असा मी कसा मी निराळा निराळा

Submitted by उद्दाम हसेन on 15 April, 2013 - 14:39

नसे ओळखीचा तुझ्या मी जगाला
मशीदी मधे शोधतो विट्ठलाला

तुझ्याशी अबोला करायास जाता
तुझ्या लोचनांनी हसावे कशाला

मना रे, कशाला जळावे पुन्हा तू
पुन्हा आसवांनो जरा या घराला

नका कुंडलांनो दिवे मालवू रे
तिच्या सावलीला बघा घात झाला

कशाला पुरावा कशाला दुरावा
पहा, माफ केले तरी मी तुम्हांला *

तिचा शेर प्रत्येक जेथे असावा
करू द्या अशी शायरी शायराला **

असा मी कसा मी निराळा निराळा
स्वतः मीच धिक्कारतो रे स्वतःला

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला

- Kiran..

(माझी पहिलीच अ.गझल आहे. )

* नव्या द्विपदीची भर.
** दुसरी नवी भर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण, गझल तंत्र वगैरे जाणकार सांगतिल. एकुणात प्रयत्नं चांगला आहे.

'पुन्हा एकदा' चं ग्रामिण स्वरूप - पुन्यांदा ऐकलय. पण 'पुन्हांदा'?
कुंडलांची द्वीपदी बर्‍यापैकी वळसा घालून गेली. <<कि धिक्कारतो >> गझल लिहिताना र्‍हस्व-दीर्घाचा तोल संभाळायला(च) हवा नाही का?

मला अगदी आवडलेली द्वीपदी शेवटली. सुंदर आहे.

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला << व्वा ! व्वा! >>

वा किरणशेठ वा

सावलीच्या शेरात तेवढी अलामत भंगली बघा

बाकी उत्तमच आहेत सगळे खयाल
अभिव्यक्ती / मांडणी चारचौघांपेक्षा खूपच वेगळी आणि अतीशय सुखदही आहे

विठ्ठलाच्या शेरात खयाल जरा कमी सखोलतेने हातळला गेला आहे की काय असे वाटले म्हणजे दुसरी ओळ अप्रतीम आहे पण पहिली तिच्याशी एकजीव वाटत नाही (वैयक्तिक मत)
पण माझ्यमते शेर भन्नाट वेगळा/ नाविन्यपूर्ण झालाय मला आवडला

मक्ता हा या गझलेतला मला सर्वात जास्त आवडलेला शेर आहे (कडेलोट हा शब्द एकदातरी मी गझलेत वापरावा ही माझी जुनी इच्छा होती ती तुम्ही आज पूर्ण केलीत :))

असा मी कसा मी निराळा निराळा>>सर्वात जास्त अवडलेला मिसरा

धन्यवाद किरणशेठ

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला<<< अतिशय सुंदर शेर!

वैवकु, दाद तुमच्या सूचनांवर विचार करून मी बदल केले. पुन्यांदा हा दादतैचा शब्द वापरला. वैवकुने अलामत भंग लक्षात आणून दिली. नजरेतून सुटली होती. लक्षात आलीही नसती पुढेही. याबद्दल आभार.

अरविंद काका, नेहमीप्रमाणेच प्रोत्साहनाबद्दल आभार.

बेफिकीर
सर्वात पहिल्यांदा माफी आणि मैत्रीप्रस्ताव स्विकारल्याबद्दल आभार.

बेफिकीर
सर्वात पहिल्यांदा माफी आणि मैत्रीप्रस्ताव स्विकारल्याबद्दल आभार.<<<

गझलेवरील प्रामाणिक प्रेम हे प्रतिसादाचे प्रयोजन आहे. येथे माझा कोणीही मित्र वा शत्रू नाही, ना मी कोणाचा मित्र वा शत्रू आहे.

दादतै
कुंडलांचा शेर नंतर उलगडून सांगेन. कुणी त्याआधी उलगडून सांगितला तर आनंद होईल. (पहिलीच अ. गझल असल्याने जरा एक्साइटमेंत आहे Happy )

बदल मनातील गझलेला योग्य दिशेने घेवून जणारे !!!!!
आवडले

कशाला पुरावा कशाला दुरावा
अता माफ केले पहा मी तुम्हांला>>>>> वा वा ! सहज, थेट ! वा !!

शेवटचे ३ शेर सर्वात आवडले.

--------------------------------------------------------------------------
'पुन्यांदा' हा शब्द इतर शेरातील शब्दांच्या बाजाशी विसंगत वाटला.
वैम. कृगैन.

काका
हे ही पटलं. Wink

मंडळी. एकदा प्रकाशित गझलेत नंतर शेर घुसवले तर चालतं का ? मला तर उगाच घाई केल्यासारखं वाटूलागलंय.

किरण ही गझल आहे......मला कवितेतलेच काही कळत नाही तर गझलेतले काय घं$% समजणार ?? Uhoh

जे लिहिलेस ते छान लिहिले आहेस......

तिलकधारी आला आहे.

प्रथम प्रयत्न असल्यास ठीकठाक! मतला आणि पायथ्याला हे शेर अपेक्षा वाढवत आहेत.

तिलकधारी निघत आहे.

वैवकु
तुझ्या मुळंच लिहीली गझल. पुढे मागे जर कधी माझं नाव त्रिखंडात झालं, मला भेटायला रांगा लागल्या, मी जाईन तिथे ट्रॅफिक जॅम होऊ लागला आणि तिलकधारी सही घ्यायला आले तर सही देत देत मी ओबी व्हॅन्सना सांगेन कि माझा मित्र वैभु हाच मी गझल लिहीण्याची प्रेरणा आहे. ( या प्रतिसादातील माझा मित्र पासून पुढचं खात्रीने सत्यात उतरू शकेल, आधीचं वाचकांनी ठरवावं Lol )

किरण स्वतःही निघत आहे. Lol

नसे ओळखीचा तुझ्या मी जगाला
मशीदी मधे शोधतो विट्ठलाला<<<<<<<<<<

सुंदर मतला!

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला<<<<<<<<<<

लडिवाळ शेर!
अवांतर:
कडेलोट काफिया घेऊन गझल करायचा मोह होऊ लागला आहे!
गझललेखनास आमच्या हार्दिक शुभेच्छा किरणजी!

दादतै? (मला चालतं म्हणा...)

बदल आवडले.
... ते कुंडलांचं सांगच, बाबा. कुणीच धजावलं नाहीये. मला एकदम यडचापसारखं वाटतय.

वैभव(जोशी) गुर्जींनी एकदा दम भरला होता (की स्वातीबाईंनी? आठवत नाहीये. दम लक्षात आहे)... गझल लिहिण्याच्य सुरुवातीच्या काळात्(तरी) "अता" सारखी सूट घेऊ नका (more like घेतलीत तर याद राखा Happy ). पुढे पुढे एखादी विलक्षण सुंदर खयाल आहे अन "अता" शिवाय आता पर्यायच नाही... तेव्हा ठीकय.
ड्रायव्हिंग शिकण्याच्या काळात सगळेच्या सगळे नियम, काटेकोर पाळण्यामागचं हेच तत्वं असणार.

असो... माझा आगाऊपणा इथेच थांबवते.

असो... माझा आगाऊपणा इथेच थांबवते. >>

चुकलं तर दाखवून दिलंत म्हणून कळालं. मला तर आवडलं हे सगळंच. वैवकु / स्वातीतै यांनी भरलेला दम पण लक्षात ठेवीन. कुंडलांचा शेर उलगडून सांगतो.

विस्मयाजी - पर्यायी आवडला. घेतो बरं का. जशी आज्ञा.

या द्विपदीतला नायक नायिकेच्या सावलीची अपेक्षा करतो. ती काही त्याच्यासोबत नाही. इथे कल्पनाचमत्कृती म्हणून ती नसताना तिची सावली सोबत असण्याची कल्पना केली आहे. पण गंमत (विरोधाभास) अशी आहे कि सावलीसाठी कुठून तरी प्रकाश लागतो. आपला नायक कमनशिबी, शापित आहे हे सांगण्यासाठी इथे प्रकाशाचा स्त्रोत म्हणून त्याच्या कुंडलांचा (कर्णासारखा) वापर केलाय. सावलीसाठी मंद उजेड त्याच्याच कुंडलांचे दिवे देतात. पण आता हे दिवेही विझत चाललेत, मालवत चाललेत. त्या शेवटच्या क्षणीही तिच्या त्या सावलीमय अस्तित्वाला जपण्यासाठी तो कुंडलांना विनवणी करतोय. दिवे मालवले तर तिच्या सावलीचं अस्तित्व अंधारात विरून जाईल हे त्याला सहन होत नाहीये.

पहा बरं पटतंय का ?

धन्यवाद.

कर्दनकाळ काका ( हे नारायणराव पेशव्यांनी हाक मारल्यासारखं वाटतंय का ?)
मनापासून आभार आपले.

किरण, ते वैभव.... वैवकू नव्हेत. ते वैभव जोशी. मिळवून वाचावं असं ज्याचं लिखाण अन त्यातही गझल... गझल अन त्याचं लडिवाळ हे एक आयुष्यात पुन्हा पुन्हा अनुभवण्याचे, सुंदर करणारे क्षण आहेत.

कुंडलांवरच्या विवेचनासाठी खरच आभार.
अगदी खरं सांगायचं तर कर्णाच्या बाबतीत कुंती अन अगदी काहीच प्रमाणात द्रौपदी ह्या दोनच स्त्रिया त्याच्यातल्या "त्या"ला काही अर्थं देणार्‍या. जो अर्थं राधेनं, त्याच्या सूतमातेनं दिला तो लौकिक अर्थ नाकारण्यातच आयुष्यं गेलं त्याचं.
त्याची कुंडलं एक दिवस होती अन एक दिवस नव्हती अशी गेली आहेत... होती तेव्हा मऊ मवाळ झुरुमुरू प्रकाश कायम देत राहिली... गेली तेव्हा मंद-बिंद होत नाहीत... गेलीच.. त्यानं स्वहस्ते कापूनच काढलीत...

ह्या धर्तीवर... कुंडलांची सावली झालीच तर ती कुंतीलाच झाली असती. अन त्यातही मंद होत चालेला प्रकाश...
अर्थं इतका (म्हणजे खूपच) दुरान्वये लागतोय की... तुझं स्पष्टीकरण वाचूनही मी असा अर्थ घ्यायला का कू करतेय.
तुझ्या एका गोष्टीचं मात्रं अगदी मनापासून कौतुक, कीरण. इथे आलेले सगळे प्रतिसाद तू सरळ मनानं, शिकण्यासाठी घ्यावेत त्याच भूमिकेतून घेतो आहेस. काहीही सांगायला गेलं की भस्सकन गरळच अंगावर ओतणार्‍यांपासून वेगळा आहेस असं गृहीत धरतेय... नव्हे तसंच दिसतय.

असो.. जुन्या मायबोलीसारख्या गप्पाच झाल्या. लिहीत रहा, रे. मी आवर्जून वाचेन.

अरे बापरे !!!
वैभव जोशी म्हणताय का ? काय लिहीतात ते.... खतरनाक !

कर्णाचा उल्लेख झाला कि राधा आणि कुंतीच आठवतात हे अगदी खरं आहे दाद. महाभारत डोळ्यासमोर उभं राहतं. कर्णच का, भीष्माचा उल्लेख झाला तरी हेच होतं. माझे दोन आवडते नायक आहेत हे. या द्विपदीतला नायक कर्णाप्रमाणे कमनशिबी पण प्रेयसीच्या बाबतीत. त्याची कुंडलं मंद होत मालवत चाललीत म्हणजे त्याचे अखेरचे क्षण अशी कल्पना केली होती.

पण वाचकांच्या मनात कुंडलं, कर्णं याने प्रेयसी डोळ्यासमोर येऊ शकत नाही हे अगदी अगदी मान्य. मृत्युंजय, राधेयाचा पगडा आजही जबरदस्त आहे. जबरदस्त साहीत्यकृती आहेत या दोन्ही.

आता गझलेची गोडी लागली. (माझ्या गझलेत असा एखादा शेर गझलेत नकळत येणार, कितीही काळजी घेतली तरीही).

बाकि काय बोलू. भरून पावलो असंच वाटलं.

सर्वच मंडळींचे मनापासून आभार. खरंच गप्पा झाल्या.

कुठेही करावा कडेलोट माझा
नसावा तिचा गाव त्या पायथ्याला
>> अफ्फाट आहे हा शेर!!

किसी बात पर मै किसीसे खफा हूं
मै जिंदा हूं पर जिंदगी से खफा हूं

या मीटरमधे सहज गाता येतेय ही गझल Happy

Pages