"मी दुःखात आहे." हे माणूस किती प्रामाणिकपणे. मनापासून आणि खरंतर कौतुकाने मान्य करतो! पण "मी सुखात आहे." हेही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून का मान्य केलं जात नाही? "मी सुखात आहे" म्हणणार्यांच्या स्वरात काहिसा विषाद किंवा डोळ्यांत सत्य लपवण्याच्या धडपडीसारखे भाव असायलाच हवेत का? का नाही तो छातीठोकपणे सागू शकत की "हो... मी सुखात आहे! मला असलंही दुःख नाही! मला कुणाकडून कसलीही तक्रार नाही! माझी जेवढी अपेक्षा होती, माझी जेवढी पात्रता होती, त्याहून कित्येक पटींनी जास्त मला आयुष्याकडून मिळालेलं आहे. त्यासाठी मी द्देवाचा ऋणी आहे. आभारी आहे. समाधानी आहे. सुखी आहे."
देणार्यानं सर्वांनाच सर्व समप्रमाणात वाटून दिलं. ’एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ असं त्याने कधिच केलं नाही. हा धाग्यांचा हिशेब आपण आपल्या कल्पनेत केला. सुख-दुःख वाटताना त्याने सारखंच परिमाण वापरलं असेल तर मग "मला आयुष्यात कसलंच सूख मिळालं नाही" असं म्हणणारे पावलोपावली भेटतात. पण "मला आयुष्यात कुठलंही दुःख मिळालं नाही" असं मान्य करणारं कुणीच का भेटत नाही?
माणसाच्या मनातलं हे सुख-दुःखाचं अजब रसायन समजुन घेण्यास अत्यंत क्लिष्ट! सूख समजायला सोपं आहे पण दुःखाची व्याख्या भलतीच गुंतागुंतीची! हे दुःख ज्याला पूर्णतः समजलं केवळ आणि केवळ तोच हे म्हणू शकतो... कि मी सुखी आहे! त्यामुळे सुखी व्हायचं असेल तर दुःखाचा मुळापासून मागोवा घ्यायला हवा.
बुद्धानं घेतला होता दुःखाचा शोध. दुःखाचा आभ्यास केला त्यानं. दुःखाचा ध्यास घेतला आणि... आणि त्याला दुःख कळलं! दुःख समजलं! सरतेशेवटी त्याला त्या मूर्तिमंत दुःखाचा साक्षात्कार झालाच! त्या बुद्धाच्या चेहर्यावर म्हणूनच विलसत रहातं एक अथांग तेज. समाधानानं ओतप्रोत भरलेले त्याचे डोळे सुखाचा तो भार असह्य होऊन तो अर्धोन्मिलित ठेवतो! आणि सर्वात सुंदर आहे ते त्याच्या चेहर्यावरलं ते मंद, शांत, तेजस्वी अन् गूढ हास्य! ते स्मित... जे सूख कधीच देऊ शकत नाही. ते समाधान... जे सुखामुळे लाभत नाही. हेच पुरावे आहेत कि बुद्धाला दुःख समजलं होतं!
तू, तुझ्या आजुबाजूला जगणारा प्रत्येकजण खरंतर मनातल्या मनात हाच दुःखाचा शोध घेतो आहे. मग तरिही त्याला... प्रत्येकाला... असं का वाटतं कि तो सुखाच्या मागे पळतो आहे? प्रत्येकजण असं का म्हणतो कि मला सूख पाहिजे? गंमत आहे ना? माणूस सदैव दुःखांना बोलावत राहतो आणि म्हणतो मात्र... "या सुखांनो या..."
तुझाच विचार कर ना... तू मान्य करतोस कि तू खूप सुखात आहेस? किंवा तुला असलेली थोडीफार दुःखे त्या बुद्धाला समजलेल्या वैश्विक दुःखाच्या मानाने फारच किरकोळ... नगण्य आहेत? कुणी तुला म्हटलं.. "मजा आहे बाबा तुमची." तर मनातल्या मनात तरी तू चरफडत म्हणतोसच... "तुम्हाला काय कळणार माझी दुःखं?" त्यावेळी खरंतर तूच मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात निपचित पडलेल्या दोन-चार चुकार दुःखांना शोधून, जवळ ओढून गोंजारत असतोस! आपण आपल्या दुःखांना एकटं सोडत नाही हेच खरं. स्वतःच्या कल्पनेतही आपण दुःखांनाच पहातो... आपण कुठल्यातरी महान दुःखात बुडालेले आहोत... त्यातून स्वतःला जगवतो आहोत... इतर लोक आपल्याला पाहून हळहळताहेत... अश्या कल्पनाविलासांतून आपल्याला आनंद मिळतो.
खळखळून कितीही हसलो तरी माणसाच्या मनात सुप्त इच्छा असते ती मनमोकळेपणाने रडण्याची! एखाद्याला भरभरून सूख देऊन पहा, त्याच्या मनातल्या, प्रार्थनेतल्या सर्व इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करून पहा. तरिही तो ला सर्वसूखी म्हणणार नाही. त्याच्या जन्माला पुरेल असा दुःखाचा छोटासा कण तरी तो स्वतःपुरता शोधूक काढीलच काढील! माणूस जन्माला येतो तेव्हा पहिल्यांदा काय करतो?.. तर मोकळेपणाने रडतो! मनुष्यजन्म मिळाल्याची घटना तो त्या अनादिकाळापासून चालत आलेल्या अनाम दुःखाच्या साक्षीने साजरी करतो!
बुद्धाने शोधलेलं दुःख आणि आपण घेत असलेला दुःखाचा शोध यत खूप फरक आहे. बुद्धाने जगण्यासाठी आवश्याक असलेल्या या दुःखाचा फक्त शोध घेतला नाही... ’दुःख’ या शब्दाभोवती असलेल्या अनेक गूढ वलयांचा त्याने अभ्यासपूर्वक भेद केला. त्याला जे दुःख सापडलं ते मानवाचं होतं... संपूर्ण मानवजातीचं होतं. म्हणूनच त्याला दुःख फक्त समजलं नाही... त्याला दुःखाचा साक्षात्कार झाला!
दुःखाचा तसा वेध घेता यायला हवा! तिन्ही त्रिकाळ या संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेल्या या दुःखाला आत्मसात करता यायला हवं. त्यासाठी तू दुःखाची आराधना कर! दुःखाला प्रसन्न करून घे! ज्याप्रमाणे रात्र म्हणजे मूळ कागद आणि दिवस म्हणजे केवळ त्या कागदावर मारलेले रंगांचे फ़वारे असतात... त्याचप्रमाणे दुःख म्हणजे आपल्या आयुष्याचा मूळ कॅनव्हास आहे. सुखाच्या त्यावर फक्त काही कलात्मक रेघोट्या आहेत. सुंदर चित्राला आकार घेण्यासाठी एक मजबूत, स्वच्छ कॅनव्हास लागतो.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥
लेखनशैली आवडली पण विचार पटले
लेखनशैली आवडली पण विचार पटले नाहीत.