द्वंद्व

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 12 April, 2013 - 01:24

dilemma (1).jpg

मी……
कावरीबावरी
पुन्हा…. !!
किती दिवस चालणार असं !!
किती दिवस गप्प बसायचं
मनातलं वादळ मनातच लपवायचं… !
तो आसूड फिरवत राहतो शब्दांचे.
अन् मी फक्त झेलत राहते घाव त्याचे.
त्याचं संकुचित जग
आणि तो स्वयंघोषित स्वामी.
का म्हणून स्विकारलीये मी….त्याची ही गुलामी !!
का सोसतेय हे क्लेश अतोनात
जुळवत राहते शब्द… फक्त मनातल्या मनात.
घायाळ होते मीच
त्याच्या शब्दानं आणि माझ्या मौनानं.
……...

आता दिवस, आठवडे त्याच विचारात जाणार
जीव सारखा कासाविस होणार
घुसमट माझीच होणार.
तो…..
तो बिनधास्त……
झालेल्या पडझडीपासून अगदी अलिप्त.
स्वत:च्याच विश्वात मस्त !
कधीतरी आठवण आली की येणार,
अन् पुरेशी विद्ध झालेय ह्याची खात्री करुनच जाणार…. !
आणि मी…..
मी त्या जखमेची मलमपट्टी करत
पुन्हा त्याचीच वाट पाहणार.
तो आला की तितक्याच आवेगाने
त्याच्या गळ्यात पडणार.
त्याचा अहं कुरवाळत
पुन्हा पुन्हा घायाळ होणार.
पुन्हा शब्द जिंकणार
आणि पुन्हा पुन्हा मौन हरणार.
…….
पुन्हा…….???
नाही…..!!
बास झालं.
मौनानं आता बोलायलाच हवं.
शब्दांना पराभूत करायलाच हवं.
मौनाची ताकद ओळखायला हवी,
शब्दांवर कुरघोडी करायलाच हवी.
…..
येईल का तो पुन्हा आज
शब्दांची घेवून तश्शीच मिजास
रेंगाळतोय दाराशी शब्दांचा वावर
मौनाचा झालाय ताबा अनावर
सलामी झालीये
तुंबळ युद्धाची
आता वाट फक्त…
दार ठोठावण्याची.
कधी शब्दांची माघार, कधी मौनाची हार
द्वंद्व मनाचं मनाशी, निरंतर सुरु राहणार.
मनाच्या समराला रोज सामोरं जायचं
कधी कुणाला जिंकवायचं….हे मात्र तुम्हीच ठरवायचं.

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम
१)मुक्तछंदात यमके किती त्यांची जागा कुठे(नेमक्या अंतरावर) ठेवायची ती जागा बदलत कशी ठेवायची
२)ओळी किती लांबीच्या करायच्या व कुठे तोडायच्या
३)कडवी कुठेकुठे बदलायची ...वळ्णे घेतघेत .....प्रस्तावनेनेंतर ....कसा उत्तम समारोप साधायचा

या सर्वांचे अतीशय नेमके व इच्छुकाना काहीतरी जिथे शिकता येईल असे उदाहरण म्हणजे तुमची ही उत्तम कविता होय !!
आशयविशय , काव्यात्मकताही लाजवबच !

असो
चू भू द्या घ्या

मला माझाच एक आगामी गझलेतला शेर आठवला

बरेच काही मनात आहे
तुझा अबोला भरात आहे

आपला नम्र
~वैवकु

आपल्या कवितेनं सध्या एक वेगळंच पण छान वळण घेतलंय. मस्त !! Happy

हे अगदी सुरेख.........
जुळवत राहते शब्द… फक्त मनातल्या मनात.
घायाळ होते मीच
त्याच्या शब्दानं आणि माझ्या मौनानं.

तो बिनधास्त……
झालेल्या पडझडीपासून अगदी अलिप्त.
स्वत:च्याच विश्वात मस्त !
कधीतरी आठवण आली की येणार,
अन् पुरेशी विद्ध झालेय ह्याची खात्री करुनच जाणार…. !

कधी शब्दांची माघार, कधी मौनाची हार
द्वंद्व मनाचं मनाशी, निरंतर सुरु राहणार.
मनाच्या समराला रोज सामोरं जायचं
कधी कुणाला जिंकवायचं….हे मात्र तुम्हीच ठरवायचं.

अज्ञात......मी सुद्धा तुमच्याशी सहमत आहे Happy आजकाल वेगळंच काही उतरतंय Happy