कबुतरांची सभा

Submitted by अत्रुप्त आत्मा on 5 May, 2013 - 23:51

पर्वा एका सरकारी हापिसात
कामासाठी गेलो होतो
आणी नेहमी प्रमाणे वाट बघत
ताटकळत उभा होतो.

कडेला वाटलं माणसं बोलताहेत
पण कबुतरं बोलत होती
कालच्या दिवसात काय काय झालं?
याचे हिशेब तोलत होती

पहिलं दुसर्‍याकडे पाहुन
मिष्किलपणे हसत होतं
आणी त्यांच्या गमती पाहुन
तिसरं मधिच घुसत होतं

काल म्हणे पहिल्याला
आख्खं कणिस मिळलं
पण दुसर्‍यानं धक्का दिला
आणी ते हवेतच गळलं

थोड्याच वेळात कबुतरांची
भली मोठ्ठी सभा भरली
आणी आज चरायला कुठं जायचं?
यावरच पहिली चर्चा ठरली

कुणी म्हणलं किराणा दुकान
आजचा पहिला ठराव आहे
धान्यात दगडं-खायचा
तिथं चांगला सराव आहे.

दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन
कशाला मोकळं सोडायचं?
पण त्या बेन्या शिपाया देखत
पहिलं पोतं कुनी फोडायचं?

होता होता...चर्चा करता
सकाळचे आकरा वाजले
मग कबुतरांच्या पोटात
कावळे ओरडायला लागले

हळू हळू एकेक जण
बाजु बाजुनी कटायला लागला
त्यामुळेच चर्चेचा तिढा
खर्‍या अर्थानी सुटायला लागला

शेवटी अध्यक्षच खुर्ची सोडून
फर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करून उडून गेला
परंपरे नुसार सभासदांना
वार्‍या वर सोडून गेला

त्यानंतर विषय एकदाचा
मूळ मुद्याला आला
सगळे म्हणाले,मरु दे चर्चा
दाणे टिपायला चला

सरकारी भाषेतच एक बोलला
कृती कार्यक्रम हाती धरा
चर्चा कसल्या करताय?
उडा दुकानांकडं भराभरा

तेव्हढ्यात सरकारी हापिसातुन
''गुटुरगू गुटुरगू'' ऐकू आलं
आणी मला अंदाज आला...की,
हापिस एकदाचं सुरु झालं.

काम व्हावं म्हणुन गेल्या गेल्या
सायबाला दिला पेश्शल चहा
तेव्हढ्यात खिडकितलं कबुतर म्हणलं,
''दाणे नसतिल तर सावध रहा''...
=================================================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ विस्मया | 5 May, 2013 - 23:59 नवीन

:हाहा

फर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र >>> इथं कागद फाटल्याचा भास झाला.>>> Lol आम्हालापण तुमच्या प्रतिक्रीयेवर शाई अटल्याचा अंदाज आला :-p

सही Happy