी उपयोगी आणि लेफ्ट मधील १ हा देखील चढावर चढण्यासाठी उपयोगी. सिंहगडासारख्या चढावर १, ३ किंवा २, २ हे सारखाच Cadence देऊ शकतात.

केदारने वर सांगितल्या प्रमाणे गियर्स वापरायला शिकेन. अचानक इतकि माहिती वाचुन अज्ञानाचे पडदे दुर झाल्यासारखे वाटत आहे.

वा! मस्त धागा. मी पण थोडीफार सायकल चालवते. मध्यंतरी दर रविवारी सहकारनगर ते पिंपरी जात होते. पण मी अगदी हळूहळू जाते, त्यामुळे एकटीच जाते.

बाकीच्या अडचणींपेक्षा आपली सुरक्षितता सांभाळणे, हा मोठा प्रश्न वाटतो. अरुंद रस्ते, मुख्य रस्ता आणि शोल्डरच्या पातळीत फरक असणे, ह्याची भीतीच वाटते. नेहमी सायकल चालवणारे ह्या अडचणींवर कशी मत करतात?

Pages