किळस न वाटेल असा चांगला भयपट - एक थी डायन (Ek Thi Daayan - Movie Review)

Submitted by रसप on 21 April, 2013 - 02:50

कुत्रा स्वत:चं शेपूट पकडू शकत नाही. हे नॉर्मली कुत्र्याला माहित असतं. पण कधी तरी त्याला हुक्की येते आणि तो स्वत:भोवती जोरात फिरून शेपूट धरण्याचा प्रयत्न करतो, अखेरीस हरतो, थकतो आणि गप्प बसतो. माणसाला शेपूट नाही, पण 'भूतकाळ' आहे आणि हुक्की आली की आपणही त्याला मुठीत घेण्यासाठी गोल-गोल फिरतो. तो कधीच हातात येणार नसतो. त्यामुळे त्याच्या मागे लागण्यापेक्षा त्याला आपल्या मागे लागू द्यावं आणि आपण मात्र आज व उद्यावर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून हे शेपूट आपल्याच पायात वळवळ करून आपल्यालाच तोंडावर पाडणार नाही.
पण 'एक थी डायन' मधल्या जादुगार 'बोबो' (इम्रान हाशमी) चं (बोबो ? काहीही काय ? मग त्याच्या कुत्र्याचं नाव काय आहे ? - असे प्रश्न विचारू नका ! तुम्हाला कितीही हसू आलं तरी त्याचं नाव हेच आहे, जादूगारांची नावं अशीच असतात.) भूतकाळाचं शेपूट वळवळ करणारं नसतं, तर 'सळसळ' करणारं असतं, किंबहुना ते शेपूट नसतं, 'शेपटा' असतो, 'डायन'चा ! बालवयापासून जादूची आवड असलेला बोबो, तऱ्हेतऱ्हेच्या पुस्तकांतून क्लृप्त्या शिकत असतो. ह्याच त्याच्या वाचनातून त्याला 'डायन'बद्दल - हडळींबद्दल कळतं. आणि एक हडळ त्याच्या आयुष्यात येतेही, त्याची आणि लहान बहिण 'मीशा'ची'केअर टेकर' म्हणून. ह्या केअर टेकर 'डायना' उर्फ 'लिसा दत्त' (कोंकणा सेन-शर्मा) वर बोबोचे वडील (पवन मल्होत्रा) लट्टू होतात आणि नंतर तिच्याशी लग्नही करतात. नाखुषीने, हे सगळं स्वीकारण्याचं बोबो नाटक करत असतो, पण त्याला डायनातील गडबड जाणवत असते. तो तिचं खरं रूप उघडकीस आणायचा खूप प्रयत्न करतो. त्यात त्याला थोडंफार यशही मिळते. तरी, अघटित घडतेच. डायन ज्यासाठी आलेली असते, ते ती करतेच आणि हाच भूतकाळ त्याला वारंवार सतावत असतो.
पुढे तीच हडळ 'लिसा दत्त', बोबोच्या आयुष्यात पुन्हा येते. का येते ? ती नेमकं काय करते ? हे चित्रपट पाहूनच कळावं, असं वाटतं. कारण ते पाहाण्यात जी मजा आहे, ती वाचण्यात किंवा ऐकण्यात नाहीच.

Ek-ThiDaayanPoster.jpg

सर्व पात्रांचा उत्कृष्ट अभिनय आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ह्यामुळे 'एक थी डायन' लक्षात राहतो. अनेक ठिकाणी आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, मुठी आवळल्या जाऊन घाम येतो. आपण खुर्चीच्या टोकापर्यंत पुढे सरकतो, डोळे फाडून बघतो.

कोंकणा सेन-शर्मा, आजच्या घडीच्या सर्वोत्कृष्ट अभितेत्रींपैकी - ज्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असाव्यात - आहे, ह्यावर तिची 'लिसा दत्त' शिक्कामोर्तब करते. साध्या साध्या संवादांत ती प्रचंड जान आणते. तिचे डोळे तिच्या शब्दांहून खूप जास्त बोलतात.

शाळेत एखादा हुशार मुलगा असतो, पण डफ्फळ मुलांच्या संगतीत राहून, तो द्वाड बनतो. त्याची हुशारी व्रात्यपणामध्ये खर्च होते. तसं काहीसं इम्रान हाशमीचं झालं आहे. मला आठवतंय, त्याचा 'फुटपाथ' मी माहीमच्या 'सिटीलाईट'मध्ये पाहिला होता, तेव्हा मला तो आवडला होता आणि मी मित्राला म्हणालो होतो की, "ह्याचे सगळे पिक्चर मी बघणारच !" पण पुढच्याच सिनेमापासून त्याने असा काही आचरट व्रात्यपणा सुरू केला की मी ताबडतोब माझे शब्द मागे घेतले होते. 'डायन'मधला जादुगार बोबो, इम्रानने चांगला वठवला आहे. पण तरी जित्याची खोड असल्यागत तो जरासं 'तोंड मारतो'च !

छोट्याश्या भूमिकेत कल्की कोचलिन छाप सोडते. मला तिचा तो उसवलेला चेहरा आणि एनिमिक शरीरयष्टी खरं तर पाहवत नाही, पण 'डायन'मध्ये ती खूपच सुसह्य वाटते.
हुमा कुरेशी सांगितलेलं काम चोख करते.

संगीत काही विशेष नाही. 'बेचारा दिल' ठीक-ठाक वाटतं.

आजपर्यंत अनेक भयपट, भूतपट आले आहेत. गेल्या काही वर्षांत - 'भूत'नंतर - बॉलीवूडमध्ये काही दिग्दर्शकांनी तर अश्या चित्रपटांसाठी स्वत:ला वाहूनच घेतलं आहे. पण ह्या सगळ्या भाऊगर्दीत 'डायन' सगळ्यात वेगळा आहे. का ? कारण, भयपट म्हणजे हिंसा किंवा बीभत्सपणा असंच नाही, हे 'डायन' सांगतो. ह्या चित्रपटात रक्ताचे पाट वाहात नाहीत. ज्यासाठी खरं तर प्रचंड 'स्कोप' होता. काही गोष्टी पटकथाकार-दिग्दर्शक न दाखवताच सांगून जातात ! इथे पडद्यावरील पात्रांना आरडाओरडा करावा लागत नाही. चित्रविचित्र चेहरे करावे लागत नाहीत. इथे निष्कारण, घणाघाती पार्श्वसंगीत नाही. हा चित्रपट एक 'जेन्युईन' भयपट आहे, जो प्रसंगांतून, घडणाऱ्या घटनांतून भयनिर्मिती करतो.

एकंदरीत, पटकथाकार व दिग्दर्शकाने खूप काळजीपूर्वक वेगळेपणा जपायचा प्रयत्न केला आहे, जो माझ्या मते यशस्वीही झाला आहे.

रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/04/ek-thi-daayan-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पयली.
Proud

बघायला पायजेल.

>>उसवलेला चेहरा आणि एनिमिक शरीरयष्>><< +१
खरे तर दाताडा चेहरा... आणि सफेद रंग... (गोरा नाही, सफेदच)

'एक थी डायन' च्या प्रमोशनकरता प्रदर्शित केलेली 'एक थी नायिका' हि 'लाईफ ओ.के'' वरची मालिका तशी फडतूस वाटली होती....पण हे परीक्षण काही वेगळच सांगतंय. बघावा लागणार एकदा हा सिनेमा!

एका चमत्कारी पद्धतीने मला हा चित्रपट काल बघता आला. सोनोग्राफी करून घ्या असे डॉक्ट्राने सांगितल्याने घाबरत घाबरत साडेनऊला डायग्नोस्टिक सेंटरची पायरी चढले. पण आज सर नही आयेंगे असे स्वागतिकेने सांगितल्याने बागडत बागडत कीर्तीमहल मध्ये जाऊन मस्त वडासांबार , चहा उपमा असा भरपेट नाश्ता केला. तरीही पावणेदहाच वाजले होते. शाळेत जाऊन फी भरायची व रि़झल्ट( आधी माहीत अस्लेलाच) घ्यायचा अशी कामे एक वाजता पोहोचून करायची होती. आता काय करावे? हपिसात जाऊन लॅप्टॉपचे तोंड बघायचा कंटाळा आला. तडमडत आर्म ऑल ला आले आणि तिकीट मिळते का ते बघू म्हणून सरकता जिना पकडला. तर नेमके ये शाम मसतानी मदहोश किये जाय. मुझे डोर कोई खींचे तेरीओर लिये जाय हेच गाणे लागले. चुडैल बुलारै देक तेरेकु असे मी मनाशी म्हट्ले. तिकीट्वाल्याने पण एटी का हंड्रेड विचारले मी म्हटले घाबरायचेच आहे तर स्टायलीत घाबरू! तर आत जाईपरेन्त सिनेमा सुरू झालेला.

बोबो द बॅफलर चा प्रयोग सुरू असतो. मला पण बोबो आणि मिशा ही दोन कुत्र्यांचीच नावे वाट्ली. पण दोघे मुलांनी मस्त कामे केली आहेत. बोबो चा भूतकाळ तो संमोहित झाल्यावर आपल्या नजरेसमोर येतो. रामसे बंधुद्वय, रामगोपाल वर्मा प्रकारचा हा सिनेमा नाही. साध्या साध्या रोजच्या घटनांमधून, मुले त्या घट्नांना किती वेगळ्या पद्धतीने आकलन करतात, त्यांच्या कल्पना शक्तीच्या आधारे परिस्थिती समजावून घेताना त्यांची कशी दमछाक होते आणि एक्ट्याने घाबरायला होते ते छान दाखविले आहे. नरका पर्यंत जाणारी लिफ्ट, स्टेप मदर अच्छी भी हो सकती है म्हणणारी निर्व्याज बालिका, काळ्या केसांची वेणी, भास, आभास, जुना मुंबईतला फ्लॅट, आख्यायिका यांचा
बिलीव्हेबल संगम दिग्दर्शकाने केला आहे.

हुमा कुरेशी फार मस्त दिसते, इम्रानला शोभते. बी ग्रेड सोडून ए ग्रेड चित्रपटांकडे इम्रानची वाटचाल चालू आहे हे स्पष्ट होते. त्याचा वावर सहज आणि कपडेपट नॉर्मल आहे. शो करताना तो स्टायलिश कपडे घालतो पण जादुगार सरकार दिसत नाही. हुमेचा आवाज व बोलण्याची पद्धत अगदी नैसर्गिक आहे. कत्रिना, प्रियांका सारखे प्लास्टिक, आंग्रजाळलेले उच्चार नाहीत.

कंकणा आपली आवडती अभिनेत्री आहे. नंदिता दास सारखीच भारतीय मातीतली वाट्ते. कुठल्याही रोलचे ती सोनेच करते. तिची रोखून बघण्याची स्टाइल चित्रपटात आपल्याला अस्वस्थ करते.
एका पालीला पण महत्त्वाचा रोल आहे. भयपट असल्याने पूर्ण सिनेमात एकदाही. घरात आलो. ट्यूब लावली, लक्ख प्रकाश पडला, सर्व वस्तू नीट दिसल्या, असे घड्त नाही. पण आपली तक्रार नाही.
मध्यंतरा पर्यंत अतिशय नीट पेस आहे. नंतर फार वेगाने व फार घटना घड्तात. स्पेशल इफेक्ट्स
मलातरी आवडले. कल्की घरच्या पार्टीत एक गाणे म्हणते ते आजकाल रोज एफ एम वर लावतात
पण ते जरा बोअरच आहे. अर्थात नव्या पिढीला आवडेल असे आहे. शाळेत वेळेवर जायचे असल्याने माझी शेवटची पाच- दहा मिनिटे मिस झाली. चुडैल का राज राजही रह गया. Happy

पुढे तीच हडळ 'लिसा दत्त', बोबोच्या आयुष्यात पुन्हा येते.

रसप. भूतपट, भयपट, रहस्यपट टुकार असो वा उच्च दर्जाचा. त्यात रहस्य असेल तर ते फोडू नये ही विनंती. वर्तमनापत्रात वाचलेल्या परीक्षणातून हेच रहस्य आहे असा समज झाला होता. तसं असेल तर चला दोन घटका टीपी म्हणून गेलं तरी या रहस्योद्घाटनानंतर हा सिनेमा बघण्यात आता काही अर्थ उरला असेल का ?
स्पॉईलर अ‍ॅलर्ट का नाही टाकत ? पुढच्या वेळी काळजी घ्यावी ही अपेक्षा.

.

.

.

.

.

ह्या केअर टेकर 'डायना' उर्फ 'लिसा दत्त' (कोंकणा सेन-शर्मा) वर बोबोचे वडील (पवन मल्होत्रा) लट्टू होतात

पुढे तीच हडळ 'लिसा दत्त', बोबोच्या आयुष्यात पुन्हा येते.

या वाक्यांमुळं शंका विचारली होती. आधीच्या प्रतिसादातही कोट केलंय. मी थांबतो.

बेताल भाषेबद्दल क्षमस्व.

ह्या केअर टेकर 'डायना' उर्फ 'लिसा दत्त' (कोंकणा सेन-शर्मा) वर बोबोचे वडील (पवन मल्होत्रा) लट्टू होतात

पुढे तीच हडळ 'लिसा दत्त', बोबोच्या आयुष्यात पुन्हा येते.

ह्यातुनही रहस्यभेद होत नाहीये.
विश्वास ठेवा!

अरेरे मी मिसलं सगळं...

रणजीत, तेच तर मला पहायची इच्छा आहे पण हिंमत नाही आणी उदय डोळे बंद केले तरी आवाज येतात त्याच काय करू? Sad

मस्त परीक्षण. कितीही भ्या वाटलं तरी बघणारच.
उसवलेला चेहरा आणि एनिमिक शरीरयष्टी >>>>>>>>>> प्रोमोज मधे कल्की ला बघितलं तेव्हा मला वाटलं की तिच डायन असेल म्हणुन. Happy

चुडैल बुलारै देक तेरेकु >> Proud
घाबरत घाबरत साडेनऊला डायग्नोस्टिक सेंटरची पायरी चढले. पण आज सर नही आयेंगे असे स्वागतिकेने सांगितल्याने बागडत बागडत कीर्तीमहल मध्ये जाऊन
>> अमा वन्ली यु कॅन डू इट.
मी असते तर रडत चडफडत डागदरला शिव्या घालून आजचे मरण पुन्हा उद्या आहेच अशा चेहर्‍याने हापीस गाठले असते आणि अजुन एक दिवस वाईट गेला असता.

उसवलेला चेहरा आणि एनिमिक शरीरयष्टी >> अगदी अगदी
समीक्षण मस्तच. रसप चे समीक्षण वाचुनच पिच्चर बघायची रिस्क घेतेय आजकाल.

परवाच डायन पाहीला. हा चित्रपट इतर भुतपटांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. कोंकणा सेन शर्मांच्या वडीलांच्या (मुकुल शर्मा) एका कथेवर आधारीत असल्याचं ऐकण्यात आलं. पण मला या चित्रपटाचा शेवट खटकला. शेवटापर्यंत इतका खिळवून ठेवणार्‍या या सिनेमाचा शेवट भट कँपातल्या भुतपटांसारखा का केला? कळायला मार्ग नाही.

आणखी एक गोष्ट... सबंध सिनेमात इतका अंधार करून ठेवलाय, की काहीवेळा पडद्यावर काय चाल्लयं हे नीटसं समजत देखील नाही.

छान लिहिलय, पहावासा वाटतोय.
या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी, तो एका सिनेअभिनेत्रीच्या आयूष्यावर आधारीत आहे असा स्टंट केला होता, तो मात्र मला क्रूर वाटला.

Pages