रिक्षावाला - ४ (अंतिम)

Submitted by मुग्धमानसी on 25 April, 2013 - 05:06

आधीचे भाग...
भाग १ - http://www.maayboli.com/node/42624
भाग २ - http://www.maayboli.com/node/42643
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42647

तुषारने नीताकडे मोर्चा वळवला.
"तुम्ही... आय मीन... तू काहितरी बोल ना... ताई..."
नीताने एक थंड कटाक्ष तुषारकडे टाकला. इतका थंड की तुषारच्या अंगावर शहारा आला. पण लगेचच तिच्या डोळ्यात त्याला सामान्य भाव दिसले.
"मी? काय बोलू?"
"तुमच्या मिस्टरांचे युद्धातले काही अनुभव सांगा की."
नीताचं तोंड जरासं पडलं. "ते नसतात इथे. त्यांचे अनुभव सांगण्यापुरतेही."
"त्यांची खूप आठवण येते तुला?"
"...."
"तुझं बाळ केवढं आहे? महिन्यांचं... वर्षांचं?" - आता बर्व्यांनीही संभाषणात निग्रहाने भाग घेतला. त्यांचे डोळे आता कोरडे होते.
"माझं बाळ..." आता तिच्या बोलण्यात उत्साह आला.
"आता आठ महिन्यांचं आहे. मुलगी आहे. रांगायला लागलीये आता. बसते जरा जरा, पण पडते बुदुक्कन!" नीता हसली.
"अरे वा! मुलगी म्हणजे छानच! पण एक आहे... या मुली ना फार भरभर मोठ्या होतात बुवा. म्हणता म्हणता लग्नाच्या होतात.... तुमची छोकरीही गोडच असणार. हा प्रवास संपल्यावर जर संपर्क राहिलाच तर घरी येईन तुमच्या. छोकरीला भेटायला. चालेल ना?" - बर्वे
"हो... चालेल की. नक्की या. आणि तूही ये रे."
"नक्की येणार. तुमचे मिस्टर येणार असतील तेंव्हा सांगा. मी येईन. आह...."
बर्वेंनी तुषारला जोरदार कोपर मारले होते. त्यानं रागाने बर्वेंकडे पाहिलं. बर्वे ’तो विषय काढू नकोस’ असं सांगायचा प्रयत्न करत होते. पण तुषारला काही समजलं नाही. बर्वेच पुन्हा बोलले...
"मग घरी तुमच्या बाळापाशी कोण असतं?"
"बाळापाशी.. सासूबाई असतात. सासरेही असतात. नोकरी सोडणारच होते मी.... पण आई म्हणाल्या मी आहे ना... तु निर्धास्त कर नोकरी. म्हणून मग ती ६ महिन्यांची झाल्यावर लागले पुन्हा नोकरीला."
"भाग्यवान आहात तुम्ही... अशी माणसं आहेत म्हटल्यावर काही काळजीच नाही. पण आता काळजीत असतील ना सगळे घरातले? आता जरा शहराजवळ आलोय आपण. बघा बरं तुमच्या मोबाईलला रेंज येतेय का ते..."
"अं... हो..." नीताने मोबाईलवर पुन्हा नजर टाकली. "नाही... नाही आलेली रेंज अजून."
"कुठली डबडी सर्विस वापरतेस तू? उद्याच्या उद्या नविन सर्विस बदलून घे बघू." - तुषार बोलला.
नीता हसून बोलली... "घेते घेते हो..."
"बाय द वे.... तुझे मिस्टर कधी येणारेत इथे?" - तुषार बोलला आणि बर्वेंनी डोक्यावर हात मारून घेतला.
"अं... ते... येणारेत ना... लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला येतीलच. तिच्या जन्माच्या वेळेस आठवडाभर आले होते. त्यानंतर अजून बघितलेलं नाही त्यांनी पोरीला. ’आता याल तेंव्हा भरपूर सुट्टी घेऊनच या’ असं सांगितलंय त्यांना...."
"छान आहे... छान आहे... म्हणजे संपूर्ण कुटूंबाला एकत्र भेटण्याचा योग आहे तर..." बर्वे खूश होत म्हणाले.
"मी पण आलो तर चालेल ताई?" रिक्षावाले आजोबा मध्येच म्हणाले आणि त्या तिघांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली.
"हो... मग काय आजोबा.... तुम्ही तर यायचंच यायचं! पण आता आम्हाला घरी तर पोचवा नीट..." नीता हसत म्हणाली.
"चला... हिरकणी बाई चिंतेतून बाहेर तर पडल्या...." - बर्वे म्हणाले.
"हो... आता घर जवळ आलंय म्हटल्यावर.. आणि चांगल्या लोकांची सोबत आहे म्हटल्यावर.. मनावरचा ताण खरोखर सैल झालाय. बरं वाटतंय. या रिक्षावाल्यांच्या रुपात देवदूतच आला म्हणायचा!" -नीता म्हणाली.
रिक्षावाले आजोबा खांदे घुसळून लाजल्यासारखे हसले. त्यांचे रुपेरी लांबसर केस खांद्यावर रुळताना विलक्षण चमकले. त्यांना समोरून पाहणार्याला त्यांच्या डोळ्यांतही तीच चमक दिसली असती...
"ताई... भरकटलेल्यांना, वाट चुकलेल्यांना अचूक जागी पोहोचवणं हे देवदूताचं काम. मी बापडा कोण? इथे तुम्ही सर्वजण शहाणी, सुजाण, शिकलीसवरलेली माणसं. कुठून आलात ते तुम्हाला माहीती... कुठे जायचंय तेही तुम्हाला माहिती... आता कुठे आहात याचाही अंदाज आहेच ना तुम्हाला? मग मी कोण तुम्हाला रस्ता दाखवणार? मी आपला तुम्हाला जिथं जायचंय तिथं नेऊन सोडणारा हमाल!"
"आजोबा... तुम्ही फार गूढ बोलता असं वाटतं हो... म्हणजे म्हणत एक असता, पण जे तुम्हाला म्हणायचं असतं ते वेगळंच असतं. कधी कधी उपरोधिक बोलताय की काय असंही वाटतं. कोण आहात कोण तुम्ही? या वयात हे रिक्षा चालवायचं काम का करताय?" - बर्वे अत्यंत गंभीरपणे बोलत होते.
रिक्षावाले आजोबा पुन्हा एकदा खांदे घुसळत हसले आणि म्हणाले... "मी जे वाटतं ते बोलतो साहेब. ठरवून, मुद्दामून काही बोलत नाही. काय असतं ना... आपल्याला सरळपणाचीच सवय राहिलेली नसते. म्हणजे मनातल्या मनात सुद्धा आपण बर्याच गोष्टी बोलतच नाही! मनाला फसवायला जातो.. आणि स्वतःच फसतो! स्वतःच स्वतःचे भ्रम रचतो आणि त्या भ्रमाच्या भल्यामोठ्या इमल्यात पुन्हा स्वतःचाच शोध घेत रहातो. काय? नको बाबा फार बोलायला... पुन्हा म्हणाल मी खूप गूढ बोलतो..."
"नाही नाही.... बोला ना आजोबा... कसले भ्रम?" यावेळेस नीता म्हणाली.
"तुम्हाला ठावूक आहेत ताई... इथे असणार्या सगळ्यांना ठावूक आहेत कसले भ्रम ते! एकदा आपापल्या मनाशी मोकळेपणाने गप्पा मारा बघू... चला पुढची पाच मिनीटे हा खेळ खेळूयात." - रिक्षावाला.
"मी नाही आता... माझा झालाय खेळून... बहूतेक."- तुषार म्हणाला आणि रिक्षावाले आजोबा पुन्हा एकदा हसले! बाकिचे मात्र गंभीर होते. त्यांच्याही मनात तोच विचार होता ना...
"पुन्हा एकदा खेळू. पाच मिनिटांनी मनातल्या गप्पा इतरांना सांगाव्याश्या वाटल्या तर सांगायच्या! मोकळं व्हायचं. फार बरं वाटतं साहेब. तसंही नंतर पुन्हा कुठे कोण एकमेकांना भेटणार आहे? एकदा शहरातल्या गर्दीत हरवल्यावर... मजा येईल साहेब.. वेळही जाईल. खेळून तर बघा..." -रिक्षावाले आजोबा.
"वेळच जायचाय तर अंताक्षरी खेळूयात ना.. उगाच काय असले विचित्र खेळ?" - तुषार अगतिक होऊन म्हणाला..
"का? स्वतःशी बोलायची भीती वाटते बाबा? बघा तुमची मर्जी... मी आपलं एक सुचवलं" - रिक्षावाले आजोबा.
"ठिक आहे... खेळू आपण हा खेळ... बघू तरी, बर्वेबुवा काय म्हणतात ते... पण आजोबा, खेळात तुम्हीही सामिल आहात हं. नंतर तुम्हीही बोलायचं काय?" - बर्वे म्हणाले.
रिक्षावाले आजोबा हसले आणि म्हणाले. "मी आहेच की... चला... आता पाच मिनिटांनी बोलू."
_________________________________

बर्व्यांची पहिली काही सेकंद गेली ती कसला विचार करावा या विचारात. खरोखर असं मुद्दामून समोर आणून बसवलं तर आपणच आपल्याला किती अनोळखी वाटायला लागतो... एकदम औपचारिक होऊन जातं सगळं. पण औपचारिक गप्पांची सुरुवात हवापाण्याच्या चर्चांनी होते तशीच करावी का? ’काय रे मना? कसा आहेस? कसं काय हवा पाणी?’ - बर्वे हसले.
मग डोळे मिटून त्यांनी पुन्हा मनाशी बोलायचा प्रयत्न करायला सुरूवात केली. मघाशी मनात आलेले विचार त्यांना आता नको होते म्हणून त्यांनी निग्रहाने डोळ्यांसमोर सुलभाचा चेहरा ठेवायचा प्रयत्न केला. पण शेवटी मनच ना ते! गेलं आपल्या वळणावर! आणि त्यांच्यासमोर पुन्हा आकार घेऊन उभा राहिला एक रुबाबदार तरुण! त्यांचा मुलगा! केवढा अभिमान होता त्यांना त्याचा.... हुशार, कर्तबगार... वगैरे वगैरे.
’नालायक!’ त्रासून बर्व्यांनी त्याला विचारांतून हटकायचा प्रयत्न केला. पण तो काही जाईना. त्याचा खंबीर, निग्रही चेहरा, निरागस हसू... शेवटी बर्व्यांनी हार मानली.
अमेरिकेला शिकायला जातो म्हटल्यावर सुलभा चिंताग्रस्त झाली होती. मी मात्र त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहिलो. वाटलं होतं शिकायला तर जातोय... उच्च पदवी मिळवून परत येईल आणि इथे चांगला पैसा मिळवून आमचं उत्तरायण सुखाचं करिल. माझाही केवढा मोठा स्वार्थ! त्यानंही मला योग्य तीच शिक्षा दिली. पण या सगळ्यात सुलभाला जी शिक्षा मिळाली ती कशाची होती ते काही समजलं नाही.... शेवटपर्यंत!
बर्वेंनी डोळे उघडले आणि एक लां निःश्वास सोडला.
मी त्याला नालायक म्हणतोय... पण मी कोण आहे? सुलभा आजारी असताना त्याला फोन केला होता. तो म्हणाला भारतात येऊन आईला चांगल्या उपचारांसाठी अमेरिकेला घेऊन जातो. तिला बरं करतो. मी म्हटलं माझं काय? मलाही ने... तर म्हणाला सद्द्या आईला एकटिला व्हीसा मिळवून नेतो... तुम्हाला सावकाशीने येता येईल मागून...
मी हादरलो... सुलभाशिवाय जगायचं? ती एकटी जाणार एवढ्या लांब? माझ्यापासून लांब? आणि तिथंच तिचं काही बरं वाईट झालं तर? दरदरून घाम फुटलेला. डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले आजार शेवटच्या पायरीवर आहे. बरा होण्याची शक्यता अगदीच कमी. मी स्वार्थी विचार केला. म्हटलं सुलभाचं जे काही व्हायचं ते माझ्यासमोर होऊ देत! आता तिच्या जीर्ण झालेल्या देहाचे आणखी हाल नकोत. मी तिला आता माझ्या डोळ्यांसमोरून हलू देणार नाही!
मी त्याला सांगून टाकलं - ’तुझी आई गेली! मी तिचं सगळं उरकलं. तू आता इथे येऊन काही फायदा नाही. तू तुझ्या विश्वात सुखाने रहा!’ सुलभालाही यातलं काहीच सांगितलं नाही. पण शेवटी शेवटी त्याचंच फार वेळा नाव घ्यायची ती... तेंव्हा फार अपराधी वाटायचं... वाटायचं.... तिचं आणि तिच्या लेकाचं एक निराळं विश्व आहे आणि त्यात मी कुणी उपरा... उगाच लुडबुडतो आहे.....! असं वाटून आणखी चीड यायची. ती गेल्याचा खोटाच फोन केला त्याला आणि त्यानंतर आजतागायत... त्याच्याशी बोललो नाही...
पण त्यालाही कधी हक्कानं आईमागे एकट्या उरलेल्या बापाला भेटायला यावंसं वाटलं नाही. असं असूनही.. एक बाप म्हणून... माझं चुकणं माफ होतं का? माझा मुलगा एकटाच चुकतो, तो एकटाच नालायक आहे हा माझ्या मनाचे रचलेला भ्रम असेल?
__________________

’आईशी बोलायला हवं होतं बहुतेक!’ एकदम तुषारच्या मनात आलं आणि तो चमकला. आजवर हा विचार मनात आलाच नव्हता कधी... आजवर त्याच्या मते तो एकटाच होता ज्याच्यावर अन्याय झाले, ज्याचे अपमान झाले, ज्याच्याशी सर्व जग वाईट वागलं. पण कदाचित अजून कुणीतरी होतं... जे एकटं पडलं होतं. माझी आई... कदाचित बाबाही... पैशाशी गप्पा नाही ना मारता येत!
मी सोडून जगातले सगळे वाईट आहेत आणि ते सगळेच माझ्यावर अन्याय करतात.... या भ्रमात का उगाच माझ्या वागण्याचं समर्थन शोधतोय मी?
__________________

मी काय बोलू? तेही माझ्याच मनाशी? पण खरंय. जगातल्या इतर कुणाहीपेक्षा माझं मन मला परकं झालं आहे. - नीता मनाशीच बोलत होती.
भ्रम... भ्रमातच संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे आता. काय करायचं स्वतःशी प्रामाणिक राहून? माझ्या आजोबाजूचं प्रत्येक माणूस चांगलं आहे. मला सुखी ठेवण्यासाठी धडपडतं आहे. अगदी आज अचानक भेटलेली ही परकी माणसं सुद्धा चांगली निघाली. कळता नकळता अनेक मार्गांनी परमेश्वर माझी काळजी आजवर घेत आला. पण त्या परमेश्वरी कृपेच्या फक्त एका कटाक्षाला मला मुकावं लागलं तर मी सगळ्या आयुष्यालाच खलनायक ठरवून मोकळी झाले! खंडिभर सुखाच्या वास्तवावर बसून ओंजळभर दुःख उराशी जपत राहीले.
या दुःखाची नशा असते बहुतेक!
पण आता या भ्रमातून स्वतःला बाहेर काढायची वेळ आली आहे का?
नीतानं डोळे मिटून तो प्रसंग डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केला. महिन्याभरापुर्वी शाळेत आलेला तो फोन... सासर्यांचा घाबरलेला आवाज... आपण घरी पोचेपर्यंत सगळं संपलेलं होतं. सासूबाईंना चुकूनही दुषण दिलं नाही मी. पण त्यांनीच मनाला फार लावून घेतलं... त्यानंतर आजवर त्या घरात एक शब्दही बोललेल्या नाहीत! बाल्कनीत उभं राहून बाळाला जेऊ घालताना.... सासूबाईच्या हातून... माझं बाळ...
नीतानं ओंजळीत तोंड लपवलं आणि हमसून हमसून रडू लागली....
"तरी बरं झालं पोरगीच होती ते.... " नातेवाईकांतली एक बाई कुजबुजल्याचं ऐकलं आणि सगळ्यांसमक्ष आपण त्या बाईच्या कानशीलात भडकवली. त्या दिवशीपासून सगळे कुजबुजताहेत की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय... मला वेड लागलंय... मला वेड लागलंय?
एक चिमुकला जीव गेला त्यासाठी हळहळ झाली.... पण त्या दिवशी एक आई सुद्धा मेली... तिचं श्राद्ध कोण घालणार?
______________________

"चला... पाच मिनिटं संपली! बोलायचं ते बोला बरं का पटापट आता.... आपला प्रवास सुद्धा संपत आलाय आता. १०-१५ मिनिटांत पोचू आपण..." रिक्षावाल्या आजोबांच्या आवाजाने सगळे भानावर आले. पण कुणी काही बोलेना. सगळ्यांचा कंठ दाटलेला... सगळ्यांचे डोळे भरलेले...
"काय झालं साहेबांनो? बोला की... मनाशी गप्पा फारच रंगलेल्या दिसताहेत... क्काय?"
तरिही मागून अवाक्षरही नाही.
"ठिक आहे. थांबवू आपण आता हा खेळ. आता मीच बोलतो. ऐका बरं का. प्रवास संपता संपता माझ्या या रिक्षाशी सगळा परिचय करुन देतो तुमचा."
थोडं थांबून रिक्षावाले आजोबा बोलू लागले...
"या रिक्षाचं इंजिन म्हणजे ’विचार’ आहे साहेब. म्हणजे कसं ना... गाडी स्टार्ट झाल्यापासून बंद पडेपर्यंत हे सतत चालू असतं. त्याशिवाय गाडी चालणारच नाई ना साहेब. आणि हे इंजिन जितकं स्वच्छ ना साहेब.... गाडी तेवढी चांगली पळते. या ’विचारां’ची स्वच्छता सतत करावी लागते. यात ज....रा घाण अडकली, तर गाडीचं आयुष्य कमी होतं ना साहेब. फार म्हणजे फारच महत्त्वाचा पार्ट आहे हा गाडिचा! अणि महत्त्वाचं म्हणजे... इंजिन चांगलं आहे असं आपण गाडिला खोटंच समजावू नाई ना शकत! काय बाबा?"

तुषार ऐकत होता... माझे विचार? सर्वांनाच असतात की स्वतःचे स्वतंत्र असे विचार.... मग माझेच एकट्याचे विचार योग्य आहेत हे मीच कसं ठरवलं? मला त्यांचे विचार ठावूकच नाहीत! आई-बाबांचं माझ्यावर प्रेम नाही हे मीच ठरवलं. अप्पांचं माझ्यावर खूप प्रेम आहे हेही मीच ठरवलं. माझे विचार प्रदूषित आहेत... माझ्या स्वतःच्याच अहंकारानी!

"आणि रिक्षाची बॉडी आहे ना... चासी म्हणतात ना त्याला... ती म्हणजे ’समाज’. म्हणजे बघा हं.... हा समाजच जन्मभर आपल्याला आधार देतो... प्रवास करताना आपली स्वतंत्र अशी जागा आपल्याला देतो... बूड टेकायला. आता हा समाज असतो कठिण... अनेक टोकदार खिळे आणि कठिण धातूनी बनलेला. हा समाज जेवढा जुना... तेवढे त्याचे गंजलेले धातू आणि खिळे आपल्याला इजा पोचवणारे असतात! त्यातून या समाजातलं इंजिन... म्हणजे विचार... हे सुद्धा जुनं, पुराणं असेल तर... गाडीतल्या प्रवाशांना त्याचा त्रास होणारच. अशावेळी काय करायच? समाजातल्या खिळ्यांपासून स्वतःला वाचवत रहायचं.... किंवा मग जमत असेल तर समाजच दुरुस्त करायचा. पण प्रवास करणार्याला सतर्क रहायलाच हवं ना... नाईतर इजा आपल्यालाच होणार... काय ताई?

नीताने ओंजळीतून मान वर काढली... समाज... माझा खरा राग या समाजावर होता जो मी त्या दिवशी त्या बाईच्या कानाखाली वाजवून व्यक्त केला. पण समाज बदलला नाही... बदलत नाही... त्या घटनेनंतर मी मात्र बदलले. समाज बोलत राहिला आणि निषेधाद्दाखल... मी त्या समाजाचेच म्हणणे खरे ठरवत गेले. म्हणजे ज्यांना हरवायचं होतं, त्यांच्याशी मीच हरत गेले. मी वेडी नाही! माझं बाळ गेलं. अपघाताने गेलं. त्या बाळाची आई म्हणून मी संपले असेन,, पण... एक स्त्री म्हणून... माझ्यातली आई कधी मरू शकते? हा समाज एका आईला अशी इजा पोचवू शकतो?

"आणि हा रिक्षाचा मिटर... हा म्हणजे ’काळ’. हा पुढे पुढेच धावणार साहेब. तीच प्रव्रुत्ती आहे त्याची. याच्याकडे लक्ष देत राहिलं तर प्रवासाची मजा घेणं राहून जातं साहेब! कधी हा फार जोरात धावतोय असं वाटतं... कधी हा थांबून गेलाय असं वाटतं. पण असं काही होत नसतं. हा काळ त्याच्या गतीने धावत असतो. आपल्या खिशात किती पैसे आहेत त्याच्याशी या मिटरला काय घेणं देणं? मग आपणच खिशाला झेपेल एवढाच प्रवास करायचा. आणि खरं सांगू का... आपल्या प्रवासाला लागतील एवढेच पैसे दिलेले असतात आपल्याला... त्या विधात्याने! त्यापेक्षा कमी नाही... आणि जास्तही नाहीत! ईथे पैसे म्हणजे आपले श्वास बरं का काका!"

बर्वे हतबुद्ध झाले होते. उभ्या जन्माचं तत्वञ्यान हा रिक्षावाला एवढ्या सहजपणे सांगत होता. खरंच खूप काळ गेला. आपण प्रत्येक निर्णय घेताना निसटत जाणार्या काळाकडे बघत राहिलो. किंवा मग मोजत राहिलो खिशातले पैसे... उरलेले श्वास! मुलाला जन्म दिल्यापासून आजवर जे जे काही केलं ते खरंतर त्याच्यासाठी नव्हतं. माझ्यातल्या बापासाठी होतं. त्यात त्याचा उत्कर्ष घडत गेला तो केवळ एक संयोग! मग आता त्या ऋणांच्या परतफेडीची अपेक्षा मी का ठेवावी? बरं ती परतफेडही त्याने माझ्या पद्धतीने करावी हा हट्ट का? तो त्याच्या पद्धातीने जे काही करत होता... ते मी स्वीकारलं का नाही? तो चुकलाच! पण मीही उत्तरादाखल चुकाच का केल्या?

"आणि शेवटी साहेब..." रिक्षावाले आजोबा बोलतच होते..
"प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर तुमची ओळख करून देतो याच्याशी... हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर जे रबरी हूड आहे ना साहेब रिक्षाचं... त्याला मी ’क्षमा’ असं म्हणतो. या क्षमेने सगळ्या प्रवासभर आपलं रक्षण केलं... पावसापासून, झाडाच्या फांद्यांपासून, वादळापासून... या क्षमेशिवाय हा प्रवास झाला तर असता... पण असा सुखकर वाटला नसता. हे क्षमेचं छप्पर डोक्यावर असावं लागतं साहेब. क्षणोक्षणी चुका घडतात. त्यामुळे प्रवाशाला त्रास होतो... कधी विचार खराब होतात, कधी समाज गंजलेला असतो. कधी संयम संपतो तर कधी वास्तव फारच बोचरं निघतं. पण बर्याचदा चुका घडतात त्या परिस्थितीमुळे... बाहेरच्या पावसापाण्यामुळे. या परिस्थितीजन्य चुकांना क्षमा हेच उत्तर असतं साहेब. सगळ्याच चुकांना सिक्षा द्यायची ठरवलं तर गाडी चालणार कशी? माफ करावं लागतं. कधी इतरांना... कधी स्वतःला!
चला... हे आलं तुमचं ठिकाण. माझं काम संपलं."
शेवटच्या वाक्यानिशी रिक्षातले तिघंही भानावर आले. बाहेर शहराचा ओळखीचा गजबजाट होता. रात्रीची वेळ होती म्हणून जरा गर्दी कमीच होती इतकंच.

"चला उतरा. माझं काम संपलं" रिक्षावाले आजोबा म्हणाले.
"अहो हे काय आजोबा... घरापर्यंत सोडा की..." - तुषार म्हणाला.
"या ताईचं घर इथंच समोर आहे. काका जातील पुढच्या गल्लीत चालत. आणि बाळा तू... निवांत पोच घरी. अप्पा ठणठणीत आहेत. मी निघतो. माझी कल्पना थकली आता. संयमही संपत आलाय. उतरा लवकर..."
तिघंही उतरले. रिक्षावाल्या आजोबांनी रिक्षा परत चालू केली...
नीता घाईत म्हणाली... "थांबा ना आजोबा.. बाहेर या जरा... पाया पडावसं वाटतंय तुमच्या. आशिर्वाद देऊन जा... पुन्हा कधी भेटाल... न भेटाल..."
"माझे आशिर्वाद आहेच बाळांनो... पाया पडायची गरज नाही... आणि मला पुन्हा तुम्हाला भेटावं लागणार नाही याची खात्री आहे. येतो मी." कुणालाच काही कळायच्या आत रिक्षा सुसाट दूर जात होती.
काही सेकंदांनी बर्वे अचानक ओरडले... "ओ आजोबा... तुमचे पैसे..." पण उपयोग नव्हता.
अचंभित होऊन तिघेही रिक्षा गेल्याच्या दिशेकडे पहात राहिले. अचानक नीता म्हणाली... "त्या आजोबांना आपलं घर कसं माहित होतं?"
"अरे हो की... आणि त्यांना माझ्या अप्पांबद्दल कसं कळलं?" - तुषार म्हणाला.
बर्वे गंभीर झाले होते.
"तो म्हातारा.... विलक्षण होता! काहितरी हेतूने आपल्या आयुष्यात एकाच वेळी अशा रितीने येऊन गेला. त्याचा शब्दन् शब्द मेंदूवर कोरून ठेवायला हवा..."
____________________________________
एक वर्षानंतर त्याच ठिकाणी....

नीता भलं मोठं पोट घेऊन उभी होती. तिच्या शेजारी एक उंचापुरा तरूण... तिचा नवरा.
बर्वे घाईघाईने आले. तिला पाहून म्हणाले, "नमस्कार नीताबाई... अर्रे बापरे.... सहकुटुंब आलेल्या दिसताय... अगदी छोटे साहेबही आहेत."
नीता हसली. तुमची ओळख करुन द्यायची होती... हे माझे मिस्टर... मिलिट्रीत असतात. दोन दिवसापुर्वीच सुट्टी घेऊन आलेत."
"हो... कारण समजतंच आहे मला. व्यवस्थित ना सगळं? डिलिव्हरीची तारिख कधीची आहे?"
"बस्स... आता पुढच्या आठवड्यात कधीही. अहो... हे मिस्टर बर्वे... तुम्हाला सांगितलेलं ना..."
"हो हो... नमस्कार बर्वे साहेब!"
"नमस्कार चमत्कार रहू देत हो.... हा तुषार कुठे उलथलाय? बरोब्बर एका वर्षाने याच जागी भेटायचं ठरलं होतं ते विसरला की काय?" - बर्वे रस्त्याकडे पहात म्हणाले.
"तो नाही विसरणार. येईलच इतक्यात."
इतक्यात तुषार पळत, धापा टाकत आलाच.
"काय रे? कुठेही शांतपणे, चालत, निवांत पोचण्याची एलर्जी आहे काय तुला? त्या दिवशी बसस्टॉपवरपण असाच आला होता ना? काय गं नीता?"- बर्वे म्हणाले.
"हो तर... काय रे तुषार? सगळं ठिक ना?" नीता म्हणाली.
"हो गं. सगळं ठिक आहे. यायला जरा उशीर झाला ना.... तुम्ही निघून जाल कि काय असं वाटलं."
"अरे वेड्या.... असे कसे जाऊ? काय चाललंय काय तुझं सद्धया?"
"मी? स्वतःचा बिझिनेस चालू केलाय. बाबांनी मदत केली. सद्ध्या छोटंसं ऑफ़िस आहे... तिथं जयराम आळीत."
"अरे वा! बरिच प्रगती केलीत राजे..." बर्वे म्हणाले. सगळे हसले.
"बरं... मी चाललोय पुढच्या आठवड्यात अमेरिकेला. माझ्या मुलाकडे. तो आलाय इथे मला न्यायला. या मिटिंगसाठीच थांबलो होतो." बर्वे म्हणाले.
"अरे वा! बरं झालं थांबलात. आजची भेट व्हायलाच हवी होती." - तुषार बोलला.
"अरे... मी कसा विसरीन आजचा दिवस? आणि दर वर्षी भेटणारोत आपण याच दिवशी... जमेल तोवर. काय?" - बर्वे
"हो तर... अहो... हा तुषार." - नीता
"समजलं ते मला.... खरंतर मी मुद्दाम आलो इथे. तुमचे आभार मानायचे होते. त्या रात्री तुमच्यासारखे सज्जन भेटले नीताला म्हणून.. अणि आमच्या पहिल्या मुलीबाबत जे झालं... नीता पार खचली होती. पण त्या रात्रीनंतर सगळं बदललं. विस्क्टलेलं परत नीट झालं. काय झालं असं ते ठावूक नाही. पण जे घडलं, त्याला तुम्ही साक्षीदार होतात!"
"आभार ज्यांचे खरोखर मानायला हवेत ते भेटलेच नाहीत ना पण..." - बर्वे उद्विग्न होऊन म्हणाले...
"खरंच.. त्या दिवशीचे ते रिक्षावाले आजोबा कोण होते हो? कुठे दिसलेच नाहीत नंतर?" - नीताच्या मिस्टरांनी विचारलं

खाली मान घालून तिघांनीही नाही म्हटलं.

खरंच.... कोण होता तो रिक्षावाला?
__________________________________________________________

मुग्धमानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय कथा आहे!!!!
वाचताना शेवटी शेवटी अंगावर काटा आला.. आयुष्याचं अख्खं तत्वज्ञान किती साध्या सोप्या भाषेत सांगितलंय.

जियो, मुग्धमानसी. आजचा दिवस सार्थकी लावलात.

चारही भाग आवड्ले, धन्यवाद...
(जास्त वेळ न लावता इथे टाकण्याचा वेग, विशेष अभिनंदनास पात्र) . Happy

नंदिनी +१
मानसी तू ग्रेट आहेस! खुपच सुंदर लिहिलयेस.
बाकीचें ईमेलीतून बोलू...
नक्की!
जियो! लिहित रहा! मला तुझ्या लिखाणाची गरज आहे.

मस्त कथा. चार भागात आयुष्याचं सार सांगितलत. आणि हो पटापट भाग टाकल्याबद्दल अभिनंदन. इतरांनी पण ध्यानात घ्या जरा Wink

मानसी किती सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगितलेत. खरोखर ग्रेट आहात. Wish you all the best.
असेच लिहित रहा. कबूल केल्याप्रमाणे रोज एक भाग टाकून कथा पुर्ण केलीत याबद्दल विशेष अभिनंदन.

मानसी काय प्रतीक्रिया देऊ? जीवनाचे सार असे उत्तम तत्वज्ञान या कथानकातुन जिवंत साकारलेत. असे वाटले की कथेतील पात्रे म्हणजे नीता, तुषार, बर्वेकाका आणी रिक्षावाले काका हे आपल्या शेजारचे कुणी असावेत आणी आपणही त्यांच्या जीवनातील एक घटक आहोत. जबरदस्त लिहीलयं.:स्मित:

आणी कथा लवकर पूर्ण केल्याबद्दल पण आभार आणी अभिनंदन सुद्धा.:स्मित:

अतीशय सहज आणी ओघवती लिखाणशैली आहे. मान गये.

Pages