नागिणीचा विळखा – वेळीच ओळखा!

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 20:27

“डॉक्टर, बाबांना गेले दोन-चार दिवस डाव्या साईडला पाठीत दुखत होतं. काल परवा गरम पाण्याच्या पिशवीने जरा शेकलं, पण पाणी बहुदा जरा जास्तच गरम झालं असावं कारण आज शेकल्याच्या जागी लाल छोटेछोटे फोड आलेत आणि थोडी खाज सुटलीये. काय करू?” संजीवचा सकाळी सकाळीच फोन आला होता.

“संजीव, घरी काही करू नको. दहा वाजता त्यांना दवाखान्यात घेऊन ये, तिथेच बघुया काय ते.”

बरोबर दहा वाजता संजीव त्याच्या ६४ वर्षांच्या वडलांना घेऊन आला, आणि ते फोड बघताच मला लक्षात आले होते की माझा अंदाज खरा ठरला आहे, “संजीव, अरे ही ‘नागीण’ आहे.”

“नागीण !!!” अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रीया आलीच!, “डॉक्टर, नागीण पूर्ण गोल पसरली तर जीवाला धोका असतो नां?”

“संजीव, अरे या सगळ्या ऐकिवात गोष्टी आहेत. प्रत्यक्षात असं काही नसतं!”

= =

‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शन ला आपण नागीण (हर्पीस झोस्टर) म्हणतो, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात बरं!. खरं सांगायचं म्हणजे लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही. पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ठ नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्यभरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपी सारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता अशा कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू जागृत होऊ शकतो.
लक्षणे:

एकदा का हा विषाणू सक्रीय झाला की काही विशिष्ठ लक्षणे दिसू लागतात. संजीवच्या वडिलांना झाली तशी पाठदुखीने याची सुरवात होते. नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे किंवा खुपल्यासारखे वाटत राहते. दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात आणि त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो. त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो. याच बरोबर ‘फ्लू’मध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागतात.

पाठीतल्या ज्या नर्व्हला याचा संसर्ग झाला असेल, त्यां नर्व्हच्या प्रभावित क्षेत्रात प्रामुख्याने याची लक्षणे दिसतात. पुरळ सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या कालावधीत दुखण्याचा जोर सर्वात जास्त असतो. कांजिण्याप्रमाणेच हे पाणीदार फोड पुढे सुकतात, त्याला खपली धरते आणि ती पडून जाते. साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.

काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.

प्रचलित उपचार:

सर्वसाधारण विषाणू-संसर्गाप्रमाणेच एकदा लक्षणे सुरु झाली की त्यांना पूर्णपणे काबू करणे शक्य होत नाही. पाण्यासारखे द्रव असलेल्या फोडांमध्ये अजून जीवाणू-संसर्ग होणार नाही यासाठी उपचार केले जातात. ‘असायक्लोवीर’ सारख्या विषाणू-मारक औषधाचा उपयोग होतो. त्वचेची दाहकता कमी करण्यासाठी बाहेरून काही मलमे दिली जाऊ शकतात पण त्याचा सीमित परिणाम दिसतो.

होमिओपॅथिक उपचार:

आजवरच्या अनुभवावरून आढळलेला होमिओपॅथिक उपचारांचा विशेष फायदा म्हणजे लक्षणांची सुरवात झाल्या-झाल्या त्या लक्षण-समुहाला अनुसरून योग्य असे होमिओपॅथिक औषध दिले तर लक्षणांची पुढील वाढ तर थांबू शकतेच पण अगदी कमी कालावधीत संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. प्रामुख्याने ऱ्हस टॉक्स, अर्सेनिक अल्ब, मेझेरीयम, आयरिस, रॅननक्युलस बल्बोसस यांसारख्या औषधांचा यासाठी विशेष उपयोग होतो असे आढळून आले आहे. अर्थात, लक्षणांवरून योग्य औषधाची निवड होमिओपॅथिक तज्ञच करू शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे जेष्ठ नागरिकांमध्ये राहणारी वेदना आपण होमिओपॅथिक उपचारांनी नक्कीच घालवू शकतो. होमिओपॅथिक औषधांमधील ब्रायोनिया, कोलोसिंथ, कॉस्टिकम्, सिमीसिफुगा, मॅग फॉस यांसारख्या काही औषधांतील योग्य औषधाची निवड करून ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’वर हमखास मात करता येते.
होमिओपॅथिक उपचारपद्धतीमध्ये केवळ आजाराच्या लक्षणावर मात इतकेच मर्यादित लक्ष्य न ठेवता पेशंटच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करणारी औषधे सुद्धा आहेत, ज्यामुळे आरोग्याचे रक्षण होतेच पण पुढील संसर्गाचाही अटकाव होतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमित.. खूपच उपयुक्त माहिती शेअर केलीत. धन्स!!

माझी एक मैत्रीण गेल्या ६,७ महिन्यांपासून या रोगाने त्रस्त आहे.. तिला हे सिंप्टम्स झाले त्यावेळी मला पहिल्यांदा या आजाराचं नांव कळलं.. आता ती पुष्कळ बरी आहे. पण नर्व्ज स्ट्रेंगदनिंग च्या गोळ्यांचा साईड ईफेक्ट असेल बहुतेक्..तिला रात्र रात्र झोप येत नाही.
तिच्या आसपासच्या लोकांना फक्त मिझरेबल आणी हेल्पलेस वाटत राहतं Sad
तिला होमियोपथी बद्दल सांगीन आज.. पण तरी भारतात जाऊन होमियोपथी सुरु करायची वाट पाहावी लागेल तिला..

जगात असेल हो पण चीन मधे नाही उपलब्ध.. चीन मधे त्यांच्याच जडीबुटींची औषधे (चायनीज मेडिसिन)देणारी मोठाली हॉस्पिटल्स आहेत. माझ्यापुरतंतरी मी त्यांना वाऊच करते.. पण पुष्कळ भारतीय लोकांना चायनीज औषधांचं वावडे आहे..

मला नागीणीसारखी लक्षणे दिसली होती, तेंव्हा मला माझ्या मित्राने नक्स वोमिका आणि काली मूर दिले होते... नागीण गायब झाली.

( औषध होमिओ, मी अ‍ॅलो आणि देणारा डॉक्टर आयुर्वेदिक. )

डायबेटिस, हायपरटेन्शन यावर लिहा.

त्रासदायक असतो हा आजार आणि गैरसमजही खुप आहेत.>>>>>>>>>>>>> जस की मंत्र टाकल्यावर नागीण जाते असेच गैरसमज ना....

अमित,

तुमचा उपक्रम चांगला आहे. होपॅ बद्द्ल च्या बर्याच गोष्टी कळत आहे, कृपया लेख सुरुच ठेवा.

ईथ काही सदस्या च्या म्हणण्या प्रमाणे होपॅ व आर्यूवेद वैगेरे थोतांड आहे.

तुमच्या ह्या लेखातील एक वाक्य मला विचार करायला लावते.

" हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही. पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ठ नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्यभरासाठीच."

आजच्या अ‍ॅ पॅ च्या मताप्रमाणे लसीकरणानंतर त्या विषाणूचा संर्सग होत नाही कारण शरीरात अँटी बॉडीज तयार झालेल्या असतात. शरीराला रोग प्रतीबंधक शक्ति असते हेच अ‍ॅ पॅ ला मान्य नाही.

पण तुमच्या वरील माहीती प्रमाणे, ह्या विचारालाच छेद जातो.

जर विषाणु शरीरात असतील तर शरीरचची रोग प्रतिबंधक शक्तीच त्या विषाणू पासून शरीराचे रक्षण

करते.

हा एसटीडीचा प्रकार आहे का? कारण "या इन्फेक्शन ला आपण नागीण (हर्पीस झोस्टर) म्हणतो" असं लिहिलंय म्हणुन विचारलं.

कांजिण्यांचे जंतु शरीरात राहून जातात व प्रौढवयात उपटतात.. फार त्रासदायक आजार. वेळेत निदान झाले नाही तर फार रेंगाळतो.. माझ्याबाबतीत असे गेल्यावर्षी झाले..मला तो इन्सेक्ट बाइट वाटला..डॉक्टर नेमके बाहेरगावी होते, मी फोनवर स्वतःच दिलेल्या माहितीवरून औषधयोजना झाली व मला भारी पडले ते प्रकरण.

मस्त माहीती Happy

आमच्या ओळखिच्या मावशींना डोळ्यावरील भागावर झालेली नागिण,त्यांच्या डोळ्याकडील भाग आता काहीतरी जखम झाल्यासारखा भयानक दिसतो आहे.