मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याचा कडेलोट झाला!

Submitted by कर्दनकाळ on 25 April, 2013 - 15:43

मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याचा कडेलोट झाला!
तुला आज मी मुक्त करणार आहे, तुझ्या सोसण्याचा कडेलोट झाला!!

कितीदा अशी राख झालो कळेना,कितीदा फिरोनी उभाच्या उभा मी!
विजांशी कुणी एवढे खेळते का? विजा झेलण्याचा कडेलोट झाला!!

जगाचाच आजन्म संसार केला, न पत्नी, न मुलगा, न मुलगी बघितले!
सडाच्या सडा राहिलो शेवटी मी, सडा राहण्याचा कडेलोट झाला!

जगावेगळा सोस त्याला फुलांचा, घराचा जणू जाहलेला बगीचा!
घरी कोपराही न उरला रहाया, फुले वेचण्याचा कडेलोट झाला!!

दिले सोडुनी दर्पणी पाहणे मी, मलाही न मी ओळखायास येतो!
चरे पाडले केवढे या जगाने, चरे पाडण्याचा कडेलोट झाला!!

तुझे हासणे, लाजणे जीवघेणे! तुझे पाहणेही नशा आणणारे!
खळ्या हास-या पाहुनी वाटते की, तुझ्या हासण्याचा कडेलोट झाला!!

न हे पायही राहिले सोबतीला, तरी चालतो वाट अद्यापही मी.....
कधी गाव येणार माहीत नाही, पहा चालण्याचा कडेलोट झाला!

अहोरात्र गझलेत तू डुंबलेला! अहोरात्र गझलेत तू धुंदलेला!
न खाण्यापिण्याची तुला शुद्ध वेड्या, तुझ्या झिंगण्याचा कडेलोट झाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीशजी:

शक्य तो दुस-यांच्या गझलवर स्वतःचा शेर देण्याचा मोह मी आवरतो.
मात्र एकूणच वरील चर्चा पाहून एका उद्विग्न मनःस्थितीत लिहिलेला मला माझा एक शेर आठवला:

इथे कौतूक कोणाला न माझे
मलाही सोस कोठे मिरवण्याचा

शेर पर्फेक्ट नसलातरी त्यातून भावना पोहचतात, असे वाटते.

कडेलोट

काही शब्दांकडे जसे निव्वळ शब्दशः पाहायचे नस्ते तसेच काही शब्दांकडे निव्वळ लाक्षणिक अर्थाने बघणे सुद्धा उपयोगाचे नसते. काही शब्दांना एखद्या अत्यंत महत्वाच्या पार्श्वभुमीने एवढा जबरदस्त संदर्भ प्राप्त होतो की, त्या शब्दाचे शब्दशः "व्यक्यिगत लाईफ"च संपुष्ठात येते.

उदा. काळे पाणी म्हणजे काळ्या रंगाचे पाणीच ना?
पण त्रोटक स्वरूपात जर "काळे पाणी" असा शब्द वापरला तर लगेच त्याचा अर्थ अंदमानकडे अंगुली निर्देश करायला लागतो.

पानिपत : हा शब्द कोणत्या शब्दकोषात सापडेल? पण हा शब्द सपशेल पराभव झाला अशा काहिशा अर्थाने मराठीत रुढ झाला. पानिपत हे हरयानातील एका शहराचे नाव आहे. अटीतटीच्या युद्धामध्ये मराट्यांचा तेथे पराभव झाला. आणि तेव्हापासून मराठी माणसाचे दिल्लीचे सिहांसन काबीज करण्याचे मनसुबे उधळले गेले ते कायमचेच.
मग पराभवाला प्रतिशब्द म्हणून पानिपत हा शब्द वापरायचा असेल तर त्या वाक्यात-विधानात तोलमोलाची पार्स्वभूमी यायला हवी ना?
कि, शिक्षकाने खोडकर विद्यार्थ्याचा कान थरून त्याला गप्पगार केले म्हणून "शिक्षकाने विद्यार्थ्याचे पानिपत केले" असे म्हणणार काय?

किंवा

बायकोने भाजी बेचव केली म्हणून तिला काळे पाणी दाखवायला पाहिजे, अशी कविता रचणार का?

कडेलोट हा सुद्धा युद्धाच्या इतिहासामध्ये प्रचंड संदर्भ लाभलेला शब्द आहे.
मराठ्यांचा कडेलोट झाला म्हणून मराठ्यांना सपशेल हार पत्करावी लागली. इतिहास बदलता-बदलता बदलायचा राहिला.

पूर्वी युद्धामध्ये डोंगराळ भागात/किल्ल्यात "भूलभूलैय्या" स्वरूपाची व्यूहरचना असायची. रस्त्यात प्रचंड काळ्याकुट्ट अंधारात बेमालूमपणे खंदक असायचे. चाल करून येणार्‍या सैन्याला आपण आगेकूच करित आहोत, असा खात्रीने भास होत राहायचा आणि प्रत्यक्षात सैन्याचा खंदक मार्गे डोंगराच्या कडेवरून कडेलोट होत राहायचा. अशा तर्‍हेने एकाचवेळी हजारो सैनीकांचा कडेलोट व्हायचा. युद्ध न लढताच पराभूत.

लाखो चिनी सैनिकांचा कडेलोट झाल्याने २०१४ च्या भारतासोबतच्या युद्धात चीनचा सपशेल पराभव झाला.

कडेलोट हा शब्द मी एकदा प्रतिसादात वापरला होता बेफीजीना तो आवडला असे त्यांनी म्हटले
त्यावरून मला वाटले की हा शब्द काहीतरी फारच छान आहे मग मी मनात ठरवले की एकदा हा शब्द गझलेत वापरायचाच म्हणून........................

मागे किरणने कडेलोट चा "पर्फेक्ट" शेर केला

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला
_________किरण

तो वाचून मी म्हटले की मला हा शब्द एकदा गझलेत वापरायची फार इच्छा होती वगैरे व तू(किरण) हा जो शेर केलास हा पाहून मला माझी इच्छापूर्ण झाल्यासारखे वाटते वगैरे वगैरे वगैरे..........

प्रा. साहेबांनी त्यावरूनच शड्डू ठोकून सांगीतले की आम्ही (ते) आता यावरून गझल करणार म्हणून!!

ही अताताई अतिरेकी गझल सुचण्याचा उचंबळ प्रा.साहेबाना माझ्या प्रतिसादावरून आला त्याबद्दल मी सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करीत आहे
Sad

~वैवकु

Wink !!!!!

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला

हा शेर परफेक्ट झाला.
आणि त्याचे कारणही सोपे आहे.

माझा कडेलोट करावा किंवा माझा कडेलोट केला किंवा माझा कडेलोट झाला असे वाक्प्रयोग झाल्यास "माझा" या शब्दामुळे कडेलोट या शब्दाला सिमित स्वरूपाचा अर्थ प्राप्त होतो. असे मला वाटते. Happy

-----------------------------------------

मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याने कडेलोट झाला!

हा सुद्धा दुर्बोध पण सुसंगत शेर होऊ शकेल.

कडेलोट का झाला? कुणाचा झाला? कोणी केला? कशासाठी केला? वगैरे उत्तरे वाचक शोधत बसतील. Wink

'कडेलोट झाला' हे दोन शब्द गुगलले.
अतिरेक झाला या अर्थाने बर्याच ठिकाणी वापरलाय.
जुना संदर्भ प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणात 'दु:खाचा कडेलोट झाला' असा सापडला.
आता कोण हे 'प्रबोधनकार ठाकरे ' असे विचारू नका.
http://prabodhankar.com/node/352/page/0/308

मला गझल आवडली आणि शब्दरचना पटली.

मला काही सुचले आहे ....आगाऊपणा म्हणा हवे तर !! Happy

................लगागाल......णे हा कडेलोट आहे

असे काहीसे केल्यास कसे ???

चूक भूल्द्यावी घ्यावी

भूषणः

हासण्याच्या शेरात तुम्ही म्हटल्याप्रमाणे कडेलोट चा वापर खटकत आहे.
दु:खाचा कडेलोट झाला हा वापर दु:खद गोष्टीबाबतीत आहे हे लक्षात घ्यायला हवे.
तसेही कडेलोट झाला हे फक्त अतिरेक झाला ह्या अर्थानेच वापरायचे असेल तर व्याकरणाची सूट घेऊन अतीरेक का वापरले जाऊ नये. कडेलोट हा वापर मूळ शब्दाची गंमत घेऊन आला तर रदीफ अपरिहार्य ठरावा (जसे किरण ह्यांच्या शेरात होत आहे).

धन्यवाद,

इथे कौतूक कोणाला न माझे
मलाही सोस कोठे मिरवण्याचा
इति समीर

चार चिंध्या या यशाच्या, कनवटीला!
तीच ती झालर पुन्हा मिरवू कशाला?
इति कर्दनकाळ

इथे कौतूक कोणाला न माझे
मलाही सोस कोठे मिरवण्याचा

माझा शेर मायबोलीसाठी नव्हता, दुस-या एका साइटला उद्देशून होता.
खरेतर मायबोलीइतके अप्रिशियेशन मला कुठेच मिळाले नाही. असे मी अगोदरही म्हटले होते.
बाकी, आपला शेर छान आहे.
प्रत्यक्षात उतरला तर फार छान.

तिलकधारी आला आहे.

बहुतांशी शेर 'कहर होत आहे' अशी रदीफ घेऊन साफ होण्यासारखे आहेत किंवा किंचित डागडुजीने पूर्णत्वास जाण्यासारखे आहेत. 'कहर होत आहे' ही रदीफही आकर्षक आहे. तिलकधारी या निष्फल चर्चांमुळे झालेल्या स्वतःच्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणून असे म्हणत आहे की एकमेकांची टाळकी फोडण्याआधी रदीफेला असलेले पर्याय का बघितले जात नाहीत?

तिलकधारी तावातावाने निघून जात आहे.

बाकी, आपला शेर छान आहे.
प्रत्यक्षात उतरला तर फार छान.
<<<<<<<<

शेर असा होता........

चार चिंध्या या यशाच्या, कनवटीला!
तीच ती झालर पुन्हा मिरवू कशाला?

इथे कोणत्या यशाच्या चिंध्या हे चतुराईने अव्यक्त ठेवले आहे! बर मिळालेल्या यशाला चिंध्याच का म्हटले आहे हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडले आहे! चिंध्या पहिल्या ओळीत आल्या म्हणून झालरीची प्रतिमा दुस-या ओळीत आली! चिंध्या पण यशाच्या ज्या जणू झालरीसारख्या शायराला वाटत आहेत! या दोन्ही गोष्टी मिरविण्याजोग्या असूनही शायर म्हणत आहे, की तीच ती झालर पुन्हा पुन्हा मिरवू कशाला? यालाही एक वेगळा अर्थ आहे! फार फार पूर्वी जेव्हा नशीब चांगले होते, देवाची कृपादृष्टी होती तेव्हा काही यश आमच्या पदरात पडले व नंतर बरेच वर्षे यशाशी आमचा संबंधच आला नाही! इतका की, पूर्वी मिळालेले यश इतके प्राचीन झाले की, त्यांची अवस्था एखाद्या चिंधीसारखी झाली! याच यशाच्या चिंध्या काय त्या आमच्या कनवटीला उरल्या आहेत!

आता कोणत्या यशाबद्दल आम्ही हे म्हणत आहोत हे अव्यक्त ठेवले आहे कारण शेर खाजगी न होता सार्वत्रिक व्हावा! तेव्हा तो आम्ही प्रत्यक्षात आणला की, नाही हे फक्त आणि फक्त आम्हीच जाणतो !
ज्या कुणाला या शेरातील प्रत्ययात आपले प्रतिबिंब दिसत असेल त्याने ठरवावे की, त्याने ते प्रत्यक्षात आणले आहे की, नाही! या शेरातील प्रतिमांची वीण ही कमालीची घट्ट आहे!
टीप: शेरात काय अव्यक्त ठेवायचे याला बरीच कलात्मकता लागते!
शेरातील deliberate gaps शेराचा आवाका/व्याप्ती वाढवतात!
अवांतर: याच प्रतिमेचा आमचा एक खूप जुना शेर आठवत आहे, तो देण्याचा मोह अनावर होत असल्याने इथे देत आहे, ज्यावरून त्याच प्रतिमा वापरून भिन्न अर्थ/भावना शायर कसे अभिव्यक्त करतो हे कळावे!

माझ्या नावावरी यशाच्या दोन चार ज्या चिंध्या होत्या.......
लुटणा-यांनी त्याही लुटल्या, यशास त्यांच्या झालर झाली!..
.............इति कर्दनकाळ

तिलकधारी रदीफ नेमका कोणता घ्यावा ही शायराची मर्जी आहे!
हां निवडलेला रदीफ शेरात निभावता मात्र आलाच पाहिजे!
कोणताही एक सुटा शेर काढून तो रसिकांना ऐकवावा, जेव्हा रदीफ कोणता काफिया कोणता , याची कोणतीही पूर्वकल्पना नसताना जर शेर थेट पोचत असेल तर ते, शेर कामयाब असल्याचे लक्षण आहे!
या निकषावर वरील गझलेतील कोणत्याही शेरात रदीफ अस्थानी वा न निभावल्यासारखा वाटत नाही!

'रदीफ' हा स्त्रीलिंगी शब्द आहे असा बाराखडीतला भटांचा आक्रोश शिष्यांपर्यंत कसा पोहोचला नाही बुवा?

रदीफेच्या लिंगाबद्दल केलेली टिपण्णी पोचली! बाकी वरील लेखनप्रपंचावर शिताफीने वदायचे टाळणे व बगल देणे फारच कलात्मक व साहित्यिक चतुराईचे वाटले!

Pages