रिक्षावाला - २

Submitted by मुग्धमानसी on 24 April, 2013 - 00:49

रिक्षाच्या एका कडेला बसून नीता विचारात गढलेली होती. तोंडाने सतत रामनाम पुटपुटत होती. तरी मनातलं वाईट विचारांचं वादळ काही थांबेना. अवघ्या तास-दिड तासापुर्वी कुठे होतो आपण! शाळेत रानडे बाईंना मनातल्या मनात शिव्या घालत घालत भरभर काम उरकत होतो. मनगटातल्या घड्याळ्याकडे पाहत मनात म्हणत होतो कि याहून वाईट काही होऊच शकत नाही. आणि आता... एवढ्या लगेच दैवानं दाखवून दिलं कि आहे त्याहूनही वाईट असू शकतं. परमेश्वराच्या कल्पनाशक्तीला अंत नाही हेच खरं. मघाशी वेळेत... किमान लवकरात लवकर घरी पोचायचं म्हणून आटपिटा चालला होता जीवाचा. आणि आता... परमेश्वरा... फक्त माझ्या घरी, माझ्या माणसांत सुखरूप ने रे बाबा मला. माझ्या लेकराशी गाठ पडू दे माझी! घरी सगळे चिंतेत असतील. तसं सांगितलं होतं आपण सकाळी निघतानाच की संध्याकाळी उशीर होईल... पण आता जरा जास्तच उशीर होणार असं दिसतंय. कदाचित रात्र होईल. त्यातून काहीही संपर्कही होत नाहीये... ती पर्समधून मोबाईल काढून उगाच बटणं दाबत राहिली.

ही माणसं कोण आहेत कोण जाणे..! हल्ली कुणावर विश्वास टाकावा अशी सोय नाही. त्यातून हि परकी माणसं, मी एकटी बाई माणूस. वेळ अशी अडनिडी आणि आपण घरापासून... आपल्या शहरापासून किमान एक तासभर लांब! या दोघांनी... किंवा या रिक्षावाल्यानी फ़सवून लुटायचं ठरवलं तर न बोलता लुटलं जाण्याखेरिज काहीही मार्ग नाही आपल्याकडे. जीव वाचावा फक्त! ... ’श्रीराम, श्रीराम, श्रीराम...’ ती डोळे मिटून अखंड पुटपुटत होती. एका मुठीत तिनं तिचं मंगळसुत्र घट्ट धरलं होतं.

बाहेर कोसळणारा पाऊस तिला भिजवत होता तरी तिनं रिक्षाचा रबरी पडदा ओढला नाही. शून्य नजरेने निसर्गाचा थैमान पाहताना ती काही अर्थ जुळवायचा प्रयत्न करत होती...
_____________________________

रिक्षाच्या दुसर्‍या टोकाला तुषार मख्खपणे बसला होता. त्यानेही पडदा ओढला नव्हता. तसंही ती आधीच ओलाचिंब होता. आता अजून काय भिजायचं राहिलं होतं? नाही म्हणायला मन अजून कोरडंच होतं. त्याला अजून विश्वास बसत नव्हता कि त्याच्यात अजूनही घरी परतायची एवढी ओढ शिल्लक होती! पण परतीचा प्रवास एवढा विचित्र असेल असं अजिबात वाट्लं नव्हतं त्याला! तसंही त्याच्याजवळ लुटलं जाण्याजोगं काहीही नव्हतं त्यामुळे तो निर्धास्त होता. ’घरी गडगंज पैसा आहे बापाचा. पण त्यातली एकही दमडी न उचलता घराबाहेर पडलो आपण ते बरंच झालं. दोन दिवस काही खाल्लेलंच नाही आपण...’ अचानक पोटातल्या भुकेची जाणीव होऊन तो अस्वस्थ झाला. ’घरी गेलो तरी पाणी सुद्धा प्यायचं नाही! उपाशी मेलो तरी चालेल पण बापाच्या पैशाचं आणि आईच्या हातचं काहीही खायचं नाही. अप्पाला भेटायचं, तो मरेपर्यंत त्याच्याजवळ रहायचं... आणि त्याला वाटेला लावलं की आपणही निघायचं. बापाच्या कुबड्या नकोत. आपला रस्ता आपण आखायचा. पण पैसे.. पैसे कुठून आणायचे?’

मनातली बेचैनी मख्ख नजरेतूनही जाणवत होतीच. हे काका बनेल दिसतात. तोंडाला दारूचा वास आला मला मगाशीच. त्यातून भरपूर पैसेही आहेत बहुतेक यांच्याकडे. मगाशी या रिक्षावाल्याला मोठ्या तावात म्हणाले... ’वाट्टेल तेवढे पैसे देतो तुला फक्त आम्हाला शहरात नेऊन सोड.’ त्यांनी पाकिट काढलं तेंव्हा बर्याच नोटा दिसल्या मला त्यात. या पैशेवाल्यांचं काही सांगता येत नाही. यानंच हे सगळं घडवून आणलं नसेल कशावरून? आणि आता मोठा साळसूदपणाचा आव आणतो आहे. काही लफडं झालं तर हा त्याच्या पैश्याच्या जोरावर सहज नामानिराळा होईल... पण मी मात्र अडकेन. माझा सख्खा बापही ओळख देणार नाही मला. आणि त्याच्या तावडित सापडलो तर तोच सोलून काढील मला. या म्हातार्याकडे लक्ष ठेवायला हवं. आणि या रिक्षावाल्यावरही.

तिरक्या नजरेने शेजारी बसलेल्या बर्वेंकडे हळूच अधूनमधून बघत आणि मनातली, पोटातली अस्वस्थता विसरण्याचा प्रयत्न करत तुषार निमुटपणे शांत बसून राहिला. प्रवास संपायची वाट पहात राहिला.
_____________________________

त्यादोघांच्या मध्ये अवघडून बसलेले बर्वे भयंकर चुळबुळत होते. आत्तापर्यंत ओढून ताणून टिकवलेलं अवसान आता गळून पडायच्या बेतात होतं. मनातल्या मनात त्यांची पाचावर धारण बसली होती. कुणाच्याही नकळत पुन्हा पुन्हा ते स्वतःचा खिसा चाचपून बघत होते. एवढी रोख रक्कम घेऊन आपण दिवसभर बोंबलत फिरतोय यासाठी ते स्वतःच स्वतःला शिव्या घालत होते. आजच बॅंकेतून पेंन्शनचे पैसे काढले. सुलभाच्या दोन पाटल्यासुद्धा नेमक्या आजच मोडल्या. काय करणार? घरभाडं भरलं नाही तर पुढच्या महिन्यात रहायचे वांदे होतील. पेंन्शनच्या रकमेत घरभाडं भरलं की हाती काहीच उरत नाही. सुलभा होती तेंव्हा पैश्याला पैसे जोडून थोडी थोडी बचत करायची आणि वेळ भागवून न्यायची. आपल्या उधळपट्टी स्वभावावर ती एवढी का संतापायची ते आता कळतंय. ती असताना या घरभाडं वगैरे प्रकरणात कधी लक्षच घालावं लागलं नाही आपल्याला. तेंव्हा माझ्या पेंन्शनवर आम्हा दोघांचं भागायचं ते आता माझं एकट्याचंही भागेना!

सुलभाचं मंगळसुत्रसुद्धा आणलं होतं मोडायला. पण हिंमत झाली नाही. तेही खिशात तसंच आहे. ’प्राण गेला तरी या पैशाला आणि सुलभाच्या मंगळसुत्राला कुणाला स्पर्षही करू देणार नाही!’ - त्यांनी मनातल्या मनात निग्रह केला आणि दुसर्याच क्षणी त्यांना त्यातला फोलपणा जाणवला. हा पोरगा तरूण आहे. चेहर्‍यावरून सभ्य वाटतो पण हल्ली कुणाबद्दल काय सांगता येतंय? आपणही मघाशी शहाणपणा करून आपलं पाकिट उघडं केलं याच्यासमोर. त्याच्या नजरेनं बरोबर हेरलं असणार जे हेरायचंय ते. हा रिक्षावाला सुद्धा त्याला सामिल असेल तर? ही पोरगी बिचारी गरिब वाटते. पण एवढे पैसे पाहून हिची मती सुद्धा फिरली तर काय घ्या?

बर्वेंना घाम फुटला होता. अस्वस्थपणे हात चोळत आणि चहूबाजूंनी परिस्थितीचा अंदाज घेत, चेहरा सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत बर्वे शांत बसले होते. पण त्यांच्या मनात मात्र कल्लोळ चालला होता!
_____________________________

समोरच्या आरशात या तिघांचेही चेहरे आळिपाळीने पहात रिक्षावाला त्याच्या पांढर्या शुभ्र मिशित हळूच हसत होता. बरिच मिनिटे अशीच शांततेत निघून गेल्यावर शेवटी तो स्वतःच म्हणाला -
"काय साहेबांनो... कशी वाटली आपली रिक्षा?"
"काय?" - बर्वेंनी चाचपडत विचारले.
"नाई म्हटलं कशी काय वाटली आपली रिक्षा?"
"तुझी रिक्षा म्हणजे काय पुष्पक विमान आहे का रे? कशी वाटली काय कशी वाटली? रिक्षासारखी वाटली."
"पुष्पक विमानापेक्षा कमी नाई साहेब आपली रिक्षा... तुमच्या एवढ्या अडचणीला सुपरमॅनसारखी धावून आली! एरवी या वक्ताला साधी हातगाडी नसती मिळाली तुम्हाला या एरियात! येवढं ध्यानात घेऊन तरी चार शब्द कौतुकाचे बोला कि राव!"
"खरंय दादा! तुमचे खरंच उपकार झाले. आज मला सुखरुप घरी सोडलंत तर तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही दादा!" ’दादा’ या शब्दाचा जाणूनबुजून पुन्हा पुन्हा प्रयोग करत नीता म्हणाली.
"चालायचंच ताई... नका टेंशन घेऊ. त्ये म्हणतात ना... ’ग्राहक देवो भव!’- तुम्ही देव आहात ना आपले. तुमची सेवा नै करायची तर कुणाची?"
"बराच परोपकार करता वाटते तुम्ही... " बर्वे उद्गारले. त्यांच्या स्वरातला कुत्सितपणा अजिबात लपत नव्हता. रिक्षावाला हसला. आणि चक्क तुषार सुद्धा. म्हणजे त्याचे या संभाषणाकडे लक्ष होते तर!
हसून झाल्यावर रिक्षावाला म्हणाला - "काय साहेब... गरिबाची चेष्टा करता? आम्ही आपले पोटासाठी चार पैसे मिळावेत म्हणून जे करतो ते करतो! स्वार्थच तो! आणि खरं सांगू का... जगात परोपकार, परमार्थ नावाची चीजच नसते साहेब! ज्यांना स्वतःचा खरा स्वार्थ जरातरी व्यवस्थित कळला ना, त्याला जग परोपकारी... महान म्हणतं!"
"अरे वा... अध्यात्म या विषयात सुद्धा गती आहे वाटते आपल्याला? बाकी तुमचे वय बघून वाटते खरे तसे..." बर्वे पुन्हा कुत्सितपणे म्हणाले.
"पुन्हा चेष्टा करताय साहेब. मी आपला तुम्हाला बोलतं करायचा प्रयत्न लावलाय. शहरापर्यंत पोचायला अजून तासभर तरी लागेल साहेब. पावसामुळे स्पीड वाढवता येत नाई ना... एवढा वेळ एकमेकांकडे किंवा बाहेरच्या पावसाकडे नुसतंच बघत राहण्यापेक्षा म्हटलं जरा चार गप्पा होऊदेत! आपल्याला भारी आवडतं बाबा बोलायला!"
"हं... खरंय तुमचं!" - पहिल्यांदाच तुषार बोलला. त्याच्या मनात आलं बोलता बोलता या रिक्षावाल्याचं अंतरंग काढून घेता येतंय का बघू. निदान याच्या हेतूंचा अंदाज तरी येईल...
"बाकी तुमची ही सुपरमॅन रिक्षा खरंच भारी आहे हां..." - तुषार म्हणाला. बर्वेंच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांना सद्ध्या कुणाशीही बोलायचं नव्हतं. नीता मात्र लक्ष देउन संभाषण ऐकत होती.
"सुपरमॅन नाही साहेब... कल्पना म्हणा!"
"कल्पना?"
"होय! माज्या रिक्षाचं नाव कल्पना! कसं काय वाटलं साहेब? तसं पण आपल्या कल्पनेच्या भरार्‍या सुपरमॅनच्या भरार्यांपेक्षा भारी असतात! काय साहेब?"
बर्वे दचकले. "छाने छाने..." ते जरा मोठ्याने पुटपुटले. पाण्यात असताना माशाशी वैर करून चालत नाही एवढं शहाणपण अनुभवानी... म्हणण्यापेक्षा परिस्थितीनी दिलं होतं त्यांना.
"छानच नाव ठेवलंय हो रिक्षाचं..." नीता उगाचंच बोलली. आता तिच्या मनावरचा ताण थोडा सैल झाल्यासारखा वाटत होता. निदान वाहन तरी मिळालंय... आपण घरी पोचण्याची शक्यता वाढलीये!
"रिक्षाचंच कशाला ताई... या कल्पनेच्या प्रत्येक पार्टला नाव ठेवलंय! उगाच आपले बसल्या बसल्या उद्योग..."
"अरे वा! नावं ठेवण्यात माहीर दिसताय तुम्ही..." बर्वेंनी सहज जोक मारला. सगळे हसले. वातावरण थोडं हलकं झालं.
"भारी चेष्टा करता राव तुम्ही!" - रिक्षावाला.
"बरं मला सांगा... या सीटला काय बरं नाव दिलंयत तुम्ही?" - नीताने विचारलं.
"नका विचारु ताई. हसाल तुम्ही. आधीच हे साहेब चेष्टा करतात माझी सारखी."
"नाही करत हो चेष्टा आता. बोला तुम्ही बिंधास!" - बर्वेंनाही उत्सुकता वाटू लागली होती आता.
"बरं सांगतो. सीटचं नाव आहे - वास्तव!" - रिक्षावाला.
तुषार फस्सकन हसला - "हे नाव काय पिक्चर बघून ठेवलंय वाटतं! आजोबा... सिनेमे पण बघता वाततं तुम्ही.... हे हे हे..."
नीतालाही हसू आलं....
रिक्षावाला म्हणाला... "बघा हसणार नाही म्हणाला होतात ना?"
"अरे पण ’वास्तव’ का?" - बर्वे
"काय करणार साहेब... किती ठिकाणी विरलीये, फाटलीये ती सीट ते पाहिलंत का? वास्तव हे असंच असतं... आणि कल्पनेच्या भरार्या चालू असताना बुडाखाली आपण दाबून ठेवतो ते वास्तवच ना? अजून दुसरं कुठलं नाव फीट बसणार त्या सीटला?"
सगळेच शांत बसले. हे असं काही एका रिक्षावाल्याकडून अपेक्षितच नव्हतं ना... त्याच्या अशा प्रश्नांची उत्तरं कोण देऊ शकणार होतं?
"छान आहे छान आहे..." असं उगाचच म्हणत बर्वे अस्वस्थ झाले.

काही क्षण शांततेत गेल्यावर काहितरी विषयबदल म्हणून बर्वेंनी आपला मोर्चा नीताकडे वळवला... "तुम्हाला लहान बाळ आहे म्हणालात... मुलगा कि मुलगी?"
"त्याने काही फरक पडतो का? कि मुलगा असेल तर माझी घरी लवकर परतण्याची घाई जस्टिफाय होते?" - नीता
"अहो काय अर्थ काढताय तुम्ही? मी आपलं सहज विचारलं. शेवटी आई आहात तुम्ही... आई बाळासाठी करते ना.. तेवढं एकच प्रेम जगात खरं! बाकी सब झूट! माझ्याशिवाय कोणाला कळणार हे? एका चांगल्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मुलाचा बाप होण्याची शिक्षा भोगतोय मी कित्येक वर्ष! माझ्या तळपायाची आग अजूनही मस्तकाला जाते त्याचा विषय निघाला की...! मात्र... सुलभाच्या उशाशी ती मरताना त्याचाच लहानपणीचा फोटो होता. त्याचंच नाव होतं तिच्या तोंडात... आणि अडखळत जे काही दोन शब्द बोलायची त्यातही त्याच्याचबद्दलचे प्रश्न! ’आला का हो तो? कधी येणारे?’............. मी!... मी होतो तिच्यापाशी शेवटपर्यंत! तिच्या उशापायथ्याशी बसून तिची मी सेवा केली! पण मरताना तिच्या डोळ्यांत पाणी मात्र त्याच्यासाठी होतं... माझ्यासाठी काहीच नाही. खरं सांगतो... स्वतःच्या सख्ख्या मुलाबद्दल अशी इर्ष्या कधी कुणाला वाटली नसेल. आणि किवही वाटली! असं निर्व्याज प्रेम दाराशी उभं असताना त्याला घरात प्रवेश न देणारं ते दळभद्री कार्ट..."
बर्वेंचा नूर आता पालटला होता. त्यांचा गोरा वर्ण लालबुंद झाला होता आणि डोळ्यांत कठोकाठ भरून पाण्यासह संताप दाटला होता!

रिक्षा संथ वेगात अंधार्या निर्मनुष्य रस्त्यावरून चालली होती... रस्त्यावरून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाला भेदत, खड्डे चुकवत...! पाउस आता जरा दमल्यासारखा वाटत होता. त्याचा रुद्रावतार यथावकाश सौम्य होत होता. रिक्षाच्या आतमध्ये मात्र वातावरण जरासं ढवळलेलं होतं. पण काही वेळातच बर्वे काका भानावर आले आणि आपण जरा जास्तच बोलून गेलो कि काय असं वाटून खजील झाले. मग उगाच सारवासारव करायच्या भाषेत म्हणाले...
"पण माझा दुसरा मुलगा आहे ना... पोलिसात आहे चांगला! मोठ्या हुद्द्यावर! मी त्याच्याकडेच असतो ना सद्ध्या! ओ रिक्षावाले... तुम्हाला काही अडचण आली तर सांगा बरं का मला... पोलिसात भारी ओळखी आहेत आपल्या हां...!"
तुषार हसला!
"तुला काय झालं रे दात काढायला?" -बर्वे
"नाही म्हटलं... तुमचा मुलगाच पोलिसात मोठ्ठ्या हुद्द्यावर आहे म्हणता... मग तुम्ही इथं काय करताय? त्याला बोलावलं असतं तर त्याने तुमची चांगली सोय केली असती ना... आणि आम्हालाही सोयिस्कर झालं असतं काहितरी... आधी सांगायचंत ना..." - तुषार
"करणारच होतो मी फोन... पण... पण... मोबाईलला रेंज नाही ना... आता जरा शहराजवळ आल्यावर फोन करतो त्याला. बघच तू..." - बर्वे
"काका, उगाच पोलिसांचं नाव घेऊन आमच्यावर दडपण आणायचा प्रयत्न चालवलाय तुम्ही ते काय कळत नाही का मला? तुमच्यासारख्या पैसेवाल्यांची थेरं चांगली कळतात मला. आम्हाला उगाच कशात अडकवायचा प्रयत्न केलात ना... महागात पडेल तुम्हाला... सांगून ठेवतोय!"
"तरिच! वाटलंच होतं मला. माझ्याकडच्या पैश्यावर नजर आहे तुझी. माझी स्वतःची, कष्टाची कमाई आहे कळलं ना? तुझ्यासारखं बापाच्या जीवावर नाही उड्या मारत मी!"
"ए म्हातार्या... तोंड आवर..."

"विश्वास!!!"
रिक्षावाले आजोबा अचानक ओरडले आणि करकचून ब्रेक दाबत रिक्षा जागीच थांबली. रिक्षावाल्या आजोबांच्या पाठिवर नाक आपटून बर्वे काका जागेवर आले आणि वैतागून ओरडले - "काय झालं?"
"विश्वास पंक्चर झाला बहुतेक!"
"काय? कोण विश्वास?"
"माझ्या रिक्षेचं... कल्पनेचं पुढचं चाक! विश्वास!"
’आज सगळ्या सनकी म्हातार्यांशीच गाठ आहे म्हणायची...’ - तुषार पुटपुटला.
यावर बर्वे काही बोलणार तेवढ्यात नीता बोलली, "अरे देवा! आधीच उल्हास... त्यात फाल्गुनमास! आता हे चाक पंक्चर झालं म्हणताहेत..."
"ओ रिक्षावाले... चाक पुर्ण पंक्चर आहे कि हवा फ़क्त कमी झालीये ते बघा की जरा उतरून..." - बर्वे
रिक्षावाले आजोबा उतरले. रिक्षातलं वातावरण आता चिंतातूर झालं होतं! चाकाकडे वाकून काहितरी बघून पुन्हा येऊन आजोबा म्हणाले - "पंक्चर नाही वाटत. पण हावा पार गेलीये."
"अहो थोडी हवा असेलच ना... रेटा तशीच गाडी पुढे. एकदा शहरात पोचल्यावर बघता येईल."
"विश्वासात दम नसेल तर गाडी पुढे कशी रेटणार साहेब? डगमगत थोडं अंतर चालेल पण लांबचा पल्ला गाठायचा तर विश्वास मजबूतच हवा ना! अजून एकत्र फार लांब जायचंय साहेब! आनि तुम्ही म्हणताय तसं तशीच रेटली गाडी पुढे तर विश्वास पुर्ण खराब होईलच पण माझ्या कल्पनेचाही अपघात वगैरे झाला तर? ते नुकसान कोण भरून देईल साहेब?"
बर्वे शांत झाले. तुषार मात्र वैतागून म्हणाला... "अहो मग आता या तुमच्या विश्वासला काय करायचं ते बोला. काय साला कटकट आहे! प्रवासच संपेना!"
"वैतागू नका साहेब. मी थोडीच काही केलंय? स्टॅपनी बाईसाहेब आहेत ना आपल्याकडे. चाक बदलून टाकू ५ मिनिटात आणि चलू झटकन् पुढे. हाय काय अन् नाय काय. एवढा उशीर झालाच आहे त्यात अजून थोडा... पण विश्वास बरा झाल्याशिवाय पुढे जाता नाई यायचं."
________________________________________

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चाललिये कथा... पुढे काय होईल याची उत्सुकता आहे Happy

अत्ताच या आधीचा भाग वाचुन संपवला आणि बघितलं तर दुसरा भागही आला Happy आता असाच तिसरा भागही लवकर टाक Happy