सोपं नसतं झाड होणं

Submitted by -शाम on 15 April, 2013 - 09:19

सोपं नसतं झाड होणं
मातीमध्ये रुजून येणं
एका एका श्वासासाठी
आभाळाचं ऋण घेणं.... सोपं नसतं झाड होणं

सूर्य डोई घ्यावा लागतो
तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर
वारासुद्धा द्यावा लागतो

सोपं नसतं मागेल त्याला
मागेल ते ते देत जाणं.... सोपं नसतं झाड होणं

तळाखालच्या कातळाशी
लढता येत नाही
घाव दिले कोणी तरी
रडता येत नाही

सोपं नसतं ओठ शिवून
सगळं सोसत जाणं...सोपं नसतं झाड होणं

नव्यासाठी जुनं निमूट
सांडून द्यावं लागतं
ऋतू-ऋतू म्हणेल तसं
जगून घ्यावं लागतं

सोपं नसतं आयुष्याचं
खोल गाडून घेणं.... सोपं नसतं झाड होणं

.....................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून मी काही चांगलं लिहलंय
असं वाटत नाही.>>>>नाही हो छान लिहिलंय...
थेट आशय मांडणारी एक स्वच्छ अन् सहज कविता!

धन्यवाद दोस्तांनो ...!

प्रमोदकाका तुमच्यासाठी काय लिहू ... आशीर्वाद असावा इतकेच.
तुम्ही केलेलं काव्यवाचन खूप आवडलं .. मी थोपुवर शेअर केलयं....

सगळ्यांचे पुन:श्च आभार!!!!!

..................................शाम

आज, स्पृहाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून या कवितेचे अभिवाचन शेयर केले आहे. ते ऐकून माबोवर ही कविता वाचलीये हे आठवलं आणि हा धागा वर काढावासा वाटला.
फार सुंदर!

सुंदर ,, खरंच छान झालीय

मला फक्त एक बदल सुचवावासा वाटतोय

प्रत्येक उदाहरणादाखल त्याचे नाव आले असते तर अजून मजा आली असती .. जस कि , हा तुमचा मुखडा आहे ====
तळाखालच्या कातळाशी
लढता येत नाही
घाव दिले कोणी तरी
रडता येत नाही
सोपं नसतं ओठ शिवून
सगळं सोसत जाणं...सोपं नसतं झाड होणं

==========
तो असा असता तर ===
तळाखालच्या कातळाशी
लढता येत नाही
घाव दिले कोणी तरी
रडता येत नाही
सोपं नसतं ओठ शिवून
सगळं सोसत जाणं...सोपं नसतं कातळ होणं

==============

हलकेच घ्या ,, हि नम्र विनंती ...बदल सुचवलेले

माझे आत्तापर्यंत माबो वर खाते नव्हते. वाचनमात्रच होतो आत्तापावेतो.
पण ही रचना खाते उघडायला भाग पाडणारी झाली अगदी.. !

खूप खूप आवडलीये. धन्यवाद. Happy

Pages