मुंगूस....भाग १

Submitted by प्रेमळ पारधी on 20 April, 2013 - 13:04

मुंगूस..

अगदी लहान होता तेव्हा पासून, का कोण जाणे पण त्याला मुंगूस या प्राण्याबद्दल एक वेगळंच आकर्षण होतं. मुंगसाचे लालबुंद डोळे त्याचा रंग, आकार आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मुंगसाची ती अखंड, अव्याहत सुरु असलेली अनामिक धावपळ!

गावी राहत होता तेव्हा क्वचित मागच्या परसात दिसायचा कधी मित्रांसोबत रानात फिरायला गेला कि झाडीतून खसफस करत पळताना आढळायचा. पुढे कधी तरी एकदा शाळेची ट्रीप प्राणीसंग्रहालयात गेली होती तिथे पण एका पिंजऱ्यात त्याला ते दिसलच. दुपारची वेळ होती, जवळपास सगळेच प्राणी पुढ्यात आलेल्या भोजनावर ताव मारून सुस्त झालेले होते. बारा महिन्याच्या आळशी मगरी-सुसरी सोडाच पण माकडे सुद्धा उन्हाच्या काहिलीने काहीशी मलूल होऊन शांत बसून राहिली होती. आणि अशा वातावरणात त्या शे दीडशे पिंजऱ्या पैकी एका कडेच्या पिंजऱ्यातलं ते मुंगूस मात्र अत्यंत वेगाने या टोका पासून त्या टोका पर्यंत अखंड फेऱ्या मारत होतं.

मुंगसाच्या पिंजऱ्या समोर येताच बाकीची पोरं ओरडायला लागली, "मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शप्पथ !" पण आता मधे तब्बल तीन युगे उलटून गेल्यामुळे त्या रामाच्या शपथे मधला प्रभाव संपला होता कि काय कोण जाणे, मुंगूस तोंड लपवून धावतच राहिलं. दोन पाच मिनिटांत कंटाळून बाकीची पोरं पुढच्या पिंजऱ्या कडे निघून गेली. पण याचा पाय तिथून निघेचना. पिंजऱ्या मधल्या मुंगसाच्या फेऱ्या आणि इकडे बाहेर याच्या मनातली अस्वस्थता दोन्ही वेगानं वाढू लागलं होतं. काय कारण असावं मुंगसाच्या या अशा वागण्यामागे? ही एवढी कसली सनातन अस्वस्थता उरात घेऊन फिरतोय हा? कधी आणि कसं आपल्याला याचं उत्तर मिळेल त्यापेक्षाही मुंगसाची ही अनामिक अस्वस्थता कधी आणि कशी शांत होईल? या विचारात मध्ये अनेक वर्ष उलटून गेली.

शहराच्या त्या बेफाट पसाऱ्यात, झगमगाटात आणि मुख्य म्हणजे नोकरीच्या धबडग्यात एव्हाना तो अनेक गोष्टी विसरून गेला होता. नवे घर, नवे मित्र, या सगळ्यामध्ये बुडून गेलेल्या, अगदी सुखात आहोत असं वाटणाऱ्या त्याला कधी तरी अचानक कसली आणि का हुरहूर लागायची कळायचं नाही. "ही कातरवेळ असलीच असते," अशी मनाची समजूत घालून तो उत्साह परत आणायचा खरं, पण आपण मनाची समजूत घातली आहे आपल्याला उत्तर मिळालेलं नाही हे तो आत कुठे तरी जाणून होता.

यथावकाश घरी लग्नाची बोलणी सुरु झाली, त्यानिमित्ताने कपाटात कुठेतरी पडलेली पत्रिका-कुंडली बाहेर आली. एकदा सहज गम्मत म्हणून आपली पत्रिका वाचायला बसला आणि थबकलाच. पत्रिकेमध्ये एके ठिकाणी चक्क "योनी - मुंगूस" असा उल्लेख! म्हणजे नेमकं काय हे घरात विचारल्यावर उत्तर मिळालं "अरे, म्हणजे मागच्या जन्मी तू मुंगूस होतास. "…

हातातून ती पत्रिका अलगद कधी गळून पडली त्यालाही कळल नाही. अचानक कशाची तरी एक जबरदस्त ओढ, एक हुरहूर त्याचं मन व्यापू लागली. परसात, रानात, प्राणी संग्रहालयात पाहिलेला तो छोटासा, झुपकेदार शेपटीचा, तांबूस-तपकिरी जीव आणि त्याची ती अनाहत अस्वस्थ होऊन सुरु असलेली धावपळ सारं सारं त्याच्या नजरेसमोर उभं ठाकलं. आपल्याला का त्याच्या बद्दल एवढी उत्सुकता एवढी ओढ वाटत होती याचा जणू उत्तरच त्याला मिळाल्या सारखं वाटलं. कोणाला पटो न पटो पण जन्मांतरीची ही नाळ आज देखील आपल्या मनात गारुड करून आहे. कितीही काहीही केलं तरी आपल्या मनातील हुरहूर का नाहीशी होत नाही याचा मूळ आपल्याला सापडलं कि काय या विचाराने तो आतपासून हलला. मुंगसाच्या नव्हे आता खुद्द आपल्या आयुष्यातील या अनादि अस्वस्थतेच कारण शोधून काढायचं या विचाराने त्याला झपाटून टाकलं. डोळ्यामध्ये अचानक जमा झालेले अश्रू कोणाला दिसू नयेत म्हणून त्याने तोंड फिरवलं आणि कुठून तरी दूर अज्ञातातून एक
आवाज ऐकू आला, …………….

"मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शप्पथ !"

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users