शून्य स्थिती

Submitted by रसप on 7 May, 2013 - 01:33

मी आल्या, गेल्या, केल्या अन् झाल्याचा
झटकून निराशा हिशेब जेव्हा करतो
छोट्यातुन मोठी शून्ये उमलत जाती
मी पुन्हा एकदा माझ्यासोबत नसतो

ओठांना तृष्णा शब्दांची मग असते
हृदयास शांतता हवीहवीशी थोडी
ही द्विधा अशी की संचित विसरुन जावे
गुंते ना सुटती, पडती नवीन कोडी

जो समोर असतो रस्ता, समुद्र बनतो
गाड्यांच्या अगणित लाटांमागुन लाटा
दृष्टीस किनारा ना कुठलाही जवळी
संतत आवाजाचा असतो सन्नाटा

ही शून्य स्थिती ना उदास ना आनंदी
मी माझ्यापासुन मुक्त, नसे मी बंदी
मी समोर माझ्या क्षण असतो मग नसतो
जणु दुरून कोणी गाभाऱ्याला वंदी..

....रसप....
०६ मे २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/05/blog-post_7.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो समोर असतो रस्ता, समुद्र बनतो
गाड्यांच्या अगणित लाटांमागुन लाटा
दृष्टीस किनारा ना कुठलाही जवळी
संतत आवाजाचा असतो सन्नाटा<<<<<

माझ्यामते कवितेतले सर्वोत्तम कडवे ! अगदी जसाच्यातसा सीन उभा केलास डोळ्यासमोर

बाकी विषय , आशय , काव्य, शब्दसौन्दर्य असे जे जे सगळे एका उत्तम कवितेत असायला हवे ते ते नेहमीप्रमाणेच लाजवाब झाले आहे इथेही

खूपच आवडली ही कविता
धन्स

<< ओठांना तृष्णा शब्दांची मग असते हृदयास शांतता हवीहवीशी थोडी
ही द्विधा अशी की संचित विसरुन जावे गुंते ना सुटती, पडती नवीन कोडी >> सुंदर रचना ....

छान कविता.
खालील ओळी सर्वात आवडल्या.

"ओठांना तृष्णा शब्दांची मग असते
हृदयास शांतता हवीहवीशी थोडी"

"ही शून्य स्थिती ना उदास ना आनंदी
मी माझ्यापासुन मुक्त, नसे मी बंदी"

जो समोर असतो रस्ता, समुद्र बनतो
गाड्यांच्या अगणित लाटांमागुन लाटा
दृष्टीस किनारा ना कुठलाही जवळी
संतत आवाजाचा असतो सन्नाटा

मस्तच .