सोपं नसतं झाड होणं

Submitted by -शाम on 15 April, 2013 - 09:19

सोपं नसतं झाड होणं
मातीमध्ये रुजून येणं
एका एका श्वासासाठी
आभाळाचं ऋण घेणं.... सोपं नसतं झाड होणं

सूर्य डोई घ्यावा लागतो
तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर
वारासुद्धा द्यावा लागतो

सोपं नसतं मागेल त्याला
मागेल ते ते देत जाणं.... सोपं नसतं झाड होणं

तळाखालच्या कातळाशी
लढता येत नाही
घाव दिले कोणी तरी
रडता येत नाही

सोपं नसतं ओठ शिवून
सगळं सोसत जाणं...सोपं नसतं झाड होणं

नव्यासाठी जुनं निमूट
सांडून द्यावं लागतं
ऋतू-ऋतू म्हणेल तसं
जगून घ्यावं लागतं

सोपं नसतं आयुष्याचं
खोल गाडून घेणं.... सोपं नसतं झाड होणं

.....................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली हे खरेच, पण 'शाम' या नावाकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाल्यासारखी वाटली नाही. उदाहरणार्थ, शीर्षकावरून 'आत काय मांडले असेल' अशी जी एक अपेक्षा निर्माण होते ते खरी ठरल्याचे पाहून वाईट वाटले, अधिक काहीतरी डचमळवणारे वाचायला मिळेल अशी एक आंतरिक अपेक्षा तुमच्यामुळे निर्माण झाली होती. धन्यवाद!

क्लासच.
शेवटच्या ओळीत सिक्सर हाणला.

सूर्य डोई घ्यावा लागतो
तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर
वारासुद्धा द्यावा लागतो

हे अचूक आहे.

शाम,कविता सुंदर आहे अन झाडाची असल्याने अपराधभावना जागवणारी आहे. योगायोगाने आजच प्रकाश हरी कार्लेकरांची झाड याच नावाची एक सुन्न करणारी कविता वाचली होती..

शाम, खूप खूप आवडली ही कविता. अख्खी कविता सओर बसून गप्पा मारल्यासारखी आहे. त्यातही हे -
सूर्य डोई घ्यावा लागतो
तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर
वारासुद्धा द्यावा लागतो
सोपं नसतं मागेल त्याला
मागेल ते ते देत जाणं....

तो झुळुकभर शब्दं भारी आवडला... मी वापरला कुठे तर तुमची सय आल्याविना रहाणार नाही.

वा ! सुरेखच!
>>>सूर्य डोई घ्यावा लागतो
तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर
वारासुद्धा द्यावा लागतो

...सोपं नसतं ओठ शिवून
सगळं सोसत जाणं...
......
ऋतू-ऋतू म्हणेल तसं
जगून घ्यावं लागतं<<< क्या बात है !

व्वा........ क्या बात है........ कविता प्रचंड आवडेश Happy

मस्तच आहे! एक झाड काय म्हणतं आहे म्हणून सरधोपट अर्थही आहे आणि झाड हे रूपक घेतलं तर दडलेले अर्थही आहेतच. सुरेख! पुलेशु!

कविता. छान आहे

----------------------------------------------------------------------------------------------------------------
"पण 'शाम' या नावाकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता झाल्यासारखी वाटली नाही"
बेफीजींच्या या विधानाशी बर्‍याच अंशी सहमत.

खूप खूप धन्यवाद दोस्तांनो!!!

सुश .. तुझे विशेष आभार!

बेफि, उकाका.. तुमची प्रतिक्रीया माझ्यासाठी खूप मोलाची आहे. खरेतर माझ्याही स्वतःकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणूनच तर अजून मी काही चांगलं लिहलंय असं वाटत नाही.

धन्यवाद!!

कविता आवडली. सहज, साधी अर्थपूर्ण आणि तरीही कसलाही आवेश नसलेली असल्याने मनाला भिडली...

Pages