तुझ्या माझ्या आठवणींजवळ..

Submitted by बागेश्री on 20 April, 2013 - 03:25

तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....
भिंतींवरच्या पापुद्र्यांवर,
हात फिरवून पहा ना...

नव्हतंच का कधी काही
तू ही जपून ठेवावंसं,
जपलं असशीलच काही, तर
हलकेच उकलून पहा ना....

उष्ण उसासे, निसटलेले
त्वचेसारखेच मनाला, स्पर्शूनसे गेलेले
क्षणांचीच उब ती
आत जाणवून पहा ना..

हातांची हातांना घट्ट मिठी,
स्पर्शांचे स्पर्शाला होकार अन् नकार
थांबून जरा आज,
ती भाषा पडताळून पहा ना...

डोळ्यांच्या बाहूल्या,
पापण्यांचं लवणं,
कुठलीशी भावना
जपतच हसणं..
तुझ्या मनातलं हे बिंब
पुन्हा डोळ्यांत पहा ना...

तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....

-बागेश्री
ब्लॉग: वेणूसाहित्य venusahitya.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रियाशी सहमत आहे, पण तरीही कविता आवडली. आर्तता, ओढ, तुटलेपणाची जाणीव इत्यादी भावना सकसपणे आल्या आहेत असे वाटले. धन्यवाद.

तुझ्या माझ्या आठवणींजवळ,
तूही रेंगाळून पहा ना....
भिंतींवरच्या पापुद्र्यांवर,
हात फिरवून पहा ना...

हे जास्त आवडलं..

आवडेश Happy

उष्ण उसासे, निसटलेले
त्वचेसारखेच मनाला, स्पर्शूनसे गेलेले
क्षणांचीच उब ती
आत जाणवून पहा ना..

सुरेख
मला आवडली.

चांगली आहे कविता.

"नव्हतंच का कधी काही
तू ही जपून ठेवावंसं,
जपलं असशीलच काही, तर
हलकेच उकलून पहा ना...." >>> हे सर्वात आवडलं.

hmmmm

कविता खूपच सरळ सोट आणी छान आहे,
पण जसे सर्वजण अपेक्षिताहेत, तशी आणखीन एकदा, एक आणखीन . . . . .
कविता लिहुन पहाना . . . . : )